भर दुपारच्या उन्हात एस.टीच्या विनंती थांब्याच्या बाजूला असलेल्या झाडाच्या सावलीत,जमिनीत गेलेल्या जाडजूड मुळावर भिवा जरा टेकला.
शेजारी पदराने घाम पुसत त्याची बहिण संगी खांद्यावरून सरकणारी बॅग पुन्हा पुन्हा सावरत उभी होती.
भिवा जमीनीवर शून्यात कुठेतरी हरवत , हातात एक काडी घेऊन खालचा पालापाचोळा इकडे तिकडे करत असलेला पाहून संगीला राहवलं नाही.
बॅग जमिनीवर ठेवत,तिने त्याच्या हातातून काडी ओढली आणि दूर फेकली,त्याने तरीही मान वर केली नाही.
“देख भाऊ वहिनी जाऊन आते महिना झाला,माले बी घर दार आहे, मावश्या बी त्यांच्या घरी गेल्या,आते तुलाच धीर धरना पडीन..माणूस भाई आहे तू,दुसर लगीन कर,नाहीतर जेवा-खावायची सोय बघ..आमचं माहेर तर तुटलं आते.”
त्याने वर न बघताच मान हलवली.
तेवढ्यात धूळ उडवत एसटी आली आणि संगी निघून गेली.
दूर दूर जाण्याऱ्या पाठमोऱ्या एसटीकडे तो बघत राहिला.
गाडी दिसेनाशी झाली तरी तो तिथेच बसून होता,घरी जाऊन तरी तो काय करणार होता आणि कोण होतं त्या घरात वाट बघणारं?
तो जरावेळ तिथेच रेंगाळला.तापून लालेलाल झालेल्या उन्हात रस्त्यावर अभावानेच कुणी होतं,मधूनच एक कुत्र येऊन त्याच्याकडे बघून भुंकून जात होतं,त्याने दगड मारताच विव्हळत दूर जात होतं.
एस.टी आल्यावर त्यातून एखाद दुसरं कुणी उतरल्यावरच थोडावेळ जिवंतपणाची चुणी त्या करकरीत वातावरणावर पडत होती.
एक बिडी ओढून त्याला जरा तरतरी आली आणि तो घराकडे जायला पाय ओढू लागला.नाल्याकडचा जवळचा रस्ता न घेता तो गाव बाहेरच्या दूरच्या रस्त्याकडे वळला.तेवढंच घरी उशिरा पोहचू म्हणून त्याला हायसं वाटलं.
शेजारून आवाज करत एखादी बैलगाडी किंवा फटफटी गेल्यावर रस्त्यावर धुळीचा लोट उठायचा, पांढरा फुपाटा अंगावर बसून तो धुरकाटल्या सारखा दिसत होता,पायातल्या चपलेचा तारेने बांधलेला अंगठा सैल झाल्याने तो खुरडत खुरडत चालत होता.
समोर शनिमंदिराचा पार दिसल्यावर त्याला हायसं वाटलं.
तो झपझप पाय उचलत पाराकडे गेला आणि वडाच्या जाड भाकरीसारख्या दाट सावलीत जरा अंग सैल करून पडला.
अंगावर चढणारे मुंगळे त्याचा डोळा लागू देत नव्हते,त्यांना झटकत त्याने कूस बदलली,जरा डोळा लागतो न लागतो तोच दोन चार लाल मुंग्याच्या चाव्याने तो हैराण झाला आणि मुंग्यांना चांगल्या अस्सल शिव्या घालत तो अंग खाजवत उठला.
पाराच्या पलीकडे शेडमध्ये गुरांच पाणी त्याला दिसलं,शेणामुताच्या वासाची पर्वा न करता त्याने ते पाणी सपासप चेहऱ्यावर मारलं तसे मातकट ओघळ त्याच्या चेहयावरून खाली येऊ लागले.
त्या गार स्पर्शाने तो सुखावला.
”धुणं वाळत घालून आल्यावर रंजीचा हात असाच थंड लागायचा” त्याला आठवलं आणि एक खोल कळ त्याच्या काळजात उठली पण तेवढ्यापुरतीच.
रंजी,त्याची बायको मरून आता एक महिना झाला होता,आई बापाविना पोरकं पोर म्हणून काही दिवस म्हातारी दुरपदा मावशी,अक्की मावशी आणि बहिणी थांबल्या होत्या पण महिना होत आला तश्या एक एक करून सगळे घरला गेले.आज धाकटी बहिण गेली,आता आयुष्य एकट्याने काढायचं होतं,त्या घरात आता बांगड्यांचा,साखळ्यांचा,जोडव्यांच्या चटचटीचा कसलाच आवाज येणार नव्हता.
त्याने पुन्हा ओंजळभर पाणी घेतलं डोक्यावरच्या काळ्यापांढऱ्या राठ खुरट्या केसांमधून मधून हात फिरवला,त्याला हुशारी आली,तोच ओला हात थोडा दाढीच्या खुरट्यामधून त्याने फिरवून घेतला आणि एकवार कपडे झटकून तो घरच्या रस्त्याकडे वळला.
ग्रामपंचायतच्या कमानीपर्यंत पोहचला असेल नसेल तोच बाजूच्या सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेल्या पाराखाली पत्ते कुटणारी मंडळी त्याला दिसली त्याचा चेहरा खुलला,तो झपझप पावलं टाकत तिथे गेला,आज कितीही वेळ पत्ते खेळले तरी एक शब्द ही न बोलता डोळ्यांनीच आग ओकणारी रंजी नव्हती म्हणून निवांत होता.खिश्यामधला उरला सुरला खुर्दा संपल्यावर तो नाईलाजाने उठला, चिमुटभर मिळालेली तंबाकू त्याने तोंडात टाकली आणि तो निघाला.
आताशी दुपार जरा निवली होती.त्याच्या घरचा रस्ता रोजचाच होता पण आज तो संपू नये असं त्याला वाटत होतं.थोडा पुढे गेला तोच दत्त मंदिराच्या पंख्याचा हवेला बसलेल्या दगू म्हातारीने त्याला बसल्या जागेवरून आवाज दिला. चपला खाली काढून तो दोन पाहिऱ्या चढून तिथेच बसला.
“संगीला सोडायला गेला व्हता का रे?”
त्याने फक्त मान हलवली.
“आता कसं करशीन रे बाबा,कशी जिंदगी जाईन तुन्ही? चांगली पोरं व्हती रंजी..सवाशीन म्हणून मेली बिचारी , कसं गुराढोरासारखं मारे तू तिला पण कधी बाहेर सांगण न्हाई की कुणाजवळ रडणं न्हाई.पैसा पैसा जोडायची न तुझं पोट भरायची.तू असा ऐदी,पोटच्या पोराला बी तू खाल्लं.तुन्हा दारूपायी लेकरू ले तालुकाच्या दवाखान्यात न्यायला बी पैसा नव्हता तिच्याकडे...असा कसा रे तू? पहिले पोरगं मंग बायको मारली. इध्वाबाई खाऊन,काम करून कशीबशी जगते भो...पण रंड्क्या माणूस भाईचं काम लई वंगाळ, दुसऱ्यापणावर बी अश्या आळशी माणूस ले कोण पोरगी देईन ?
भिवा खाली मान घालून ऐकत होता,त्याला आज म्हातारीचा राग येत नव्हता,एरव्ही रंजी ह्या म्हातारीशी दोन शब्द बोलतांना दिसली तरी तिच्या कमरेत दोन लाथा ठरलेल्या असायच्या कारण म्हातारीच ऐकून ती त्याला सारखी काहीतरी काम धंदा पहा,पैसे कमवा असच टुमण लावायची आणि त्याला ते सहन व्हायचं नाही.
त्याला असं केविलवानं बसलेलं पाहून म्हातारी म्हणाली.-
“आज रातच्याला भाकरी न पिठलं पाठवते पण उद्या काय करशीन ? काहीतरी सोय पाय रे भो...कामधंद्याच.काय म्हणत अशीन रे दादा तुन्हा माय-बाप ना आत्मा?”असं म्हणत म्हातारीने डोळ्याला पदर लावला आणि ती रडायला लागली.
“मी देखसू काय ते”
म्हणून तो उठला,चप्पल पायात कशीबशी सरकवून तो पुढे निघाला.मागे म्हातारीची बडबड कितीतरी वेळ चालू होती.
आता संध्याकाळची वर्दळ वाढली होती,मघाची मरगळ जाऊन गल्ली जिवंत झाली होती.तो गल्लीच्या शेवटी असणाऱ्या त्याच्या मातीच्या,वरून टिनपत्र असलेल्या घराजवळ आला,अंगणात शेजारच्या शेवग्याच्या झाडाच्या पानांचा सडा पडला होता,एरव्ही उन्ह कलली की हातात झिजत आलेला खराटा घेऊन रंजी अख्ख आंगण स्वच्छ,निर्मल झाडून काढत असे.त्याने संतापाने पायानेच काही पानं बाजूला सारली.समोर मोडकळीला आलेल्या दरवाज्यावर गंजलेल्या लोखंडी साखळ्याची कडी होती आणि तसलंच लोखंडी कुलूप वर लटकत होतं,त्याने खिश्यातून चावी काढली आणि थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला.
घरातला अंधार एकदम अंगावर आला,रंजी गेल्यावर पहिल्यांदा तो एकटा होता घरात.तो घरात गेला आणि त्याने दरवाजा लावून घेतला.खांब्यावर असलेल्या मेणचट बोर्डवरच बटण दाबताच कावीळ झाल्यासारखा प्रकाश त्या खोलीत पसरला.
तो डोकं धरून खाटेवर बसला,शेजारच्या घडवंचीवर रंजीच्या दोन फाटक्या साड्या,विटके परकर पडले होते. त्याची नजर त्या साड्यांवर गेली.
हीच साडी घातली होती रंजी ने जेव्हा दोन महिन्यांची बाळंतीण होती आणि पोराला दवाखान्यात न्यायला पैसे पाहिजे म्हणून वाड्यातल्या घरी काम मागायला गेली होती.दुसऱ्याचा वाडा झाड्तांना दिसली म्हणून त्याने तिथूनच बाजल्याच्या माच्याने मारत मारत तिला घरी आणलं होतं.डोकं फुटून रक्त वहात होतं,अंग काळं निळं पडलं होतं,दोन दिवस तापाने फणफणली.त्यांचं ते अशक्त, वाळक्या शेंगेसारख पोरगं डोळे वर करून त्यानंतर दोन दिवसातच गेलं.तेव्हा जीवाच्या आकांताने ती रडली होती आणि भिवाच्या नाकर्तेपणाला पहिल्यांदा उघड उघड बोटं मोडून शाप दिला होता.भिवा काम करत असलेला गावाबाहेरचा कपड्यांचा कारखाना तीन वर्षापासून बंद पडला होता आणि त्याचा थकीत पगार मिळेल ह्या आशेवर तो होता,स्वतःही काही धड काम करत नव्हता,काम धरलं की सोड असं करून,रंजीच्या पैंजण, कुड्या, किरडू आणि शेवटी मंगळसूत्र विकून पैश्यांची नड त्याने भागवली होती. रंजीलासुद्धा तो काम करू देत नव्हता.ती भिवाला चोरून कुणाच्या गोधड्या शिवून दे,गोवऱ्या थापून दे,दळण करून दे असे कामं करून दोघांच दोन वेळचं जेवण भागवत होती.
पोटचं लेकरू गेल्यापासून जणू तिची वाचाच गेली.ती घुम्यासारख काम करून दिवसाला दिवस जोडत होती.शेजारची शेवंती तिला एकदा म्हटली होती.
“कशाला ह्या ऐदी बरोबर राहते,माहेरला निघून जा” पण माहेरही असंच दळभद्री असल्याने “कसा बी असला तरी हळदीकुंकुचा मान मिळतो दोन घरात,सवाशीन आहे मी आणि सवाशीन मरेन हे बी लै शे ” म्हणून ती स्वतःची न समोरच्याची बोळवण करत असे.
त्यादिवशी सुद्धा वाड्यावरून तिला दळणासाठी बोलावलं होतं, भिवा बाहेर गेलाय हे पाहून थोडावेळ जाऊन येऊ म्हणून ती लगबगीने निघाली पण भिवा रंजीकडून काही अजून किडुक मिडुक मिळतंय का मोडायला म्हणून परत आला,घराला कुलूप पाहून संतापला,शेजारी पाजारी शोधतांना ती वाड्यावर काम करतांना दिसली आणि त्याच्या संतापला पारावार उरला नाही,त्याने लाथा बुक्क्या मारतच तिला घरी आणलं,घरी आणल्यावर तिचं डोकं मोरीतल्या दगडावर आपटलं आणि पैशांसाठी घरातलं एकमेव पितळी पातेलं घेतलं आणि तो तिरमिरीत निघून गेला.रंजी तशीच रक्ताळलेल्या जखमेने तळमळ राहिली…दोन दिवस तापाने फणफणली आणि तिसऱ्या दिवशी ती सवाष्ण ह्या दळभद्री संसारातून ती कायमची मोकळी झाली.
भिवाला आता त्या क्षीण पिवळ्या उजेडात त्याच्या वाळक्या अशक्त मुलाचा चेहरा दिसत होता,रंजीचा रक्ताळलेला चेहरा दिसत होता ,दगु म्हातारीचं बोलणं कानात घुमत होतं
“ तू बायको पोराचा जीव घेतला,रंडक्या माणुसभाईचं काम लै वंगाळ”
त्याच्या डोक्यात घणाचे घाव घतल्यासारखं झालं.'मी व्हतु म्हणून रंजी सवाशीन व्हती का ती व्हती म्हणून मी सवाशीन होतो...' ती गेल्यावर त्याला त्याच्या फाटक्या आयुष्याची लक्तर जागोजागी दिसली ..
त्याने रंजीची साडी घेतली बाजल्यावर चढून वरच्या तुळइला बांधली आणि ……..आणि
दिवसेंदिवस रंजीच्या अंगणात पालापाचोळा साचत होता……!
©हर्षदा
सवाशीन(अहिराणी)--सवाष्ण