Prarambh - 1 in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | प्रारब्ध भाग १

Featured Books
Categories
Share

प्रारब्ध भाग १

प्रारब्ध ..भाग १

आज सकाळी सकाळीच किसनरावांचे आणि सखुबाई चे घर सजलेले होते .

संपूर्ण परिसर झाडलेला ,दारात शेणसडा टाकून रंगीत रांगोळी घातलेली .

अंगणात एका बाजूस असलेल्या तुळशीची पूजा करून तिच्यापुढे उदबत्ती लावली होती .

एका कोपर्यात एका लहान टेबलवर तांब्या आणि दोन चार भांडी ठेवली होती .

टेबलाजवळ घरातल्या दोन चार प्लास्टिक खुर्च्या ठेवल्या होत्या,शेजारीच दोन सतरंज्या घातल्या होत्या .

जवळच एका पिशवीत हार ,फुले इतर साहित्य होते .

नुकतेच गावातले सनईवाले येऊन दाखल झाले होते .

कार्यक्रम घरगुती होता पण ५० /१०० उंबरा असलेल्या त्या लहान गावात प्रत्येक जण एकमेकाच्या जवळचा होता

त्यामुळे कार्यक्रमाला न बोलावता सुद्धा सगळे गाव जमत असे .

आज किसनरावांच्या घरी सुमनचा साखरपुडा होता .

होय तीच तयारी चालली होती .

किसनराव आणि सखुबाईच्या भाचीचे, सुमनचे लग्न ठरले होते .

सुमन, ..किसनरावांच्या दिवंगत बहिणीची मुलगी होती

सुमन तीन महीन्याची असताना एका अपघातात किसनरावांची बहीण आणि दाजी मरण पावले होते .

त्या अश्राप पोरीचा पायगुण वाईट आहे असाच ग्रह बाळगून ,दाजींच्या घरचे कोणीच त्यानंतर सुमनची जबाबदारी घ्यायला तयार झाले नव्हते .

अपघात झाल्यावर त्या पोरीला हात सुद्धा लावायला तयार नव्हते ते लोक !!

मग किसनराव आणि सखुबाई ती इवली पोर आपल्या घरी घेऊन आले .

त्या दोघांना तीन चार वर्षे झाली मुल झालेले नव्हते .

त्यामुळे बहीणीची ही अनाथ आणि अजाण पोर दोघे प्रेमाने सांभाळू लागले .

तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखे प्रेम करायला सुरवात केली त्यांनी .

काही वर्षे अशीच गेली आणि नवल म्हणजे त्यानंतर सखुबाईला दिवस गेले .

या वेळेस देवाने सुर्यकांत आणि चंद्रकांतच्या रूपाने दोन जुळी मुले त्याच्या पदरात टाकली .

या गोष्टीमुळे सुमनवरचे त्यांचे प्रेम अधिकच वाढले .
हा सुमनचा पायगुण आहे असे त्यांना वाटत होते

आता घरात लाडाने सुमनला ते दोघे ताई म्हणू लागले मुलांना चिंटू आणि पिंटू बोलावू लागले .

किसनराव त्या लहान गावात एक लहान शेतकरी होते .

एक दोन एकर शेती होती ,दोन म्हशी होत्या.

आई वडिलांनी बांधुन ठेवलेले चार पाच खोल्यांचे साधे घर होते .

कमाई फारशी नव्हती पण आहे त्यात दोघे सुखी होते .
सुमनला एकटीला आत्तापर्यंत ते सांभाळू शकत होते

पण आता या तीन मुलांच्या पालन पोषण आणि शिक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावर होती .

त्याही परिस्थितीत चार कामे आणखीन करून त्यांनी सुमनला तालुक्याच्या गावी पदवीपर्यंत शिक्षण दिले.

मुलेही गावातच शाळेत शिकत होती,आता दोघेही दुसर्या इयत्तेत गेली होती .

सुमन दिसायला सुरेख होती .

त्या सर्व पंचक्रोशीत अगदी उठून दिसणारी होती .

शिक्षणात तिला फार गती नव्हती पण शिक्षण तिने पूर्ण मात्र केले होते

तालुक्याच्या कॉलेजातून नुकतीच तिने शेवटच्या वर्षीची पदवी परीक्षा दिली होती .

त्या गावात इतके शिक्षण आणि तेसुद्धा तालुक्याच्या गावी पूर्ण करणारी ती एकटीच मुलगी होती .

गावातल्या इतर मुलींची दहावी ..फार फार तर बारावी झाली की लग्न करून दिली जात होती .

सुमन याला अपवाद ठरल्याने एक हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती.

मात्र तिला नटण्याची खुप आवड होती .

भरपूर कपडे ,आभूषणे , चपला ,पर्स अशा गोष्टी तिला हव्या असायच्या .

ती खुप लाडकी असल्याने मामा ,मामी पण कौतुकाने तिच्या सर्व आवडी निवडी पूर्ण करीत असत.

तालुक्याच्या गावाहून तिच्यासाठी हवे ते साहित्य आणले जात असे .

नुकतेच दोन दिवसापूर्वी जवळच्या गावात एक लग्न होते.

त्यासाठी किसनराव सखुबाई आणि सुमन सोबत गेले होते .
आधी सुमन यायला तयारच नव्हती ,पण त्या निमित्ताने पाव्हणे लोकांच्या ओळखी होतात
असे सांगुन सखुबाईने तिला तयार केले होते .

तिथेच पाव्हण्याच्या भाच्याने सुमनला पाहिले आणि आपल्या आईवडिलांकडून तिच्या लग्नाविषयी विचारले होते त्याचा आईवडिलांना पण सुमन आवडली होती .

हा मुलगा मुंबईला नोकरीला होता .

मुंबईत अपार्टमेंट मध्ये दोन खोल्यांचे एक घर सुद्धा होते त्याचे .

तो एकुलता एक असुन शेजारच्या गावी थोडी शेती होती तिथे आईवडील रहात होते .

बाकी जबाबदारी अशी काहीच नव्हती

सुमनला त्याच्याविषयी विचारले असता सुमनचा पण होकार मिळाला .

मुंबई तर तिचे आवडते ठिकाण होते .

मुंबईला जायला मिळावे असे तिने पाहिलेले स्वप्न होते .

तशात चक्क मुंबईच्या मुलानेच लग्नच विचारले म्हणल्यावर काय ..सुमन एकदम खुष ..!!!

मुलगाही दिसायला मुंबई स्टाईल होता ,परेश नाव होते त्याचे

त्या लहान गावात तर नवीन फ्याशनचे कपडे, बूट वगैरे घालून आलेला तो अगदी “हिरो” दिसत होता .

जेवण झाल्यावर लगेच तिथल्या तिथे चार लोकांची बैठक बसलीआणि लग्नाची बोलणी सुरु झाली .

मुलगा त्याच्या मामाकडे लग्न कार्यक्रमासाठी आल्यामुळे चार दिवस राहणार होता .

इतक्या थोड्या अवधीत त्याला स्वतःचे लग्न उरकून जायचे होते .
कारण रजा जास्त मिळाली नव्हती .

त्यामुळे दोन दिवसात किसनरावांच्या घरी साखरपुडा करायचा ठरला..

आणि दोन दिवसांनी इथेच या गावात त्याच्या मामाच्या घरी लग्न ..असे ठरले .

लग्नात सुमनच्या अंगावर काही घालावे किंवा हुंडा किती द्यावा असा प्रश्न केल्यावर

होणाऱ्या नवऱ्यामुलाने आणि त्याच्या घरच्यांनी आम्हाला काहीही नको असे स्पष्ट सांगितले .

फक्त साखरपुडा होईल त्या दिवशी त्याच्या सोबत घरची चार सहा माणसे आणि त्याचे एकदोन मित्र जेवायला येतील इतकेच ...

लग्नाच्या दिवशीचा खर्च तेच करणार होते .

किसनरावांच्या घरची आठ दहा माणसे घेऊन यायला सांगितले होते लग्नाला.

किसनराव आणि सखुबाई अगदी खुष होऊन गेले...

इतक्या झटक्यात आणि कमी खर्चात हे लग्न होणार आणि सुमनला साजेसे स्थळ मिळाले म्हणून

अगदी “यादी पे शादी ‘सारखेच घडले होते म्हणा न ..!!!

गावातल्या लोकांच्या मते सुमनने नशीब काढले होते.

देखणा ,चांगला पगार असलेला ,घरची कोणतीच जबाबदारी नसलेला..

आणि दोन खोल्यांची स्वतःची जागा मुंबईत असणारा नवरा मिळवला होता सुमनने.

“सुमन आवरले का ग तुझे?... ये लवकर बाहेर .

मामीची हाक ऐकताच सुमनने ओ दिली ..हो ग मामी आलेच पाच मिनिटात ..

“ए मीने आवर न ग लवकर दे पटकन पदर माझ्याकडे पीन लावते मी “

“थांब ग किती गडबड करतेस ..

थांबतील सगळे तु बाहेर येईपर्यंत.... नको काळजी करूस ..”

पदर नीट निऱ्या करून मिनूने तो मागे घेऊन ब्लाउजला पीनअप केला

परत एकदा निऱ्या साफ सुफ करून तिने उठून सुमनकडे एक नजर टाकली

“आय हाय ...

खल्लास ग... काय दिसतेस ..!!

सिनेमातली हिरोईन झक मारेल ?

असे म्हणून चटकन तिने सुमनच्या गालाची हलकेच पापी घेतली ..

मिनू तिची अगदी जवळची मैत्रीण तालुक्याच्या गावातून खास आजच्या कार्यक्रमासाठी आली होती .

“चल काहीतरीच तुझे ..असे म्हणून सुमनने तिला बाजूला ढकलले ..

खरोखरच सुमन अतिशय देखणी दिसत होती

गोरा गव्हाळ रंग ,तेजस्वी त्वचा ,लांबसडक काळ्याभोर केसांचा एक मोठा शेपटा ,

काजळ घातलेले मोठे मोठे तपकिरी डोळे ,अत्यंत कमनीय बांधा ,सरळ नाक ,उभट चेहेरा ,

हसरी जिवणी आणि मोत्यासारखे दात ..

चापून चोपून नेसवलेली साडी ,गळ्यात एक चेन, कानात मोती आणि हातात एक एक डिझाईनची बांगडी

चेहरा आज मात्र पावडर,रूज ,काजळ..आणि थोडीशी लिपस्टिक आणि कुंकू याने सजवलेला ..

दृष्ट लागु नये म्हणून तिच्या कानाच्या मागे एक लहानसा काजळाचा ठिपका लाऊन मिनी तिला घेऊन बाहेर आली ..

त्या दोघी बाहेर आल्या तेव्हा बाहेर आजूबाजूच्या पाच सवाष्णी जमल्या होत्या .
सोबत त्यांची लहान मुलेमुली होती .

मामीच्या मुलांचे छोटे मित्र,शेजारची काही पुरुष माणसे एवढी माणसे जमली होती .

क्रमशः