गौरवी आता शुद्धीवर आली होती आणि आपण हॉस्पिटल मध्ये कसे? कोणी आणलं इथे? म्हणून नर्स ला विचारात होती. तेवढयात विवेक औषधी घेऊन तिथे आला. आणि गौरवीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला.
विवेक - " मी आणलं तुला इथे, कस वाटतंय तुला आता?"
गौरवी त्याच्याकडे फक्त बघत होती. वरून शांत दिसत असली तरी खूप राग , प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते.
विवेक - (तिला भानावर आणत) काय झालं? असं का बघतेय? मी काही केलंय का? आणि तू कुठे होतीस?
तो खर तर परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता की हिला काही समजलंय का ते.
नर्स तिथे समोर असल्यामुळे ती फारस काही बोलू शकत नव्हती. " मी आता ठीक आहे" एवढंच ती बोलली. आणि नर्स ला परत विचारू लागली की "मला सुटी कधी मिळणार?"
विवेकला तिच्या मनाचा काहीच थांग लागत नव्हता.
तो परत बोलला " अग हो ....आधी तू ठणठणीत बरी तर हो मग जायचच आहे आपल्याला घरी. तुला असच घेऊन गेलो तर तुझे वडील मलाच ओरडतील ना माझ्या मुलीची काळजी घेतली नाही म्हणून. " तो थोडा स्मित करून तिला मोकळं करण्याचा प्रयत्न करत होता पण गौरवीच्या डोळ्यात आता त्याला राग स्पष्ट दिसला. त्याला जाणवलं की हीला माहिती झालय बहुतेक सगळं. पण आपणहून स्पष्टीकरण दिलं तर तिचा भ्रम आणखी पक्का होईल त्यापेक्षा तिलाच वेळ द्यावा. इथून बाहेर पडल्यावर ती नक्की काहीतरी बोलेलच.
थोडाच वेळात गौरवीला सुटी होते. हॉस्पिटच्या सगळ्या formalities करून ते दोघेही निघतात. विवेक तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण ती मात्र शांत असते.
विवेक - " तू काही खाल्लं नाहीस म्हंटलेत डॉक्टर, तू कुठे होती काल? किती शोधलं तुला? काही खाल्लं का नाहीस? आणि डोळे का एवढे सुजलेत तुझे? आपण आधी काही खाऊुयात का प्लीज मग बोलूयात, सद्धे तू फार ताण घेऊ नकोस. चल ना आपण काहितरी खाऊयात मलाही भूक लागलीय. " अस म्हणत तोच हात पकडून तिला हॉटेलच्या दिशेने घेऊ जाऊ लागतो. तेवढ्यात ती जोरात हात झटकून देते, आता तिला आपला राग आवरण शक्य होत नाही. आणि ती चढ्या आवाजातच त्याला बोलू लागते.
गौरवी - " तुला खरच एवढी काळजी वाटतेय माझी विवेक? किती दिवस हे नाटक करणार होतास ? आणि का? कशासाठी? मी इथे कुणाच्या विश्वासावर आली होती? आणि तू काय केलंस? मी कुठे गेली विचारतोय तू मला , तुला शोधायला गेली होती मी. आणि तू मला एकटं सोडून निघून गेला होतास त्या पार्टीत कुण्या दुसरी बरोबर. मला सगळं कळलंय मी बघितलंय तुम्हा दोघांना. लेडीज टॉयलेटमध्ये कीस करताना एवढाच नाही मी तूमच बोलणं सुद्धा ऐकलंय. तुला काय वाटलं रे तू मला फसवशील, नाही... देव आहे माझ्यासोबत आजही.. आणि त्याने वाचवलय मला तुझ्यापासून. तुझं सत्य माझ्या डोळ्यापुढे आणून. का केलस तू असं सांग, का केलंस? मी किती मनापासून प्रेम केलं तुझ्यावर आणि त्याच हे फळ दिल तू मला. सांग ना का केलंस तू असं?
एका श्वासात ती सगळं बोलत होती. त्याची कॉलर पकडून ती त्याला जाब विचारात होती आणि आसवांनी तर केव्हाच त्यांची वाट शोधली होती.
तो ही शांत होता काय बोलावं त्याला कळत नव्हतं. त्यानी तिला समजावण्याचा प्रयत्न केला " शांत हो तू प्लीज , ताण घेऊ नकोस डॉक्टरांनी नाही सांगितलंय, आणि इकडे ये आपण बसून बोलूयात." अस म्हणत त्याने तिला एक बाकड्यावर बसवलं आणि पुन्हा तिच्याशी बोलू लागला. तिला काय सांगायचं हे त्यानी आधी ठरवलेलं होतंच , तो फक्त तिच्या या प्रश्नांचिच वाट बघत होता. त्यांनी तिला पाणी दिलं. तिला त्याच्या हातून पाणीही प्यावस वाटत नव्हतं, जे झालं ते आठवल्यानंतर ते पाणीही तिला विष वाटत होतं, "नको मला" एवढंच ती म्हणाली.
विवेक - " प्लीज तू शांत हो आधी, मला नीट समजू दे तुला काय म्हणायचं आहे, काहीतरी गैरसमज करून घेतलाय तू नक्कीच."
गौरवी - " गैरसमज आधी होता, आता माझा गैरसमज दूर झालाय"
विवेक - "काय बोलतेय तू? मी लेडीज टॉयलेटमध्ये कोणत्या मुलीबरोबर किस करत होतो?! आणि केव्हा बघितलं तू हे? तो नक्की मीच होतो का?"
उगाच " मी त्यातला नाहीच" असा आव आणून तो बोलत होता.
गौरवी - पार्टीमध्ये सगळे जेव्हा डान्स न्जॉय करत होते, आणि तू म्हंटल होता की आलोच मी दोन मिनिटात तू इथेच थांब म्हणून मला सांगून गेला होतास. मी वीस मिनीट वाट बघितली पण तू आला नाही मलाही वॉशरूम ला जायचं होतं मला वाटलं तू येतो तोपर्यंत मी लगेच जाऊन येते. म्हणून मी लेडिज टॉयलेट कडे आले होते, मी आत आले आणि बघून शॉकच झाले. मला काहीच सुचलं नाही मी तिथून तशीच पळत निघाले, बाहेर रस्त्यावर बराच लांब गेल्यावर थांबली एक बाकड्यावर बसली आणि रात्र तिथेच काढली. सकाळी परत आली आणि रिसेप्शनवरून खोटं कारण सांगून चावी मिळवली. आत येऊन बघते तर ....... ती हुंदके देऊन देऊन रडू लागली पुढचं तिला बोलवतच नव्हतं.
-----------------------------------------------------------------------
क्रमशः...