हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी...
भाग-8
कणक मनात भयाने पुटपुटत होती. तिने सर्व गोष्टी ऐकल्या होत्या, ज्या त्या तिघी बोलत होत्या. कोणीतरी आलय याची चाहूल लागताच, तिघींनी विषय बदलला. आणि मावशी बोलल्या,
"अगं वत्सला पाच-सहा महिन्यांपासून काही तराटनगरीच्या काकांचा फोन नाही आला बरं का... काय माहिती? माझ्या मते त्यांना फोन करून घ्यावा."
"काय? तराटनगरी....?"
"अगं होऽऽऽ ...ते मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले ना राहायला..तराटनगरीला.......!"
"अगं पण ते तर इकडे खाली शेतातल्या बंगल्यात राहायचे ना?" वत्सलाबाई हातवारे करत प्रश्न विचारत होत्या.
"हो ...राहायचे ना...पण अगोदर ..!"
"म्हणजे?"
"अगं म्हणजे ते अगोदर तिथे राहायचे. पण जेव्हा पासून
शरद (काकांचा मुलगा) पुण्याला गेलाय ना, तेव्हापासून ते तराटनगरीला आले. बाप- मुलाचा छत्तीसचा आकडा...! दोघांच जमत नाही.काकू एकटी काय-काय करणार? कोणाचं ऐकणार? रोज-रोज भांनगड नको. म्हणून शरद पुण्याला गेला. गेला तर गेला पुन्हा आला सुध्दा नाही. इकडे काका-काकू आजारी का काही कमी पडलं, कशाचचं भान नाही त्याला.....
मग आपणच बोलावा त्यांच्याशी.मात्र पाच-सहा महिन्यात आमचं पण काही बोलणं ना फोन झाला काकांशी.हे पण जात राहायचे अधून-मधून भेटायला.पण आता शेतातल्या वाढत्या कामांमुळे यांनाही जाता आलं नाही.
कसं राहत ना माणसाचं जीवन...!पैसा राहतो मात्र सुख, समाधान, नाते,आपलेपण,जिव्हाळा राहत नाही.
ज्ञान,धन,आरोग्य ... प्रकृतीने या तिघांना एकत्र राहण्यासाठीच बनवलेलं आहे. भले माणसाने जीवनात एखादी कला कमी शिकावी, मात्र या तिघांना एकत्रित रित्या योग्य प्रकारे मिळवता येण्याची कला शिकली पाहिजे.ऐवढा पैसा असून काही उपयोग आहे का? जर काकांना प्रेमाचे दोन शब्द बोलता आले असते तर आज शरद त्यांना भेटायला नसता आला का? लोक त्यांच्याशी चांगले नसते बोलले का ? काका जर बोलायला चांगले असते ना तर लोकांनी त्यांच्यासोबत फक्त पैशा पुरती नाही तर प्रेमाने त्यांची विचारना केली असती.आयुष्यात शब्दांना फार महत्त्व आहे. चांगल्या शब्दानेच आणि प्रेमाने नाती टिकवता येऊ शकतात. पैशाने थोडी नाते विकत घेता येतात... आता बघ ना, एवढ्या मोठ्या फार्महाऊसमध्ये फक्त काका-काकूच राहतात. पैसा आहे मात्र कोणी आपलं म्हणणार नाही. या वयात त्यांची अपेक्षा पूर्ण करणारं देखील कोणी नाही."
"हो ना गं बाई .....! पण एवढं मात्र खरं आहे की, काकांना आयुष्यभर त्यांचा स्वभावऽऽऽ नडला."( तिघी जणी विचार करत विचित्र हावभाव तोंडावर आणत होत्या.)
"बरं ऐक ना, ती तराटनगरी किती टोकाला आहे. गावापासून किती दूर..... जास्त वस्ती पण नाहीये.जातांना आजु-बाजूला जंगलच लागते.गाड्या पण नाही जात तिथे. आपल्याला पाईच जावं लागणार. पण काकांनी कशाला जायचं तिकडे? इकडेच राहायचं ना शेतातल्या बंगल्यात...!"वत्सलाबाईंंनी शंका विचारली.
"तुला आता माहितीच ये की, काका कशे आहेत. पैशांचा हव्यास.....ह्या फार्महाऊसमध्ये राहणारे भाडेकरू निघून गेले...का? तर म्हणे की, ते फार्महाऊस जंगलात आहे, आणि त्यामध्ये त्यांना अनेकदा अमानवी शक्ती असल्याचा अनुभव आला.म्हणून घाबरून पळून गेले. पैसे कमी मिळता कामा नये म्हणून काका काकूंना घेऊन फार्महाऊसमध्ये राहायला गेले आणि इकडच्या खालच्या शेतातील बंगल्यात भाडेकरू टाकले. शरद होता तेव्हा गावात त्याच्या शिक्षणासाठी रहावा लागायचं.आता काही चिंता नाही म्हणून गेले तिकडे.."
"काकांचा असा स्वभाव आणि एकूलता एक मुलगा म्हणून आज एवढी संपत्ती आहे....नाही का?"कणकची आजी म्हणाली.
"हो ना....!"
कणकच्या मावशीने कणकला बघितलं.....
"काय गं कणक..? ये ना......."
"हा...हा येतच होती."
(कणकने काहीच ऐकले नाही अशे हावभाव तीने चेहऱ्यावर आणले. आणि विषय बदलत म्हणाली.)
"मावशी... तो अहिश दादा कुठे राहतो गं? काय करतो? इथे राहत नाही वाटत ना?"
"तू पण त्याची विचारपूस करते काय?"
" तु पण म्हणजे? मला काही कळलं नाही." (कणक प्रश्नार्थक चेहऱ्याने मावशीकडे नीट उत्तर देण्याचे आशेने बघत होती.)
"अगं तो तर मागील पाच-सहा वर्षांपासून बाहेर गावी शिकायला गेलाय. तू नाही का मागच्या वेळेस परभणीला आली होती, तेव्हा तो पण तर आला होता घरी..."
"हो का.... मला नाही माहिती मी नव्हत पाहिलं. किती वर्ष झाले मी अहिश दादाला पाहिलच नाही" कणक मावशीचं वाक्य मध्येच तोडत म्हणाली.
" अगं तो काय दोन-तीन दिवसांसाठी यायचा आणि निघून जायचा.पण आता आलाय ना तो...मागच्या आठ-दहा दिवसांपासून परभणीला, आईच्या दुःखात होता तो... म्हणून वाड्या बाहेरच निघाला नव्हता. एवढ्या दिवसातून आज सकाळीच आला होता आपल्या घरी. थोडा वेळ बसला आणि विचारत होता. तुझी विचारपूस करत होता. कणक कुठे आहे म्हणे किती दिवस झाले? दिवस काय वर्ष झाली असतील, तिला बघितले नाही. मोठी झाली असेल ना.. असं पण तो आता इथेच राहणार ये. नोकरी लागली त्याला आपल्या शेजारच्या गावी... तुला तर माहितीच आहे ना... लहानपणापासून जिद्दी, मेहनती आणि हुशार आहे तो...घरच्या परिस्थितीची जाण ठेवून अवघ्या 19 व्या वर्षी नोकरीला लागला."
वच्छलाबाई म्हणाल्या. "हो का... बापरे.. चांगल आहे ना मग... फक्त एकोणवीसाव्या वर्षीच नोकरीला."
"हो..ना ..वत्सला पण एक गोष्ट सांगू..... सविता ताईंची तेवढी अहिशची लग्न करण्याची, लग्न बघण्याची इच्छाच अपूर्ण राहून गेली. जेव्हा पण आल्या ना, तेव्हा हीच गोष्ट सांगायच्या. पाहिल ना.. कधी वेळ बदलेल सांगताच येत नाही."
"हो ना गं ... खूपच वाईट झालं ना हे.. मी तर ऐकलं तर मला धक्काच बसला होता... मी येणार होते पण लग्न होतं ना... बरं दारावर जाऊन येऊ सविता मावशींच्या .... दुपारून...!"
कणकला मात्र कालच्या घटनेच्या सत्यतेची अधिकाअधिक खात्री पटत चालली होती.
"म्हणजे सकाळी मला वाटलं होतं की घरी कोणीतरी आलं होतं... तर तो अहिश दादाच होता.म्हणजे ते माझं स्वप्न नव्हतं."
कणक चा आजचा सारा दिवस कालच्या घटनेची सत्यता पडताळण्यात आणि विचार करण्यातच गेला.
-ज्ञानेश्वरी ह्याळीज
क्रमशः
आपला अभिप्राय आणि रेटिंग आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की अभिप्राय लिहून सांगा.
धन्यवाद 🙏