१४)स्वारी पेरजागढाची...
तिरीपीचा सूर्य केव्हाच वर निघून गेला. तरी माझी झोपेतून उठायची वेळ होईना.चुलीवरचा चहा कधीचं थंड पडून गेला होता, आणि सकाळचे आठ वाजले तरी उठायचं नाव नाही.म्हणून काकूने अंगावरील चादर ओढली, इतकं कुणी झोपतोय का... जा तोंड धुवून घे आधी... चहा थंड पडून गेल कवाचं.
माझ्यासाठी गावाकडची मजा म्हणजे पहिल्यांदाच झाली होती. त्यामुळे पहिल्यांदा मला फार नवल वाटलं होतं. कारण आपल्याकडची सकाळ म्हणजे फक्त माझी रूम, त्या पलीकडे असलेला सूर्यनारायण बघणे कधी आयुष्यात जमलेच नाही. सगळे काही आवरता आवरता 10 केव्हा वाजून जायचे कळायचेच नाही. जेवण करून कुठे बाहेर निघावं म्हटलं तर अर्धा दिवस घरीच निघालेला असायचा. आणि इथे शेवट मीच उरलो होतो. सगळे केव्हा तयार होऊन माझी वाट बघत बसले होते. बहुदा हेच कारण असावं की खेड्यातले लोक मजबूत काठीने खूप काळ स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतात.
सगळे मिळून जेवण केल्यानंतर सगळे आपापल्या कामाला निघून गेले आणि मी पण स्वतःची बॅग भरून निघालो पेरजागढ फिरायला.गावापासून दोन ते तीन किलोमीटर लांब होतं त्यामुळे पायी पायी त्या वाटेपाशी आलो. तिथे गेटवरच पेरजागढ सात बहिणींचा डोंगर म्हणून नाव लिहिलं होतं. आणि बाजूलाच जंगल प्रशासनाने लावलेला सूचनाफलक होता,की जंगलांमध्ये वाघ बिबट अस्वल व अन्य वन्य जनावरांचा वावर असल्यामुळे कृपया जंगलामध्ये प्रवेश करू नये.
कच्चा खडकाळ रस्ता होता आणि वर जंगलात जाताना लुप्त पावत चालला होता.पण माझं काही वेगळंच होतं. रस्त्यावरूनच पेरजागडाची प्रतिमा अगदी अप्रतिम रूपाने दिसत होती. आणि मी एक स्मित पसरवून वाट चालण्यास सुरुवात केली.
गावापासून झुडपी जंगलाचा वावर होता, आणि सतत कोणी धनगर किंवा सरपण गोळा करणाऱ्या महिला असायच्या त्यामुळे मला पाहिजे तेवढी भीती वाटत नव्हती.पण जसजसं जंगलात आत मी जात होतो तसतसे ते जंगल भयानक रौद्र रूप धारण करीत होतं. उंच उंच वृक्षांची रेल चेल सुरू झाली होती. त्यामुळे एखाद्या वाळक्या काटकीचा पायाखाली आवाज सुद्धा चेहऱ्यावर घाम ओसांडून टाकत होता.
जंगलातलं एक वेगळं अस्तित्व असतं. जंगलात प्रत्येक पावलावर असलेली भीती प्रत्येक जनावरांना सुद्धा असते. म्हणतात ना धावपळ केल्याशिवाय कुणाचं सुख पायाशी लोळण घालत नाही. तसेच तिथे जंगलात पण असतं. प्रत्येकाला स्वतःचा जीवन जपून घेण्यासाठी धावपळ करावी लागते. कारण हरीन धावपळ करते की आज जास्त जोरात पळाली तर स्वतः काही दिवस सुखाने जगेल पण तिच्या मागे धावणारा वाघ सुद्धा तोच विचार करतो की मी जरा जोराने पळालो तर सुखाने शिकार खात बसणार अर्थात धावपळ प्रत्येकाचीच आहे.
रस्त्याने जात असताना अचानकच मी ओरडलो कारण एक विशाल काय साप रस्त्यावर निपचीत पडून होता.मागच्या वेळेला मी जो साप बघितला होता तो यापेक्षा कितीतरी मोठा होता कारण तो द्रव्यावरचा पहारेकरी होता. अजगर असेल म्हणून मी त्याचे फोटोज् माझ्या मोबाईलवर घेतले पण नंतर कळलं की तो अजगर नसून ब्लडरेटल स्नेक आहे.गाव त्याला "रकतटवऱ्या" असं म्हणतात आणि मी बघितलेला सात ते आठ फुटाचा तो बराच मोठा साप होता.तसा त्याच्या रक्ताचा थेंब सुद्धा विषारी आहे आणि मांसाहारी असल्यामुळे तो हल्लाही करतो. म्हणून मला माहित झाले. पण त्याने माझ्यावर कसलाच हल्ला केला नाही, आणि परत येताना तो मला दिसला सुद्धा नाही.
कितीतरी वेळ असा एकटाच मी चालत होतो आणि निसर्गाचा आस्वाद घेत होतो. निरनिराळे फुलपाखरू,अनेक पक्षांची चित्र विचित्र आवाज,वेगवेगळ्या वनस्पती जवळपास दोन किलोमीटर चालून झाले असेल.दुरूनच पेरजागडाचे खालचे मंदिर दिसू लागले, आणि आतमध्ये काही जणांची हालचाल दिसू लागली.
कसा आहे सोबतीला कुणी असलं, की समोर असलेल्या भीतीला सावरायची हिंमत दुप्पट होते.ज्यामुळे बोलण्याचालण्यात किंवा इतर गोष्टीत एकटं वाटत नाही. पण आता होतेच कोण सोबतीला. रहस्य उलगडण्यापूर्वी प्रत्येक जण आपल्याला असं कोड्यात ठेवून निघून गेला होता. आणि आता जे करायचं होतं ते आता मीच करणार असं मनाशी निश्चय करून मी गेटच्या आत मध्ये पाऊल टाकले.
कुणीतरी मुले मजा घेण्यासाठी तिथे आले होते.बाजूलाच कडुनिंबाच्या झाडाखाली त्यांची गाडी थांबलेली होती. आणि मंदिरासमोरच्या आवारात दगडांच्या चुली पेटलेल्या दिसत होत्या. मी त्यांच्याशी बोललो वगैरे नाही आणि सरळ मंदिरात चालला गेलो.दहा मिनिटे तिथे बसून आपल्या मित्रांची आठवण करू लागलो. कारण जेव्हा आम्ही सगळे एकत्र यायचो तेव्हा कुठे ना कुठे भटकंती पक्की. जिथे तिथे फिरायचं, गप्पा मारत मस्ती करायचो.
पण आज फक्त आठवणींच गाठोड माझ्या हृदयात जमा होतं. जीवाला जीव लावणारी मित्र असा हा एकटा जीव सोडून एकांत करून जातील असं कधीच वाटलं नव्हतं मला.आजही त्या मैत्रीची काळजात वारं घालत होती आणि आपण त्यांच्यासाठी येथे आलोय हे लक्षात आलं.
उठलो... क्षणभर आवारात इकडे तिकडे बघितलं. कोणीच नव्हतं. कारण स्थान जंगलात असल्यामुळे सहसा येथे कोणी फिरकत नाही. आणि यात्रा फक्त शिवरात्रीच्या वेळेस असते. त्यामुळे इतर दिवसात इथे काय घडतय त्याबद्दल कुणालाच काही माहिती नाही. गडावर जाण्याच्या मार्गावर उभा झालो. कृपया दारू मांस सेवन करून जाऊ नये. मासिक पाळी असलेल्या महिलांनी कृपया चढू नये. असे स्पष्टपणे तिथे लिहून ठेवलं होतं.थोडक्यात वाचला आणि निघू लागलो जवळपास 25 ते 30 पायऱ्या सिमेंटच्या बांधकामात होत्या. गेटच्या मागे छोटा बांधकाम केलेलं हनुमान मंदिर होतं.क्षणभर त्याला दंडवत केल्याप्रमाणे हात जोडले आणि निघू लागलो. दोन्ही बाजूला असलेलं घनदाट जंगल आणि मध्यंतरी दगडांचे घरंगळत असणारी अरुंद पाऊल वाट चालताना दगड घरंगळण्याचा आवाज मात्र व्हायचा.आतापर्यंत असलेली रानातली कुजबूज केव्हाच बंद झाली होती. इतकी भयानक शांतता पसरली होती की साधा सरडा त्यावरून चालत गेला तरी वाघाची चाहूल लागल्यागत मी तिकडे बघायचं.
इतका वेळ चढण चढत असल्यामुळे जरा धाप लागली होती. म्हणून बसण्यासाठी जागा बघायला लागलो. आणि समोर गणपतीची मूर्ती स्थापित केलेली मला दिसली. तिथे मूर्तीच्या मागे एका दगडावर मी थोडी विश्रांती घेतली. पाणी वगैरे पिले आणि परत दगडांची ती पायवाट चढण्यास सुरुवात केली. इतक्या घनदाट जंगलात असलेली ही भयानक शांतता नक्कीच कसल्यातरी अस्तित्वाचा मला सारखा भास करुन देत होती.नक्की कशाचा यावेळी तरी सांगू शकत नव्हतो. फक्त कुठून पक्षाचे सुरेल संगीत कानावर ऐकू येत होतं. पण गडाच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत मला कुठलाच पक्षी किंवा एखादा फुलपाखरू आढळला नाही.
शेवटी मजल दर मजल करत धापा टाकीत बाजूला असणार्या दगडांचा किंवा झाडांचा आधार घेत मी पायथ्याशी आलो.दोन ते तीन मोठ्या शिळा समोर ठेवलेल्या होत्या. त्यावर चढून मान उंचावून शिखराकडे बघु लागलो. कित्येक जागी मधमाशांचे पोळे होते. यावरून एक आठवलं की ही पोळे खाण्यासाठी अस्वल येथेच असते दऱ्याखोऱ्यात.
पायथ्याशी पोहोचल्यानंतर डाव्या बाजूला जलकुंभ आहे.तिथेच दगडावर जलकुंभ आणि खाली दिशा सूचक बान दाखवलेला आहे. हे एक तिथलं वैशिष्ट इतक्या उंचावर असूनही पाणी कधी कमी होत नाही. हे फार आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे.तिथून पाणी पिऊन घेतल्यानंतर मी मग पुढचा प्रवास करण्यासाठी निघालो आणि दगडांची ती ठेवण बघून मला आश्चर्याचा आभास होत होता.
थोडा समोर गेल्यावर एक छोटीशी खोली डाव्या बाजूला होती. काय आहे ?म्हणून मी तिच्या पाशी गेलो कारण ताला वगैरे असं काही लावलेलं नव्हतं.उघडल्यावर आत फक्त काळोख तेवढा उरलेला होता. आणि वटवाघळे तिथे फार प्रमाणात होते. त्यामुळे मी फार आत जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि परत आलो. पण ती खोली फार वेगळ्या पद्धतीने बांधली होती जेणेकरून तिथे कुणी रहात असावे या पद्धतीने. दगडांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेला दगड विटांचे बांधकाम करून एक रूम तयार केली होती. ज्यामुळे कुणालाही अगदी आत मध्ये एखादं घर असल्यासारखं वाटायचं. असो ते फक्त कुतूहल होतं.
पण आता हळूहळू मी डोंगर चढायला लागलो होतो.हळूहळू आजूबाजूचे जंगल आता खाली जाऊ लागलं होतं आणि मी उंच चढत जात होतो.कोपऱ्यावर एक छोटीशी दत्तात्रेयाची मूर्ती होती. आणि आपण आता उंचावर येत आहोत याची जाणीव होत होती. सभोवतालचा परिसर दिसू लागलं होतं. नमस्कार करून मी वर चढायला लागलो तर जवळच्या डाव्या बाजूला एक नागोबाची मूर्ती होती. त्याच्या पाया पडून मी पुन्हा सामोरे जाऊ लागलो.
आतापर्यंत मी फक्त चढण चढत होतो पण आता उघड शिड्या होत्या आणि तिथून त्या चालू झाल्या होत्या.त्याच्या उजव्या बाजूला एक वाघोबाची छोटीशी मूर्ती स्थापित केली होती आणि मागेच सांगितले की हीच ती जागा आहे. त्याच्याखाली वाघाचे वास्तव्य असते. सतत मी थोडक्यात एका मोठ्या दगडावर उभा होऊन जरा वाकुन बघू लागलो.तर खाली असलेली दरी थोडी फार फक्त दिसत होती. खाली पाण्याच्या आधाराने असलेली माकडे मात्र झाडावर जिकडे तिकडे उड्या मारत होते.
30 ते 40 शिड्या चढल्यानंतर सात बहिणींचे ते छोटेसे देवस्थान दिसलं ज्याच्या नावाने ते गड होतं. पण यावेळेस तिथे पूजा करायला किंवा तिचे गीत गायला कोणी नव्हते. मी एकटाच त्या गडावर होतो. दगडांमध्ये उमटवलेल्या त्यांच्या छव्या होत्या.अलीकडे भाविकांचे एक चांगल्या प्रकारे असलेले श्रद्धा स्थान असल्यामुळे तेथे दानपेटीची आणि नवीन मुर्त्यांची पण सोय झाली होती. त्या दगडांच्या भोवताल एक कठडा पण उभारला होता.ज्यामुळे कुणी श्रध्देची नास्तिक अवहेलना करू नये म्हणून. दगडांमध्ये असलेल्या त्या सातही बहिणींचे दर्शन घेऊन मी समोर असलेल्या मोकळ्या दगडांवर जाऊन बसलो.
आजूबाजूचा सभोवार प्रदेश, हिरवंगार रान, डोंगर-दऱ्या, तलाव, छोटी-छोटी जंगलात असलेली गावे अशी स्पष्टपणे दिसत होती.एकच छान ते दृश्य होतं की त्यावरून माझी नजर हटत नव्हती. असं वाटत होतं की एखाद्या ढगावर उडी मारून घ्यावी आणि संबंध रान फिरून यावं.
पाच-दहा मिनिटांचा डोळ्यांना आस्वाद घेऊन मी मग उजव्या बाजूला गडावर जाणाऱ्या रस्त्याला लागलो. गडाच्या काठाकाठाने पाऊलवाट चाललेली होती. दगडे अशा पद्धतीने तिथे वसलेले होते की ज्यांचा तोल कधीही जाऊ शकतो. कारण कित्येक बाजूने ते गड उघड्या प्रमाणे पडले होते. आतमध्ये एकदम पोकळ असल्यासारखे. काही अंतर गेल्यावर एक पहिला कोपरा लागला. दुरून बघताना आपल्याला त्या कोपऱ्याची जाणीव होत नाही. कारण नजरेला समांतर असलेला तो कोपरा आधाराने अडकून पडलेला होता आणि हिरव्यागार गवताने आपली पालवी विस्तारून त्याला झाकून टाकले होते. त्यामुळे समोर दरी आहे हे आपल्याला जवळ गेल्याशिवाय माहिती होत नाही.
हे खरच भीतीदायक आहे... मी स्वतःशीच म्हटलं. कारण खाली बघताना माणूस वाचण्याची शक्यता तर कमीच, पण तो सापडणे देखील कठीण आहे. याची वाच्यता येत होती. फक्त वडाच्या पारंब्यांनी दगड घट्ट पकडल्यागत आपली मुळे जिथे-तिथे पसरवली होती.
चालताना फक्त नजरेत भरत होतं ते दगडाचे उंचच-उंच दगडमहाल. कारण ते उभं होतं, असं काही संतुलन असल्यासारखं. प्रत्येक लहान दगडांनी मोठ्या दगडांना अडकवून ठेवलं होतं. प्रत्येक दगड एकमेकांना घट्ट पकडून असल्यासारखं होतं. सारखी रस्ते तयार झाली होती आणि अशी कितीतरी रस्ते चालताना रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या स्थितीत होते. त्यामुळे सारखी अस्वलाची भीती मला जाणवत होती असल्या खोऱ्यात जास्त करून तिचे अस्तित्व असायचे.
वाघापेक्षा अस्वलही फार हिंसक जनावराची जात आहे. कारण भीतीपोटी वाघ सुद्धा शिकार सोडून पळून जातो, पण अस्वल मात्र घाबरत नाही. लोखंडाचा आधार घेऊन आपल्या शरीराची हाडे फोडली जातात पण तिच्या नखात अशी काय ताकद असते, की ती आपलं डोकं सुद्धा फोडून टाकू शकते. त्यामुळे अस्वलाला फार प्रमाणात भीत असतात.
थोडा आणखी सामोरे गेल्यावर एक खोल दरी आली मला वाटते यालाच "हत्तीखोयाळ" म्हणतात. तर कदाचित तो हाच असावा... पूर्वी लोक एखाद्या विशिष्ट वस्तूला व्यक्तीला त्याच्या त्या कारणावरून नाव द्यायचे. आता ही एक त्यातलीच गणना होती. एक हत्ती आरामात खाली जाऊ शकत होता, ज्यामुळे त्याला कदाचित असे नाव असायला पाहिजे असे मला वाटते. कारण अत्यंत खोल असणारी ती दरी तेवढेच निरुंद अशी वाटत होती. आणि आत मधून तशी ती वाढतच गेल्यामुळे वरच्या बाजूने आत मधलं असं काहीच दिसत नव्हतं.
गडावर जायची पाऊलवाट मात्र आपल्याला तिथून फिरून जावे लागते. तसं त्या दरीची खोलाई वरून इतकी खोल वाटत होती की जणू ते कुठेतरी जाण्याचा मार्ग असावा असं वाटत होतं. आणि दरी वरून जाताना रस्ता म्हणजे दरीत अडकलेली मोठी मोठी दगडे होती. तिथून तो रस्ता मी पार केला, आणि समोर आपली वाट चालण्यास सुरुवात केली. कारण आता गडावर जायची वाट आता जवळच आली होती. आणि आतापर्यंत अर्धा मैल गडाची मी पायपीट केव्हाच केली होती. हत्तीखोयाळ पासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर एक कोपरा लागला. ज्यात मागे मी सांगितल्याप्रमाणे एक विशालकाय दगड आपल्या वाटेतच समतोल होऊन पडला आहे. आधीच दगडांचं विस्तीर्ण आश्चर्य बघून कुणीही थक्क होऊन जाईल. आणि त्यात भर म्हणजे पुन्हा बॅलन्स झालेले दगड. एका छोट्याशा दगडाच्या आधाराने त्याला थांबवून ठेवलं होतं. बघणाऱ्याला या पद्धतीत वाटत होते की जणू तो दगड आत्ता घसरेल की नंतर घसरेल, पण इतके वादळ येऊनही त्या दगडाची भूमिका जशीच्या तशीच आहे आजतागायत.
निसर्गाचे रूप विविध तऱ्हेने या जगात उपलब्ध आहेत याची जाणीव या हाडामासाचा माणूस कधी करणार नाही. कारण निसर्ग म्हणजे एक नियम आहे. एक प्रकारचा देव आहे, ज्याचे महत्व माझ्यामते आज तरी माणूस समजलं नाही आहे. फक्त ओली दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच कळत नाही.
संतुलन असलेल्या दगडापासून तरी गड चढण्याच्या शिड्या अजून दहा मिनिटांचे अंतर मागते. आणि एक शेवटची कॉर्नर असते त्या कोपर्यात. वरून एकदम अरूंद अशी पाऊलवाट आहे. कारण घसरणीचा भाग असल्यामुळे आपल्याला फार सांभाळून जावे लागते. जर प्रतिव्यक्ती समोरून येणारा असेल तर दोघांपैकी कुणा एकाला तरी थांबावं लागतं. हा शेवटचा टप्पा आहे, तिथून उभारत असलेल्या पाच ते दहा दगडामधे कोरलेल्या शिड्या आहेत या थेट आपल्याला गडावर घेऊन जातात.
गर्दी तर कुणाचीच नव्हती, पण जरा भीतभीतच मी गडावर चढलो होतो. कारण थंडीचे दिवस अजून संपले नव्हते. थोडी-थोडी झाडांची पाने मात्र गळायला लागली होती. पण डोंगराळ कपाळावर असलेली कुरणे अजून तरी पिवळसर हिरवी होती. कुराणांमधून एक छोटीशी पायवाट रमलेली होती. मी त्या पायवाटेने जरा भीतभीतच सामोरी जात होतो. तिथे सहसा कोणत्या जनावराची भिती नव्हती. पण माणूस जेव्हा एकटा असतो ना तर एक हवेचा झोका पण त्याच्या अंगावर काटा उभा करतो, आणि आधीच मी त्यात नवीन.
समोर तो रस्ता एका मंदिरापाशी येऊन थांबला. मंदिर ते बंद होतं आत मध्ये तसं काहीच नव्हतं. पूर्वी म्हणे याच मंदिरात काही मूर्त्या होत्या, पण कालांतराने आत मधले सगळे दैवत्व बाहेरच स्थापित केल्या गेलं. एका पाषाणावर शिव शंकराची मूर्ती तयार केली होती. बाजूलाच नंदीबैलाची वगैरे अशा दोन तीन मुर्त्या मंदिरा समोरच्या प्रांगणात होत्या. त्यांचे दर्शन घेऊन मी काठावर असलेल्या बाजूला गेलो तर दुरवरचा प्रदेश स्वच्छपणे डोळ्यात दिसत होता. पायी येताना सोनापूर आपण किती मागे सोडले याची जाणीव झाली. पुन्हा सोनापूरच्या जवळपास असलेले काही गाव पण दिसत होते.
इतक्यात कुणीतरी एखादी महिला रडत असल्यासारखा आवाज येत होता. मी थोडा वाकुन बाजूच्या झाडीच्या खाली बघू लागलो. कारण त्यातूनच तो आवाज येत होता. जवळपास कुठेतरी अस्वल होतं, इतकं मात्र नक्कीच. म्हणून कसलाही आवाज न करता मी गुपचूप काठाकाठाने तिकडे भावाची डोंगरी म्हणतात त्या बाजूला गेलो. मागच्या वेळेला काही लोकांनी लवकर उतरण्यासाठी एक खिंड आहे म्हटलं तिथे गेलो.
जंगलाचं विविध रूप तिथे दिसत होतं. आणि कोसळलं डोंगर सुद्धा अगदी डोळ्यात दिसत होतं. काठाकाठाने चालत मग एका दगडापाशी आलो, ती एक छोटीशी विहीर असल्यासारखी होती. ज्यात मध्यभागी एक दगड होता. मागे काकानेच मला सांगितलं होतं, की बहिणींचा अस्तित्व असताना त्या इथे आंघोळ करायच्या. खरंतर इतक्या उंचावर पाणी असणे म्हणजे ही एक आश्चर्याचीच गोष्ट होती. आणि त्यात आंघोळ म्हणजे त्याहून नवल. म्हणून मी ती गोष्ट फेटाळून लावली होती. पण ते स्थळ फेटाळून लावता येत नव्हते. त्या वेळेस मला वाटलं.
देवस्थानाला भेट देणाऱ्यापैकी काही लोकांनी दिलेल्या मूर्तीची स्थापना, तिथे एक दोन ठिकाणी दिसली. त्या जलाशयापासून अख्ख्या पर्वतरांगा दिसत होत्या. मुक्ताईला असलेली डोंगररांग पेरजागडावरून विशाल काय होत गेलेली होती. ही डोंगररांग थोड्याफार प्रमाणात घोडाझरी तलाव आपल्याला दिसत होता तिथपर्यंत दिसते.बऱ्याच जंगलाचा दर्शन इथून मोकळेपणानं करता येत होतं. त्यामुळे काठावर असलेल्या एका छोट्याशा दगडावर बसून मी एका निर्विकार नजरेने त्या जंगलाकडे बघत होतो. आकाशातलं ऊन सावलीचा खेळ बघून गमतीशीर वाटायचं. ढगांची ती छाया काही काही भागात अक्राविक्राळ रूप दाखवायची. पण माझ्या मनात एक निराळाच चक्र चालू होता.
कारण आज आपण गडावर आलोय, पण यातलं मला काहीच कळण्यासारखं वाटलं नव्हतं. कारण ज्या रहस्याचा उलगडा करायचं होतं. तिथे फक्त माझी दृष्टी जात होती आणि ती पण नाहीच्याबरोबर. मी जिथे बसून होतो तिथूनच काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा म्हणून, मी बॅग काढली. पाण्याची बॉटल काढून दोन ते तीन घोट घशात कोंबले आणि ते ताम्रपत्र बाहेर काढून, त्यावरचे निशान बघू लागलो. मी जिथे बसून आहे त्याची नोंद घेतली.
कारण जिथे मी बसून होतो. तो पेरजागडाचा तुकडा अगदी निर्विकारपणे अलग काढावा तर तीन संभाव्य चिन्ह माझ्या समोर उपस्थित झाले होते. ज्या बाजूला सारंगडचा तलाव दिसून येत होता. त्या बाजूला एक शंखाची कलाकृती दिसत होती. आणि मधल्या विस्तीर्ण जंगलाच्या परिसरात एक आदिमानवाची कलाकृती होती. आणि तिसर्या बाजूला भावाची डोंगरी असते त्या बाजूला ती त्रिशुलाची कलाकृती होती. आणि त्यातच त्यांच्या ही वरच्या बाजूला एका मोठ्या माणसाची कलाकृती दिसत होती. अशा बऱ्याच कलाकृती दिसत होत्या. पण अजूनही मला त्याचा उलगडा होत नव्हता.कुठे लाल चिन्हाची खून होती तर कुठे कुठे गोल वर्तुळात चौकोन कोरला गेला होता. एकीकडे विस्तीर्ण जंगल माझ्या डोळ्यासमोर उभा होता आणि त्यातच त्याचं एक रूप माझ्या हातात होतं.
त्यां नक्षात बऱ्याच काही कलाकृती दाखवत होत्या.पण त्यांचं काय करावं? हेच मला समजत नव्हतं. तितक्यात बाजूच्या खडकावर काहीतरी हालचाल झाल्यासारखं मला जाणवलं. आणि नक्षा कोंबून बॅगेत टाकला. तसं इतक्यात झालेल्या मृत्यूच्या प्रसंगाने माझ्यातली भीती फारच प्रमाणात घालवली होती. पण मी काही देव माणूस नव्हतो. त्यामुळे मग सभोवार नजर पसरवली. तो फक्त एक आभास आहे लक्षात आलं, आणि मी परतीचा मार्ग पत्करला.
बाहेरूनच बघितल्यावर असं कधीच वाटलं नव्हतं, की गडाच्या वर एखादं गाव बसेल इतकी सपाट जागा आहे म्हणून.पण त्यात मातीचा अंश फार कमी प्रमाणात होता. सगळ्यात जास्त दगडांचा त्यात समावेश होता. मध्यंतरी झाडाझुडपांची काही मात्रा होती. ज्यामुळे गडाच्या त्या पलीकडल्या भागात यावेळेस एकटेदुकटे तरी जायची हिंमत नव्हती. त्यामुळे कसलाही विचार न करता मी गवतातून वाट काढत मंदिराच्या समोर आलो.
शेवटच्या अगदी महादेवाच्या मूर्ती समोर आलो. आणि हात जोडून परतीचा मार्ग धरला. येताना जी भीती जाणवत होती ती आता गड उतरताना भासत नव्हती. आणि चेहऱ्यावर कसलीच संवेदना पण नव्हती. त्यामुळे मी चाललो होतो तसा आता कुणीतरी सोबत आहे असं वाटत होतं.
हत्तीखोयाळात आणि दोन्ही कोपरे पार करून बहिणींच्या मंदिरापाशी आलो. चालतोय बहिणींनो...अशी प्रेमळ हाक दिली. आणि परत माघारी फिरलो. कारण खूप वेळ झाला होता. आणि सायंकाळच्या आत गावांमध्ये पोहोचणे आवश्यक होते.नुकतेच मनगटावर बघितले तर साडे तीन वाजून गेले होते.
जंगलाचं कसं असतं.सकाळी सूर्य जसा उगवतो तसं तसं वन्यप्राणी जंगलाच्या आत जातात आणि सायंकाळच्या सुमारास जेव्हा सूर्यप्रकाश लुप्त पावते तसं वन्यप्राणी गावच्या आसऱ्याने निघून येतात. रस्त्यावर येऊन बसतात. त्यामुळे जंगलात कधी या प्रहरी कधीच थांबू नये.आणि सायंकाळचा सुमार हा लवकरच संपतो. वर थंडीचे दिवसही जरा लहानच असतात त्यामुळे अंधारायला लवकर होत असते.
तरीपण गडावरून उतरताना थोड्याफार जलद गतीने येत होतो. अचानक वाघोबाच्या जवळ आल्यावर कसलीतरी दुर्गंधी येत होती. रात्री त्याबद्दल काकाने मला सांगितलं होतं, की त्या खाली त्याचं पहारा असतो.थोडाफार उंचावून बघितले तर मघाशी असलेली वानरे पण नव्हती. जवळपास कुठेतरी वाघ असल्याची खात्री मात्र होती. त्यामुळे आवाज न करता थोडासा त्वरेने मी चालु लागलो. एकदम जलकुंभापर्यंत येईपर्यंत दम नाही सोडला. पण खरंतर जलकुंभापासूनच जंगलातून पायवाट होती.अचानक मागाहून छम छम असा पैंजणांचा आवाज यायला सुरु झाला.मी मागे वळून बघावं तर दृष्टिक्षेपात अशी एकही वस्तू आढळत नव्हती कि तिचं ध्वनि निघावं. पण नंतर चालताना सातत्याने त्या आवाजाचा पाठलाग मात्र माझ्या मागे होता. त्यामुळे मी फारसं न थांबता परत चालायला सुरुवात केली होती.
ज्यावेळेस चालताना गडावर आजूबाजूला दृष्टी टाकत मी गडावर गेलो होतो. त्यावेळेस तो आवाज माझ्यापासून दूर व्हावा यासाठी प्रयत्न करत होतो. पण जसे मी थांबायचो तो आवाज थांबायचा. चालू लागलो की परत मागावर यायचा. अशा पद्धतिने मी गणपतीच्या मूर्तीपर्यंत पोचलो.काही क्षण तिथे थांबून मी पालटुन बघू लागलो. कोण असेल ते असे समोर येईल म्हणून. पण कोणीच आलं नाही. पाच-दहा मिनिटं शांत वातावरण होतं. अगदी चिटपाखराचासुद्धा आवाज येत नव्हता.
शेवटी कंटाळून मी परत चालायला लागलो. आणि ते छम छम अगदी स्पष्टपणे माझ्या पाठीमागे येऊ लागले. मी घाबरलो तर नव्हतो. पण कदाचित उत्सुकता म्हणून, प्रत्येक आवाजाच्या मागोमाग मी मागे वळून बघत होतो. जाताना ज्या अस्तित्वाची जाणीव होत होती. कदाचित ती जाणीव बहुदा आता आवाजाच्या रूपाने माझ्या कानावर येत होती.
अगदी गडावरून तो आवाज खाली असलेल्या गेटपर्यंत ऐकू आला होता.मंदिराच्या खाली असलेल्या आवारात प्रवेश करताच तो आवाज आपोआप लुप्त झाला.इकडेतिकडे लक्ष देताच मंदिरात एक गृहस्थ दिसला आणि थोडं हायसं वाटलं.मी त्याच्या कडे जाऊ लागलो. तो इथेच राहणारा असेल, त्यामुळे त्याला काही माहिती असेल. याबाबत असे मला वाटले होते.कारण मघाशी इथे मला त्या पिकनिक करणाऱ्या मुलांशिवाय कोणीच आढळले नव्हते.त्यांच्या जवळ गेल्यावर त्याने कोण? कुठला? त्याबद्दल चौकशी केली. पण उलट मी त्याला विचारले, की इथलं सत्व काय आहे? तुम्ही इथे एकटेच असतात तेव्हा त्याबद्दल तुम्हाला काहीतरी जाणवते का?
ट्रस्टतर्फे मंदिराची देखभाल तो तिथे राहून करायचा. यासाठी त्याला एक खोली आणि अन्नपाण्याची तशी सोय करण्यात आली होती.पण पाण्याअभावी इथे त्याचे बरेच हाल व्हायचे. त्यामुळे तो फार त्रासून गेला होता. पण त्याने सांगितलेली ती माहिती जरा विचित्र वाटली.
तो सांगू लागला की त्या ज्या सात बहिणी आहेत. त्या बाजूला असलेल्या नवतळा नावाचे गाव आहे तिथल्या माना जातीच्या मुली आहेत.त्या इथे आल्या होत्या. आणि त्यांचं नाव या गडाला देण्यात आलं होतं. पण नेमकं पुढे काय झालं? असं काय घडलं? त्यांच्याबद्दल मलाही काहीच ठाऊक नाही. एक मात्र होतं की त्या गडाविषयी प्रत्येक जण एकच म्हणायचा की बहीण रडते तर तिचं डोंगर चढते आणि भाऊ हसते तर त्याचं डोंगर कोसळते...आणि ते सगळं बरोबरच होतं. कारण लोक म्हटल्याप्रमाणे बहिणींच डोंगर चढलेलं होतं आणि बाजूला असलेल्या भावाचा डोंगर बऱ्याच प्रमाणात कोसळलं होतं. पण त्याचा खरा अर्थ काय हेच मला ठाउक नव्हतं.
परत त्याने असंही सांगितलं होतं, की त्या सातही बहिणी एका झाडाची पूजा करायची. पण काही वात्रट लोकांनी ते झाड सुद्धा कुर्हाडीने तोडले होते.पण आश्चर्य असं होतं, की त्या झाडातून रक्त गळू लागलं होतं. त्याला घाबरून ती लोक पळून गेली होती. मग जेव्हा बहिणी त्या झाडाची पूजा करण्यासाठी तेथे गेल्या, तेव्हा ते तुटलेले झाड आणि त्यावरचे लाल रंगाचे रक्त पाहून त्यांची माया दुखावली.आणि त्यांनी त्या लोकांना श्राप दिले. असं पण त्याने मला सांगितले. पण खरं तर विश्वास मला अजूनही वाटत नव्हता. कारण त्या ज्या स्वरूपात होत्या कधी कुणी बघितलं तर माहित नाही. बस फक्त जे आहेत ते आहे.
त्यांचं म्हणणं होतं की सत्व आहे इथे. प्रत्येकाला असं दिसून येण्याचं कारण नव्हतं. आणि नियमांचे उल्लंघन करणारे आपल्याला कुठेही मिळतात. अगदी शैक्षणिक पात्रतेचे सुद्धा ज्याचे अनुकरण तो मला सांगत होता. असे कित्येक ताजे उदाहरण त्याने सांगितले जे मला वृत्तपत्रांमधून किंवा व्हाट्सअप च्या माध्यमातून आज पर्यंत मी ऐकत आलो होतो. तसा अपघात काही वेळा नकळत घडते पण त्याने प्रत्येक गोष्टीचा उलगडा एका ठोक कारणावरून केला. प्रत्येक अपघाताचं कारण त्याने सांगितलं आणि तेसुद्धा सांगितलं की कुणी काय चूक केली होती? कुणी कसं काय केलं होतं? मला त्याचं असं पटलं तर नाही पण त्याच्या समाधानाकरिता मी हो ला हो केलं. आणि तसे एक शेवटचा प्रश्न त्याला विचारला की या गडाची सुरुवात कशी झाली म्हणजे सगळ्यात आधी या सत्वाची कुणालातरी प्रचीती आलीच असेल ना.
शेवटचा तो बोलला तर अगदी समाधान करण्यासारखं बोलला त्याने जे सांगितलं त्यावरून तर नक्कीच असं वाटू लागलं होतं की आपण योग्य त्या मार्गावर चाललो आहोत. कारण झालेल्या असामान्य गोष्टींना एखादी असामान्य गोष्ट साध्य करू शकते आणि त्याचा खुलासा त्याने नकळतपणे केला होता.
बोलण्याच्या ओघात किती वेळ होऊन गेली मला काही कळलच नाही पण सूर्याची किरणे आता जागा सोडायला लागली होती. त्यामुळे मग मी त्याचा निरोप घेण्याचं ठरवलं. कारण येथे मी एकटाच होतो. तसेच आता एकटाच जाणारसुद्धा होतो आणि गड फिरताना बराच वेळ मी लावला होता. निघताना एक नजर गडावर टाकली आणि मनात विचार करत करत मी गावाकडे जाण्याची तयारी केली. गेटच्या बाहेर आलो असून रस्ता माझी वाटच बघत होता. पण एक प्रश्नचिन्ह उरलेला होता. मघाशी आपण जे अनुभवलं ते शेवटी काय होतं? कारण जर का ही गोष्ट सांगितली असती तर तो गृहस्थ सगळी त्या सात बहिणीची महिमा आहे असं म्हणाला असता. पण काय खरंच शेवटच्या पायरीपर्यंत त्या मला सोडायला आल्या होत्या. मग असं होतं तर त्या सर्व माझ्या सोबतीला दिसू शकल्या असत्या.
शेवटी आभास तो आभास. कारण आभास हा भासुन घ्यायचा असतो. सत्व इतक्या सहजासहजी लोकांना मिळालं असतं तर जो तो आज अद्वितीय शक्तीचा किंवा धन द्रव्याचा मालक असता. त्यामुळे आभासणे सुद्धा माझ्या मते फार सात्विकतेचे प्रमाण आहे याची प्रचिती फारच कमी लोकांना येते.
त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत नक्कीच काहीतरी तथ्य वाटत होता. त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी बघितल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. आणि मी एक गडप्रेमी आहे हे कितीतरी लोकांना ठाऊक होतं.
रस्त्याने जाताना सूर्य केव्हाच अस्ताला जात होता आणि रस्ता अजूनही जरा लांब होता. तितक्यात काकांनीच फोन केला... कुठे आहेस म्हणून? मी म्हटलं... येतोय रस्त्यात आहे.