Samarpan - 25 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | समर्पण - २५

Featured Books
Categories
Share

समर्पण - २५

मूखतिर होते ग़म के निशानो को,
समझलीया मैने खुशी की आहट।
काश समझ लेते ख़ामोशी अगर,
तो अधुरी ना रहती हमारी चाहत।


खूप सोप्प असतं ना व्यक्त होणं....! प्रत्येक गोष्ट शब्दांत उतरवुन पोहचवण्यासाठी मला नाही वाटत जास्त कष्ट लागत असतील, मग कठीण काय आहे??? शब्दांची मदत न घेता, मनातलं जाणून घेणं आणि ते मनापर्यंत पोहोचवणं.... अतिशय कठीण काम....आणि माझ्याबाबतीत अशी सगळीच कठीण कामं जमायची विक्रमला, कदाचीत आताही जमत असेल...हो, कळत असेल माझी शांतता पण विचरण्याच 'कठीण काम' मात्र तो आता करत नाही आणि मीही ती अपेक्षा करत नाही...स्वतःचं गऱ्हाणं कोणासमोर मांडण हा विक्रमचा स्वभावच नाही. जेंव्हा तो आनंदी असायचा तेंव्हा त्याला सांगावं लागायचं की हे मडक्याच तोंड फुटून जाईल आणि जेंव्हा तो शांत असायचा तेंव्हा असं वाटायचं माझीच वाणी गेली आहे, त्याची शांतता समजून घेण्याचा प्रयत्न नेहमीच केला मी, कारण त्याला वाटायचं शांततेमागचं दुःख समजून घेणं म्हणजेच खरं नातं निभावणं, तिथेच विश्वास नांदतो...असेलही, पण आता मात्र मला कंटाळा आला त्याच्या शांततेला 'डिकोड' करता करता, का उगाच अवघड करून ठेवतो हा माणुस?? बोलून मोकळं नाही होता येत का? कदाचित काही गोष्टी बोलुन दाखवता येत नसतील...ठीक आहे, प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत शब्दांत, असेल ते कठीण काम..पण कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्दांची मदत घेणं सोयीस्कर ठरते, गैरसमज टळतात त्यामुळे...हीच गोष्ट कित्तीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला विक्रमला पण त्याच्या बाजूने परिस्थिती काही बदलली नाही..... बरं, आताची परिस्थिती काहीही असो, पण मी मात्र तशीच... तेंव्हाही मला शब्दांची गरज भासायची व्यक्त व्हायला आणि आताही भासते, फरक एवढाच आहे कि आता मी माझ्या भावनांना आवर घालायला शिकली....

विक्रमला भेटायची खुप उत्सुकता लागली होती, कधी एकदाचा दिवस उगवतो आणि कधी मी जाते अस झालं होतं मला, आणि हे मला का वाटत होतं कारण ही परीक्षा माझ्या विश्वासाची होती...अभय आणि नम्रता जे काही गैरसमज करून बसले होते विक्रम बद्दल ते दूर करण्याची हीच वेळ होती. मला नेहमी वाटतं ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही किंवा जोपर्यंत त्याची परिस्थिती जाणून घेत नाही तोपर्यंत त्याच्या बाबतीत कोणताच निष्कर्ष आपण काढू नये. अभयला मात्र माझा हा स्वभाव 'अंधविश्वास' वाटतो आणि त्याला वाटत माझ्या ह्याच स्वभावामुळे कोणीही माझी फसवणुक करू शकतो... अभय माञ सहजासहजी कोणावरही विश्वास न ठेवणारा व्यक्ती, बरोबर आहे, या कलयुगात कोणावर पूर्णपणे विश्वास ठेवणेही चुकीचेच... पण खूप जास्त अविश्वास ही आपल्या दुखाच कारण बनते....मला वाटत अतिजास्त विश्वास माणसाला दुर्बल बनवते तर अतिजास्त अविश्वास माणसाच्या मनात शंकेच जाळ बनवते, ज्याला कोणीच तोडू शकत नाही...आणि त्याच्या या स्वभावामुळेच मी नम्रताला घेऊन जाणार होती सोबत...

दुसऱ्या दिवशी मी सगळं आवरून नम्रताची वाट पाहत बसली होती, तशी नम्रताने आधीच अभयला कल्पना दिली होती की ती मला एका डॉक्टर कडे घेऊन जात आहे त्यामुळे अभयने जास्त प्रश्न उपस्थित नाही केले....आणि खर संगायच तर मलाही अभयला सांगावस वाटलं नाही की मला विक्रमला भेटायचं आहे, कारण मला माहित होतं मी जरी त्याला कितीही पटवुन देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला जे विचार करायचा आहे विक्रम बद्दल तो तेच करणार...कस आहे जर कोणी निश्चयच केला असेल कोणाला चुकीचं समजायचं तर त्याच्यासमोर कितीही डोकं आपटून काहीच फरक पडत नाही, आणि सध्या स्थितित तरी मला डोकं शांत ठेवायचं होतं, नम्रता आल्यावर आम्ही जायला निघालो तर अभय मला बोलला,

"नैना, सांभाळून जा, काल मी रागात होतो पण आज खरच सांगतो, तुला मला काय शिक्षा द्यायची ते दे, मी मान्य करेल, पण विक्रमच नाव नाही आलं पाहिजे तुझ्या तोंडून, तुला या जगातलं सगळं सुख देईल मी, फक्त त्याचं नाव नाही आलं पाहिजे मधात आपल्या..."

अभयच बोलणं ऐकून हसू आलं मला, वाईट हि वाटल त्याच्या मानसिकतेसाठी.....म्हणजे काय वाटतं पुरुषांना, बायकोला सगळी भौतिक सुख दिली म्हणजे संपली त्याची जबाबदारी, एवढ्यात समाधानी असेल ती बायको...सुख आणि समाधान यात खुप सूक्ष्म फरक आहे...सुख मिळालं म्हणजे समाधान मिळेलच असं नाही परंतु समाधान असेल तर त्यालाच सुख मानून जगू शकतो आपण... सांगावसं वाटत होतं अभयला की नाही घेणार विक्रमच नाव तोंडून मी, पण जर अश्याप्रकारे तू जबरदस्तीने त्याला काढायचा प्रयत्न केला तर खरंच तो जाईल का माझ्या मनातून?? कदाचित मी चुकीची असावी, पण मला वाटत जी स्त्री तुमच्या घरचा उंबरा ओलांडून आली आहे, जी तुमच्यासाठी तीच शरीर काय तर सगळं आयुष्य ही अर्पित करायला तयार असते, तुम्हाला साधं तीच मनही जिंकता येऊ नये किंवा तसे प्रयत्न ही तुम्ही करू नयेत का?? आणि मला अस का वाटत होतं, कारण मी माझ्या आणि अभयच्या नात्यासाठी खुप काही करण्याची तयारी ठेवली होती, एवढंच काय तर मी, त्याच्या आयुष्यातल्या साफिया नावाच्या दुःखाला ही आपलं केलं होतं...आता मात्र मला राग येत होता खूप त्याचा. नम्रताला वाटायचं की मी चुकीचं वागते अभयसोबत, त्याचा चांगुलपणा मला दिसत नाही....मला सगळं कळायचं त्याच्याबद्दल, पण मग चूक झाली म्हणून सतत टोचत राहणं हा काय पुरुषांचा जन्मसिद्ध अधिकार आहे का?? मी वाट पाहत होती की अभयला हे कळावं की जबरदस्तीने कोणालाही आपलं बनवता येत नाही...त्याला कळली हे गोष्ट पण दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता...
--------------------------–---------------------------------

मी आणि नम्रता आमच्या नेहमीच्या कॅफेमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर दहा मिनिटांतच विक्रम तिथे आला, तो येऊन बसल्यावर एक बोचट शांतता तिथे पसरली, मला गुदमरायला झालं...त्यामुळे ती शांतता भंग करण्यासाठी मी विक्रमला नम्रताची ओळख करून दिली, पण नम्रताकडे पाहून साफ जाणवत होतं की तिला किती राग आहे विक्रम बद्दल, मी तिला विचारलं तर बोलली,

"नैना, फक्त तुझ्यासाठी मी आली आहे इथे, तुला काय बोलायचं याच्याशी लवकर बोल आणि ये बाहेर, मी वाट बघत आहे, आणि माहीत आहे ना तुला, डॉक्टर ने तुला आराम सांगितलाय, आणि अभयला खुप काळजी आहे तुझी..."

"अग, पण ऐक तर..."

माझं काहीही न ऐकून घेता, शेवटच्या वाक्यावर जोर देत ती बाहेर गेली निघून गेली...आज पहिल्यांदा असं झालं होतं की मी आणि विक्रम सोबत आहोत पण आम्हाला शब्द सापडत नव्हते बोलायला, का अनोळखी असल्या सारखे भासत होतो आम्ही एकमेकांना? शेवटी मीच सुरुवात केली,

"कसा आहेस?"

"ठीक....."
आता त्याच्या या 'ठीक' ला मी काय समजू? कारण त्याच्याकडे पाहून अजिबात जाणवत नव्हतं मला की काहीही ठिक असेल, नेहमी हसणारा आणि हसवणारा विक्रम एवढा शांत....नक्कीच काहीतरी कारण असावं या शांतते मागे...मी त्याला काही विचारणार तेवढ्यात तोच बोलला,

"बोल, काय म्हणते? म्हणजे, काय काय आरोप आहेत तुझे?"

आणि असं बोलताना त्याने त्याचे डोळे माझ्यावर रोखले...त्याच्या नजरेत बघताना मला हे कळून चुकलं होतं की काहीतरी तर घडलं आहे त्याच्यासोबत...किती अगतिकता, किती शल्य, आणि किती माझी काळजी, आणि मी बोलण्याने त्याला झालेलं दुःख...सगळंच होतं त्या नजरेत, मला मात्र काय बोलावं काही कळत नव्हतं

"आ...आरोप?? कसले आरोप?"

"कसलेच आरोप नाहीत नैनिका माझ्यावर? खरंच? मग मुलींच्या मनाशी खेळणारा, त्यांना फसवणारा कोण?? असच काहीतरी बोलली होती ना तू मला....अश्याच शब्दांत माझी स्तुती केली होती ना माझी तू?"

तो अस बोलल्यावर मी मात्र एक आवंढा गिळला, बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण खूप दाटून आलं होत मला, गळ्यातून आवाज निघत नव्हता, मी मान खाली घातली पण तरीही माझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचा एक थेंब टेबलावर पडला आणि विक्रमने तो अचूक हेरला, त्याला कदाचित वाईट वाटलं असावं, त्याने लगेच त्याच हात माझ्या हातावर ठेवून मला आश्वस्त करत बोलला,

"तू रडावं, किंवा तुला माझ्यामुळे काही त्रास व्हावा यासाठी मी काहीच बोललो नाही, तुझेच शब्द तुलाच ऐकवतो आहे नैनिका एवढंच...."

आता मात्र मला रडू आवरणं कठीण झालं आणि मी माझा हात त्याच्या हातावर मारत बोलली,

" हे काय नैनिका नैनिका लावलय रे नालायका, आपल्यात एवढं काय बदललं विक्रम की तुझी सोनू आज नैनिका झाली तुझ्यासाठी?"

"खूप काही बदललंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बदललंय माहीत आहे? तुझा माझ्यावरचा विश्वास..."

"नाही विक्रम अस काही नाही, माझा अजूनही विश्वास आहे तुझ्यावर..."

"हो, ते दिसतच आहे, तू पाठवलेल्या मेसेज वरून किती विश्वास आहे तुला माझ्यावर.."

"अस नाही रे विक्रम, मी रागात होती, आणि मागच्या काही दिवसामध्ये जे काही झालं त्यामुळे माझी चिडचिड झाली, त्यात कितीतरी दिवस तुझा फ़ोन बंद होता आणि तू स्वतः ही काही मला कॉन्टॅक्ट केला नाही, लास्ट जे आपलं बोलणं झालं त्यांनंतर तू गायब झालास त्यामुळे मला असं वाटलं...."

".....तुला अस वाटलं की मी तुला फसवलं, हो ना?"

".................." माझ्याकडे उत्तर नव्हतं द्यायला आणि माझे डोळे खाली झुकले,

"फसवणूक व्यवहारात होत असते सोनू, आणि आपल्यात व्यवहार कधीच नव्हता, आपल्यात.....जाऊदे सोड, नाही कळायचं कधीच तुला, तुला वाटत असेल मी अपराधी आहे तुझा तर मी आहे इथे, तू माझी शिक्षा सांग फक्त...."

"विक्रम प्लिज ना रे, नको मला अजून काही बोलू, चूक झाली माझी.."

"प्रश्न चूक किंवा बरोबर चा नाही सोनू, पण तुझ्या मनात एकदाही आलं नाही की मी काही अडचणीत असेल, नाही वाटलं तुला अस?? सरळ सरळ आरोप लावून मोकळी झालीस??, एवढंच ओळखलं तू मला,??"

"तस नाही रे विक्रम, मी नाही समजली तुला चुकीच, पण परिस्थिती अशी होती ना, मला काही कळत नव्हतं रे कोण बरोबर कोण चूक, तुला नाही माहीत रे काय काय झालंय..."

"काय कमाल आहे ग, कोण चूक कोण बरोबर नाही कळत तुला म्हणजे माझ्या बाबतीत कन्फ्युशन आहे तुला हाच अर्थ होतो याचा...आपण एवढा वेळ सोबत घालवला सोनु, तुला कधीतरी वाटलं की मी तुला चुकिच्या नजरेने पाहिलं किंवा काही गैरफायदा घेतला, मी कसा वागलो तुझ्याशी हे नाही आठवलं तुला?? मला खुप दुःख झालं तुझे माझ्या बद्दल चे विचार ऐकून...तुला आठवते मी दिल्लीला गेलो होतो आणि तू अडचणीत होती, माझे फोन नाही घेतले, तेंव्हा मी असच गैरसमज करून घेतला का ग तुझ्या बाबतीत? मी तुला भेटायला आलो तेंव्हा तुला माझी तगमग नाही दिसली?? मी जर तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर तू नाही ठेवू शकली माझ्यावर? नातं मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं, विश्वास हाच पाया असतो त्याचा, आणि मला तर वाटलं होतं आपल्यात हे सगळंच आहे....मला खूप दुःख देऊन गेले ग तुझे शब्द...."

विक्रम, बरोबर होता त्याच्या जागेवर, त्याचा राग ही बरोबर होता, मी अस नको बोलायला होत त्याला...पण त्यावेळेला माझी काय परिस्थिती होती ते नाही सांगू शकली मी त्याला, खूप रडायला येत होतं, जो व्यक्ती मला समजून घेईल अस मला वाटत होतं त्यालाच मी दुखावलं होतं, काही बोलण्याची हालत नव्हती माझी, त्यामुळे विक्रमची माफी मागून निघून जावं हाच विचार केला मी, पण माझे अश्रू काही केल्या थांबत नव्हते, स्वतःला खुप आवरत मी विक्रमला बोलली,

"माफ कर मला, मी निघते..."
अस बोलून मी उठून दोन पाऊलं पुढे गेली,विक्रमने मला आवाज दिला,

"बस कर ना जाडे, किती रडशील....मी पण खुप कंटाळलो आहे ग..."
मी मागे वळून पाहिलं, विक्रमचे डोळे भरून आले होते, त्याला कस सोडून जाऊ शकत होती मी, मी लगेच जाऊन बसली, आणि त्याला विचारलं

"काय झालंय रे विक्रम? मला वाटलंच काहीतरी नक्की झालंय?? कोणाला कंटाळला आहेस?"

"तुझ्या रडण्याला कंटाळलोय जाडे, किती रडशील, विचार करून आलो होतो की खूप रागावणार तुला, पण तुझा रडका चेहरा पाहून जास्त काही रागवायची इच्छाच झाली नाही..."

हाच स्वभाव आवडला नाही मला विक्रमचा...एखादा विषय वळवायचा कसा याची चालाकी जानायचा तो, पण यावेळेस मी त्याच्या बोलण्यात येणार नव्हती....

"हे बघ विक्रम, मला माहित आहे तुला तुझे प्रॉब्लेम सांगायला आवडत नाही पण मी आज ऐकून घेतल्या शिवाय जाणार नाही इथून, सांगायच मला गुपचूप काय झालंय ते..."

मी अस बोलल्यावर त्याने त्याची मान वळवली आणि दुसरीकडे बघायला लागला,

"काही नाही ग, चालायचंच..."

"काय चालायचंच विक्रम, सांग मला काय झालं? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे? तुझी तब्येत ठीक नाही आहे का? की एखादा टेंडर नाही मिळाला म्हणून परेशान आहेस?"

एवढं सगळं बोलूनही विक्रम माझ्याकडे पाहायला तयार नव्हता...

"दिशा?? काही प्रॉब्लेम आहे तुमच्यात?"

मी हे बोलल्यावर मात्र त्याने लगेच माझ्याकडे मान वळवली...मला कळाल नक्कीच काहीतरी झालं असावं त्याच्यात आणि दिशामध्ये...आता मला भीती वाटायला लागली, ज्या आगीच्या झळा मला लागत होत्या त्याचे चटके विक्रमने सोसू नये असं मला वाटत होतं, पण मी हे विसरली होती की नैतिकतेच्या परीक्षेत आमच्या मैत्रीने समाजाच्या नजरेत कधीच जीव तोडला होता मग आता त्यात अभय बरोबर कदाचित दिशाही शामिल झाली असावी,

"दिशा ठीक आहे ना विक्रम, सगळं ठीक आहे ना रे तुमच्यात, बोल ना..."

"ठीक आहे ग, सोड तो विषय, आज तू कोल्ड कॉफ़ी न घेताच कशी जायला निघाली, तुझा ज्वालामुखी त्याशिवाय शांत नाही व्हायचा.."

"मला नको काही, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मला..."

"हे बघ सोनू काहीच झालं नाहीये, तुला तुझेच प्रॉब्लेम कमी आहेत का जे तू माझ पण ओझं डोक्यावर घ्यायला निघालीस..."

"तू जोपर्यंत सांगणार नाही मी जाणार नाही इथून, आत्ताच सांगते"

"काही झालं नाही, आम्ही दिल्लीला गेलो होतो, तू माझे फोन उचलत नव्हतीस, मी खूप पॅनिक झालो, तिला वेळ नाही देऊ शकलो त्यामुळे रागवली आहे, बस एवढचं...नको जास्त विचार करुस ग..."

"तू सांगतो त्यावर विश्वास तर नाही की फक्त एवढीच गोष्ट असेल, पण माझ्यामुळे तुमच्यात काही अडचण होत असेल तर ही मैत्री इथेच थांबलेली बरी विक्रम....आणि अजून एक, कदाचित भावनेच्या ओघात मी इतकी वाहून गेली की मला कळलं नाही की मी तुझ्या आणि दिशाच्या मधात आली आहे, आणि माझ्यासोबत तुही वाहून गेला, आता मात्र एक सांगते, अभयने जी चूक माझ्या बाबतीत केली ती तू दिशासोबत करू नको, आपली मैत्री या वळणावर येईल याचा विचार केला नव्हता मी कधी...."

"नको एवढा विचार करू ग सोनू, अस समज तू बोलली आणि मी ऐकलं, नाही दुर्लक्ष करणार मी तिच्याकडे...आता हसून दाखव ना"

"विक्रम...नक्कीच अजून काही अडचण नाही ना रे..."

माझ्या या प्रश्नावर त्याने फक्त नकारार्थी मान हलवली, आणि बोलला,

" बर असुदे, तुला मी जाडी बोलतो हे फारच मनावर घेतलेलं दिसतेय, जेवत नाही आहेस का इतक्यात.... विदर्भाचे लोक काहीही मनावर घेतात यार, यामुळेच विदर्भ वेगळा देत नाही आम्ही,😝😝"

"मी मेल्यावर पण तुला जोकच सुचतील ना विक्रम.."

"काहीही बोलू नको सोनू, तू हसावी म्हणून करतो मी जोक, यानंतर अस अभद्र बोलायचं नाही...बर सोड, अभय कसा आहे, ठीक आहेना सगळं, आता माझा नको जास्त विचार करू ग, त्याच्याकडे लक्ष दे, आणि तू खातपित जा काही..."

खर तर खूप काही सांगायला, विचारायला गेली होती मी विक्रमला भेटायला, पण काय माहिती का, त्याला काही सांगूच शकली नाही, आणि त्याच्याही अडचणी त्याने माझ्यासमोर मांडल्या नाही हे नक्की....त्याचा उतरलेला चेहरा नक्कीच सांगत होता की तो अडचणीत आहे, त्याचे रुक्ष झालेले डोळे त्याची कहाणी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तो मात्र लपवत होता... खूप दिवसांनी मी हसली होती आणि कदाचित तोही, त्यामुळे आम्ही आमच्या दोघांचंही रडगाणं मांडलं नाही एकमेकांसमोर...

नातं असंही असतं... प्रत्येक वेळेस आपल दुःख त्या व्यक्तीसमोर मांडायलाच पाहीजे हे महत्त्वाच नाही, कधी कधी नुसतं त्याला बोलूनही मन हलकं होतं... आज आमचं ही तसच झालं होतं... प्रेम नक्की कशात असतं?? याची बरीच उत्तर असतील लोकांकडे, पण माझ्या दृष्टीने प्रेम नक्कीच त्यागात असायला पाहिजे...त्याग हाच प्रेमाचा मूलभूत पाया असावा...मला जरी वाटलं होतं की प्रत्येक गोष्ट शब्दांतून व्यक्त व्हावी, पण तरीही आज कमी शब्दांत हे कळलं होतं की फक्त मला त्रास नको म्हणून विक्रमने त्याचा प्रपंच माझ्यासमोर मांडला नाही आणि मला ही वाटलं नाही की माझे प्रॉब्लेम सांगून त्याला अजून दुःख द्यावं मी....पण अशी लपवाछपवी करता करता विक्रम एक दिवस असा नजरेआड होऊन जाईल याची कल्पना मात्र मी केली नव्हती....

--------------------------------------------------------------
क्रमशः