Shree Datt Avtar - 14 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | श्री दत्त अवतार भाग १४

Featured Books
Categories
Share

श्री दत्त अवतार भाग १४

श्री दत्त अवतार भाग १४

हातात भिक्षा पात्र धारण केलेल्या, सोबत श्वान असलेल्या, शील नावाच्या भक्ताचे (ब्राह्मणाच्या क्रोधापासून तसेच संसारगर्तेत बुडण्यापासून) रक्षण करणारा हा मायामुक्तावधूत अवतार होता .

पाणीपात्रधराय त्वं ||श्वानसहिता शीलरक्षका ||

मायामुक्तावधूताय ||दत्तात्रेयाय नमो नम: ||

पाणी (संस्कृत शब्द - अर्थ - हात) म्हणजे हातात भिक्षा पात्र धारण केलेल्या, सोबत श्वान असलेल्या, शील नावाच्या भक्ताचे (ब्राह्मणाच्या क्रोधापासून तसेच संसारगर्तेत बुडण्यापासून) रक्षण करणार्‍या, मायामुक्तावधूत अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो



११) मायायुक्तावधूत

दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव 'मायायुक्तावधूत' असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण सुरु होते.

ही योगमाया होती.

जेव्हा श्रीप्रभू एका तरूण तपस्व्याच्या रूपात प्रकट झाले तेव्हा त्यांचे सोबत त्यांच्या डाव्या मांडीवर एक तरूण युवती बसली होती. त्यांचे हे रूप पाहून, साक्षात लक्ष्मी नारायणच प्रकट झाले आहेत असे समजून सर्वजण त्यांना शरण गेले आणि आपापल्या सांसारिक विवंचना त्यांचापुढे विषद करू लागले.

परंतु एकाही दर्शनार्थीने अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी रूची दाखवली नाही.
श्री गुरूंनी मग एक लीला केली, ते सोबत असलेल्या तरूणीसोबत नृत्य गायन करू लागले. परंतु हे तर श्री दत्तात्रेय आहेत आणि ते आपल्या मायेसोबत खेळत आहेत, असे समजून लोकांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. श्रीगुरूंनी मग मद्य, मदिरादि विषयसेवन त्या तरूणीसोबत सुरू केले आणि ते म्हणाले, "मी हे असे विषयसेवन करत आहे त्यामुळे तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याची पात्रता आणि सामर्थ्य आता माझ्यात नाही."
त्यांचे हे वचन ऐकताच उपस्थितांपैकी बरेच लोक निराश झाले आणि परत माघारी फिरले. पण काही शिष्य मात्र श्री गुरूंच्या त्यारूपातसुद्धा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिथे तसेच थांबले. त्यांची ती निष्ठा पाहून श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या उपस्थित भक्तगणांना उपदेश केला, "श्रद्धा, भक्ति, ध्यान - धारणा, शमदमादि नियमांचे पालन आणि षड्रिपूंवर विजय मिळवूनच संसारबंधनातून मुक्ति मिळू शकते!"

यानंतर मायायुक्तावधूत नमर्देच्या उत्तर तटाने फिरत फिरत माहूरगडापर्यंत पोहोचले.
येथे त्यांना जंभासूरापासून त्रस्त झालेले देवगण, कार्तवीर्य सहस्त्रार्जुन आणि परशुराम भेटले. श्रीगुरूंनी मग परशुरामांना क्षत्रिय वधाच्या दोषापासून मुक्त होण्यासाठी आणि मनःशांतीसाठी 'त्रिपुरा रहस्य' विषद केले.

श्री गुरूंच्या सोबत असलेली त्यांची ही शक्ति मायारूपिणी देवी अनघाच होती.

अनघालक्ष्मीसहिताय ||मायारूपप्रदर्शका ||

मायायुक्तावधूताय ||शार्दुलाय नमो नम:||

ह्या अनघालक्ष्मींच्या सोबत नित्य असलेल्या, आपले मायारूप दाखवणाऱ्या, मायायुक्तावधूत अवतार धारण करणाऱ्या श्री शार्दुलांना माझा नमस्कार असो.

१२) आदिगुरु

सद्गुरु श्रीदत्तात्रेय भगवान यांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने ओळखला जातो. मदालसेचा धाकटा पुत्र जो अलर्क, त्याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता दत्तात्रेयांनी जो अवतार घेतला, त्याला आदिगुरु असे म्हटले आहे. ज्या अवतारात श्रीगुरूंनी अलार्कला उपदेश केला तो हा आदिगुरू अवतार आषाढ शुद्ध पौर्णिमेला, मंगळवारी, पहिल्या प्रहरी, पहिल्या मुहूर्तावर झाला

राजा म्हणून राज्य करताना, मदालसेचा पुत्र अलर्क हा अनेक संसारिक सुखांमध्ये तल्लीन झाला होता.

त्याचा मोठा भाऊ, सुबाहू हा ज्ञानी होता.

आपला भाऊ या वासंनांच्या पाठी आपले जीवन व्यर्थ घालवत आहे असे सुबाहूस वाटले.

त्याला आध्यात्मिक दृष्टीने जागृत करण्याच्या उद्देशाने तो त्याच्या नगरात आला आणि संपत्तीमध्ये त्याने आपल्या वाटा मागितला. अलार्कने जेव्हा ते नाकारले तेव्हा सुबाहूने काशी राजाच्या मदतीने त्याच्या नगरावर हल्ला केला आणि त्याचे राज्य चहू बाजूंनी घेरले.

परिणामी नगरात येणाऱ्या तरतुदी थांबल्या. यामुळे प्रजाजनांना अन्नधान्य मिळू शकले नाही आणि ते उपासमारीने ग्रस्त झाले. ही प्रतिकूल परिस्थिती पाहता अलार्क निराश झाला.

तेव्हा त्याला त्याच्या आईने मदालसेने त्याला लिहिलेल्या पत्राची आठवण झाली जे त्याच्या आईने त्याला आणीबाणीच्या प्रसंगी वाचण्यास सांगितले होते. अलार्कने कसेबसे नगर सोडले, जंगलात प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जवळची पेटी उघडून त्यातील आपल्या प्रिय आईचे पत्र पाहिले. त्यात असे लिहिले होते की,' संकटांच्या काळात इतर विचारांचा त्याग करावा आणि संत शरण जावे आणि आत्मकल्यानाचा विचार करावा. माहूरगडावर पवित्र वास्तव्य करणाऱ्या परमगुरू श्री दत्तात्रेयांना शरण जावे.' आध्यात्मिक मार्गदर्शनापर्यंत त्याला श्री दत्तात्रयांकडे जायला हवे.

आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीदत्तात्रेय हे आदिगुरुच्या रुपाने अवतरले. तो दिवस शनिवारचा होता. त्या दिवशी पहाटे पहिल्याच प्रहरातील दुसऱ्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीदत्तात्रेय आदिगुरुंच्या रुपाने प्रकट झाले.

अलर्कने माहूरला जाऊन श्री दत्तात्रेयांची शरणागती पत्करून आपले दुःख सांगितले. श्री दत्तात्रेयांनी त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि विचारले, "हे दुःख तुझे आहे का? फक्त त्याआधी तु कोण आहेस याचा विचार करावा".

या एका प्रश्नामुळे अलर्कच्या बुद्धीत प्रकाश पडला. त्याने स्वत:च विचार करण्यास सुरवात केली. त्याच्या अज्ञानाचा नाश झाला आणि त्याचा अहंकार आणि लोभ देखील नाहीसा झाला तसेच शत्रुत्वाची भावना देखील विलुप्त झाली.

.

त्यांचा आशीर्वाद घेऊन राजा अलर्क आपल्या राजधानीला परत आला. सर्व राज्य त्याने सुबाहूच्या स्वाधीन केले. साष्टांग नमस्कार करुन तो एकांतामध्ये आनंदाने आत्मस्वरुपाचे चिंतन करण्यासाठी निघाला. अलर्काची ही वैराग्याची व आत्मज्ञानाची परिपक्वावस्था पाहून सुबाहूला अत्यंत संतोष वाटला. त्याने ते सर्व राज्य परत अलर्काच्या स्वाधीन केले. निरपेक्ष बुध्दीने अनासक्त राहून तूच हे सर्व राज्य नीट संभाळ असे सांगून व अलर्काला आशीर्वाद देऊन आपला हेतु सफल झाल्याचे समाधान मानीत काशीराजासह तो आपल्या मार्गाने परत गेला.

मदालसात्मजवरदा || शाश्वतज्ञानप्रदायका ||

आदिश्रेष्ठा अभयहस्ता || दत्तात्रेयाय नमो नम:||

मदालसेच्या आत्मज म्हणजे मुलाला वरदान देणाऱ्या, त्याला शाश्वत ज्ञान देणाऱ्या, सर्वश्रेष्ठ अशा अभय प्रदान करणार्‍या (आदिगुरू अवतार धारण करणाऱ्या) माझ्या दत्तगुरूंना माझा नमस्कार असो.

१३) शिवरुप

एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा 'शिवरुप' नावाचा तेरावा अवतार होता .

भगवान श्रीदत्तात्रेयप्रभु यांचा तेरावा अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या नावाने ओळखला जातो.

हा अवतार सोमवारी, श्रावण शुद्ध अष्टमीला झाला.

पिंगळांग नावाचा एक वेद-शास्त्रांमध्ये पारंगत असलेला ब्राह्मण माहूर येथे राहत होता. एकदा त्याने पाहिले की एक तेजस्वी दिगंबर युवक कृष्णाम्लाच्या वृक्षाखाली पाहिला.

त्याच्यासोबत एक दिगंबर तरूणीदेखील होती आणि तो वेदांचे उच्चारण करत होता.

ते पाहून पिंगळांग अचंबित झाला.

त्याने त्या युवकाला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

"तू कोण आहेस? तू सुसंस्कृत दिसत नाहीस पण तुला वेद येत आहेत. तू ब्रम्हचाऱ्यांसारखा दंडधारी नाहीस किंवा तुझ्याकडे गृहस्थ माणसे ज्याचे आचरण करतात ते अग्निहोत्र देखील नाही. संन्यासधर्म धारण करण्याचे तुझे वयही दिसत नाही. मग नक्की तुझा आश्रम तरी कोणता?"

यावर तो युवक म्हणाला," हे संपूर्ण जगच आत्मरूप आहे. माझा पंचाश्रम आहे, जो सर्वत्र आत्मस्वरूपच पाहतो." त्याचे हे उत्तर ऐकताच पिंगळांगाला कळून चुकले की हे तर साक्षात अनसूया नंदन श्री प्रभू दत्तात्रेय आहेत.

त्याने विनम्रतेने श्रीगुरूंना वंदन केले आणि आत्मकल्याणासाठी उपदेश करण्याची विनंती केली

आत्मरूपनिदर्शकाय || पञ्चाश्रमविधायिने ||

दत्तात्रेय शिवरूपाय || शार्दुलाय नमो नम:||

आपल्या सहज बोधाने आत्मरूपाची अनुभूती घेण्याचा निर्देश करणाऱ्या, सामान्य माणसाच्या चार आश्रमव्यवस्थेंच्या पलिकडे असणाऱ्या (जेथे सामान्य मनुष्याचे नियम लागू पडत नाहीत कारण तेथे केवळ आत्मरूप दृष्टी असते), शिवरूप दत्तात्रेयांना माझ्या शार्दुलांना माझा नमस्कार असो.

क्रमशः