श्री दत्त अवतार भाग १२
“बाळ तु कोण आहेस”?
त्यांचा हा प्रश्न ऐकून दत्तात्रेय म्हणाले, “ माझे स्वरुप कोणाच्याही प्रतीतीला येणारे नसल्यामूळे मला अप्रतितस्वरुप म्हणतात, मला बाह्यरूपाने किंवा उपाधीने जाणता येत नाही".
“तुझा आश्रयदाता कोण आहे ते सांग”?
दत्तात्रेय म्हणाले, “ मला कोणी आश्रयदाता नाही व माझा कोणी आश्रय अथवा संरक्षकही नाही.”
"तुझे निवासस्थान कोणते आहे?"
. "माझ्याकडे निवास नाही व माझे आश्रयदाते गुरुही नाहीत
“तुझा योग कोणता व त्याच्या अभ्यासाची रीत कोणती”?
दत्तात्रेय म्हणाले “ माझ्या योगाला मी चित्रयोग हे नाव दिलेले असून त्याच्या अभ्यासाची काही प्रक्रिया नाही.”
यावर सिध्दांनी विचारले, “तुझा गुरु तरी कोण आहे”?
त्यावर दत्तात्रेयांनी उत्तर दिले की, " मला कोणी गुरु नाही."
पुन्हा सिध्द म्हणाले, “तुझी मुद्रा कोणती, वैष्णवी की शांभवी”?
दत्तात्रेय म्हणाले " माझी ही करुणात्मक मायेच्या पलीकडची निरंजनी मुद्रा आहे, जी अत्यंत दयाळू अशी निरंजनी आहे."
“अरे ती कशी असते”?
“जसा मी आहे तशीच ती असते”
“तुझ्या या मुद्रेत तुला काय दिसत आहे”?
दत्तात्रेय म्हणाले, “ ध्यानातील अवस्थेत जे प्रचीतीला येते अर्थात ध्याता, ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीच्या पलीकडचे जे काही तत्व आहे तेच माझे ध्येय होय”
सिद्ध म्हणाले “तुझा मार्ग कोणता आहे?"
दत्तात्रय म्हणाले "माझे मार्ग म्हणजे शिवत्त्व (शाश्वत तत्त्व) ची पूर्तता आहे."
श्रीगुरूंचा त्या सिद्धांशी हा संवाद चालू असताना ११ रुद्र, १२ आदित्य, ४९ रुद्रगण, ऋषी, मुनीस, देवगण, गंधर्व, यक्ष, किन्नर इत्यादी आकाशमार्गे जात होते.
अचानक त्यांच्या हालचालीत अडथळा निर्माण झाला, ते सर्व बदरिकावनात उतरले.
तेव्हा प्रत्येक सिद्धपुरूष आपले महत्त्व सिद्ध करण्यासाठी बोलू लागला की त्यांच्या तपश्चर्येचे बलाने या सर्व देवगणांच्या हालचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे ते पृथ्वीवर खाली उतरले.
एवढ्यात अवतार धारण केलेले श्रीदत्तराज, म्हणाले, "तुम्ही सगळे व्यर्थ संघर्ष का करता? जो त्यांच्या हालचालीतील अडथळा दूर करून, त्यांना आकाशातून जाण्यास परवानगी देऊ शकेल तोच सर्वोत्तम सिध्द असेल असे आपण मानूया.''
दत्त गुरूंचा हा युक्तिवाद सर्वांनी मान्य केला आणि प्रत्येकजण पुढे येऊन आपापल्या परीने प्रयत्न करू लागला. परंतु कोणीही त्या देवगणांना पुन्हा आकाशमार्गाने पाठविण्यात यशस्वी झाले नाही.
शेवटी श्री दत्तात्रेय म्हणाले, "हे सुरगणांनो आपण आपल्या ईच्छित स्थळी प्रस्थान करू शकता, तुमच्या हालचालीतील अडथळा काढून टाकण्यात आला आहे."
दत्तांच्या मुखातील हे उद्गार ऐकून, सर्व गण श्री दत्तप्रभूंना अभिवादन करून तेथून आकाशमार्गे निघुन गेले . झाला प्रकार पाहताच सर्व सिद्ध पुरूषांना कळून चुकले की मुलगा सामान्य नसून परमात्मयोगी आहे.
म्हणून अहंकार त्यागून ते त्यांना शरण गेले.
कुमारयोगी श्री दत्तप्रभू म्हणाले, "मी सिद्धराज, योगीराज आहे. कालाग्निशमन करणाऱ्या आणि दुःखाचे निर्मूलन किंवा हरण करणारा असल्यामुळे मला 'हरी' असेही संबोधले जाते.
आत्मज्ञानाचा विचार करताना आणि त्यायोगे मला प्राप्त करण्यासाठी, मंत्रांचा अभ्यास करावा. मीच मंत्रराज, अमर आणि परब्रह्मरूप आहे. सर्व विश्वाचा मी नियंता आहे, पण मी स्वतः मात्र मंत्रांच्या आधीन आहे.
योग्य प्रक्रियेनुसार साधना केल्यास मंत्रांद्वारे तुम्हाला त्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात ज्या मिळविण्याचा तुम्ही प्रयास करत आहात."
हे सांगून त्यांनी त्यांना काही मंत्र आणि त्यांची कार्यपद्धती सांगितली.
त्या सर्व मंत्रउपदेशांना एकत्रितपणे 'सिद्ध राजआगम' असे म्हटले जाते.
सुमारे ५०० वर्षांपूर्वी, श्री दत्तात्रेय यांनी हे अंबेजोगाई (महाराष्ट्र) च्या आपल्या महान आवडत्या भक्त दासोपंत यांना पुन्हा एकदा हे रहस्य कथन केले. त्यांनी लिखित स्वरूपात ते जतन केले आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला, मघा नक्षत्रावर हा अवतार झाला.
ध्यान-ध्यातृ-ध्येयरूपा | चित्रयोगादीसंस्थितः ||
सिद्धराजावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ||
ध्यान-ध्याता-ध्येय या तीनही अवस्थारूप (आणि तरीही त्याच्याही पलिकडे) असणाऱ्या, चित्रयोगावस्थेत राहणाऱ्या, सिद्धराज अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
८) ज्ञानसागर
श्रीदत्तात्रेय यांचा आठवा अवतार ज्ञानराज हा होय. हा अवतार फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी झाला.
त्यावेळी पुनर्वसू नक्षत्र होते
एकदा बदरिकावनात श्रीगुरूंचे भ्रमण चालू असताना काही विचार त्यांच्या मनात होते.
भगवान दत्तात्रेयांनी विचार केला की, "या लोकांनी योग सिद्धी प्राप्त केली, परंतु काम, क्रोध, लोभ इत्यादी षड्रिपूंवर त्यांनी विजय मिळवले नाहीत.
असे होत नाही तोपर्यंत त्यांना मनाची खरी शांती मिळणार नाही आणि त्यांना कधीच शाश्वत आनंद मिळणार नाही.
काम म्हणजे इच्छा, वासना ह्याच सर्व दुःखांच्या मुळाशी आहेत आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवनात लढत आहे.
क्रोध सुद्धा या ईच्छांच्या अपूर्णतेतूनच जन्म घेतो.
संपूर्ण जग या संघर्षात ओढले आणि व्यापले गेले आहे आणि त्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि अध्यात्मिक अशा तिन्ही प्रकारचे भोग त्यांना भोगावे लागत आहेत.
म्हणून सर्व लोकांनी काम, क्रोध, लोभ इत्यादिंच्या बंधनांच्या पलिकडे जायला हवे म्हणजे मग ते ज्ञान प्राप्त करतील आणि माझ्याशी एकरूप होतील."
म्हणून श्री दत्तात्रेय 'ज्ञानसागर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुमार स्वरूपात अवतरीत झाले.
ह्या अवतारात प्रभू अवकाशात साधारण एक मनुष्य उंचीवर हवेत अधांतरी दिसू लागले.
सहाजिकच त्या सिद्धांचे लक्ष वेधले गेले आणि ते ह्या कुमाराला जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी अथक प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले.
त्यांना कळून चुकले की हे तेच परमात्मा आहेत आणि ते त्या कुमाररूप श्रीगुरूंना शरण गेले आणि त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली.
त्यावर प्रसन्न होऊन श्री दत्तात्रेय म्हणाले, "कामामुळे क्रोध वाढीस लागतो, क्रोधामुळे सद्सद्विवेकबुद्धीचा लय होतो आणि अयोग्य कृती होत राहतात .
षड्रिपूंवर विजय मिळवण्याऐवजी जे केवळ सिद्धींच्या पाठी लागतात त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच होते.
जे सिद्धींच्या पाठी जातात, ते माझ्याशी एकरूप न पावता शाश्वत आनंदाला मुकतात."
"म्हणूनच तुम्ही मला अनन्यभावाने शरण जा, मंत्रांचे पुरश्चरण करा (नाम घ्या) आणि शाश्वत तत्त्व जाणून घ्या आणि नैतिक जीवन जगा.
फक्त बुद्धी किंवा तर्काने मला जाणता येत नाही.
त्यामुळे आपण काम-क्रोधादींवर विजय मिळवावा व माझी भक्ती चालू ठेवावी." हा उपदेश ग्रहण करून नंतर सिद्धांनी श्री दत्तप्रभूंनी दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण केले आणि शाश्वत आनंद मिळविला. सिद्धांच्या कल्याणाकरिता बद्रीवनात हा अवतार फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी झाला.
सिध्दीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रुपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील 'ज्ञानसागर' नावाचे रुप धारण केले होते .
कुमारप्रभवे तुभ्यं || सिद्धजनप्रबोधका ||
ज्ञानसागरावताराय || दत्तात्रेयाय नमो नम: ||
कुमाररूपात आपली प्रभा प्रकट करणाऱ्या, सिद्धजनांना ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या, ज्ञानसागरावतार धारण केलेल्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
क्रमशः