Salaam-a-ishq - last part in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | सलाम-ए-इश्क़ - अंतिम भाग

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

सलाम-ए-इश्क़ - अंतिम भाग

पाण्याचा एक घोट घेत शांतपणे तिने बोलायला सुरुवात केली-

“शले...तुला आणि आदिला चिठ्ठी लिहून मी माझ्या घरी काय प्रॉब्लेम झाला हे सांगितलंच होत आणि तुम्हाला हा ही विश्वास दिला होता की माझं लग्न होतंय पण माझ्या मनात भलताच प्लान होता,आत्महत्या......हे शरीर,हा आत्मा...माझं असलेलं आणि नसलेलं अस्तित्व फक्त नि फक्त माझ्या आदीच होतं.

मी ठरवलं स्वतःला विहिरीत जाणूनबुजून झोकून द्यायचं. ते कसं अमलात आणायचं हे ही ठरवलं...त्या दिवशी मी आरतीच ताट घेऊन विहिरीकडे निघाले होते तोच पंकजने,माझ्या चुलत भावाने मध्येच थांबवलं,तो म्हणाला भाऊजींना म्हणजे विक्रम जाधव,माझ्या चुलत आत्याचा मुलगा,माझा होणारा नवरा..त्याला बोलायचंय म्हणे महत्वाचं.

दुसऱ्या दिवशी लग्न म्हणजे त्याला जावायचा मान मिळायला सुरवात झाली होती.त्याचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून भाऊकाका आम्हाला एकट्यात बोलू द्यायला कसेबसे तयार झाले होते.आम्ही माझ्या खोलीत बसलो होतो.माझा प्लान पार पडायला उशीर होतोय म्हणून मी बिथरले होते.तोच विक्रम जे बोलला त्याने माझे हात पाय गार पडले.

सहा महिन्यांपूर्वीच विक्रमने दिल्लीत त्याच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या आशना शर्मा हिच्याशी गुपचूप लग्न केलं होतं.तिला वडील नव्हते पण तिच्या आईच्या संमतीने हे सगळं झालं होतं.त्याचं गावं आणि आमचं गाव प्रेमाच्या बाबतीत किती बुरसटलेल आहे याची जाणीव त्याला होतीच. त्याच्या घरच्यांनी जेव्हा माझ्याशी लग्नाबद्दल विचारलं तेव्हापासून त्याने माझी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती.त्याला माझ्या न आदीच्या प्रेमाबद्दल ही माहित होतं.त्याने मला ब्लाकमेल केलं. अक्चुली त्याने देखील एक फुल प्रूफ प्लान बनवला होता.त्याचं प्रेम मिळवायला तो कुठलीही रिस्क घ्यायला घाबरणार नव्हता.आमच्या घरच्यांसमोर तो अडून बसणार होता की त्याला लग्न करायचं ते रुद्रप्रयाग मधल्या त्रियुगी नारायण मंदिरातच जिथे साक्षात शिव पार्वतीचा विवाह झाला होता असं म्हणतात.तिथे बांधलेल्या रेशीमगाठी युगानुयुगे कायम होतात.त्याने माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की फक्त सहा महिने,तो अमेरिकेला जाईल तो पर्यंत हे लग्नाचं नाटक करायचं,एकदाचा तो निसटला की...मग हे लग्न खोटं होतं असं तो जाहीर करणार होता.माझी फरफट होईल मग टाकलेली मुलगी स्वीकारायला तयार आहे म्हणून आदीच्या घरच्यांना मागणी घालायला सांगायची.मलाही वरकरणी हा प्लान ठीकच वाटला.विक्रम ने सगळी तयारी केली होती.घरच्यांपुढे हा मंदिरात लग्नाच्याबाबतीत अडून बसला.काही दिवस थांबून सर्वांचे दिल्लीचे तिकीट बुक झाले. ऋषिकेशवरून सोनप्रयागपर्यंत अत्यंत थंड वातावरणात कसाबसा प्रवास त्यांनी केला.दोन,चार लोक तर सोनप्रयागलाच आजारी पडले.त्रियुग मंदिरापर्यंत प्रवास करणं हे दोघांच्याही घरच्यांना अशक्य होतं.विक्रमचा प्लान बरोबर काम करत होता.मंदिरापर्यंत फक्त मी,पंकज,विक्रम,सीमा आणि दादा एवढेच लोकं पोहचलो.आशना अगोदरच तिथे पोहचली होती.त्यात विक्रमच नशीब,त्याचं टोकाचं प्रेम, ह्या बळावर जणू पूर्ण नियती त्यांना एक करायच्या मागे लागली होती. पंकजला सणकून थंडी भरल्याने चाळीस-बेचाळीस किलोमीटर मागे असलेल्या उत्तरकाशी मध्ये हॉटेलमध्ये तिघांना थांबवून मुहूर्त गाठायला म्हणून माझ्या भोळ्या दादांनी आम्हाला पुढे पाठवलं.

मुहूर्त साधला गेला तो आशना आणि विक्रमच्या लग्नाचा आणि पुरावा म्हणून वधू वराच्या वेषात,आनंद ओसंडून वाहतोय ह्या आवेशात फोटो काढले ते मी आणि विक्रमने. साक्षात शिव पार्वतीच्या लग्नचं अखंड यद्नकुंड तिथे पेटत होतं त्या अखंड धुनीच्या साक्षीने मी आदित्यचा मनोमन पती म्हणून स्वीकार केला.तिथल्या एका सिद्ध साधू पुरुषाने हा गळ्यातला काळामणी ह्या मानसपूजेचा प्रसाद म्हणून दिला.ह्या मण्यावर आदित्य आणि माझ्या लग्नाचे लग्न संस्कारच झालेय जणू.साक्षात पार्वती आणि शिव जिथे एक झाले तिथे मी स्वतःला आदित्यला अर्पण केलं.स्वतः घातलेल्या मंगळसूत्रासोबत त्याच्या नावाचा हा मणी मंगळसूत्र म्हणून धारण केला.

दुसऱ्या दिवशी तब्बेतीच कारण देऊन मी पुन्हा सगळ्यांसोबत घरी आले.सगळे खुश होते. काही दिवस मी जाधव घरण्याची सून म्हणून राहिले.विक्रम दिल्लीलाच थांबला होता.मग तो मला घ्यायला आला.त्रीयुगीला लग्न केल्याने सत्यनारायणाची गरज नाही असं म्हणून त्याने तो प्लान रद्द केला.जेजुरीला मात्र आम्हाला एकत्र जावं लागलं,तेवढीच काय ती फसगत.त्यानंतर सासरी देवदर्शनानंतरच्या पहिल्या रात्री एका खोलीतही आम्हाला पाठवलं.आम्ही पुढचे प्लान करत कितीतरी वेळ असंच गप्पा करत बसलो.दोन दिवसांनी विक्रमची सुट्टी संपली आणि आम्ही दिल्लीला आलो.खूप वेळा वाटलं...तुला किंवा आदिला फोन करून सांगाव..पण विचार यायचा फक्त सहा महिने थांबूया मग सगळं व्यवस्थित होईल.आतापर्यंत देवाने साथ दिलीय बाप्पा पुढेही सगळ असच सुरळीत करेन...पण सगळ्या गोष्टीवर पाणी फिरलं.

वर्ष होत आल पण विक्रमला बाहेरचा प्रोजेक्ट मिळत नव्हता. मी आशनाच्या आईसोबत,शालिनी शर्मा त्यांच्या सोबत शेजारच्या ट्वीन बंगल्यात राहत होते.त्यांचा सहारा नावाचा NGO होता.त्यात काम करायचं मी सुरु केलं.खोट्या लग्नाला एक वर्ष होत तोच नियतीने घोर अन्याय केला.दिनुकाका सुडाच्या भावनेने पेटला होता.कसं झालं,काय झालं कुणास ठावूक पण रात्री शेतातून घरी परतणाऱ्या भाऊकाकां आणि दादा यांच्या मोटारसायकलला एक ट्रक चिरडून गेला.पण अक्सिडंट केस झाली. एका रात्रीत होत्याचं नव्हत झालं.घर,जमीन जुमला...सगळं उघड्यावर पडलं.घरच्यांच्या ह्या दुखाः पुढे माझं दुखः पुन्हा खुजं ठरलं.सीमाचं नागपूरला ऍडमिशन झालं होतं. वर्ष लागले सगळे वाद मिटायला. भाऊकाकांचे मोठे जावई काकीला आणि पंकजला औरंगाबादला घेऊन गेले. मी आईला दिल्लीला घेऊन आले.तेव्हापासून ती माझ्याजवळ असते. एक दिवस मी आईला विश्वासात घेऊन हिम्मत करून सगळं सांगितलं.तिने बराच दिवस माझ्याशी अबोला धरला. मी खूप प्रयत्नांनी तिची समजूत काढली.तिने लग्नाचा प्रस्ताव ठेवला.माझं लग्न झालय असं मी गृहीतच धरल्याने पुन्हा लग्न करायचा प्रश्नच नव्हता.मी फक्त माझ्या आदीची होते.सीमाचं मेडिकल पूर्ण होतांनाच तिने तिच्यासाठी जोडीदार निवडला होता.तिलाही यथावकाश खोट्या लग्नाची गोष्ट सांगितली..आई,सीमा,विक्रांत सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तुटत होता. बरीच वर्षे उलटली होती.आता आदीच आयुष्य स्थिरस्थावर होत असेल तेव्हा त्याचा आयुष्यात पुन्हा वादळ,अस्थिरता नको म्हणून माझ्या ह्या विचित्र गुंत्याला मी त्याच्यापासून दूर ठेवलं.यथावकाश विक्रमच्या घरीही ही गोष्ट कळाली होती.ह्या घोर फसवणुकीची शिक्षा म्हणून विक्रमच्या आई बाबांनी त्याच्याशी बोलणं टाकलं होतं पण दित्याच्या जन्मानंतर सगळं सुरळीत झालं. त्यांच्या मुलीचं नाव ठेवण्याचा मान त्यांनी मला दिला. आदीच नाव सारखं तोंडात असावं म्हणून मी तिचं नाव ‘दित्या’ ठेवलं, मी तिला न ती मला इतक्या क्लोज आहोत की तिची मम्मी नसेल तरी तिला चालतं पण मोम्सी हवीच म्हणून हट्टाने कॉन्फरन्ससाठी माझ्या सोबत आली..........शले....२००६ ते २०१८ जवळपास एक तप उलटलंय मी अजूनही त्याचीच आहे पण तो आता कुण्या दुसर्याचा आहे.....”

शलाकाचे डोळे विस्फारलेलेच राहिले.तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता.तिचा आसवांचा बांध नकळत फुटला आणि आशुला घट्ट मिठी मारून ती रडायला लागली.आशुलाही स्वतःला सावरणं मुश्कील झालं होतं.....भावनांना मोकळी वाट करून दिल्यावर त्या थोड्या सावरल्या.

तिला पाणी देऊन थोड बळजबरीने खायला घालत अचानक आठवल्यासारखी शालका म्हणाली-“आशु तू हे आदिला सांगितलं आहेस ना.....?”

तिचे हात हातात घेत घाबरून आशु म्हणाली-“शलाका तुला माझी शपथ आहे...आदिला काही सांगू नको..त्याच आयुष्य कुणाशीतरी प्रमाणे जोडलं जातंय....त्या मुलीच्या..पिहू तिचं नाव....तिच्या प्रेमाच्या आड माझ्या ह्या गुंतागुंतीच्या आयुष्याला आणू नको...प्लीज मी तुझ्या पाया पडते तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे.....”

असं म्हणून आशुने खरोखर तिच्या पायावर हात ठेवले.तिला झटकन उठवत ती म्हणाली-“अग वेडाबाई..मी आता काही दिवसांपूर्वी त्याला भेटले होते...त्यानेही लग्न नाही केलेलं.....मला पूर्ण खात्री आहे....”

तिच्या खांद्यांना घट्ट पकडत आशु म्हणाली... “शले खूप प्रयन्त केल्यावर ठरलं आहे त्याचं लग्न. त्याच्या होणाऱ्या बायकोला सुद्धा भेटले मी काल गोड आहे.शालुमा सांगत होती..खूप प्रेम करते त्याच्यावर....प्लीज शलाका त्याचं आयुष्य निर्धोकपणे जाऊदे गं...माझ्या आयुष्यात खूप गुंता आहे...खोटं लग्न....खोटा पती...,आदिच घर नावाजलेलं आहे. माझं हे पूर्व आयुष्य त्यांच्या सोशल सर्कलमध्ये समजलं तर त्यांना लाज वाटेल गं.....प्लीज शलू उपकार कर.....” असं म्हणून ती रडायला लागली.

तिला शांत करत ती म्हणाली-“मला अजूनही शंकाच आहे पण तू कालच त्याला भेटलीय म्हटल्यावर मे बी असेल.....ओके नाही बोलणार मी...तू शांत हो...बर आता तुझे पुढचे प्लान काय आहे?”

खिडकीतून बाहेर बघत आशु म्हणाली-“ मी आता दिल्लीला राहणार नाही. आईला सीमाकडे सोडून एका दुसऱ्या जागी,एका सामजिक संस्थेत मी अर्ज केला होता तिथे मी जाणार आहे कायमची..सॉरी पण तुलाही सांगणार नाही....माझ्या कमनशिबी आयुष्याचं सावट कुणावरही नकोय मला....होप सो तूला समजतंय ...”

तिला मागे वळवत शलाका म्हणाली-“नाही मला नाही समजत आणि समजून घ्यायचं पण नाहीये तू जिथे जाशील तिथला पत्ता मला हवाय आणि हे शेवटचं सांगून ठेवते तुला.”

थोडं फ्रेश होऊन,दित्याला घेऊन ती जायला निघाली.निघतांना शलाकाने तिला विचारलं-“ दिल्लीला कधी जातेय परत...”

खांद्याला पर्स अडकवत निराशेने हसत ती म्हणाली-“सॉरी पण ते ही तुला सांगणार नाही. आता दित्याचा मामा राम आहे खाली गाडीत तो तिला घेऊन हॉटेलवर जाईल. मी कॅब करून दिवसा उजेडीच चांदणं बघायला जातेय.....ताऱ्यांच्या गावी जातेय...माहित नाही आयुष्यात पुन्हा बघायला मिळेल ना मिळेल?....

“ताऱ्यांच गाव ?.......म्हणजे काय?..कुठे ?....” शलाकाने गोंधळून विचारलं.

सक्षमचा पाप घेत त्याला आणलेलं गिफ्ट देत ती म्हणाली. “बाय शलू जास्त विचार करू नको....I will be fine…..”

ती शलाकाचा निरोप घेऊन निघाली.

***********************************

शलाकाच चित्त थार्यावर नव्हत...तिच्या डोक्यात सारख आशुच भरकटलेल आयुष्य,तिची झालेली फरपट....ओढाताण...हेचं राहून राहून येत होतं.आदीचा विचार तिला अजून गोंधळात टाकत होता...

”आत्ताच तर भेटलो होतो त्याला ....तेव्हा तर तो काहीच बोलला नाही मग ही अशी का म्हटली? करावा का आदिला फोन विचारावं का त्याला......?मोडावी का आशुची शपथ?

खूप वेळ विचार करून तिने शेवटी आदीचा नंबर लावला.त्याचा फोन बंद येत होता.तिला सुचेनास झालं.तिने,त्याने दिलेलं कार्ड शोधलं.सुदैवाने ते कार्डफोल्डरमध्ये जपून ठेवलं होतं.तिने त्याच्या ऑफिसला फोन केला.तो ऑफिसला देखील आलेला नव्हता.तिने मग ऑफिसमधून त्याच्या घरचा नंबर घेतला आणि फोन केला.आदिला आशुभेटल्या वरचा ताण सहन झाला नव्हता. अचानक रात्रीतून ताप भरल्याने तो ऑफिसला न जात झोपून होता.विभाताईनी त्याला उठवायला नकार दिला.खूप महत्वाचं काम आहे म्हणून तिने खूप गयवया केल्यावर त्यांनी त्याच्या रूम मध्ये कोर्डलेस पोहचता केला. त्याने फोन घेतला पण तो पूर्ण ग्ल्यानीत होता.पलीकडून शलाकाचा आवाज ऐकून तो जरा नीट ऐकण्याचा प्रयत्न करू लागला.

“हेल्लो आदित्य...शलाका बोलतेय.....अरे सॉरी तू आजारी आहे कळलं पण तुला कॉंग्रेट्स करायला फोन केला...”

“कश्या बद्दल शाकाल?....काय बोलतेय...” तो गुंगीतच म्हणाला.

“..अरे मला माहित नव्हत तुझं लग्न ठरलं ते....आपण भेटलो तेव्हा तू तसं काही होतंय असही काही बोलला नव्हतास...म्हणून म्हटलं....शुभेच्छा तुला आणि पिहुला सहजीवनासाठी...” त्याची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी तिचे प्राण कंठात आले होते.

“काय्य्य्यय पिहू....मी लग्न.....शाकाल काय झालय तुला......कुणी सांगितलं....”

तिने आनंदाने निश्वास सोडला आणि तिला रडूच आलं....ती रडतच म्हणाली-

“आदि.....ती मूर्ख....बावळट आशुडी......त्या मुर्खानेही लग्न केलेलं नाहीये आणि काल तुझ्यापासून तिने हे लपवलं.....”

आदीचे हात थरथरायला लागले,डोकं सुन्न झालं होत...त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हते तो उठून उभा राहिला...त्याच्याकडून उभं राहिलं जात नव्हत...पूर्ण ताकद एकवटून तो म्हणाला-“मला निट सांग शाकाल काय झालं ते...”

शलाकाने रडतच थोडक्यात पण सगळं सांगितलं....तेव्हा त्याला आठवलं पिहुला बघून ती असं का म्हटली.पण तिला हे कुणी सांगितलं ह्याची लिंक त्याला लागत नव्हती.

“ती कुठे गेलीय आता शाकाल? काही सांगून गेली का?” त्याने अगतिकतेने विचारलं.

“नाही रे स्पष्ट काही बोलली नाही...काहीतरी विचित्र बडबड करत होती.दिवसाचं चांदणं ....ताऱ्यांच गाव....समथिंग लाईक द्याट ..... आदि तिच्या डोक्यावर परिणाम तर नाही झाला रे...दिवसा चांदणं बघायला...” शलाकाने काळजीने विचारल.

आनंदाने हसत तो म्हणाला.... “ शाकाल काही होणार नाही तिला....मला माहित आहे ती कुठे भेटेल...मी करतो तुला फोन.....थ्यांक्स यार तुला माहित नाही तुझं असणं आमच्या आयुष्यासाठी काय आहे .....कॉल करतो तुला...नंतर.”

फोन ऑन करून तो धावतच खाली आला आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली.विभाताई त्याला थांबवत होत्या पण आयुष्याचा प्रश्न आहे एवढंच बोलून तो गाडीत बसला.ड्रायव्हरला गाडी रुद्रमहादेवाच्या टेकडीकडे घ्यायला सांगून त्याने पिहुला फोन करून कॉन्फरन्समध्ये कुणी दिल्लीचं भेटलं होतं का ह्या विषयी विचारलं...तिने सारसबागेपर्यंतची सगळी हकीकत सांगितली...आदिला दोन न दोन चार जोडून सगळा खुलासा झाला...आता फक्त आशु तिथे असायला हवी होती.

स्वप्नशिल्प पासून ही देहूरोडची टेकडी जवळच होती.गाडी टेकडीच्या खाली थांबली. त्याने एकवेळ खालून संपूर्ण टेकडी डोळ्यात साठवली...आणि रुद्रमहादेवाला मनोमन प्रार्थना केली.तापाने शरीराला थकवा आला होता पण आज तो धावणार होता त्याच्या...त्याच्या आयुष्यासाठी,त्याच्या हरवलेल्या प्रेमासाठी.....आयुष्यातून निसटलेल्या १२ वर्षांसाठी,मैत्री कसोशीने निभावणाऱ्या शलाकासाठी ...तिच्यासाठी न स्वतःसाठीसुद्धा...आणि तो धावत सुटला. त्याला कसलीच पर्वा नव्हती,काटे,दगडधोंडे...कसलीच नाही....

तो वर पोहचला तेव्हा आकाशात मळभ दाटून आलं होत....ह्या मौसमातला त्या दिवशी कदाचित शेवटचा पाऊस बरसून गेला होता.त्याने महादेवाला दुरूनच नमस्कार केला.अंगातल्या फिक्कट निळ्या जीन्सवर ठिकठिकाणी मातीचे डाग होते,कुठे गवताचा काडी कचरा लागला होता.अंगामधला ग्रे टी शर्ट घामाने भिजून अजून गडद झाला होता,त्याच्या थोड्या रापलेल्या चेहऱ्यावर जरा धूळ,घाम..शोभत होता...केस घामाने भिजले होते...तो दगडी कट्ट्याकडे पळत सुटला...

कट्ट्यावर ती पाठमोरी बसली होती. एक गडद आमसुली रंगाचा पदर मागून वाऱ्यावर उडत होता.तो पळतच कट्ट्याजवळ गेला.त्याला धाप लागली होती.गुढग्यावर दोन्ही हात ठेवत वाकून तो जलद गतीने श्वास घेत होता.त्याच्या श्वासांचा आवाज ऐकून तिने मागे वळून पहिलं. समोर तिचा आदि होता.तिचं भान हरपलं,स्थळ,काळ सगळं,सगळं,जणू ती विसरली होती...मधली १२ वर्ष जमेला धरलीच नव्हती आणि ती भावना अनावर होऊन कधी हसत कधी रडत आदिजवळ आली. त्याच्या कॉलरला पकडत समोर पसरलेल्या पांढऱ्या फुलांच्या गालीच्याकडे बोट दाखवत ती म्हणाली-“आदि....आदि..हे बघ ना आपले चाद्ण्यांचे दिवे....किती वर्ष झाली जणू ते माझी वाट पाहताय रे....त्याचं आयुष्य कितीय रे ?आपल्या प्रेम एवढं?की त्याहून जास्त....आदि सांग ना.. ही फुलं माझी वाट पाहत होती ना....आदि हे सगळं,सगळं अजूनही तसचं आहे....काही काही बदललं नाहीये आदी....”

“आशु इनफ” म्हणून जोरात ओरडून त्याने तिचा कॉलर वरचा हात झटकून संतापाने ओठांवर दात दाबून पूर्ण ताकदीने तिला एक थप्पड मारली. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती....रडक्या आवाजात ती पुन्हा म्हणाली-“आदि आय...हेट शलाका .....तिने प्रॉमिस तोडलं.....”

त्याने पुन्हा तिला जोरात थप्पड मारली.तिच्या नाजूक गोऱ्या गालांवर त्याचे बोट उमटले होते...एक हात गालावर ठेऊन रडतच ती पुन्हा म्हणाली –“मी तिला भेटायला नको होतं....”

मागे हात टाकून तिचे केस गच्च पकडत तो म्हणाला-“हो मीच तिचा नंबर द्यायला नको होता तुला....म्हणजे हा सगळा खुलासा झालाच नसता.”

ती कळवळली तिने त्याच्या हातून केस सोडवण्याचा प्रयत्न केला.तसं केसांची पकड अजून घट्ट करत तो म्हणाला-“काय समजतेस काय ग तू स्वतःला....तुला कळतंय का तू काय केलंस माझ्या सोबत...स्वतःसोबत.....तू गृहीत धरलं मला,माझ्या प्रेमाला.....तुझ्या दृष्टीने आई वडिलांसाठी केलेला त्याग मोठा होता,कोण तो विक्रम त्याचं प्रेम त्याला भेटावं म्हणून तू इतका मोठा धोका पत्करला,सीमाच्या लग्नाला प्रोब्लेम नको म्हणून मला टाळलं आणि आता स्वतःच गैरसमज करून घेऊन माझ्या आयुष्यात नसलेल्या मुलीच्या भावनांचा तू विचार केलास,तू सगळ्यांचा विचार केलास...सगळ्या जगासाठी तू त्यागाची मूर्ती होऊन फिरत होती...मग माझा दोष काय होता? माझ्यासाठी का भांडाव वाटलं नाही तुला? माझ्यासोबत जगण्यापेक्षा तुला माझ्यासाठी मरणं सोप्प वाटलं.माझा जराही विचार न करता सोयीस्कर मार्ग निवडलास. माझ्या निस्सीम प्रेमाला तू कधीच कधीच न्याय दिला नाहीस...मी वेड्यासारखं अंधारात तुझ्या अस्तित्वाच्या खुणा शोधत राहिलो...वाटलं हा अंधार नियतीने नशिबात लिहिला आहे पण खरी गुन्हेगार तर तू होतीस....सगळ्यांसाठी त्यागाचे दिवे उजळत राहिलीस आणि माझ्यासाठी काजव्या एवढाही प्रकाश तू ठेवला नाहीस...तू नव्हतीस तर वेड्यासारखं वरून खिडकींतून त्या पारिजातकाच्या झाडाशी बोलायचो...वाटल वेड तर नाही लागलय आपल्याला....पण त्या फुलांमधून तू हसल्याचा भास व्हायचा,त्याच्या दरवळणाऱ्या सुगंधातून तुझ्या असण्याचा आभास व्हायचा....,हे ही मी अमान्य करणार नाही की कितीतरी वेळा वाटलं..तुला मिठीत घ्यावं....तुझ्या नाजूक ओठांवर ओठ टेकवून सगळं सगळं जग विसरून एक व्हावं...पण हे भास आभासांचे खेळ खरे मानून मी दिवस काढत होतो.....तू कुण्या दुसऱ्याची झाली आहेस हा विचार खूप वेळा विषासारखा मनात भिनायचा,मी सैरभैर व्हायचो...कुणाला सांगणार? काय सांगणार.....खूप वेळा वाटलं...तुझ्या प्रेमाची ही झिंग उतरवायला नशेचा आधार घ्यावा पण मग स्वतःला सावरायचो....हे आयुष्य तुझी ठेव होती माझ्याकडे....मी प्रेमाला तारण ठेऊन स्वतःकडेच गहाण पडलो होतो....,खूप दिवस तुझ्या माझ्या प्रेमाच्या अस्तित्वाच्या खुणा मिरवणाऱ्या जागांकडे जाण्याचं मी जाणून बुजून टाळलं...कुणास ठावूक कुठल्या आठवणींचा काटा सरळ हृदयात घुसेल आणि ही जीवघेणी वेदना उराशी कुरवाळत मला जगावं लागेल....पण मग कोर्टात तारीख पडल्यासारखा चतुर्थीला सिद्धिविनायकाला जायला लागलो,पण त्याच्या सभामंडपातही मी पाउल ठेवलं नाही....बाहेरच बसून त्याने माझ्यावर केलेल्या अन्यायाचे हिशोब त्याला द्यायला लागलो....त्याने त्याच्याच दारात तुला माझ्यासमोर उभं करून माझ्या बाजूने निकाल दिला आशु पण तू त्यालाही अमान्य करायला निघाली होतीस?......काय सिद्ध करायचं ग तुला?....की आदित्यच्या प्रेमाचा अंत किती हे बघायचंय का तुला ?”

आदित्यच्या ह्या ओरडण्याने घाबरून ती सारखी रडत होती. त्याच्या ओठांवर हात ठेवून ती तिचे केस सोडवत म्हणाली-“शोना.....मला माफ कर रे.......मी खूप त्रास दिला तुला.......पण हे सारं करतांना फक्त तू न तुचं होता माझ्या समोर....मला मान्य की विक्रम त्याचं प्रेम मिळवायला शेवटच्या पॉसिबल प्रयत्नापर्यंत गेला आणि मी सोयीस्कर मार्ग निवडत....जीवन संपवायचा विचार केला.......मी तुला हे सगळं विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं राजा....पण नादान होते रे सोन्या,जगरहाटी माहीतच नव्हती...स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणाच वाटायचं मला...मी खरच तुला गृहीत धरलं पण मी खूप घाबरले होते रे....मला वाटलं आपलं प्रेम आहे कळलं आणि तुझ्याही जीवचं काही बर वाईट झालं तर?....प्रेम दोघांनी केलं सोन्या फक्त मी प्रेमाला त्यागात शोधलं आणि तू प्रेमाला प्रेमात शोधलं....ज्या त्रियुगी नारायण मंदिरात प्रत्यक्ष शिव आणि शक्तीच्या जन्मजन्मांतरीच्या गाठी बांधल्या गेल्या त्या अंखंड अग्नीला स्मरून हा काळामणी मी तुझ्या नावाचा घातला...शालुमाने नेहमी एका सौभाग्यवातीचाच मान मला दिला.....आदि जेव्हापासून आयुष्यात तू आहे तेव्हापासून फक्त तुचं आहेस.....हे दोन वेगळे शरीर नावाला उरलेत रे........आततायीपणे निर्णय घ्यायचा अक्षम्य गुन्हा माझ्याकडून होणार होता.ह्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा असेल ती मान्य...”

तिच्यापासून बाजूला होत तो म्हणाला.. “ तू गुन्हे करायचे आणि शिक्षा मी भोगायची ही तर माझी डेस्टिनी आहे तिला काय आणि कितीवेळा आवाहन देऊ......आता तर हे हरवलेपणच आपलंस वाटतंय.......आता पुन्हा हे नव्याने गुंतन नको की नव्याने आयुष्य सावरण नको.....”

बोलून बोलून त्याच्या घश्याला कोरड आली होती.अंग अजूनच तापलं होतं,त्याची ही तगमग पाहून तिचा अश्रूंचा ओघ थांबत नव्हता..तिने पर्स मधून पाण्याची बॉटल काढून त्याला दिली.रुक्षपणे तिच्या हातातून घेऊन तो घटाघटा पाणी प्याला आणि पुन्हा दुसरीकडे तोंड करून तो बसला.बऱ्याच वेळ दोघंही एकमेकांशी बोलले नाही.वाऱ्याने तिचे केस सारखे चेहऱ्यावर येत होते आणि त्यांना सावरतांना तिची मोहक कसरत होत होती.आदि ने एक आवंढा गिळला पण तो तिला माफ करणार नव्हता....आणि चुकार वाऱ्याने पुन्हा एकदा त्याला फसवलं.तिचा वाऱ्यावर हेलकावे खाणार पदर त्याच्या चेहऱ्यावर उडाला.तिने तो अलगद खाली खेचल्यावर मात्र पुन्हा तिच्या रडून..कोरड्या झालेल्या डोळ्यांच्या आर्त हाकेला तू भुलला.....न राहवून त्याने तिला घट्ट मिठी मारली...आणि दोघेही स्फुंदुन रडायला लागले.तिचा चेहरा दोन्ही हातात पकडत तो म्हणाला-“आज आता ह्या क्षणाला तुझं सगळं आयुष्य माझ्या नावावर कर...तुझं तुझ्याजवळ कहीही उरायला नको.....आता फक्त न फक्त माझाच विचार करायचास तू.....फक्त माझी दादागिरी सहन करायचीस आहे मान्य?”

थोडं हसत,थोडं रडत ती हलकेस डोकं होकारार्थी हलवत म्हणाली-“तुझं सगळं मान्य...”

पहिल्यांदा तिच्या कपाळवर ओठ टेकवत तो म्हणाला-“...मी एक एक क्षणाचा हिशोब घेणार आहे ...आहे तुला मान्य?”

“हो मान्य य मला”

तिच्या पापण्यांवर ओठ टेकवत तो म्हणाला-“ह्या डोळ्यांवर माझा सतत पहारा असणार आहे मान्यय तुला?”

“हम्म...” डोळे मिटत ती म्हणाली.

“हे नकट्या नाकाने रागावून लाल होण्याचा अधिकार गमावलाय आता.....तुझा राग, माझ्यावर चिडणं सगळं बंद फक्त प्रेम करायचं....आहे मान्य?

नाकाला नाक घासत ती म्हणाली-“हो मान्य य”

एक दीर्घ श्वास घेऊन,तिला अजूनच जवळ ओढत तिचा वरचा ओठ त्याच्या तापाने उष्ण झालेल्या ओठांच्या मिठीत पकडून मग हलकेच सोडत तो म्हणाला-“रोज रोज ह्या नाजूक ओठांना शिक्षा होणार...बारा वर्षाचं कर्ज सव्याज फेडाव लागणार आहे मान्य?”

श्वासात गुंतलेले श्वास हळूच सोडवत त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली-“आदि तुझ्या प्रेमावर केलेल्या अन्यायाच्या बदल्यात तू दिलेल्या ह्या सगळ्या गोड शिक्षा मान्यय मला... तू दिलेला प्रेमाचा सलाम मान्यय मला............तुझ्या ओठांनी माझ्या ओठांवर दिलेल हे सलाम-ए-इश्क मान्यय मला....जन्मोजन्मीसाठी...”

समोर पसरलेल ताऱ्यांच गाव प्रेमाने न्हाऊन निघालं होतं...ह्याच दिवसा उजेडाच्या तार्यांच्या साक्षीने एक प्रेमकहाणी फुलली,विझली पुन्हा उमलली होती. आकाशातलं मळभ जाऊन आता लख्ख प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात विरघळून ओठांची साखरमिठी अधिकचं गोड गोड होतं गेली..................

समाप्त