आरजु लेकर आये थे
की सारा जहा अपना बना लेंगे
अब ना ये आरजु रही , ना जहां अपना
हसकर हम अब तो सारे दुःख सेहलेंगे ..
नित्या त्या घरात कैद झाली होती पण यावेळी ती त्याच काही एकूण घेणार नव्हती ..त्याने फक्त काही दिवसातच आपला खरा चेहरा सामोरं आणला आणि तो बदलला आहे या गोष्टीवर विचार करून ती हसू लागली होती ..त्याला आताही फक्त तीच शरीर हवं होतं पण आपण तिला इतका त्रास दिला असतानाही या घरात मनाने खुलण्याची संधी द्यावी हा विचार त्याने कधी केलाच नाही ।.त्याला वाटत होतं की नित्या नाईलाज म्हणून आली तेव्हा आपण हवं ते करू शकतो आणि आपल्याला कुणीच काहीच म्हणू शकणार नाही पण अस नव्हतं यावेळी नित्या पूर्ण जोर लावून त्याचा प्रतिकार करणार होती ..
मागील काही दिवस नित्याशी सारांशच बोलणं झालं नव्हतं ..आज सारांशने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि त्याने तिला फोन केला ..त्याचा फोन येताच तिने रिसिव्ह केला ..आणि तो समोरून म्हणाला , " काय मॅडम अलीकडे खूप व्यस्त राहू लागल्या आहात ..वेळच नाही तुमच्याकडे आमच्यासाठी !! "
नित्या कणखरपणे बोलून गेली , " हो मग काय करणार ना ?...मोलकरीण आहे तर काम करावंच लागणार!! ..मोलकरनिला सुट्टी थोडी असते !! शेवटी तो राहायला , खायला देतो ते उपकार कसे फेडणार ना ? "
सारांशला कळलं नव्हतं की तिचा मूड खराब आहे ..ती गंमत करत आहे असच वाटलं म्हणून तो म्हणाला , " बर ऐक ना नित्या तुझा पत्ता दे ना !!.. काही दिवसात वाढदिवस आहे ना संध्याचा तर गिफ्ट द्यायचं आहे ? "
तिने थोडा मूड ठीक केला आणि म्हणाली , " सारांश आता नको देऊ !!..तिला आधीच भरपूर ड्रेस घेतले आहेत सर्वांनी , त्यात तू आणखी नको घेऊ प्लिज ? "
आणि तो रागावत म्हणाला , " सरळ म्हण ना माझं गिफ्ट नकोय !! किंवा मग तुला पत्ता द्यायचा नाहीये .."
तीही त्याच्या बोलण्यावर नाराज होत म्हणाली , " तस नाही रे !! खर तर आम्ही घर शिफ्ट करतोय ना काही दिवसात तर इकडचा पत्ता देऊन काही फायदा नाही आणि तिकडचा द्यायचा झाला तर आधी शिफ्ट होऊ दे मग देते कारण तुझं गिफ्ट रिसिव्ह करायला सुद्धा तिथे कुणीतरी हवं ना !! .."
तो थोडा शांत होत पुन्हा म्हणाला , " पण गिफ्ट वाढदिवसाला दिलं जात न मग नंतर देऊन काय फायदा ? ...त्यापेक्षा एक काम कर मी पैसे पाठवतो तू तिला काय हवं ते घेऊन दे .."
" नको रे , आहे तिच्याकडे खूप काही .." , नित्या म्हणाली
पण सारांशच्या हट्टासमोर तीच काहीच चाललं नाही आणि तिने पैसे घ्यायच मंजूर केल ..सारांशचा मूड ठीक झाला होता आणि तो तिची खेचत म्हणाला , " काय मॅडम अलीकडे नवीन फ्लॅट घेत आहात तर त्याच काम करण्यातच व्यस्त असता ? ..आमच्याकडे तर लक्षच नसत कुणाचं !! नवीन घरासोबत नवीन स्वप्न सुद्धा सजवायचा विचार आहे वाटत .."
त्याच बोलणं ऐकून नित्या स्वतःचा राग शांत करू लागली म्हणून तिने मॅसेज केला नाही तर समोरून सारांश लगेच म्हणाला , " बोला बोला ! "
आणि न राहवता ती रागात म्हणाली , " हो सजवत आहे स्वप्न !!..सर्वही तेच बोलतात आणि तुही तसच बोल ..मला वाटल तुला तरी माझ्या मनातलं कळेल पण तुही त्यांच्यासारखच बोलत आहेस ..तुला काय माहिती रे मी इथे कशी जगत आहे ? ..असा एकही क्षण नसतो जेव्हा मला या घरात राहण्याची भीती वाटत नाही ..चाळीमध्ये राहत आहे तेव्हा लोक काय म्हणतील म्हणून तो काहीच बोलत नाही पण नवीन घरी गेल्यावर तो काय काय करेल याबद्दल जेव्हा विचार येतो ना तेव्हा माझी काय स्थिती होते ना नाही कळणार तुला !!..तिकडे आजोबांना फोन केला आठवण येते म्हणून तर ते म्हणाले दुसऱ्या मुलाचा विचार करा ..मृन्मय तर आधीच टपून बसला आहे ..मावशी काका सर्वांना तेच हवं ..मी काय खेळण आहे का रे !! जेव्हा वाटलं तेव्हा वापरायला ..मला वाटायचं कधीतरी की शुभम समजून घेईल पण त्यानेही मृन्मयची साथ दिली , तेव्हा वाटायचं की शुभम अस का वागतो आहे ..त्याच उत्तर मला इथे आल्यावर मिळालं ..मृन्मयने माझ्या नावावर पॉलिसी काढली आहे , त्याचा 50 लाखाचा अपघाती विमा आहे त्याची नॉमिनी मी आहे , घराची नॉमिनी मी आहे हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा शुभमला वाटलं की हा बदलला आहे आणि त्याने मागचं सर्व विसरून मला फक्त ह्या मोहापायी इकडे पाठवून दिले ..शेवटी त्यानेही सिद्ध केलंच मी मी ओझच होते सर्वांवर आणि सर्वांनी मला ठेवून उपकार केले आहे ..अजून कोणते स्वप्न रंगवू ते सांग ?.."
सारांशला काय बोलावे तेच कळत नव्हतं ..समोर शब्द बोलणंही योग्य नव्हतं ..तो फक्त शांत ऐकत होता आणि ती पुन्हा म्हणाली , " तुही पुरुषच ना शेवटी काय बोलनार म्हणा तुला ..!! "
तेवढ्यात तिच्या दारावर कुणी तर आलं आणि तिने सारांशला तस सांगून फोन ठेवून दिला ..इकडे अजूनही सारांश तिच्या शब्दात हरवला होता ..तिच्या प्रत्येक शब्दात वेदना होत्या ..आणि त्याच एक कारणही तोच होता ..तो विचार करतच होता की समोरून मॅसेज आला
📱सॉरी सारांश ..सर्वांचा राग तुझ्यावर निघाला ..पण दुसर आहे तरी कोण मला हक्काने रागवायला!! ..मागच्या काही दिवसात अस खूप काही घडलं ज्याने डोकं बधिर होऊ लागलं आहे आणि तू गमतीत म्हणाला हे विसरून गेले आणि पूर्ण राग तुझ्यावर निघाला ..सॉरी पुन्हा एकदा !!..तुला वेळ देऊ शकत नाही आहे त्यासाठी सॉरी ...पुडच्या वीकमध्ये घर शिफ्ट करायचं आहे आणि तिथेच संध्याचा वाढदिवस करणार आहोत सो पुढचे काही दिवससुद्धा मला नाही जमणार बोलायला .. सॉरी मृन्मय बाहेर आला आहे आणि घरातल्या काही वस्तू घ्यायला बाहेर जातोय सो नाही बोलू शकत ..सॉरी आणि काळजी घे ..
त्याने मॅसेज वाचला आणि फोन बाजूला ठेवून दिला ..त्याला वाईट नक्कीच वाटलं होतं पण तीच एकूण त्यालाही भीती जास्त वाटू लागली होती ...
त्या दिवसानंतर नित्याशी त्याच बोलणं फारच कमी झालं होतं ..ती रात्री थोडा वेळ ऑनलाइन यायची आणि पुन्हा परत जायची तर सारांशनेही ऑनलाइन येन बंद केलं होतं ..काही दिवसातच त्यांनी घर शिफ्ट केलं ..आणि संध्याचा वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू झाली ..एक तर नवीन घर आणि त्यात संध्याचा वाढदिवस म्हणजे नक्कीच खास क्षण होते ..या सर्व दिवसात नित्या आज पहिल्यांदाच खुश भासत होती ..आपल्या लेकीच्या चेहऱ्यावर इतका आनंद बघून तिचे डोळे भरून यायचे आणि हा पहिलाच वाढदिवस ती संध्यासोबत साजरा करत असल्याने तो आणखीच खास होता ..मृन्मय आणि नित्याने तिच्या सर्व खास लोकांना वाढदिवसाला बोलावले होते पण नित्याने सारांशला काही बोलावले नव्हते ..शेवटी वाढदिवस आला आणि सर्वात आधी त्याने तिला विश केले ..नित्यानेही तिच्याकडून त्याला उत्तर दिले ..त्याच्याकडून गिफ्ट म्हणून संध्याला नित्याने टेडी घेऊन दिला होता आणि संध्या त्या टेडीसोबतच दिवस घालवत होती ..रात्री 12 ला वीश केल्यावर तो तिला म्हणाला , " नित्या तू सर्वाना बोलावलं पण मला नाही ..विसरली वाटत ? .."
आणि तिने मॅसेज केला , " विसरले नाही रे!! ..जाणूनच नाही बोलावलं ..मला तुला कुणासमोर आणायच नाही म्हणून ..तू इथे कधीच येऊ नकोस हीच माझी इच्छा असेल ..कारण तू इकडे आलास आणि यांना कळलं तू कोण आहेस तर ते तुला जिवंत सोडणार नाही म्हणून तू तिथेच राहा ..तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला आणखी काहीच नाही "
तीच बोलन योग्य होत तरीही त्याला थोडा त्रास झाला होता ..म्हणून रागात त्याने शुभ रात्रीचा मॅसेज करून झोपायला जात असल्याचे सांगितले ..
--------
सकाळ झाली ..सकाळी त्याने जाणूनच तिला मॅसेज केला नव्हता आणि नित्याचाही मॅसेज आला नव्हता ..मॅसेज केला नाही उलट तिने संध्याचे काही फोटो स्टेटसवर ठेवले होते ..तो त्या फोटोत दोघांना पाहून खूप खुश होता पण तिने स्वतःहुन त्याला मॅसेज करावं असं देखील वाटत होत तरीही तस काहीच होत नव्हतं त्यामुळे त्याचा मूड खराब झाला होता आणि त्याने फोन बाजूला ठेवून दिला ..आज संध्या इतकी व्यस्त होती की तिला त्याची आठवण झाली नव्हती आणि रागात त्यानेही तिला मॅसेज केला नाही ..सारांश ऑफीसवरून परतला होता तरीही तीच स्थिती होती आता तर त्याला मोबाइलकडे लक्ष सुद्धा द्यावस वाटत नव्हतं ..म्हणून रागात मोबाइल बंद करून तो टीव्ही पाहू लागला ..त्याची जेवायचीही इच्छा नव्हती पण आई ओरडणार म्हणून त्याने थोडं खाऊन घेतलं आणि बेडवर पडला ..बेडवर पडला तरीही झोप त्याला येत नव्हती ..राहून राहून तिला मॅसेज करावा अस वाटत होतं पण तो तिला टाळत होता शेवटी न राहवून त्याने मोबाइल ऑन केला आणि सर्वात आधी तिचाच मॅसेज त्याला आला ..त्याने मॅसेज ओपन करून पाहिले तर तिने केक सेंड केला होता नि त्याखाली लिहिले होते .." सॉरी सारांश आज लेकीचा वाढदिवस आहे ना तर वेळच मिळत नाहीये !!..सर्व काही माझ्यावर आल आहे ..शिवाय संध्या पण मला क्षणभर सोडत नाहीये..मला माहित आहे मी आज तुझ्याशी बोलले नाही म्हणून रागावला आहेस पण खरं सांगू तू माझ्या जवळच आहेस इथेच म्हणून तुला बोलावलं नाही ..आणि हा केक खाऊन मूड ठीक करून घे ..आज बहुतेक मला आवरताना उशीर होईल सो वाट पाहू नको ..सॉरी आणि लव्ह यु सो मच ।.काळजी घे ."
तिचा मॅसेज वाचून त्याचा राग कुठेतरी दूर पळून गेला होता ..त्यानेही तिला शुभ रात्री म्हणून मॅसेज केला आणि तिचे स्टेटस पाहू लागला ..आज नित्याने आपल्या मुलीसोबत जुने नवीन सर्व फोटो शेअर केले होते आणि त्या सर्व फोटोत तिचा चेहरा खुलून निघाला होता ..तिची मस्ती असो की नटन - सजन आज सर्व काही फक्त संध्यासाठीच होती ..त्या दोघांना सोबत बघून आज त्याच्या मनात समाधान निर्माण झालं होतं कारण ह्यासाठीच तर त्याने तिला मृन्मयकडे पाठवले होते आणि आज पहिल्यांदाच सारांश गिल्ट मधून बाहेर येऊन हसत होता ..त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये तो हरवत गेला ..काही क्षण तर त्याला तिच्या खुश असण्यावर विश्वास बसत नव्हता आणि त्या दोघींना इतकं आनंदी बघून त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले ..तेच अश्रू घेऊन तो बेडवर पडला ..आज खुप दिवसाने त्याला समाधानाची झोप येणार होती...
संध्याच्या वाढदिवसानंतर नित्या फार खुश राहू लागली होती बहुतेक तिने तिच्याकडे पाहूनच नवीन आयुष्याची रूपरेषा आखली होती ..त्याव्यतिरिक्त तिला काहिच नको होतं ..शिफ्टिंग झाल्यापासून नित्या थोडी फ्री राहू लागली होती त्यामुळे पुन्हा एकदा दोघेही रोज बोलू लागले होते ..एकमेकांशी बोलता - बोलता त्यांचे दिवस कसे निघून जात होते हे त्यांना सुद्धा कळत नव्हत ..जणू ही पर्वणीच होती दोघांसाठी ..नित्याही मनमोकळंपणे बोलू लागली होती आणि त्यामुळे सारांश देखील आनंदी राहू लागला होता ..सुमारे महिनाभर झाला होता ..त्या प्रत्येक दिवसात ते कॉल वर बोलले होते आणि तिला आता कसलाही त्रास होणार नाही अस त्याला वाटू लागलं होतं आणि त्याची भीती कमी होऊ लागली ..विशेष म्हणजे नित्या आता त्याला रोज काहीही घडलं तरी सांगत होती त्यामुळे तो बिनधास्त झाला होता ..
महिना उलटून गेला ..सारांशने आजही तिला सकाळी मॅसेज केला आणि दुपारी 12 पर्यंत त्यांच्यात नीट बोलणं झालं होतं ..तिच्याशी एकदा बोललं की त्याचा दिवस फार सुंदर जात असे त्यामुळे आजही त्याचा दिवस छान जाणार यात शंका नव्हती ..नित्याशी बोलून झाल्यावर तो आपल्या कामात व्यस्त झाला तर नित्या आपल्या कामात..जेव्हापासून नित्या आनंदी राहू लागली होती तेव्हपासून तो आपल्या कामात मन लावू लागला होता आणि बॉस पण त्याच्यापासून खुश होते ..आजही काहीसं असच वातावरण होत ..काम करता असताना देखील त्याच्या मनात एकदा तरी नित्याचा विचार येऊन जायचा आणि तो मनातून खुश व्हायचा ..आजही काम करण्यात दिवस कसा गेला ते त्याला कळले नाही ..जॉबला सुट्टी झाली आणि तो घरी परतला ..आईला चहा टाकायला सांगून तो फ्रेश व्हायला वॉशरूमला गेला . तिकडून परत आल्यावर त्याने आरशावर नजर टाकली आणि स्वतःवरच हसू लागला ..आज साहेबांचा मूड फार मस्त वाटत होता आणि हे बघून त्याच्या आईलाही फार आनंद झाला होता..सारांशने फ्रेश होताच चहा घेतला आणि तिला मॅसेज केला पण तिला मॅसेज पोहोचला नव्हता ..त्याला वाटलं की ती कामात असेल म्हणून त्याने काळजी न करता मोबाइल बाजूला ठेवला ..तेवढ्यात त्याला एका मित्राचा फोन आला ..मित्राच काहीतरी काम अडकून होत ते त्याने सारांशला सांगितलं आणि सारांशनेही त्याच काम करून द्यायला हरकत घेतली नाही ..त्याने लॅपटॉप हाती घेतला आणि काम करू लागला ..साधारणता तासाभरात काम आटोपणार होत पण काही एरर आल्याने तेच काम पूर्ण करायला त्याला 3 तास लागले होते ..काम करून झाल्यावर तो खूप थकला होता त्यामुळे लॅपटॉप बाजूला ठेवून त्याने जेवण करून घेतले ..एवढ्या वेळात त्याच मोबाइलकडे लक्ष गेलं नव्हतं ..पण जेवण केल्यावर त्याने मोबाइल बघितला..आणि त्याला लक्षात आलं की अजूनही तिला मॅसेज गेला नाहीये ..त्याला थोडी काळजी वाटत होती पण तो आज खूप थकला असल्याने तिची वाट पाहण्याऐवजी त्याने झोपण्याचा निर्णय घेतला होता ..
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना त्याने पुन्हा मॅसेज केला पण तरीही तिला गेला नाही ..मृन्मय ऑफिसला 10 ला जात असे त्यामुळे त्याने 10 वाजण्याची वाट बघितली आणि कॉल केला पण तिचा मोबाइल बंद येत होता ..त्याने दोन तीन वेळा कॉल केले पण स्थिती तीच होती ..त्याच मन फारच घाबरत होत ..ऑफिसला असतानाही त्यानेही तिला बरेच कॉल केले होते पण परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता ..कसतरी वेळ ऑफिसला काढून तो घरी परतला या वेळात त्याने कितीतरी कॉल , मॅसेज तिला कॉल केले होते पण काहीच फायदा झाला नव्हता ..हीच स्थिती सुमारे तीन दिवस होती ..तिला काहीतरी नक्कीच झालंय हे त्याला कळून चुकलं होत आणि आजची वाट बघून आपण तिने दिलेल्या पत्त्यावर जायचं त्याने ठरवलं ..आज शेवटचा पर्याय म्हणून त्याने कॉल लावला आणि सुदैवाने कॉल लागला ..तिने कॉल उचलताच तो ओरडत म्हणाला , " नित्या वेडी आहेस का ? कुणी अस मोबाइल बंद करून बसत का ? आम्हाला काही काळजी वाटते की नाही तुझी? ..इतके दिवस कुणी मोबाइल बंद ठेवत का ? "
तरीही ती काहीच बोलत नाहींये हे पाहुन तोच म्हणाला , " बोलशील का आता ? "
आणि ती हळुवार आवाजात म्हणाली , " तब्येत ठीक नव्हती रे म्हणून नाही जमल!!ं ..तू काळजी नको करू मी ठीक आहे .."
तिच्या शब्दात त्याला जाणवत होत की नक्कीच काहीतरी घडल आहे ..आणि तो विचार करून म्हणाला , " तू ठीक आहेस तर मग बर आहे पण मला खात्री करू दे तू ठीक आहेस त्याची ? ..विडिओ कॉल कर मी फक्त एक मिनिट पाहीन तुला मग फोन ठेवुन देईल !! "
विडिओ कॉल ऐकताच ती जरा गोंधळली आणि हडबडीत म्हणून गेली , " तुला विश्वास नाहीये का माझ्यावर ? ..मी ठीक आहे सांगितलं ना !!..मला जास्त वेळ बोलता येणार नाही ..मी ठेवते फोन .."
आणि तो ओरडत म्हणाला , " नित्या तुला माझी शपथ कॉल ठेवलास तर बघ !! ..माझं मन घाबरत आहे मला एकदा बघायचं आहे तुला ..मी तुला शपथ दिलेली आहे तेव्हा आता विडिओ कॉल करावाच लागेल .."
तिला कळून चुकलं होत की सारांशला टाळाटाळ करणे जमणार नाही म्हणून इच्छा नसतानाही तिने कॉल करायला होकार दिला पण एक गोष्ट सांगायला विसरली नाही .." सारांश फक्त एक मिनिट त्यावर नाही बोलणार .."
त्यानेही होकार दिला आणि एका मिनिटाने तिने त्याला कॉल केला ..विडिओ कॉलवर तिला पाहून त्याला समाधान मिळालं होतं ..ती छान दिसतेय हे पाहून त्याची शंका चुकीची ठरू लागली होती ..तो फोन ठेवणारच तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिने कधी नव्हे ती डोक्यावर ओढणी घेतली आहे आणि न राहवता त्याने विचारलं , " आज ओढणी का घेतली आहेस अंगावर ? "
ओढणीच नाव काढताच ती जरा घाबरली आणि हे त्याच्या चाणाक्ष नजरेने अचूक हेरलं ..तिने ओढणी नीट केली आणि त्याला म्हणाली , " थंडी वाजते आहे रे म्हणून घेतली आहे .."
तिने ओढणी नीट केलं नसती तर क्षणभर तिच्या बोलण्यावर त्याला विश्वास बसला असता पण ओढणी नीट करताना त्याला तिच्या मानेवर काहीतरी लागून दिसलं आणि तो म्हणाला , " ठीक आहे पण ते तुझ्या मानेला काय झालं ते सांग आधी ? "
ती नजर चोरत त्याला म्हणाली , " कुठे काय ? "
आणि तो रागावत म्हणाला , " मला दिसलं ते !!..ओढणी खाली कर मग दाखवतो तुलाही .."
तिला काहीच सुचत नव्हतं म्हणून ती म्हणाली , " सारांश मला काम आहेत नंतर बोलू .."
त्यावर तो रागावत म्हणाला , " ठीक आहे नाही द्यायचं उत्तर तर नको देऊ पण मानेवर काय लागलं आहे हे जाणून घ्यायला मी सरळ तुझ्याकडे येतोय .."
ती घाबरतच म्हणाली , " नको नको !! "
मग तो म्हणाला , " चल मग ओढणी खाली कर .."
ओढणी खाली कर म्हणताच तिने साठवून ठेवलेले अश्रू बाहेर आले आणि तिने हळूहळू ओढणी काढायला सुरुवात केली ..ओढणी जसजशी खाली जाऊ लागली सारांश तिच्याकडे बघून शॉकच झाला आणि त्याच्या डोळ्यात आपसूकच अश्रू आले ..तिच्या मानेवर फक्त एक जखम नव्हती तर कुणीतरी चावल्याची कितितरी चिन्हे होती ..त्याला कळून चुकलं होत की काय झालं आणि रडतच तो म्हणाला , " हे अस कस झालं नित्या ? "
तो रडताना पाहून तिलाही अश्रू आवरता आले नाही आणि ती म्हणाली , " बघ ना सारांश !! जी भीती होती तेच झालं शेवटी..त्याने जनावरासारखं ओरबाडल रे मला ..!! त्यादिवशी मी तुझ्याशी बोलून काम आवरलं ..संध्याही शाळेत गेली होती म्हणून निवांत पडले होते ..पण त्याची तब्येत बरी नाहीये हे कारण सांगून तो घरी आला ..मलाही त्याची तब्येत बरी नाहीये म्हणून थोडं वाईट वाटलं आणि त्याला चहा देऊन मी पून्हा बेडवर पडले ..माझा डोळा लागणारच होता की त्याने माझ्या छातीवरून हात फेरायला सुरुवात केली ..माझ्या ते लक्षात येताच मी त्याला बाजूला ढकलून दिले आणि उठू लागले पण त्यादिवशी तो काहीच ऐकणार नव्हता ..त्याने माझे दोन्ही हात घट्ट धरले आणि पुन्हा बेडवर पाडले ..मी प्रतिकार म्हणून त्याच्या कानाखाली दोन मारल्या पण त्याच्या काहीच फायदा झाला नाही उलट त्याने बळजबरीे करून मलाच दोन मारल्या आणि त्याचा हात पडताच मी कमजोर पडले..दिवसात चांदने दिसू लागले मला ..मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतच होते की .त्याने माझे कपडे फाडले आणि हवं ते साध्य करून घेतले .मी कितीतरी वेळ ओरडत होते पण त्याने काहीच एकल नाही सारांश ..इतक्या दिवसाचा राग म्हणून त्याने पूर्ण शरीरावर चावे घेतले ..मी वेदनेने तडफडत होते पण त्याने मला सोडलं नाही ..उलट जास्तीत जास्त क्रूर वागत होता तो ..किती वेदना झाल्या सारांश काय सांगू !! त्या दिवसापासून तो रोज मुलीला शाळेत सोडून घरी परत येतो ..मी नाही एकल तर मारतो मला !! पण त्याला हवं ते मिळवितोच ..मागचे दोन तीन दिवस तेच घडत आहे ..खूप त्रासदायक आहे हे सर्व माझ्यासाठी ..तुला हे ऐकल्यावर त्रास होईल म्हणून मी मोबाइल बंद ठेवला होता पण सारांश मी काहिच करू शकले नाही रे ..शेवटी एका स्त्रीची शक्ती कमी पडली रे सारांश !! कमी पडली "
कभी मेहकती थी फुलो सी
खुशबू देना मेरी चाहत थी
आज बेरंगसी हो गयी हु मै
बता दे क्या सजा है मेरे चाहत की
तीच बोलणं ऐकून त्याच्या अंगातले त्राणच हरपून गेले ..तिच्याशी काय बोलावं नि काय नको हाच विचार तो करत होता .नित्या फक्त अश्रू गाळत होती ..तर तशीच स्थिती त्याचीही होती ..नित्याला अशा अवस्थेत पाहणं त्याला जमले नाही आणि त्याने फोन ठेवून दिला ..नित्याने नंतर त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मोबाइल आता बंद येत होता ती मनातून फारच घाबरली होती आणि एकावर एक कॉल करत होती पण त्याचा नंबर काही सुरू झाला नव्हता...
सारांशने फोन बंद केला तेव्हापासून ती त्याला फोन करत होती पण त्याचा फोन काही लागत नव्हता आणि तिला आणखीच चिंता वाटू लागली ..तिला माहिती होत की सारांश जरी शांत असला तरी माझ्यासाठी तो काहीही करु शकतो म्हणून तिला जास्त भीती वाटत होती आणि म्हणून ती पुन्हा पुन्हा कॉल करू लागली पण त्याचा काहीही फायदा झाला नव्हता ..सकाळची दुपार आणि दुपारची सायंकाळ झाली होती पण त्याचा फोन काही लागला नव्हता ..ती फारच रडवेली झाली होती आणि तशीच दिवसभर रडत बसली होती ..सायंकाळचे 6 वाजले होते आणि डोर बेल वाजली ...मृन्मयची येण्याची वेळ झाली होती ..त्यामुळे तोच आला असेल अस समजून ती दार खोलायला बाहेर गेली ..तिने डोर ओपन केलच होत की तिला समोर सारांश दिसला ..सारांशला पाहताच ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली ..त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतले .काही क्षण दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते..ती रडता - रडताच म्हणाली , " कुठे होतास ? मी किती कॉल केले तुला ? तुझी किती काळजी वाटत होती तुला काय माहिती ? "
आणि तोही रडतच उत्तरला , " मग मला नाही वाटणार का तुझी काळजी ? ...जेव्हा तुझं बोलन एकल तेव्हा ऑफिसला निघालो होतो पण बोलणं ऐकूनच अंगावर काटे आले की तुझ्याजवळ येण्यापासून थांबवू शकलो नाही ..नाही आणि सरळ फ्लाइट घेऊन इकडे आलो तुला माझ्यासोबत न्यायला .."
ती जोराने ओरडत म्हणाली , " मला सोबत न्यायला ? "
तर सारांश तिच्या बेडरूममध्ये जात म्हणाला , " हो तुला न्यायला आलोय आता नाही ठेवणार मी तुला इथे .एक क्षण पण नाही ..घरी जे होईल ते मी बघून घेईल पण या नरकात एक क्षणही तुला ठेवायचं नाही मला ..."
तो बेडरूममध्ये जाऊन काहीतरी शोधत होता आणि नित्याच लक्ष घड्याळीकडे गेलं ..मृन्मय केव्हाही घरी येईल हे तिला समजलं होत म्हणून ती म्हणाली , " काय शोधत आहेस तू ? "
" बॅग शोधतोय कपडे भरायला ..तुला सोबत न्यायचं आहे ना म्हणून .." , तो उत्तरला
ती फारच घाबरली होती आणि ती त्याचा हात पकडत म्हणाली , " सारांश आपण यावर उद्या बोलू ..आता इथून जा प्लिज !! कारण तो केव्हाही येऊ शकतो आणि त्याने तुला इथे पाहिलं तर मारून टाकेल ..प्लिज माझ्यासाठी इथून जा!! .."
तो तिचा हात पकडत म्हणाला , " नित्या आज जे होईल ते होउदे पण आज मी परत जाणार नाही ..तुझं खुप एकल आजपर्यंत !! ..नाही केली अपेक्षा की नाही सजवले स्वप्न पण आज जे घडतंय ते पाहून शांत नाही राहु शकत ..आज तर माझं मृत शरीर इथून जाईल किंवा मग तू चल माज्यासोबत .."
सारांश हट्टाला पेटला होता हे पाहून ती त्याच्या पायावर पडत म्हणाली , " सारांश आपण बोलू यावर उद्या प्लिज आता जा !! आपल्याला सोबत बघून तो काय करेल याची शाश्वती नाहीये ..प्लिज ऐक माझं"
त्याने तिचा खांदा धरून वर उभे केले आणि काही बोलणार तेवढ्यातच बेल वाजली आणि नित्याचे हात पाय थरथर कापत होते ..सारांश तिला हॉल मध्ये घेऊन आला होता पण नित्याची दार उघडण्याची काही हिम्मत होत नव्हती ..तो काय करेल याच विचाराने तिचे अवसान गळून पडाल होत आणि सारांशने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता तर तिकडे बेल वाजवून कुणीच दार उघडत नाही म्हणून मृन्मयने आपल्याकडे असलेल्या चावीने दार उघडले ..तो आत आलाच होता की समोर सारांश तिचा हात पकडून उभा आहे हा नजारा समोर दिसला ..त्याच्या डोळ्यात राग होता आणि त्याच रागात तो म्हणाला , " तू इथेच आहेस मग दार का उघडलं नाहीस आणि हा कोण आहे ? "
नित्या अडखळत बोलून गेली , " मृन्मय हा माझा मित्र आहे माझी तब्येत बरी नाहीये म्हणून पाहायला आला आहे .. "
मृन्मय जरा रागातच पाहत पुन्हा म्हणाला , " मित्र आहे तर हात का पकडला त्याने तुझा ? "
अस म्हणताच नित्याने त्याचा हात सोडला पण नित्या पुढे उत्तर देणार तेव्हढ्यात सारांश उत्तर देत म्हणाला , " मी नित्याला कायमस्वरूपी घेऊन जायला आलो आहे ..म्हणून तिचा हात पकडून आहे .."
त्याचे शब्द ऐकताच मृन्मयने त्याची कॉलर धरली आणि दोन कानाखाली मारत म्हणाला , " साल्या माझ्याच घरी येऊन माझ्याच बायकोला घेऊन जातो म्हणत आहेस ..इतकी हिम्मत तुझी ? "
त्याने सारांशला दोन मारल्या तरी त्याने काहीच म्हटलं नाही तर नित्या त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होती ..सारांशने जरी त्याच्यावर हात उचलला नव्हता तरी तो म्हणाला , " बायको समजतोस का तिला ? की संपत्ती आहे तुझी ?..कधी समजून घेतलंस तू तिला ..एका मुलीवर जबरदस्ती करून मर्दपणा दाखवतोस आणि बायको म्हणतोस लाज कशी नाही वाटत तुला ? ..हीच आहे का तुझी मर्दानगी ? "
त्याच बोलणं ऐकून तो आणखीच रागावला होता ..त्याचे डोळे लाल भडक झाले होते..आणि त्याच आवेशात तो म्हणाला , " साल्या , माझी मर्दानगी काढतोस , थांब तुला दाखवतोच मर्दानगी !! माझ्याच घरी येऊन मला बोलायची हिंमत करतोस !! इथून आज जिवंत जाऊ देईल तर तुला !! "
शिव्या देतच मृन्मयने त्याचा हात पकडून जोराने ढकलून दिले ..तो जाऊन भिंतीला आपटला ..मृन्मयचा राग इथेच शांत झाला नव्हता म्हणून तो लाथेने त्याला तुडवत होता ..कधी पोटावर तर कधी कंबरेवर तो त्याला मारत होता ..सारांश वेदनेने ओरडत होता पण त्याचा राग काही कमी होत नव्हता जणू त्याने त्याला संपविण्याचा प्रणच घेतला होता ..अशा तर्हेने तो त्याला तुडवत होता..नित्या हर बघून फारच घाबरली होती म्हणून मृन्मयला अडविण्याचा प्रयत्न करत होती ..पण त्याने तिलाही बाजूला ढकलून दिले आणि त्याला सतत मारत राहिला ..सारांशच्या शरीरातून रक्तच रक्त वाहू लागल होत ..नित्याने ते पाहिलं आणि हिम्मत करून स्वतःची पूर्ण ताकद लावत तिने मृन्मयला बाजूला ढकलून लावले ..तो बाजूला जाऊन टेबलवर पडला आणि त्याच्या डोक्याला लागल .त्याच्या डोक्यातूनही बरच रक्त सांडू लागलं होतं ..तिने त्याला ढकलून दिलं त्यानंतर नित्याच मृन्मय कडे लक्ष नव्हतं ..सारांशच रक्तबंबाळ शरीर पाहून ती त्याला म्हणाली , " सारांश तू ठीक आहेस ना ? ..चल आपण डॉक्टरकडे जाऊ .."
नित्याने मृन्मयला ढकलून दिलं एवढंच नाही तर त्याला लागून असतानाही ती एका परपुरुषाची काळजी घेते हे बघून त्याला राग अनावर झाला आणि रागातच तो काहीतरी शोधू लागला ..त्यावेळी नित्याच मृन्मयकडे अजिबात लक्ष नव्हतं ती सारांशला उठवायचा प्रयत्न करत होती ..तर इकडे मृन्मयचा संताप झाला होता ..मृन्मय त्याला मारण्यासाठी काहीतरी शोधत होता आणि त्याचा हातात चाकू लागला ..तो चाकू धरून त्यांच्याकडे जाऊ लागला ..त्याक्षणी फक्त सारांशला संपवून टाकन हाच त्यांचा विचार होता ..नित्या त्याला घेऊन दाराकडे जात होती तेवढ्यात काहीतरी पडण्याचा आवाज तिला आला आणि तिच्या लक्षात आलं की तो चाकुन सारांशवर वर हल्ला करतोय ..तिने ते बघितलं आणि त्याला बाजूला ढकलून दिले ..सारांश खाली पडला पण चुकून तो चाकू नित्याच्या पोटात घुसला होता ..सारांश ते सर्व पाहत होता आणि नित्या खाली जमिनीवर पडली ..नित्याची नजर आताही त्याच्या रक्तबंबाळ शरिराकडे होती ..तर सारांशला क्षणभर काय सुरू आहे तेच कळत नव्हतं ..त्याला शॉकच लागला होता ..सारांशच्या तोंडून शब्द फुटत नव्हते पण डोळ्यात अश्रू होते ..त्याच अश्रूंना ताकद बनवून पूर्ण हिम्मत एकवटून तो बोलून गेला , " नि...............त्या "
इशक ईबादत ही सही
करलु एक बार
चाहे मौतसे नवाजे मुझे जिंदगी
फिर भी आखरी सास तक रहेगा तुझसे प्यार
क्रमशा ..