श्री दत्त अवतार भाग ११
अनसूया मातेच्या आश्रमात जेव्हा श्री दत्तात्रेय अवतरित झाले, तेव्हा प्रभूंचे रूप पाहण्यासाठी जे इंद्रादी देव, ऋषी-मुनी, गंधर्व, चरण, योगी आणि संत त्यांना भेटायला आले होते ,त्या सर्वांची ती उत्सुकता पाहुन श्री दत्तात्रेय यांनी एका कुमाराचे रूप धारण केले आणि त्यांना योगाचे मार्गदर्शन केले.
"मी शरीररूप (स्थूल) नाही, मी समयघटिका ही नाही.
मी जन्म आणि मृत्यू रहित आहे. (मी या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक परीमाणीत गोष्टींच्या च्या अंतर्भूत असलो तरी या सर्वांच्या पलिकडील आहे.) भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मी विविध स्वरूपात अवतरतो आणि माझी ही स्वरूपे तात्कालिक किंवा समयोचित असली तरीही यामुळे माझ्या तात्विक अवस्थेवर काही प्रभाव पडत नाही.”
हा अवतार योगाच्या प्रचारासाठी तसेच योगाभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी आणि योगाच्या अनुयायांना आशीर्वाद देण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच या अवताराला 'योगिजन वल्लभ' म्हणून ओळखले जाते.
(योग म्हणजे केवळ योगासने नव्हेत.)
६) लिलाविश्वंभर
दत्तात्रेयांचा सहावा अवतार 'लिलाविश्वंभर' या अवतारात श्रीदत्तात्रेयांचे मुलांसाठीचे प्रेम आणि प्रखर दयाळूपणा पाहण्यासारखा आहे.
एकदा देशात दुदैवाने सर्वत्र मोठा दुष्काळ पडला.
नैसर्गिक आपत्तींनी देश ग्रासला गेला.
कधी खूप पाऊस पडून धान्याचा नाश व्हायचा तर कधी मुळीच पाऊस न पडल्यामुळे पिके सुकून जायची.
कधी जलप्रलयाचे प्रसंग ओढावले जात तर कधी प्यायलाही पाणी दूर्मिळ होत असे.
लोक अन्न पाण्याला मोताद होऊन देशोधडीला लागले.
उंदरांचा सुळसुळाट इतका झाला होता की, त्यामुळे रानात गवताची एखादी काडीही दिसेनाशी झाली.
जनावरांना खायला मिळत नसल्यामुळे त्यांची शरीरे केवळ हाडांचे सापळे बनले.
लोकांना खायला काही मिळत नसल्यामुळे उपासमारीने त्यांच्यावर मृत्युमुखी पडण्याचा प्रसंग येऊ लागले . अशी देशाची दुरावस्था झाली असल्यामुळे ऋषिमुनी, सत्शील ब्राम्हण आणि भक्तजन हे सर्व श्री दत्तात्रेयांना शरण गेले. मार्गशीर्ष पौर्णिमेला जन्म घेतलेले श्रीगुरू जेमतेम एक महिन्याचे होते आणि माता अनसूया यांच्या मांडीवर स्तनपान करीत होते.
दीन जनांची ती करुणापूर्ण प्रार्थना ऐकल्याबरोबर भगवान श्री दत्तात्रेय आपले शैशवरुप सोडून लीलाविश्वंभररुपाने प्रकट झाले .
आणि त्यांना वाचवण्याचे अभिवचन दिले.
सर्व लोकांना भरपूर अन्नधान्य आणि वस्त्रे देऊन संतुष्ट केले.
सर्व लोकांकडे कृपापूर्ण दृष्टीने पाहिले.
हे सर्व कार्य त्यांनी सहज लिलेने केले म्हणुन लोक त्यांना लीलाविश्वंभर असे म्हणू लागले.
दत्तप्रभूंनी या सर्व लोकांवर अनुग्रह करुन आपले विश्वरुप त्यांना दाखवले.
परमेश्वराचे विश्वरुप अवलोकन करुन सर्वानी त्या लीलाविश्वंभर दत्तात्रेयाला साष्टांग प्रणिपात केले व हात जोडून नम्र भावाने दत्तात्रेयांची स्तुती करु लागले.
दत्तात्रेयांनी त्या लोकांना आपल्या आश्रमात काही काळ ठेवूनही घेतले. आपल्या अमृततुल्य वाणीने सर्वांना सदुपदेश करुन संतूष्ट केले.
योगिजनवल्लभ हा अवतार सर्व योगिजनांच्या कल्याणासाठी घेतला असल्यामुळे या अवतारात त्यांनी योगिजनांच्या समुदायात वास्तव्य केले.
योगाभ्यासाचा मार्ग दाखवला. त्यांच्या योगाभ्यासातील सर्व विघ्नांचे निराकरण केले. योगिजनांना उत्तम गति दिली. त्यामुळे ते योगिजनवल्लभ झाले.
लीलाविश्वभंर दत्तात्रेय यांचे चरित्रात दत्तात्रेयांची वात्सल्यबुध्दी व त्यांच्या ठिकाणी असलेली निरपेक्ष करुणा यांची आपल्याला प्रचीती येते.
एकदा दत्तात्रेयांचे उपदेशपर भाषण ऐकुनही पुष्कळ लोक पूर्वीच्या सांसारिक प्रबळ दुर्वासनांमूळे व मोहामूळे पुन: संसाररूपी अरण्यातच भटकू लागले.
आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक तापत्रयाच्या वणव्या मध्ये सापडून होरपळू लागले.
पूर्वीप्रमाणेच लीलाविश्वभंर अंतर्धान पावले व पुन्हा प्रकट झाले.
अशा रितीने मलीन वासनांचा व अज्ञानाचा नाश होऊन सर्वाच्या अंत:करणात केलेला बोध ठसेपर्यंत परमेश्वराने ही लीला केली
जणल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला.
हा अवतार पौष शुद्ध १५ मध्ये झालासा मानतात .
श्री दत्तात्रेयांनी भक्तांना नंतर संबोधित केले की, "हे जीवन एका घनदाट जंगलासारखे आहे.
ज्यात अहंकार हा एक मोठे वृक्ष, वेली व वनस्पती यांनी सभोवती वेढलेला एक मोठा पर्वत आहे.
काम म्हणजे भयानक सिंह, क्रोध म्हणजे (क्रोधाचा) एक संतापलेला साप आहे.
वासना (इच्छा) हा एक खोल तलावच आहे.
जे लोक हे पार करू शकत नाहीत, ते खोल गर्तेत बुडतात.”
श्री दत्तात्रेयांनी नंतर हे जंगलाचे दृश्य बोलता बोलता अचानक अदृश्य केले.
मग, भक्तांनी विचारले, "स्वामी, हे भयंकर जंगल कुठे गेले?"
स्मितहास्य करीत श्रीगुरू म्हणाले, "ज्यातून निर्माण झाले आहे, त्यातच विसर्जनही झाले आहे. अज्ञानामुळे हे अस्तित्वात येते आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा ते नष्टही होते.
म्हणूनच जे माझे स्मरण करतील ते संसार कर्दमातून मुक्त होतील.
हे संपूर्ण जग असेच नश्वर आहे आणि केवळ मूळ आत्मतत्त्वच अविनाशी आहे.
जे मुळ आहे, तेच फक्त टिकणारे आहे."
यावर भक्तांनी विचारले, "स्वामी, हे आत्मतत्त्व कसे आहे?"
श्री दत्तात्रेय म्हणाले, "मीच ते आत्मतत्त्व आहे. चांगले कर्म आणि शुद्ध भक्तीच्या द्वारे मला जाणता येते"
सर्वसंकटविमुक्ताय | कामक्रोधादिवर्जितः ||
लीला विश्वंभराय स्वामी | दत्तात्रेयाय नमो नम: ||
सर्व संकटांपासून विमुक्त करणाऱ्या, काम-क्रोधादी षड्रिपूंच्या पलिकडे असणाऱ्या, लीलाविश्वंभररूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
७) सिद्धराजसद्गुरु
भगवान श्री दत्तात्रेय यांचा सातवा अवतार सिध्दराज या नावाने प्रसिध्द आहे.
लीलाविश्वभंर दत्त या नावाने अवतरुन अपेक्षित असलेले सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रेयप्रभूंनी सिध्दराज या नावाचा अवतार घेतला.
सदगुरु श्री लीलाविश्वंभर देव हे एकदा स्वत:चे रुप लोकाच्या लक्षात येऊ न देता बालरुपाने प्रकट झाले व भूतलावर इतस्तत: पर्यटन करीत करीत हिमाचल प्रदेशातील बदरिकावनात एकटेच प्रविष्ट झाले.
तेथे अनेक सिध्द् लोक वास्तव्य करीत होते.
त्यांनी खडतर तपश्चर्या करुन कष्टसाध्य अशा सिध्दि मिळविलेल्या होत्या.
त्या सिध्दिंच्या जिवावर ते अनेक प्रकारचे सुखे भोगीत व चैन करीत काळ कंठीत होते.
त्या अनेक सिध्दिंच्या बळावर ते खूपच कामाक्रोधादि विकारांच्या आहारी गेलेले होते.
कोणी लंगोटी परिधान करुन तर कोणी नग्न अवस्थेतहि रहात होते.
कोणी मौन धारण करुन बसलेले होते, तर कोणी आत्मप्रौढींचे वर्णन करण्यात गर्क झालेले होते.
कोणी आस्तिकांचा पक्ष घेऊन तर कोणी नास्तिकांचा पक्ष घेऊन निरनिराळया विषयांवर वादविवाद करीत बसलेले होते.
असा त्या सर्व सिध्दजनांचा मेळावा एका ठिकाणी जमला होता.
त्या मेळाव्यात लीलाविश्वंभर दत्तात्रेय हे बालरुप धारण करुन सर्वांच्या मागे जाऊन बसले.
सर्व सिध्दांच्या स्वभावाची परीक्षा पाहणे व त्यांच्या गर्वाचा परिहार करणे हा उद्देश्य दत्तात्रेयांनी मनात ठेवलेला होता.
दत्तात्रेयांचे ते अत्यंत तेजस्वी व दिव्य बालरुप पाहून सर्वांची दृष्टी त्यांच्याकडे आकृष्ट झाली.
अत्यंत मनोहर असलेले बालयोगी भगवान दत्तात्रेय योगमुद्रेने बसलेले होते.
दत्तात्रेयांना असे ऐटीत बसलेले पाहून सर्वांनी त्यांना प्रश्न करणे सुरु केले.
क्रमशः