प्रारब्ध ..भाग २
मामाने स्टूलवर उभे राहून दाराला तोरण लावुन घेतले .
मग मुहूर्तमेढ रोवली ,सगळ्या सुवासिनींनी तिची पूजा केली .
लग्न इतक्या तातडीने ठरलेआणि मुहूर्त पण दोन दिवसात लगेच होता
त्यामुळे मुहूर्तमेढ आणि साखरपुडा एकदमच होते
सुमनने सुद्धा हळदी कुंकू वाहिले आणि नमस्कार केला
“आता सर्व्या आया बायास्नी बी नमस्कार कर ग सुमे .
मामीला होकार देऊन तिने आधी मामा आणि सगळ्या मोठ्या पुरुष माणसांना अगदी वाकुन नमस्कार केला
मग मामीला आणि आलेल्या शेजारच्या बायकांना पण नमस्कार केला .
तोवर शेजारच्या तीन चार आज्ज्या पण जमा झाल्या होत्या त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी पण तिची अलाबला घेतली
“बायो सुमी तर लयच देकनी दिसुन रायली ..सखु नजर लागु न्हाय पोरीला... दीरीष्ट काढ बाय तिची .”
“व्हय मावशी काडनार हाय म्या .. “तिची मामी म्हणाली ..
मग सुमनने सर्वांना मामीने केलेल्या बेसनाच्या लाडूचा एक एक तुकडा वाटला आणि सर्वांचे तोंड गोड केले .
हा कार्यक्रम पार पडला .
थोड्या वेळाने नवरा मुलगा सोबत चार पाच पाहुणे घेऊन आपल्या आई वडिलांसोबत आला .
मग सुरु झाला छोटेखानी साखरपुड्याचा कार्यक्रम .
सुमन साठी एक अंगठी आणि मोत्याचा सेट आणला होता त्या लोकांनी
सोबत एक सुंदर शालुवजा साडी ..
त्या लहान गावातुन खरेदीला फारसा वाव नव्हता ,पण तरीही चांगल्यातली चांगली साडी
परेशने सुमनसाठी घेतली होती .
सुमनची लग्नाची साडी आणि मंगळसूत्र आणि काही दागिने मात्र मुंबईहून परेशचे मित्र घेऊन येणार होते.
सुमनच्या मामांनी पण परेशसाठी अंगठी घेतली होती .
त्याच्या आईसाठी साडी, वडिलांसाठी धोतर शर्ट घेतले होते
शिवाय त्याच्या मामा मामींना पण कपड्याचा आहेर घेतला होता .
लग्नाचा काहीच खर्च त्यांना करायचा नव्हता ..
त्यामुळे या कार्यक्रमाला थोडा खर्च झाला तरी चालेल पण चांगला साजरा करायचा त्यांनी ठरवले होते.
लग्नाचा कार्यक्रम मुलाकडच्या लोकांकडे असल्याने
गावातल्या जवळच्या लोकाना या साखरपुड्याच्या कार्यक्रमातच जेवण द्यायचे होते .
शेजारच्या शंकराच्या मोठ्या देवळाच्या आवारात जेवण तयार करायला तालुक्याहून माणसे बोलवली होती.
बेत साधाच होता त्या छोट्या गावच्या पद्धतीप्रमाणे ..
मसालेभात, आमटी, खाजे ,कोशिंबीर,मठ्ठा ..वगैरे
तरी पन्नाससाठ माणसे होती जेवायला .
साखरपुडा कार्यक्रम छान पार पडला
परेश आणि सुमनने एकमेकांना अंगठी घातली
परेशच्या मित्रांनी बरेच फोटो पण काढले .
साखरपुड्याच्या साडीत सुमन एकदमच छान दिसत होती
परेशची नजर तर तिच्यावरून हटत नव्हती ..
तशा मुंबईत भरपूर मुली त्याच्या आजूबाजूला दिसत असायच्या ..त्याच्या शेजारच्या ,
ऑफिसमधल्या ,ओळखीच्या ,..आणखी बऱ्याच .होत्या .
त्यातल्या काही खुप सुंदर आणि अद्ययावत कपड्यात वावरणाऱ्या सुद्धा होत्या .
पण सुमन मध्ये जे “विशेष ” त्याला दिसले ..ते पूर्वी कधी त्याला अनुभवाला आले नव्हते .
स्वतःच्या प्रारब्धावर तो खुष झाला होता अगदी!!
कार्यक्रम पार पडल्यावर जेवण करून परेश आणि त्याच्या घरचे परत आपल्या गावाला जायला निघाले
खरेतर सुमनशी काही एकांतात बोलावे असे त्याला खुप वाटत होते
पण त्या लहान खेड्यात तशी पद्धत नव्हती .
त्यामुळे सगळ्यांच्या उपस्थितीत तिला उद्देशून बोलावे लागत होते .
ती पण हसून त्याच्याकडे तिरपे कटाक्ष टाकत होती .
तसे जेंव्हा लग्न ठरले होते तेव्हा त्याने स्वतः सुमनला एकीकडे घेऊन तिची पसंती विचारली होती .
तेव्हा त्यांच्यात पाचदहा मिनिटे थोडे बोलणे झाले होते ..
तिचा तो घंटा किणकिण केल्या सारखा नाजुक आवाज आणि
त्याच आवाजात मिळालेला तिचा होकार त्याला खुप आवडला होता .
शिवाय मोठ्या मोठ्या काजळ भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहणे त्याला सुखावून गेले होते ,
आता मात्र परत जाताना फक्त त्याने सुमनला साडी ,अंगठी आवडली का हे विचारले
ते सुद्धा सर्वांच्या समोरच ..
सुमनने वर न बघता लाजत हसुन होकार दिला होता .
तिचे तर जणु पाय जमिनीवर ठरत नव्हते .
परेशसारख्या देखण्या मुलाचे, मुंबईचे स्थळ मिळाल्याने अतिशय आनंदात होती ती ...!!
सर्व मंडळी परत निघाली तेव्हा परत एकदा ती सासु सासरे आणि बाकीच्या मोठ्या माणसांच्या पाया पडली .
सासुबाईंनी तिला जवळ घेतली आणि लवकर ये लग्नाला असे सांगितले .
सुमनने पण मान डोलावली ..
सगळी माणसे गेल्यावर तिने आपल्या प्रिय मैत्रिणीला मिनुला निरोप दिला .
लग्नादिवशी तिला लवकर यायची आठवण केली
मामा मामींनी पण आई वडिलांना सोबत घेऊन यायला सांगितले मिनुला .
जेवणाचा कार्यक्रम आटोपून ,थोडी बोलाचाली झाल्यावर ,
सुमन ,मामा,मामी ,चिंटू पिंटू सगळी जण घरी आली.
चिंटू ,पिंटू तर जाम खुष होते ताईच्या नवऱ्यावर ..
ताई आमी बी येनार तुज्या बरुबर मुंबईला ..असा आत्ताच त्यांचा ताईच्या मागे हट्ट चालू झाला होता.
सुमन पण हसून दोघांना होकार देत होती.
घरात आल्या आल्या आधी सुमनला पाटावर बसवून मामीने भाकर तुकडा तिच्यावरून ओवाळून ..
दाराबाहेर टाकला .
या वेळेस मामांच्या पण डोळ्यात पाणी तरळले होते ..
त्यांना बहिणीची आठवण आली .
मामांनी मरणाच्या दारात असलेल्या बहिणीला शब्द दिला होता तुझ्या लेकीचा मी चांगला सांभाळ करीन असा ..
मामा म्हणाला ,”सुमे लय नशीबवान हायस तु ..
सर्वे आता शुभ शुभ होनार बग ..
माझ्या ताईला दिल्येला त्यो शबुद आता पुरा व्हतोय माज्याकडून “
मामीने पण व्हय जी म्हणून मान डोलावली ...
मध्ये एक दिवस गेला तोही फारच गडबडीत ..
सुमन साठी एक चांगली साडी ..मामा ,मामी ,मुले यांना कपडे
इतर किरकोळ खरेदी .वगैरे .
फराळाचे जे काही थोडे पदार्थ करायचे होते ते शेजारच्या बायकांनी एकत्र येऊन केले .
अशी सगळी तयारी एकदा पूर्ण झाली ..
दुसऱ्या दिवशी गावातल्या दोन तीन जीप मधून काही जवळचे नातेवाईक
सुमनची मैत्रीण ,तिचे आई वडील असे सर्व दहा पंधरा लोक लग्नाला निघाले.
लग्नघरी सगळे पोचले तेव्हा त्यांनी पाहिले दारात मोठा मांडव घातला होता .
सनई चौघडे वाजत होते .
नवऱ्याच्या घरच्या लोकांनी पुढे येऊन त्या लोकांचे स्वागत केले .
सगळीजण आत घरात गेली .
मग लाडू, चिवडा, चहा पाणी ओळखी पाळखी रीतसर पार पडले .
सुमनच्या सासुने सुमनच्या मामीच्या ताब्यात लग्नाची साडी व दागिने दिले .
सुंदर जरीकाठी सिल्क साडी सोबत तिच्या मापाचे ब्लाउज ,सोन्याचा लफ्फा ,चार बांगड्या ,पाटल्या दोन प्रकारची मंगळसूत्री आणि सोन्याचे झुमके... एवढे सगळे होते त्यात, हे सर्व परेशच्या मित्रांनी मुंबईतून येताना आणले होते .
मामी तर चकित झाली हे सगळे बघुन आणि सुमन हरखून गेली .
आतल्या खोलीत जाऊन मिनूने सुमनला साडी नेसवून दागिने घालून तयार केले.
तोपर्यंत लग्नाचा मुहूर्त आलाच आणि एकच गडबड सुरु झाली .
लग्नविधी सुरु झाले .
इकडे घरगुती आहेर देणीघेणी पण पार पडली.
नवरा मुलगा मांडवात आला आणि भटजींनी अंतरपाट धरला .
सुमनला पण तिचे मामा सोबत घेऊन आले .
मंगलाष्टका झाल्या आणि अंतरपाट बाजूला झाला .
सुमन आणि परेशने एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्याआणि लग्न लागले .
माळ घालताना परेशने सुमनकडे पाहिले ,सुमनची आणि त्याची नजरानजर झाली .
तिच्या हातात पुष्प गुच्छ देताना त्याने हलकेच तिचा हात दाबला .
सुमनने लाजून मान खाली घातली,ते पाहून परेश अगदी घायाळ झाला.
खुप सुंदर दिसत होती सुमन ...!!
क्रमशः