२९) सौभाग्य व ती!
सायंकाळची वेळ होती. खोलीतील आलमारीवर लावलेल्या मोठ्या आरशामध्ये तिने स्वतःला पाहिलं. ती तिच्या प्रतिबिंबाला पाहतच राहिली. रोजच्या सौंदर्यामध्ये आणि त्यादिवशीच्या तिच्या सौंदर्यामध्ये बराच फरक तिला जाणवला. रोजच्या साजशृंगारामध्ये असलेला तोच तोच पणा कुठेही दिसत नव्हता. उलट रोजच्या त्या चेहऱ्यावरील शृंगारास त्यादिवशी लज्जेची लाली शोभून दिसत होती. चेहऱ्यावर आलेली लाली आणि तेज वेगळेच काही तरी सांगत होते. सोबत चेहऱ्यावर एक आशा होती, एक उत्सुकता होती. अनेक प्रश्नही होतेच. ती रोजच नटतथटत असली तरी त्यादिवशी तिला तिच्या भावी जीवनसाथीला आकर्षित करायचे होते. एक साद घालून त्याच्या सौंदर्य संदर्भातील कल्पनेत स्वतःला उतरावयाचे होते. ते करताना नयनतीरांनी त्याला घायाळ करत लज्जेच्या सौंदर्यात त्याचा होकार मिळवायचा होता. त्यादृष्टीने माधवी तयार झाली होती. होय! ती माधवीच होती. नयनच्या सततच्या पाठीमागे लागल्याने ती त्यादिवशी लग्नाच्या बाजारात पाऊल ठेवणार होती! अर्थातच स्वत:च्या इच्छा-आकांक्षाना तिलांजली देवून. तिथेच स्रीत्वाची हार झाली होती. स्त्री मुक्तीचे वादळ घोंघावत असतानाही माधवीला जुन्या परंपरेस सामोरी जावं लागत होते. 'मुलगी पाहणे' या दोन शब्दात दडलीय मुलीची असहायता, मुलीचा अपमान आणि मुलींचा बाजार! बाजारात ज्याप्रमाणे गायी-म्हशींची विक्री होताना त्यांची सर्वांगीण पाहणी होते. सिनेमातील खलनायक ज्यादृष्टीने नायिकेकडे बघतो त्याच नजरेने आलेले पाहुणे मुलीस पायाच्या अंगठ्यापासून डोक्यावरील केसांपर्यंत बघतात. मुलीची प्रत्येक हालचाल न्याहाळून नंतर त्यावर काथ्याकुट करतात. त्या चर्चेची फलनिष्पत्ती मुलीसाठी नकारात्मक असेल तर मग तो प्रश्न त्या स्थळापुरता मिटतो. जर मुलीच्या पारड्यात होकाराचे दान पडले तर मग सुरू होतो लिलाव ! हुंडाबंदीच्या युगात मुलींची विक्री होते. तसे पाहिले तर 'मुलांचा लिलाव होतो' हा वाक्प्रचार अधिक सयुक्तिक ठरावा परंतु तो प्रचलित नाही. वधुपिता मुलगीही देतो, वर हुंडाही देऊन वरदक्षिणाही देतो म्हणजेच तो नवरदेवास विकत घेतो असाही अर्थ होऊ शकतो पण तिकडे कुणी लक्ष देत नाही. मुलगी सुस्वरूप असो की कुरूप, शिक्षित असो की अशिक्षित, नोकरी करणारी असो वा नसो तिच्या पित्याला हुंडा, वरदक्षिणा द्यावीच लागते. एकविसाव्या शतकात हुंड्याची परिभाषा बदलतेय. हुंडा हा जुना शब्द बाद होतोय. त्याऐवजी वरदक्षिणा, कन्यादान ही नवीन नावे मिळताहेत, जुन्या बाटलीमध्ये नवीन औषध टाकल्याप्रमाणे! ज्याला जसं भावेल तसा अर्थ त्याने लावावा. कन्यादान करताना दागिने, कार, जीप, स्कुटर, प्लॉट इत्यादी प्रकारही मान्य होताहेत, अडकलेला हात मोकळा होतोय, सर्व दानामध्ये कन्यादान श्रेष्ठ या आनंदात वधुपिता वराकडील मंडळीच्या अवाजवी, अवास्तव मागण्या पूर्ण करतो.
'होत असेल जरी दाणादाण
काढावे लागले जरी ऋण
क्रमप्राप्त आहे कन्यादान !' प्रमाणे!...
"माधवी... माधो..." खोलीत आलेल्या नयनच्या आवाजाने माधवी भानावर आली. तिच्याकडे आश्चर्याने पाहत नयन तिच्याजवळ येवून तिला बघत उभी राहिली. भरल्या डोळ्यांनी नयनने माधवीच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले आणि काहीही न बोलता आल्या पावली निघून गेली. किती साधी कृती ती पण त्यात तिचे भरलेले मन, माधवीवर असलेले प्रेम प्रकट झाले. आईला फार कमी वेळा तिने तसं आनदी पाहिलं होतं. माधवीसाठी आईचे रूप म्हणजे सदा दुःखात असणारी, सतत कष्टी दिसणारी आणि राबणारी आई. असं असलं तरी नयनने तिला प्रयत्नपूर्वक दुःखापासून दूर ठेवलं होतं. माधवी दिसताच नयन दुःख आत ढकलून तिला प्रेमाने, मायेने बोलत असे. तिची प्रत्येक कृती तशी प्रेमाने भरलेली असायची. नयनवर एका मागोमाग एक दुःखाचे डोंगर कोसळले होते. संजीवनीच्या मृत्यूचा धक्का तर तिला जीवनातून ऊठवणारा होता परंतु नयनने तो डोंगर सर करून ते दुःखही पचवले होते. कमालीच्या वेगाने ती त्या धक्क्यातून सावरली होती.
स्वतःला सावरत नयनने माधवीलाही सावरले होते. तिच्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. तिला योग्य वळण, योग्य शिकवण देवून घडवले होते. एखादा मूर्तीकार जसं सर्वस्व पणाला लावून मूर्ती घडवतो. चित्रकार चित्रामध्ये जीव ओतून ते साकारतो त्याप्रमाणे नयनने माधवीला सुसंस्कारित केलं होतं. त्याची जाणीव माधवीलाही होती. घरातले वातावरण जरी त्या दोघींसाठी कलुषीत असलं तरी दोघी एकमेकींना पाहताच सारे विसरून जात. एकमेकींची काळजी घेताना विचारपूस करीत. माधवीच्या आजीने कधीच घरात दखल दिली नाही. तिने तिचे विश्व आखून घेतले होते. त्या विश्वाच्या बाहेर ती क्वचितच येत असे. माधवमामाही कधी तिला, तिच्या आईला प्रेमाने, आपुलकीने बोलल्याचे माधवीला स्मरत नव्हते. कधी बोललाच तर त्यात उपहास, संताप आणि घृणाही भरलेली असे. तिची मामीही तिला कधी फारशी प्रेमाने बोलत नसली, वारंवार तिला घाडूनपाडून बोलत असली तरीही मीराने तिला स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना पण घरकामात पारंगत केले होते. मीराच्या धाकाने माधवी चहा, फराळ यासह सारा स्वयंपाक उत्कृष्ट बनवत असे.
भाऊ!तिचे आजोबा! त्यांची तऱ्हा काही वेगळीच. प्रयत्न करूनही ती त्यांच्याबाबत काहीही निष्कर्ष काढू शकली नाही. संजीवनीच्या मृत्यूनंतर भाऊंचे वागणे बदलले होते. नयनशी नाही परंतु माधवीशी ते खूपच आपलेपणाने वागू लागले होते. पूर्वी तिच्याकडे न पाहणारे भाऊ संजूच्या जाण्यानंतर माधवीला जवळ घेवू लागले. तिच्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवून शाबासकी देऊ लागले. उशिरा का होईना परंतु तिचे आजोबा इतर मुलांच्या आजोबांप्रमाणे तिचे लाड करत होते...
"माधवी, चल बेटी, पाहुणे आले आहेत. विचारलेल्या प्रश्नांची हळू आवाजात उत्तरं दे..." पुन्हा आत आलेली नयन म्हणाली. माधवी ऊठली. नयनने हाताला धरून तिला स्वयंपाक घरात नेले. स्वयंपाकघरातून पोह्याचा ट्रे घेवून माधवीने हलक्या पावलांनी बैठकीत प्रवेश केला. दुसऱ्याच क्षणी हसणारी बैठक शांत झाली. सर्वांच्या नजरा स्थिर झाल्या. धडधड वाढली. बैठकीत आलेल्या माधवीने भाऊंकडे पाहिलं तसं ते म्हणाले,
"दे सर्वांना..." कापत्या हाताने माधवीने तो सोपस्कार पूर्ण केला आणि तिथे जवळच बसली. समोर बसलेल्या मंडळीवर तिने स्वत:च्या नकळत शोधक नजर टाकली परंतु दिला 'तो' ओळखता आला नाही. सर्वांच्याच चेहऱ्यावर एक प्रकारची लालसा होती. त्यापैकी तिघे समवयस्क होते. तिघांचीही नजर तिच्या शरीरावर फिरत असली तरी ती पहिलीच वेळ असलेल्या माधवीला 'त्याला' ओळखणे कठीण गेले. गोंधळलेल्या अवस्थेत तिने स्वतःच्या पायावर दृष्टी स्थिर केली. पाहण्याच्या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा सोपस्कार म्हणजे प्रश्न उत्तरे! सर्वांनी एका मागून एक प्रश्नांची सरबत्ती केली. जमेल तशी माधवीने उत्तरे दिली. काही क्षणाने कुणी तरी म्हणाले,
"ठीक आहे. जा..."
एक ओझं डोक्यावरून उतरल्याप्रमाणे, परीक्षा खोलीतून रिकाम्या डोक्याने परतणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणे ती खोलीत परतली. काही वेळाने ती मंडळीही 'कळवतो.' असे सांगून निघून गेली.
ती मंडळी पाहून गेल्यानंतर आठ दिवस स्वप्नात तरंगणाऱ्या माधवीच्या हातामध्ये ते पत्र पडलं. पाहून गेलेल्या मुलाच्या वडिलांचे ते पत्र होते. त्यात लिहलं होत...
'मुलीला नाव ठेवायला जागा नाही परंतु नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीच्या मुलीशी संबध ठेवणे आम्हाला जमणार नाही...' पत्रातील पुढचा मजकुर तिला वाचताच आला नाही. माधवीचे डोळे भरून आले. तिला खूप दुःख झाले. पण काही गोष्टींचा सामना करावा लागतो.
नंतरही अनेक ठिकाणी नयनला तेच उत्तर मिळत असे. कुणी ठिकाण सुचवायला उशीर नयन लगेच त्यांना जाऊन भेटत असे. मुलीचे लग्न ठरवायला एक स्त्री, स्वतः मुलीची आई येतेय हे बघून स्त्री मुक्तीच्या दशकातही भुवया उंचावल्या जात असत. मुला-मुलीच्या माहितीची, अपेक्षांची विचारणा होण्यापूर्वीच अनेक प्रश्नांची यादी समोर येत असे. त्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नयनचा जीवनवृत्तांत समोर येताच नकार देताना कुणी म्हणे,
"नाही. आम्हाला मुलाचे लग्न करायचे नाही. तुम्हाला कुणीतरी खोटी माहिती दिली आहे."
तर अनेक जण समोरासमोर आणि स्वतःला फार मोठे स्पष्टवक्ते समजून म्हणायचे,
"टाकलेल्या बाईचे चारित्र्य... जाऊ द्या. आम्ही अशा घराण्याशी संबंध ठेवू शकत नाही..."
अशी उत्तरे ऐकून नयन प्रचंड निराश होत असे. उदास होत असे पण तिने धीर आणि प्रयत्न सोडले नाहीत...
००००