12. कोरोना व्हायरस;ऑनलाईन शिक्षण
कोरोना व्हायरस आला आणि सर्वच क्षेत्र बहुतःश निकामी झालं. मग ते व्यापारी क्षेत्र असो की अजून कोणते. त्यानं कोणत्याच क्षेत्राला सोडलं नाही. अजुनही काही दुकानं उघडलेली नाहीत. आणि काही प्रतिबंधीत क्षेत्र खुली झाली नाहीत.
हे तर इतर क्षेत्रातील झालं. शिक्षण क्षेत्रातही शिक्षणाचा बोरा वाजलेला दिसत आहे. सरकार म्हणत आहे की कोरोना अजुनही आटोक्यात आलेला नसून आम्ही या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवू. योजना बरी आहे. बरोबरही आहे. कारण आजच्या काळात सर्वांजवळ स्मार्टफोन आहेत. त्यांचे फोन ऑनलाईन नेटवर असतात. पण हे जरी वरवर खरं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हे खरं नाही. कारण अजुनही ब-याच लोकांजवळ व्हाट्सअपचे मोबाईल नाहीत.
ऑनलाईन वर्ग शिकविण्याच्या दृष्टीकोनातून विचार करीत असतांना ज्यावेळी प्रत्यक्षात व्हाट्सअपचे मोबाईल नंबर जेव्हा पालकांना मागीतले, तेव्हा उत्तरं मिळालीत की सर आमच्याकडे व्हाट्सअपचे मोबाईल नाहीत. बाजूचे नंबरं द्या असं विचारताच त्यांनी सांगीतलं की बाजूची मंडळी साधा फोन आल्यावर देत नाहीत. काही जणांनी सांगीतलं की सर इथं पोटाची सोय करायला पैसे नाहीत. कामधंदे बंद आहेत. कुठून टाकणार मोबाईल मध्ये पैसे. महागाई वाढली आहे.
नेट पैकेज काही फ्री नाही की प्रत्येक पालक आपापल्या मोबाईल मध्ये नेट पैकेज टाकेल. तसेच कोरोनानंतर बाजार जरी उघडला असेल तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगणाला पोहोचले आहे. पेट्रोलमध्ये ही वाढ झाली आहे. त्याचबरोबर सर्वच वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. सामान्य माणसाची गोची झालेली असून सामान्य माणूस याच कोरोनाच्या लॉकडाऊन सतत घरात बसलेला होता. तो नुकताच कामाला जरी लागला असला तरी त्याला आतापर्यंत रिक्त झालेली तिजोरी नव्हे तर झालेले नुकसान भरुन काढायचे अाहे. अशावेळी लोकांच्या मोबाईल जरी असले तरी लोकांच्या मोबाईल मध्ये नेट टाकायला पैसे नाहीत. काहींजवळ तर व्हाट्सअपचे मोबाईलच नाहीत. तर काहींजवळ साधे देखील मोबाईल नाहीत. अशावेळी ऑनलाईन शिक्षण जरी घ्याायचे झाले तर ते घ्यावे कसे? हा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला असून ऑनलाईन शिक्षण द्यावे कसे? हा प्रश्न शिक्षकांनाही पडलेला आहे. पण आपल्याला पगार मिळतो ना हाच एकमेव उद्देश घेवून तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत परिस्थितीशी जुळवून घेत हो ला हो करीत शिक्षकही गप्प आहेत. खरंच यातून शिक्षणाची ऐसीतैसी होत जरी असली तरी दोष कोणाला द्यायचा हा ही नवा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. यातून मार्ग कसा काढता येईल यावर विचार करणे सुरु आहे. कारण कोरोना आजच संपणारा आजार नाही. त्याला संपवायला बरेच दिवस लागतील. परंतू त्याला शमविण्यासाठी अजून आपली मानसिक तयारी झालेली नसून ज्यावेळी मानसिक तयारी आपली होईल, तेव्हा नक्कीच कोरोना संपेल. तोपर्यंत शिक्षणाची ऐसीतैसी जरी होत असली तरी ती ऐसीतैसी आपल्याला सहन करावी लागेल. घाई करु नये. नाहीतर ह्याच कोरोनाला संपवीत असतांना कोरोनाच आपल्याला संपवून जाईल हे ही लक्षात घ्यायला हवे.