Shodh Astitvacha - last part in Marathi Motivational Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | शोध अस्तित्वाचा (अंतिम भाग)

Featured Books
Categories
Share

शोध अस्तित्वाचा (अंतिम भाग)

समीधाला चेन्नईहून येऊन एक आठवडा झाला होता. ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती.

एके दिवशी ती नंदिनी बरोबर खेळत होती की अचानक तिचा फोन वाजला. तो त्याच प्रशिक्षण केंद्रातून आला होता. समिधाने तो उचलला.

समिधा : हॅलो, कोण बोलतंय.

समोरची व्यक्ती : नमस्कार, मी नीलिमा बोर. चेन्नई संगीत प्रशिक्षण केंद्रातून बोलतेय.तुम्ही समिधा बोलताय का?

समिधा : हो. बोला ना मॅडम.

नीलिमा : तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ५ उमेद्वारांपैकी शेवटच्या फेरीत तुमची निवड झाली आहे. तुमच्या नोकरीची जागा चेन्नईत असेल आणि तुम्हाला पुढच्याच आठवड्यात इथे रुजू व्हावे लागेल, तसेच कंपनी तुमचा राहण्याचा सर्व खर्च करेल. बाकी गोष्टी आपण नंतर सविस्तर बोलू. तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

असे बोलून तिने फोन ठेवला.

समिधा आनंदाने जोरात ओरडली. तिने नंदिनीला कडकडून मिठी मारली.

तितक्यात तिथे वैशाली ताई आणि बाकीच्या सर्वजणी धावतच आल्या. सगळ्यांना वाटले काय झाले म्हणून.

समिधाने सगळ्यांना गोड बातमी दिली..सगळे जण खूप खुश होते. वैशाली ताईंना अगदी भरून आले..

सगळ्यांनी अगदी जड अंतःकरणाने समिधा आणि नंदिनीला निरोप दिला.

समिधाने शेवटचे इमारतीकडे बघितले.

'निवारा' ती स्वतःशीच पुटपुटली.

समिधा आणि नंदिनी चेन्नईला सुखरूप पोहचल्या.

समिधाला 2 खोल्यांची प्रशस्त जागा, जीवनावश्यक सामानाबरोबर संगीत प्रशिक्षण केंद्राकडून राहायला मिळाली होती.

ती जागा प्रशिक्षण केंद्रापासून १० मिनिटांवरच होती. समिधाने आणि नंदिनीने घरात आल्यावर पहिले सामान लावायला सुरवात केली.

थोडी साफसफाई करून मग त्यांनी बरोबर आणलेले जेवण खाल्ले. प्रवासाने दोघीही फार दमल्या होत्या. दोघींना कधी झोप लागली कळलेच नाही.

समिधाला कामावर रुजू व्हायला अजूनही ४ दिवसांचा कालावधी होता.

त्यामध्येच तिला नंदिनीचे नवीन शाळेत ऍडमिशन आणि काही बारीक सारीक कामे उरकायची होती.

आतापर्यंत त्या दोघींना भरपूर लोंकांमध्ये राहायची सवय झाली होती.

निवारा संस्थेत राहात असताना कोण ना कोण बोलायला.... वेळ घालवायला हमखास असायचे. त्यामुळे त्या दोघींना एकटे राहायची सवयच नव्हती.

म्हणूनच त्यांना चेन्नईला स्थिर व्हायला बराच वेळ लागणार होता.

असेच काही दिवस निघून गेले. समिधा ही कामावर रुजू झाली.

नंदिनीची ही शाळा सुरू झाली. समिधाचे काम छान चालले होते.

तसेच तिला शिकवता शिकवता भरपूर काही नवीन गोष्टी शिकताही येत होत्या. दोघीही आपापल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाल्या होत्या.

अशातच एके दिवशी सब इन्स्पेक्टर माने समिधाची भेट घ्यायला निवारा संस्थेत आले.

त्यांची काही महिन्यांपूर्वीच पुण्यात बदली झाली होती म्हणून काही महत्वाचे काम असले तरच ते मुंबईत येत असत आणि आल्यावर आवर्जून समिधा आणि नंदिनीची चौकशी करत.

आज ते येताच त्यांना वैशाली ताईंनी समिधाच्या चेन्नईतल्या नवीन नोकरीबद्दल सांगितले हे ऐकून, माने साहेबांना अत्यंत आनंद झाला.

त्यांच्या डोळ्यासमोर समिधा भेटल्यापासून ते आतापर्यंतचे सगळे चित्र उभं राहिले.

माने साहेबांना आता त्यांनी समिधासाठी आणलेल्या बातमीच काहीच महत्त्व उरल नव्हतं.

पण तरीही निदान वैशाली ताईंच्या कानावर घालायला हवे म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली.

ते म्हणाले, " वाह!!मी इथे वेगळ्याच कारणासाठी आलो होतो पण इथे येताच ताई तुम्ही फारच छान बातमी दिलीत. देव करो समिधा आणि नंदिनी दोघी अशाच नेहमी आनंदी राहू देत."

पुढे ते म्हणाले, "ताई खरं म्हणजे मी अशा करता इथे आलो होतो की, खूप दिवसांपासून माझी काही माणसे सुयशच्या म्हणजेच समिधाच्या नवऱ्याच्या पाळतीवर होती. मी या शोधात होतो की कधीतरी काहीतरी पुरावा मिळेल जेणेकरून मी समिधाला न्याय मिळवून देऊ शकेन. परंतु काही दिवसांपूर्वी सुयशचा फार मोठा अपघात झाला. तो इतका भीषण होता की त्याच्या मृतदेहाची ओळख पटणे ही कठीण होते. त्याच्या गाडीचा चुराडा झाला. पण त्याच्याजवळच्या सामनामुळे त्याची ओळख पटली आणि या बाबतीत माझ्या सहकाऱ्यांनी त्याच्या मित्राची रणजितची थोडी चौकशी केल्यावर त्यांच्याकडून असे कळले की, सुयशने त्याची सगळी प्रॉपर्टी आणि व्यवसाय सर्व काही समिधाचे वडील जिवंत असतानाच धोक्याने त्यांची सही घेऊन रणजितला विकून टाकले होते.

तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून तो तिथेच राहत होता..खरं तर त्याचा परदेशात पळून जायचा प्लॅन होता. पण समिधाच्या वडिलांना हे सत्य तो पळून जायच्या आधीच समजलं आणि तिथेच त्याचा प्लॅन फिस्कटला. तरीही सुयशचे नशीब चांगलच म्हणायला लागेल, समिधाचे वडिल तो विश्वासघाती धक्का सहन करू शकले नाहीत आणि त्यातच ते वारले आणि सुयशला हवे ते करायला रान मोकळे झाले. त्याच्या वाटेवरचा मोठा काटा समिधा आणि नंदिनी होत्या. त्यांना त्याला मारायचे नव्हते. कारण जर कोणाला कळले तर उगाच भानगड होईल. म्हणून त्याने त्या दोघींना घराबाहेर काढले."

"असो, त्यानंतर काय झाले ते आपल्याला सर्व माहीतच आहे. कदाचित सुयशला वाटले असेल अन्न-पाण्याविना किती दिवस या दोघी जगतील. पण समिधाच्या नशिबात काहीतरी वेगळंच होते, ते तुम्हाला आणि मलाच माहीती. मी हे सगळें समिधाला सांगायला आलो होतो, पण आता मला याची काहीच गरज वाटत नाही कारण समिधाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे आणि मला नाही वाटत आता तिच्या आयुष्यावर भूतकाळाची कोणतीच सावली पडायला नको. तिचा फोन आला तर माझ्याकडून तिला शुभेच्छा कळवा. येतो मी." असे बोलून ते निघून गेले.

अशीच काही वर्षे निघून गेली. समिधा फार हुशार आणि कर्तबगार होती. म्हणूनच काही वर्षातच तिला बढती मिळाली.

आता ती एका संगीत शाखेची प्रमुख होती. समिधाने चेन्नईत स्वतःचे घर ही घेतले आणि त्या दोघी नवीन घरात स्थिरावल्या.

नंदिनीला आईप्रमाणेच संगीतामध्ये करियर करायचे होते म्हणून तिने शाळा पूर्ण झाल्यावर समिधा नोकरी करत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात आपले नाव नोंदविले.

समिधा अगदी सुखात होती. तरीही ती निवारा ह्या संस्थेला विसरली नव्हती. ती दर वर्षाला न चुकता एक ठराविक देणगी निवारा ह्या संस्थेला पाठवत होती.

याचबरोबर समिधाने चेन्नईमध्ये तिच्या बरोबरच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःची 'आधार' नावाची संस्था स्थापन केली होती.

ह्याचबरोबर संगीताचे विविध कार्यक्रम करून ती या संस्थेसाठी निधी गोळा करत होती. तसेच या कामामध्ये नंदिनीची ही समिधाला मोठी साथ मिळाली होती.

अशाप्रकारे ह्या संस्थेने इतक्या वर्षात अनेक महिलांचा उद्धार केला होता. त्यांना जगण्याची नवीन उमेद दिली होती. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला सक्षम बनविले होते आणि आज खऱ्या अर्थाने समिधाला तिच्या अस्तित्वाचा शोध लागला होता.

निवेदिकेने पुढील पुरस्कार "प्रेरणादायी व्यक्तिमत्व २०२०" जाहीर केला आणि त्या पुरस्काराची मानकरी म्हणून समिधाच्या नावाची घोषणा केली. स्वतःचे नाव ऐकताच समिधा अचानक भानावर आली.

तिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी निवेदिकेने व्यासपीठावर येण्याची विनंती केली. नंदिनीने समिधाला गच्च मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले कारण आतापर्यंतच्या समिधाच्या खडतर प्रवासाची खरी साक्षीदार नंदिनीच होती.

समिधाला उपस्थित प्रमुख अतिथी वैशाली देव म्हणजेच तिच्या लाडक्या वैशाली ताईच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वैशाली ताईंना समिधाला इतक्या वर्षांनी समोर बघून ऊर भरून आला आणि तिचा खूप अभिमान ही वाटला.

यानंतर समिधाने आतापर्यंतच्या केलेल्या कार्याची चित्रफीत ही मागील पडद्यावर दाखवण्यात आली.

पूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला.

~समाप्त~

(खरंच, समिधासारख्या अशा अनेक स्त्रिया असतील, ज्या स्वत:चे अस्तित्व टिकून राहावे यासाठी झटत असतील. समिधाचे नशीब चांगले म्हणून माने सर आणि वैशाली ताईनं सारखी देवमाणसं तिला तिच्या आयुष्यात लाभली त्यामुळे तिचा संघर्ष तिला करता आला आणि ती त्यामध्ये यशस्वी ही झाली.

तर वाचकहो, समिधाची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. ती आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. अशाच अजून काही कथा घेऊन मी नक्कीच येईन तो पर्यन्त वाचत रहा मातृभारती. धन्यवाद🙏)

©preetisawantdalvi