श्री दत्त अवतार भाग १७
१०) समुद्र
समुद्रात सर्व नद्या आपले पाणी घेऊन येतात.
समुद्र अथांग आहे तरी आपली मर्यादा सोडीत नाही.
त्याप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरी खूप प्रफुल्लीत होऊ नये. आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष ठेवावे.
११) पतंग
दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भाळून पतंग स्वत:ला जाळून घेतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या रूपावर भाळून आपला नाश करू नये. संयम राखावा.
१२) भृंग
निरनिराळ्या फुलांवरून भृंग मकरंद सेवन करतो. त्याप्रमाणे लहान - मोठ्या सगळ्या ग्रंथांचे सार लक्षात ठेवावे, व त्याप्रमाणे आचरण असावे.
१३) मातंग
मातंग म्हणजे हत्ती. हा बलवान, बुद्धिवान व आकारानेही मोठा आहे. पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीण करून त्याला आकर्षित करतात व तो खड्ड्यात पडतो. मग त्याला पकडतात.
यापासून स्त्रीच्या मोहात पडू नये हा बोध घ्यावा .
१४) मधमाशी
मधमाश्या फुलांवर जाऊन मध गोळा करतात व ते पोळ्यात जमा करतात. परंतु त्या पोळ्याला आग लावून मनुष्य ते पोळे मधासाठी हस्तगत करतो. म्हणून धनाचा संग्रह करणाऱ्या लोकांची अशीच गत होते. दरोडे - डाके पडून प्राणहानीही होते. म्हणून अनावश्यक आणि अति धनाचा संग्रह वर्ज्य करावा.
१५) मृग
हरिण हे चपळपणासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याला पकडण्यासाठी पारधी लोक बासरीसारखे वाद्य वाजवून त्याला स्थिर करतात व नंतर त्यावर जाळे टाकून त्याला पकडतात.
म्हणून ग्रामगीते म्हणजे श्रृंगारिक लावण्या वगैरे श्रवण करणे टाळावे .
भगवंताच्या गुणगानाचेच श्रवण करावे.
१६) मत्स्य
मत्स्य पकडण्यासाठी पद्धती म्हणजे एका दोरीला गळ लावतात. त्याला खाद्य म्हणून मासांचा तुकडा लावतात. दोरी काठीला बांधून ती पाण्यात सोडतात. माशाने ते तोंडाने धरताच त्याच्या टाळूला गळ अडकून पडतो व तो प्राणास मुकतो.
म्हणून भोज्य पदार्थांच्या आवडीवर रसना (जीभ) ताब्यात ठेवावी.
१७) पिंगला
विदेह नगरामध्ये एक पिंगला नावाची सुंदर देखणी वेश्या राहत होती. धनाच्या लोभामुळे तिच्याकडील पुरुषांचे येणे पुढे बंद झाले. एके दिवशी घरात- बाहेर येणे- जाणे सुरू होते. तरी कुणीही पुरूष तिच्याकडे आला नाही. तेव्हा तिला एकदम आपल्या व्यवसायावर उपरती / वैराग्य प्राप्त झाले व पुढे ती आत्मानंदात राहू लागली. निव्वळ आशेवर जगू नये. त्यामुळे दु:ख प्राप्त होते. परंतु वैराग्य आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही.
१८) कुरर पक्षी
याला टिटवी म्हणतात. हे मांसपक्षी पक्षी आहेत. असाच एकदा मांसाचा गोळा प्राप्त झाल्यावर तो सर्व पक्ष्यांनी सारखा वाटून घेतला. काही पक्ष्यांनी लवकर खाऊन संपविला पण एक पक्षी हळूहळू खात होता. त्याच्याजवळ बरेच मांस उरले म्हणून बाकीचे पक्षी त्या पक्ष्यावर मांस खाण्यासाठी तुटून पडले. जेव्हा त्या पक्ष्याने मांसाचा तुकडा फेकून दिला त्यानंतर त्याला कोणीही त्रास दिला नाही.
तात्पर्य असे की परिग्रह (संग्रह) हा दु:खाला कारणीभूत होतो म्हणून धनादिकाचा संग्रह करू नये.
१९) बालक
लहान बालक कोणतीही चिंता न करता आपल्या आनंदात मग्न असते. मान-अपमान, पाप-पुण्य इ. चिंता त्याला असतात. ते आपल्या आनंदात क्रीडा करीत राहते. ती त्याची अंतर्वृत्ती आहे. याप्रमाणे मनुष्याला अंतर्वृत्तीने सुख मिळते हे शिक्षण बालकाला गुरू करून मला मिळाले.
२०) कुमारी कंकण
एका उपवर मुलीला पाहण्याकरता काही पाहुणे तिच्या घरी आले. त्यावेळी घरचे सर्व लोक बाहेर गेले होते व तिला गायीसाठी म्हणून घरीच ठेवले होते. ऐनवेळी त्यांच्या जेवणाची सोय करावी म्हणून तिने साळी कुटण्यास घेतली. परंतु तिच्या कंकणांचा आवाज होऊ लागला. त्या आवाजाचे मात्या-पित्यांना दूषण येईल म्हणून एक-एक कंकण काढत गेली. जेव्हा एकच कंकण राहिले तेव्हा आवाज बंद झाला म्हणून कोणत्याही साधनेसाठी एकांतच असावा हे शिक्षण मला मिळाले.
२१) सर्प
सर्प हा समूहाने राहत नाही. ते एकटेच फिरतात. त्यांना दुखावल्याशिवाय कोणाला डंख करीत नाही. त्याप्रमाणे संन्याशाने सतत फिरत राहावे. पण मठ, आश्रम बांधू नये.
२२) शरकार
शरकार म्हणजे बाण बनविणारा लोहार. हा बाण बनविण्याच्या वेळी कोणत्याही दुसऱ्या आवाजाकडे लक्ष देत नाही. जवळून राजाची मिरवणूक गेली तरी त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या कामात एकाग्रता ठेवावी. जप, तप, योग साधन इ. करणाऱ्यांना अशी एकाग्रता आवश्यक आहे. हे शिक्षण मला शरकाराकडून मिळाले.
२३) कुंभारीण माशी
ही माशी पावसाळ्यात एका अळीला आपल्या घरट्यात आणून ठेवते. त्या अळीला प्रत्येक वेळी जाता - येता तिच्याजवळ असलेल्या काट्याचा डंख करणाऱ्या माशीतच असते. पुढे समयानुसार त्या अळीला डंख करीत असलेल्या जागी नवा काटा निघतो व ती अळी कुंभारीण माशी बनते. तात्पर्य ज्याचे आपण नित्य ध्यान करू त्यातच आपले रूपांतर होईल (हा किटकन्याय म्हणून ब्रह्मचिंतनात प्रसिद्ध आहे)
२४) कोळी
हा आपल्या नाभीतून सूत्र काढून त्याचे जाळे बनवितो. त्यात तो यथेच्छ क्रीडा करून ते जाळे स्वत:मध्ये सामावून घेतो. त्याप्रमाणेच ईश्वरही हे जग निर्माण करतो व यथाकाळ राहून आपल्यामधे सामावून घेतो. त्याला बाहेरची आणखी सामग्री लागत नाही. नरदेह प्राप्त झाल्यावर या जन्मात जे लोक मोक्ष साधन करून घेत नाही त्यांचा पुनर्जन्म होत राहतो. दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
गाय: दत्ताच्या मागे असलेली गायही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनूआपणाला जे हवे, ते सर्व देते.पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
४ कुत्रे: हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४वेदांचे प्रतीक आहेत.
औदुंबर वृक्ष: दत्ताचे पूजनीय रूप! या वृक्षात दत्त तत्त्वअधिक आहे.
मूर्तीविज्ञान: दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे आहे,
कमंडलू आणि जपमाळ: हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.
शंख आणि चक्र: श्री विष्णूचे प्रतीक आहे.
त्रिशूळ आणि डमरू: शंकराचे प्रतीक आहे.
झोळी: ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे.
झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.
दत्ताच्या काही नावांचा भावार्थ
१) दत्तगुरु (जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटणारा):
`दत्त हे तत्त्व जिवाकडून कोणत्याच सगुण-निर्गुण भावाची अपेक्षा न ठेवता जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटत असते; म्हणूनच ते सर्व लोकांत `दत्तगुरु' या नावाने ओळखले जाते.
२) अवधूत (दत्त म्हणजे सगुण व दत्तात्रेय म्हणजे निर्गुण, या दोन रूपांना जोडणारा) :
`अवधूत' म्हणजे जिवाच्या देहातील अष्ट अवधाने नियंत्रित करून त्याला सगुणातून निर्गुणाची दिशा दाखवणारा. अवधूत हे दत्त व दत्तात्रेय या दोन रूपांना जोडणारे माध्यम आहे. दत्त (ब्रह्मा, विष्णु व महेश यांचा मूर्त-स्वरूप आविष्कार) हा सगुण, तर दत्तात्रेय (ब्रह्मा, विष्णु व महेश या तत्त्वरूपी त्रयींचा प्रकाशरूपी आविष्कार) हा निर्गुणाशी संबंधित आहे. `अवधूत' हे दत्ताच्या तेजाची प्रभावळ घेऊन जन्माला येणारे तत्त्व आहे.
३) दिगंबर (मोक्षात विलीन होईपर्यंत साथ देणारा):
`दिगंबर' म्हणजे अंबररूपी व्याप्त प्रकाशात, म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत, म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्त्व.
४) श्रीपाद (`श्री' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारा):
`श्री' म्हणजे ईश्वराचे अविनाशी तत्त्व. अशा ईश्वररूपी अविनाशी तत्त्वाच्या, म्हणजेच `श्री' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारे तत्त्व, म्हणजे श्रीपादरूपी दत्ततत्त्व.
५) वल्लभ (अभय देणारा):
भय निर्माण करणार्या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जिवांना अभय देणारे तत्त्व, म्हणजे वल्लभरूपी दत्ततत्त्व.'
क्रमशः