11. कोरोना व्हायरस;शाळेचा प्रश्न
कोरोना व्हायरस लोकांना छळत चाललाय. सरकारन लाकडाऊन करुन पाहिलं. पण काही उपयोग झाला नाही. काही काही लोकांनी तर लाकडाऊन जबरदस्तीनं तोडलं. लोकं महिनाभर घरात राहिल्यानं उपासमार होवू लागली. त्यातच आंदोलनंही. कारण लोकं त्रासले होते. म्हणून सरकारनं लाकडाऊन खोलायचं ठरवलं.
लोकं ऐकत नाहीत. म्हणून सरकारनं लाकडाऊन उघडायचं ठरवल्यावर लोकं आनंदित झाले. त्यांना आता कोरोनाचं भय राहिलं नाही. त्यातच आता उपासानं मरण्यापेक्षा कोरोनानं मरु अशी हिंमत लोकांनी आपल्या मनात निर्माण केली. तसेच प्रतिकारशक्ती ही. पण खरंच कोरोना लोकांच्या हिमतीला ऐकतो काय?
मग काय, लाकडाऊन उघडताच कोरोनाला मोकळे रान भेटले आणि देशात तीव्र गतीने कोरोना वाढायला लागला. नागपुरचं उदाहरण द्यायचं झालं तर आज लेख लिहिण्याचे वेळी सहा दिवसात एकशे सत्तावन आकडा होता. पण काय करणार. सरकारपुढेही पेच निर्माण झाला.
कोरोना संक्रमीत होणारा रोग आहे. तो लाकडाऊन करा की उघडा. त्याला फरक पडत नाही. लाकडाऊन केले तर कासवगतीने आणि उघडले की सशाच्या वेगाने. तसेच त्यावर सध्या तरी उपाय न निघाल्याने त्याची भीती. त्यातच वादळं, पाऊस भुकंपही......
ही महामारी आहे. ही महामारी त्या पुराण कथेची आठवण करुन देत आहे की हे मनु, महाप्रलय येणार आहे. तेव्हा सावध हो. मी नाव तयार करुन ठेवणार आहे. त्या नावेत जे जे कामाचे आहे. ते ते घे. पशुपक्षी सारं काही. कारण महाप्रलय तो. कोण वाचेल कोण नाही, हे सांगता येत नाही. महाप्रलयाचे वेळी मी मासा बनून येईल. तु माझ्या शिंगांना नाव बांध. मी तुला मेरु पर्वतावर घेवून जाईल.
काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही दंतकथा आहे की नाही कुणास ठाऊक, पण या कथेची आठवण सर्वांना होत असेल. कारण या कोरोनाच्या महामारीत परिस्थितीच तशी दिसून येत आहे.
एकीकडे कोरोनाची जागतिक महामारी सुरु असतांना काल महाराष्ट्रात वादळ आलं. तसेच त्या वादळानं मुंबईसह भरपूर ठिकाणची घरं पडली. टिना कौलं फुटले. झाडंही जमीनदोस्त झाली. खुप वित्तीयहानी झाली. त्यातच कोरोनात महाराष्ट्राचा आकडा इतर राज्याच्या मानाने जास्तच आहे. त्यातच तो अजून वाढतच चालला आहे. अशावेळी लाकडाऊन ही उघडले आहे.
सरकारने माल, चित्रपटगृहे उघडले आहेत. दुकानही सुरु केले आहे आणि आता शाळा सुरु करणार असाही निर्णय ते घेण्याच्या संभ्रमात आहेत नव्हे तर घेणारच आहेत. त्यामुळे थोडं लिहावंसं वाटलं.
कोरोनाची साथ सुरु असतांना समजा लहान मुलांना शाळेत आणलंच आणि पुरेसं अंतर पाळत शाळा सुरुही केली. तरी काय कोरोना वाढणार नाही काय?ठीक आहे. वर्गात मुले सुरक्षीत अंतर पाळून बसवली. त्यांना लवकर सुटी दिली. तरी ती लहान लहान मुलं एकमेकांना हात लावणार नाहीत काय? समजा यामधील एखाद्याला कोरोना असला तर तो कोरोना इतरांना होणार नाही कशावरुन?कोरोना काय विचार करतो काय कि लहान मुलांचे नुकसान होत आहे अभ्यासाचे, त्यामुळे त्यांच्या वाट्याला जावू नये. सरकार विचार करीत असेल की त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होते. पण ते जीवंत जर असतील तर भरपूर काही शिकून घेतील. त्यासाठी ते जीवंत असणं गरजेचं आहे. शिवाय एकवर्ष नाही गेली शाळेत तर काय बिघडणार आहे. ते शिकणार नाहीत असं सरकारला वाटते. त्यांचं नुकसान होईल असं सरकारला वाटते. पण नुकसान कसे होणार?
एक आपण ऐकले असेल कि अनुभव हा देखील एक गुरु असतो. विद्यार्थी हे सतत शिकत असतात. शाळेत ते किती वेळ असतात. फक्त पाच ते सात तास. त्या पाच तासात ते जेवढे शिकत नाहीत. त्याहीपेक्षा जास्त ते परीसरातून शिकतात. घरची सगळी कामं ते बिनाबोलानं शिकतात. जे काही काही विद्यार्थ्यांच्या पोट भरायच्या कामात येते. निसर्गातील सर्वच फुलपाखरांची नावं पुस्तकात नसतात. तरीही विद्यार्थ्यांना माहित असतात. कोणत्या झाडाचं रोपटं हे कसं असतं हे शिक्षकांना देखील माहित नसतं, ते विद्यार्थ्यांना माहित असतं. सापाची निरनिराळी नावं ते पटकन सांगतात. आम्ही आमच्या पुस्तकातून दोन चारच जाती शिकवतो. जे त्यांना शिकवतो ना आम्ही. ते आम्ही नाही शिकवले तरी विद्यार्थी अनुभवातून शिकत असतात. त्यामुळं त्यांचं नुकसान होत आहे. हे कुणीही समजून घेण्याची गरज नाही.
आमची शिक्षण पद्धती ही साचेबंद आहे. आम्ही चौफेर शिक्षण देत नाही. फक्त साचेबंद शिक्षण शिकवतो. पाण्याला उष्णता दिल्यास ते गरम होतं असं आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. पोळ्या बनवणे, भाजी, भात बनवणे हे शाळेत शिकवले जात नाही. तरीही आम्ही शिकतोच.
पुर्वी तर आश्रम पद्धती होती. मुले शिकत नव्हती विशिष्ट वयात आल्याशिवाय. जेव्हा मुलांची कानाला हातं पुरायची, तेव्हा मुलं आश्रमात प्रवेश मिळवीत. त्यांना आश्रमात सर्वच कामं करावी लागायची. झाडांना पाणी घालणे. पीक पिकवणे. आपले जेवन बनवणे, स्वतःचा ताट स्वतःच धुणे. जंगलात जाणे, जडीबुटी शोधणे, तसेच लाकडे आणणे. यातूनच मुलं पुर्ण शिक्षण शिकायची. पण जसाजसा काळ बदलला. तसंतसं शिक्षण बदललं. शिक्षणाच्या कक्षा बदलल्या.
शिक्षणाच्या कक्षेबरोबरच लोकसंख्या वाढली व महागाईही. त्यातूनच पोट भरण्यासाठी माय बाप दोघंही कामाला जावू लागली. मुलं परिसरात खेळू लागली. दंगामस्ती करु लागली. तेव्हा त्या मुलांना वळण लावायचं कसं?मुलं ठेवायची कोणाजवळ? म्हणून शाळेचे अवास्तव महत्व वाढले. ते एवढे वाढले की फँशनच झाली. आज तीन वर्ष झाले की मुलांना शाळेत घातलं जातं. त्यांच्या बालमनाची हत्याच केली जाते. जे वय खेळायचं असतं. त्या वयापासून त्याला शाळा, शाळेतील शिक्षीका. तो वर्ग. वर्गात चूप बसण्याचं दंडक. सर्व काही. त्याचं स्वातंत्र्य जे थोड्या दिवसांसाठी का होईना ते हिरावलं जातं. खरंच त्या वयात शिकण्याची तरी मानसिकता असते का? तरीही आम्ही या फँशनच्या काळात आम्ही कुठे कमी नाही म्हणत शिकवतो व शाळा बंद असल्यास नुकसान होत आहे असे समजतो. हे काही बरोबर नाही.
क्षणभर विचार करा. पालक या नात्याने. सरकारनेही पालकांचा पालक या नात्याने विचार करावा व कोरोनाच्या या महामारीत शाळा सुरु करायची घाई करु नये. कारण बालकाची सुरक्षा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शिक्षण होईलही पुढे. पण जीव असेल तर. जीव जर नसेल तर शिक्षण कुचकामाचे ठरेल याचा विचार करण्याची गरज आहे.
फुलपाखरांना फुलपाखरासारखं काही दिवस स्वच्छंद उडू द्यावे. कोरोनावर उपचार निघू द्यावा. मगच शाळा उघडाव्या. विनाकारण नुकसानीच्या नावावर निरागस मुलाचा जीव धोक्यात घालू नये.