Saubhagyavati - 26 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | सौभाग्य व ती! - 26

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

सौभाग्य व ती! - 26

२६) सौभाग्य व ती !
नयन दारात उभी होती. सकाळीच वेदना सुरू झाल्यानंतर मीराला दवाखान्यात नेले होते. सात महिने पूर्ण होतात न होतात तोच तिला अकाली वेदना सुरू झाल्या होत्या. मीरा दिवसभर दवाखान्यात तळमळत होती. माधव तिच्या सोबत गेला होता. त्याने निरोप देताच आशाही दवाखान्यात पोहोचली होती. दुपारी भाऊही दवाखान्यात जाऊन विचारपूस करून आले होते. आईने मात्र दवाखान्यात जायचे नावही काढले नाही. माधव- मीराला आवडणार नाही म्हणून इच्छा असूनही नयन दवाखान्यात गेली नव्हती. मातृत्वाचा गौरव प्राप्त व्हावा म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या दिव्यातून जावेच लागते. मातृत्व म्हणजे एक शीतल, हवीहवीशी संवेदना, स्त्रीत्वाला पूर्णत्व लाभल्याची ओळख... प्रत्येक स्त्रीला या दिव्यातून, या त्रासातून जावेच लागते.
सायंकाळी माधव घरी परतला. मीराने मुलाला जन्म दिला होता. ते ऐकून सर्वांना खूप आनंद झाला. भाऊंना तर जणू हर्षोन्माद झाला. त्यांच्या घरी 'वतनदाराचे' आगमन झाले होते. भाऊंनी लगोलग नातवाच्या बारशाची तयारी सुरू केली. त्याचा थाट काय वर्णावा, जणू एखाद्या राजेशाही घराण्याच्या वंशजाचे बारसे व्हावे अशी तयारी भाऊंनी सुरू केली.. प्रत्येक पाहुण्यास, परिचितास, मित्र परिवारास पत्रिका गेली होती. शिवाय वर्तमानपत्रामध्ये भली मोठ्ठी जाहिरात झळकली होती. काही वर्षांपूर्वी शहरात आलेले भाऊ सायंकाळच्या जेवणाला महाग होते असं कुणी सांगितलं तर ते खरे वाटणार नव्हते. परंतु ते सत्य होते. सिनेमागृहातील त्यांचे पाऊल लक्ष्मीला घरी आणण्यासाठीच पडले होते. भाऊंनी दोन्ही हातांनी ओढत लक्ष्मीला घरी आणले होते.
नयन शाळेत पोहोचली. नेहमी सर्वांत अगोदर शाळेत पोहोचणारी नयन त्यादिवशी सर्वांपेक्षा उशिरा पोहोचली होती. तिने घड्याळाकडे बघितलं. पंधरा मिनिटे ती उशिरा पाहोचत होती म्हणजे तिला चहा पाजावा लागणार होता. राष्ट्रगीत चुकविणाऱ्या शिक्षकांनी चहा पाजण्याचा दंडक सर्वानुमते सुरू होता. त्यात कुणी कुचराई करीत नसे. नयनला उशीर झाला तरी काहीही थांबले नव्हते. सारी कामे नियमित सुरु होती. शाळा प्रमुखास उशीर झाला म्हणून शालेय कामकाजावर परिणाम झाला नव्हता. सारे शिक्षक आपापल्या वर्गावर होते. गायतोंडे वेळापत्रक पाहात होते. नयनने खुर्चीवर बसून चेहऱ्यावर रूमाल फिरवला. परंतु त्यामुळे सुकलेल्या चेहऱ्यावर प्रसन्नता थोडीच येणार? मनामध्ये जे भाव असतात तेच भाव चेहऱ्यावर उमटतात जणू आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे! नयनच्या स्थितीवरून आणि तिला पहिल्यांदाच झालेल्या उशिरावरून काहीतरी नक्कीच घडल्याचा अंदाज गायतोंडेनी बांधला. गेली अनेक वर्षे ती दोघे सोबत काम करीत होती. नयनच्या जीवनात घडलेल्या साऱ्या घटना त्यांना माहित होत्या. विशेष काही नाही करता आले तरी शाब्दिक आधार देण्याचे काम ते प्रामाणिकपणे पार पाडत, विठाबाईप्रमाणे! नयन सासरी होती तोवर विठाबाई तिला धीर द्यायची, पदोपदी आणि परोपरीने समजवायची. कुठे असेल ती? तिथेच की दुसरीकडे? दुसऱ्या गावी तर गेली नसेल ना? तिच्या वंशाचा दिवा तेवला असेल का? पुन्हा भेटली तर ओळखेल का?...'
"ताई, काही विशेष घडलंय का?"
"विशेष आणि माझ्या जीवनात काय घडणार भाऊ? भाईजी..."
"जी ताईसाब..." आत येत भाईजी म्हणाला.
"जा. चहा सांग..."
"पण ताईसाहेब, आप तो हेडमिस्ट्रेस है। आप को क्या जरुरत है चाय पिलाने की?"
"मग काय झालं? नियम सर्वांना सारखाच. ज्या कुणाला वेळ होईल तो चहा देईल हा आपणच केलेला दंडक मला मोडता येणार नाही." नयन म्हणाली.
"ताईजी, एक किस्सा आठवला..."
"तो नंतर सांग. अगोदर चहा सांग. सारे वाट पाहत असतील मी चहा पाजते का नाही म्हणून..."
"अभी लाया।" असे म्हणत भाईजी बाहेर गेला...
"भाऊ, थोडे माधवीकडे लक्ष द्या...." नयन गायतोंडेकडे बघून अचानक म्हणाली.
"ताई, का काळजी करता? नेहमीप्रमाणे ती यावर्षीही मॅट्रीकलाही शाळेतून नव्हे तर..."
"भाऊ, मी तिच्या लग्नाबाबत बोलतेय."
"काऽय? अहो, असा भयानक विचार..."
"भयानक? भाऊ, अहो, आता ती.....तुम्हाला कसं सांगू... मी हा निर्णय का घेतेय ते?"
"ताई, मी सारे ओळखलंय इतक्या लवकर तिचे लग्न? आता तुम्हाला...ताई, अहो, तिचे वय काय? का तुम्ही तिचा बळी घेताहात?"
"बळी? भाऊ, तुम्ही काय बोलता?"
"दुसरा शब्दच नाही. ताई, ती उमलती कळी आहे. तिला पूर्ण उमलू द्या. हे हेच वय आहे तिचे... हसण्याचे, खेळण्याचे, स्वच्छंदी जीवन जगण्याचे. ताई, फूल जरी फुललेले असले तरी आपण तीन - तीन वेळा पाहिल्याशिवाय तोडत नाही..."
"भाऊ, तुम्हाला काय वाटलं? मी हा निर्णय सुखासुखी घेतलाय? अहो, काळजावर दगड ठेवून, खूप विचार करून..." नयन बोलत असताना भाईजी आत येत म्हणाला,
"ताईजी, चेरमनसाब येत आहेत..." तोवर त्याच्या पाठोपाठ कार्यालयात पोहचलेल्या खांडरेसाहेबांनी भाईला विचारले,
"भाईजी, काही विशेष? चहा आलाय म्हणून विचारले..."
"वो-वो..." भाईजी अडखळत असल्याचे पाहून नयन म्हणाली,
"साहेब, आज मला पंधरा मिनिटे उशीर झाला त्यामुळे मी चहा सांगितलाय? तशी प्रथाच आहे आपली..."
"व्वा! चांगली प्रथा आहे. उशीर झाला म्हणून रजा नको आणि तुटपुंज्या पगारामध्ये चहा पाजावा लागण्याची आर्थिक शिक्षा नको म्हणून शिक्षक पळत येत असतील..."
"हां साब. सबसे अच्छी बात ये है, की ताईजी को आज पहली बार देरी हुई और उन्होने अपने आप चाय मंगवायी. मै तो कह रहा था की, आप स्कुल की हेड है .."
"भाई, अरे, ताईनी स्वतःवर अशी बंधने घातली आहेत म्हणूनच शाळा चालतेय. तुला काय वाटते, चहा पाजावा लागतो म्हणून सारे वेळेवर येतात का? तसे नव्हे तर ताई, स्वत: दररोज प्रार्थनेला उपस्थित असतात म्हणून इतरांना यावे लागते. शाळाप्रमुख जेव्हा सर्वांच्या आधी शाळेत येतात तेव्हा इतरांनाही यावेच लागते. काय गायतोंडेसर बरोबर ना?"
"होय साहेब. अधूनमधून शिक्षकांसोबत माझी चर्चा होते त्यामध्येही बाब नेहमीच समोर येते. सारेच म्हणतात की, ताई दररोज आमच्या सर्वांच्या अगोदर हजर असतात त्यामुळे आपल्यालाही वेळेवर यावेच लागते. एकप्रकारचे नैतिक बंधन सर्वांवर आहे. साहेब, खरे सांगू का, ताईंनी अगदी मनापासून वाहून घेतलय या शाळेसाठी. आम्हा सर्वांच्या त्या आदर्श आहेत...?"
"गायतोंडे, त्या तुमच्याच नव्हे तर आमच्यासाठीही आदर्श आहेत. त्या आहेत म्हणून ही शाळा आहे आणि त्यांच्यामुळेच आम्हालाही या क्षेत्रात काम करायला प्रेरणा मिळते. ताई नसत्या तर कदाचित आम्हीही एवढ्या चिकाटीने काम केले नसते."
"साहेब, आता पुरे हं. काही विशेष काम होते का?"
"विशेष काही नाही. मुंबईच्या वारीला जातोय. निवडणुकांचा हंगाम सुरू होतोय म्हटलं तिकीट मिळते का बघू. मुंबईला जातोच आहे तर आपल्या शाळेचा प्रस्ताव सोबत असावा."
"साहेब, तिकीटासाठी आम्हा सर्वांच्या शुभेच्छा! खरेच आपल्यासारख्या प्रामाणिक, निस्वार्थी वागणारी माणसे सत्तेत यायला हवी."
"धन्यवाद! खरे सांगू का, तुम्ही आत्ता ही जी विशेषणं दिली आहेत ना, कदाचित तीच आमच्या मार्गावर आडवे येत असावीत. ताई, तिकीट मिळाले तर या तुमच्या शुभेच्छेनेच मिळेल! नाही तर कोटी कोटी रूपये देऊनही तिकीट मिळण्याची शाश्वती नाही. दुपारपर्यंत भाईसोबत प्रस्ताव पाठवा. बरे, येतो मी..." चहाचा कप ठेवत खांडरे निघून गेले.
"किती प्रयत्नवादी माणूस. ग्रँट नसताना शाळा मॅट्रिकपर्यंत आणली. वीस कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक लोकांचा पगार करतात. सारी परिस्थिती सत्य असूनही, माणूस प्रामाणिक असूनही शाळेला ग्रँट मिळत नाही आणि दुसरीकडे खोटेनाटे कागद, खोटी संख्या दाखवून, कागदोपत्री शाळा चालवून ग्रँट मिळाल्यानंतर शाळा अस्तित्वात आणणारे महाभाग आहेत. स्वत:ला शिक्षणमहर्षी समजून डी. एड्., बी एड्. महविद्यालये उघडण्याची जणू स्पर्धाच लागलेय. ताई, काय ही स्थिती?"
"खरे आहे. या लोकशाहीत जिथं भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालाय तिथे साहेबांसारखी माणसं सापडणं म्हणजे कपिलाषष्ठीचा योग!" नयन बोलत असताना तास संपला. गायतोंडे वर्गावर गेले. नयनने शाळेच्या ग्रँटचा प्रस्ताव काढून कागदापत्रं चाळायला सुरूवात केली. कागदपत्रांची पाहणी आणि व्यवस्थित जुळणी करून ती पंजिका तिने भाईजीच्या बरोबर खांडरेसाहेबांकडे पाठवून दिली...
००००