Ladies Only - 12 in Marathi Fiction Stories by Shirish books and stories PDF | लेडीज ओन्ली - 12

The Author
Featured Books
Categories
Share

लेडीज ओन्ली - 12

लेडीज ओन्ली - १२

( वाचकांच्या माहितीसाठी नम्र आवाहन -
आपल्या मुलांमध्ये वाचनसंस्कार रुजविण्यासाठी अवश्य मागवा शिरीष पद्माकर देशमुख लिखित बालकुमारांसाठीचा दर्जेदार आणि मनोरंजक कथासंग्रह- 'बारीक सारीक गोष्टी'. आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)


" लेडीज ओन्ली "


(भाग- १२)



" वाह... खूप छान झालाय चहा " तोंडाला लावलेल्या कपातला चहा भुर्रकन ओढत शारदाबाई कौतुक करू लागल्या," तुमच्या हाताला चव आहे हो राधाबाई..! "
" ठांकू ठांकू... " कौतुकाचे शब्द कुणालाही खुलवतातच.
"कधीपासून काम करताय इथं?" शारदाबाई आस्थेवाईकपणे चौकशी करू लागल्या.
" नेमकं ध्यानात न्हाई... बट फाईव्ह सेवन इयरं झाले असत्याल... "
" खूप छान काम करता बरं तुम्ही.. अन् इंग्रजीही खूपच चांगली बोलता.. किती शिकलेल्या आहात तुम्ही.. " चहाचा एक एक घोट घेत शारदाबाई संवाद साधत होत्या.
" आवो कसलं शिकशान अन् कशाचं काय.. आमी मंजी थमसप पार्टीचे मेंबर.. दोन येळची भाकर सर्च करण्यात यीळ घालनाऱ्याच्या नशीबात कुठं साळा न् शिकषान असतंय व्हय.. धर अंगठा न् लाव भिताडाला असा कारभार समदा... " राधाबाईंनी सांगितलं.
" तरीही मग बोलण्यात येणारी ही इंग्रजी कशी काय येते तुम्हाला... " या प्रश्नावर राधाबाई खळखळून हसल्या.
" आवो म्याडमसायब आमच्या सारख्या गरीबायचं कसं असतंय.. की जे जगण्यात येतं ते वागण्यात येतं, जे कमविण्यात येतं तेच खाण्यात येतं, अन् जे आयकीन्यात येतं तेच बोलण्यात येतं... " राधाबाई समजावू लागल्या," आता म्या काय करते.. तुमच्यासारख्या धा बारा थोरामोठ्यायच्या घरी धुणे भांडे करते... तेवढ्या येळात घरातली शिकली सवरलेल्याली येजुक्याटेड मान्स जी टाकींग वाकींग करत्यात.. ती कान देऊन लिसनीते.. मंग त्येंनी वापरल्याले विंग्रजी वरडं म्या बी इवज करते... लोकं हासत्यात आपली विंग्रजी आयकून.. बट आय डोंट केयर... आपल्याला हाय ना नाद.. मंग लाज धरणं सोडून द्याचं अन् नाद करायचा.. करायचा मंजी करायचाच... "
" वा वा वा... भारीच आहात बरं तुम्ही.. मला आवडला तुमचा स्वभाव.. आणि इंग्रजीही... " शारदाबाईंनी चहा संपवला होता.
" ठांकु आगेन... "
" किती पैसे मिळतात बरं... ही धुणी भांडी करून? " शारदाबाईंच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं.
" मिळत्यात की... पोट जगविता येईल इतके मिळत्यात... " राधबाईंचा आवाज बदलला होता.
" हं... किती जणांची पोटं जगवता तुम्ही..? "
" हायेत.. सहा सात जण.. " राधाबाईंनी रिकामा झालेला कप उचलला. या विषयावर बोलणं त्या टाळत होत्या. कप ठेवायच्या निमित्ताने आतल्या घरात जाऊ लागल्या.
" पोटं भरतात सगळ्यांची.. की चिमटा द्यावा लागतो पोटाला? " शारदाबाईंचे प्रश्न संपले नव्हते.
" जाऊ द्या ना म्याडमसायब... गरीब माणूस जल्माला आला की सटवी पाचव्या दिशी त्याच्या कपाळावर उपासमार लेहून ठिवती... नशीबात लिवल्यालं भोगावाच लागत आसतंय.. " राधाबाईंच्या मनात अभावाच्या जिण्याची वेदना साचलेली होतीच. पण त्यांनी ती स्विकारली होती. म्हणूनच तर त्या कधीच ती चेहऱ्यावरही दिसू देत नव्हत्या.
" सटवीनं कपाळावर लिहिलेले कमनशीबाचे लेख कर्तृत्वाच्या डस्टरने पुसताही येतात राधाबाई. माणसाच्या मनात इच्छा अन् मनगटात बळ असेल तर तो स्वतःचं नशीब स्वतःच लिहू शकतो... " शारदाबाई प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत होत्या.
" शिकल्या सवरल्याल्या मानसायच्या बाबतीत तुमी मनता ते खरंबी आसंल.. पर आमच्यासारख्या पालापाचोळ्यायचं नशीब बदलत नसतंय.. " राधाबाईंना वास्तवाची प्रखर जाणीव होती.
" अन्.. जर आम्ही तुमचं नशीब बदलून देणार असू.. तर? " शारदाबाई नवा डाव टाकत होत्या.
" मंजे? आय डोन्ट अंडरष्ट्यांड... " राधाबाई थबकल्या.
" तुम्ही जे काम दहा बारा घरी जाऊन करता तेच आमच्यासाठी करायचं.. "
" मंजे... तुमच्या घरी धुण्या भांड्याला याचं का? "
" नाही... मी तुमच्या इंग्रजी शिकण्याच्या कलेबद्दल बोलतेय.. "
" म्याडमसायब... तुमी काय बोलताव मला कायबी कळना झालंया... "
" लोक जे बोलतात ते लक्ष देऊन ऐकण्याची कला आहे तुमच्याकडे... लोकांचं बोलणं लक्षात ठेवूनच तुम्ही इंग्रजी बोलायला शिकलात ना... मग आता लोकांचं बोलणं ऐकून पैसे कमवायलाही शिका... "
" अन् ते कसं? "
" लोक जे बोलतील ते तुम्ही ऐकायचं आणि सगळं नीट लक्षात ठेवून आम्हाला सांगायचं.. " शारदाबाईंच्या राजकारणातला हा नवा डाव होता," त्या बदल्यात तुम्हाला.. तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी मिळेलच.. आणि आमच्याकडच्या पाकळ्या मोगरा - प्राजक्ताच्या नसतात ..तर त्या कर्दळी कमळाच्या फुलाच्या असतात... मोठमोठ्या.. "
" हां... मंजी यू मीन, तुमच्या पाकळ्या मिळविण्यासाठी म्या उखाळ्यापाखाळ्या करायच्या तर . इकडच्या तिकडं. अन् तिकडच्या इकडं.. "
" इतक्या जास्त नाही... फक्त या घरात जे काही चाललंय.. म्हणजे कोण येतंय, काय बोलतंय, प्रचाराचं काय नियोजन ठरतंय अशा सगळ्या गोष्टी मला कळवायच्या... त्याही मला न भेटता.. तुम्हाला एक भारीचा मोबाईल घेऊन दिला जाईल... त्यावरून बातम्या कळवत राहायच्या... " शारदाबाईंनी त्यांचा सगळा प्लॅन सांगितला. राधाबाईंनी काहीही प्रतिक्रिया न देता शांतपणे ऐकून घेतलं. त्या यावर काही बोलतील अशी शारदाबाईंना अपेक्षा होती. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. कोपऱ्यातला झाडू घेतला. सगळं घर झाडून घेतलं. तोपर्यंत शारदाबाई नुसत्या बसून राहिल्या.
" जेवून जाणारेत का आता? " त्या उठत नव्हत्या हे बघून राधाबाई बोलल्या," माझं काम आवरलंय. मला म्होरल्या घरी जायाचंय.. तुमी बी निघा.. "
" हो निघतेच आहे पण.. मला वाटलं तुम्ही काही... "
" म्याडमबाई, उगंच मला बोलाया लावू नगा... जीभीवर दगड ठिवून गप बसल्याली हाय मी.. उगंच त्यो दगड तुम्ही तुमच्या पायावर पाडून घेऊ नगा.. "
" म्हणजे? मला कळलं नाही... मी काय समजावं ते जरा स्पष्ट सांगा... "
" हं... मंजे तुम्हाला तुमचा कचरा करून घ्याचाच हाय तर... " राधाबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला. पाठीवर लोंबलेला पदर कमरेला खोचला. बांगड्या मागे सारल्या अन् म्हणाल्या," उठ... चल उठ... निघ इथून... "
" अहो.. हे असं काय बोलताय.? " शारदाताई गोंधळून गेल्या. अन् राधाबाईंनी तर रायफलीतून बंदुकीच्या गोळ्या झाडाव्यात तशी फायरिंग सुरू केली.." आगं ये सटवे... ज्या ताटात म्या भाकर खाते तेच्यातच मला माती मिसळायला शिकवायलीस व्हय गं छिन्नाले..? जिथं खाल्लं तिथंच हागायची सवय तुला आसंल. आमाला न्हाई. म्या हाय गरीब. हायेत आमचे येका टायमाच्या भाकरीचे वांधे.. पर पोटासाठी धंद्यावर बसणारी बाजारबसवी आवलाद न्हाई आमची.. "
" राधाबाई.. काय बोलताय तुम्ही हे... "
" धा घरचे उष्टे भांडे घासून चार लेकरं, नवरा अन् सासू सासऱ्याला पोसते म्या.. पर कोणाच्या उष्ट्या पत्तरवाळीवर न्हाई जगत. ज्यो भी शिळापाता भाकर कुटका मिळंल त्यो खाऊन पाणी पेऊन इमानेइतबारे अभिमानानं जीव जगविणाऱ्यातली जहांमरद बाई हाय मी.. अन् तू मव्हं इमान इकत घ्याला निघालीस व्हय बटकूरे... "
" राधाबाई तोंड सांभाळून बोला... "
" न्हायतर काय करशील गं तू? तुव्हं नशीब चांगलं या देवबाईच्या देवळासारख्या घरात मह्यापुडं उभी हायेस तू... भाईर भेटून असं बोलली आसतीस तर आतालोक झिंज्या उपटून हातात देल्या आसत्या तुह्या... त्या इजयाताईसारखी निर्मळ मनाची बाई तुह्या बाजारबसव्या राजकारणाला चायलेंज करायला उभी ऱ्हायली तर आग लागली व्हय तुह्या बुडाला? याद राख... पुन्हा मह्या बाईसायबाच्या वाटंला आडवी आलीस तर भर चौकात थुत्तर फोडीन म्या तुव्हं... " राधाबाई फणफणत बरसत होत्या.
" हे महाग पडेल राधाबाई... "
" आगं हाट... ज्याह्यची जिंदगी फुकट भाव चालली त्येह्यला काय सस्त महागाचं भेव दाखवायलीस... तू तेरा देख... "
" येते मी... "
" कशाला येतीस... थोबाड दाखवू नगंस पुन्हा तुव्हं... चल निघ.. " शारदाबाई सगळा अपमान गिळत, पाय आपटीत घराबाहेर पडल्या.
" केरसुणी मेली... " राधाबाईंची तणफण अजूनही संपली नव्हती," मला इकत घ्यायाला निघाली... ही रांड बइमान हे मनून का समद्या जमान्याला बइमान समजीती का काय..
बाईसायबांच्या मिठाला बइमान व्हण्यापरीस सवताला रेल्वे पटरीवर निजवून देईन म्या... अन् ही चालली... राधाबाईला इकत घेयाला..."
राधाबाई बराचवेळ स्वतःशीच बडबडत राहिल्या. त्या प्रचंड चिडल्या होत्या. एकतर त्या कधी कुणाशी भांडत नसत पण एकदा का त्यांचा जीव चेतला की मग समोरच्याची पार चिरफाडच..! प्रामाणिक माणसाचा रागही प्रामाणिकच असतो. तो आला की व्यक्तच करावा लागतो. त्याला दाबून दडपून नाही ठेवता येत. मनात राग ठेवून चेहर्‍यावर हसू आणणं हे खोट्या माणसाचं कौशल्य असतं.
राधाबाईंचं काम आवरून बराचवेळ झाला होता. शारदाबाईंमुळे त्यांना आज पुढच्या घरी जायला उशीर होणार होता. त्या 'लेडीज ओन्ली' चं दार ओढून घेऊ लागल्या. इतक्यात मघाशी अपमानित करून राधाबाईंनी हाकलून दिलेल्या शारदाबाई परत एकदा त्यांच्यासमोर येऊन उभ्या ठाकल्या.
" पुन्हा कशाला आलीस हितं थोबाड घेऊन " राधाबाईंचा आवाज आणि पारा चढलेलाच होता.
" मी तुमची माफी मागायला आलेय... " शारदाबाई दोन्ही हात जोडून बोलल्या," मी तुमच्या प्रामाणिकपणाला मलीन करण्याचा प्रयत्न करायला नको होता. इमानाची भाकर खाणाऱ्या माणसासाठी त्याची इमानदारी हाच सर्वात मोठा दागिना असतो. मी त्याला पैशात विकत घेण्याची भाषा बोलून तुमच्या प्रामाणिकपणाचा अपमान करायला नको होता.. माझं चुकलंच. मला माफ करा राधाबाई. "
" इटीज वक्के. " राधाबाईंनीही आवाज उतरवला.
" पण खरं सांगू का राधाबाई, मी इतकी वाईट बाई नाहीये हो. शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या दरिद्री मायबापाची एकुलती एक लाडकी लेक होते मी. कष्टाची भाजीभाकरी इमानदारीनं मिळवून खाण्याचे संस्कार माझ्यावरही झालेत. माझं लग्न होण्याच्या आधल्या दिवसापर्यंत मी आईच्या बरोबरीनं शेतात खुरपणी निंदणीची कामं केलीत. मायबापानं मोठ्या आशेनं शहरातला, लीडरकी करणारा नवरा पाहून दिला. पण ज्याला सोनं समजलं ते पितळ निघालं. तरीही पती हाच आपला परमेश्वर असं म्हणत पत्नीधर्माचं पालन करत राहिले मी... पण त्यानं त्याच्या महत्वाकांक्षेसाठी माझा बळी देण्याचा डाव मांडला अन् मी आतून पार उद्ध्वस्त झाले. विश्वासाने ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं त्यानंच गळा कापला होता. काय करायला हवं होतं मी त्यानंतर? दोन मार्ग होते तेव्हा माझ्यापुढे. फुटलेलं नशीब घेऊन दरिद्री मायबापासाठी आयुष्यभराचं ओझं होऊन त्यांच्याजवळ राहायचं. किंवा समाजाच्या सगळ्या भंपक नीतीनियमांना लाथ मारून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. मी दुसरा मार्ग निवडला. मला माहीत होतं लोक आपल्यावर थुंकतील शिव्या घालतील. रांड रखेल म्हणतील. पण सगळं सहन करायचं. अगदी सगळं सगळं विष पिऊन पचवायचं कारण उद्या जेव्हा माझ्याकडे पैसा आणि पद येईल तेव्हा हीच लोक मला डोक्यावर घेऊन नाचतील, माझ्या पायाशी लोळण घेतील याची मला खात्री होती. अन् झालंही तसंच.. आज मला समाजात मान आहे. सन्मान आहे. लोक माझा इतिहास विचारत नाहीत आणि विचारातही घेत नाहीत. पण आज तुमच्या बोलण्यामुळे मला पुन्हा एकदा मी किती नीच हलकट बाई आहे याची जाणीव झाली.. " शारदाबाईंच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं," पण मी तुम्हाला काही प्रश्न विचारते राधाबाई... तुम्ही मला उत्तरं द्या... माझं उद्ध्वस्त होणारं जीवन सावरण्यासाठी जर मी समाजाला मान्य नसणाऱ्या वाटेवरून पुढे गेले तर त्यात माझं काय चुकलं? बायकांनी नवऱ्याचे सगळे अत्याचार सहन करीतच जगायचं का आयुष्यभर? कुठपर्यंत ते गुदमरणं ती घुसमट सहन करीत राहायची. वेगळी वाट कधी शोधायचीच नाही का? स्वप्नं कधी बघायचेच नाहीत का... महत्वाकांक्षा कधी बाळगायच्याच नाहीत का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.. ज्यांची उत्तरं कुणीच देत नाही.. पण मी माझ्यापुरत्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधलंय. माझ्या वाटा मी तयार केल्यात अन् त्यावरून वाटचालही करत आहे. आता हे जग मला काय म्हणतंय त्याने मला काहीही फरक पडत नाही. मी माझ्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला जे जे करता येईल ते करणार... चांगलं की वाईट याचा विचारही न करता... " शारदाबाईंनी डोळे पुसले. राधाबाईंचा हात हातात घेतला," तुम्ही मला खूप वाईट साईट बोललात. पण मला त्याचं आजिबात वाईट वाटलेलं नाही. नव्वद टक्के लोक माझ्याबद्दल असाच विचार करतात पण तो बोलून दाखवण्याची हिंमत नाही कोणातच... तुम्ही ती हिंमत दाखवलीत... त्यासाठी मी तुमचं मनापासून कौतुक करते... हा निर्भिडपणा कायम जपा तुम्ही.. तुमच्या शिव्यांनी माझ्या मनाला अभ्यंगस्नान घडवलं... बरं वाटलं... धन्यवाद... येते मी... " अन् राधाबाई डोळे विस्फारून शारदाबाईंच्या पाठमोर्‍या आकृतीला बघतच राहिल्या. काय बाई आहे ही... इतक्या शिव्या दिल्या तरी आभार काय मानायली... गोड काय बोलायली.. एखादं दुसरं कोणी असतं तर दहापाच माणसं संगं आणून हाणमार केली आसती मला.. पण ही बाई.. म्या शिव्या देऊन वरून महीच माफी मागायली... विलेकशेन चांगल्या चांगल्या तिखट माणसायला आळणी - पांचट बनवितंय हेच खरं..!
राधाबाई दाराला कडी लावू लागल्या इतक्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या अश्रवी आणि जेनी परत आल्या.
"मावशी आवरलं का तुमचं काम? " अश्रवीनं विचारलं.
" येस आयाम गोईंग.. बिकाज टुडे आयाम लेट.. " मघाशीचा सगळा विषय डोक्यातून झटकून टाकीत राधाबाईं फक्कड इंग्रजीत बोलल्या.
" वक्के वक्के.. " अश्रवीने त्यांच्या स्टाईलची कॉपी केली. त्यावर राधाबाई जोरदार हसल्या.
" दार लावायचं राहू द्या.. आम्ही आहोत आता.. "
" ओके बाय.. शीयू सून.. " असं म्हणत त्या निघून गेल्या. वॉकमुळे घामाघूम झालेल्या अश्रवी अन् जेनी हसत हसत घरात येऊन बसल्या..!!


© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®


{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®