संध्याही सरली परत दिवसा अखेर रात्र झाली
वाट पाहूनी तुझी अजुनीही आस ना मावळली
साथ तुझ्या प्रीतीची जरी मला नाही मिळाली
तुझ्या भासातच तरीही किती क्षण मी जगली
नजरेत तुझ्या आहेत किती गुढ रहस्ये लपलेली
अजूनही त्यांची बंद कोडी मला नाहीत सुटली
कशी सुटावी ती कोडी तर सारी तुझ्यात बुडालेली
ये कधी निदान उलगडण्यासाठी ती उत्तरे लपलेली
हळुवार वाऱ्याची पार वादळे होऊन गेली
दुखवलेली नभं आता साश्रू दाटून आली
तुझी वाट शोधताना मीच रस्ता भरकटली
सरळमार्गी वाटही आता दिशाहीन झाली
तूच मनात माझ्या आपुल्या प्रीतीची कलम रोवली
तुझ्या सोबतीच्या नाजूक क्षणांनी ती ही अंकुरली
असंख्य मधाळ गोड स्वप्नांना मी डोळ्यांत सजविली
निभवावी प्रीत तर समाज भीतीने तू पाठ फिरविली
प्रीतीसाठी तुझ्या मी किती किती झुरली
तरी तूला भेटण्याची वेडी आस ना मावळली।।
----------------------------------------------------
मरणे महाग झाले।।
तुझ्याविना आयुष्य जगता मला न आले,
जीवन संपवावे तर मरणे महाग झाले।।
जगू कसे घेऊन हे काळीज वेदनांनी भरलेले,
मागूनही ना मिळाला मृत्यू जगणेच भाग झाले।।
मिठीत घेऊन मनाला अलगद फुलविले,
भावनांनी हताश मन ते तरी ना बहरले।।
घरात येऊन माझ्या दुःखांनीही घर बनविले
मी न साधू महात्मा तयांना ना ते कळले।।
तुटता कळी मनाची स्वप्नेही बेचिराख झाले,
सोडवू कसे सांगेलं का कुणी हे हृदय गुंतलेले।।
हरवल्यात जीवन वाटा रस्ते विराग झाले,
मागूनही ना मिळाले ते मरणे महाग झाले।।
-----------------------------------------------------
काय चूक सांगावी...
सजविले मी वाळूवर घर मधुर स्वप्नांची
कोलमडून पडलं क्षणात येता सर पावसाची
काय चूक सांगावी त्या बरसणाऱ्या सरींची
वाळूवर घर सजविले ही गोष्टच मुळी चुकीची।।
मधाळ त्या स्मृतींनी बहरली बाग मनाची
तरी ना उमलली एकही कळी माझ्या दारची
काय चूक सांगावी त्या नाजूक कोवळया कळीची
अंकुरली मनात माझ्या हीच चूक त्यांची।।
चकाकणाऱ्या त्या वस्तूला चमक होती सोन्याची
समजले नाही तेव्हा मला धुंद होती नीतिमत्तेची
काय चूक सांगवी त्या चकाकणाऱ्या वस्तूची
लोभ केला मी सोन्याचा ही गोष्टच मुळी चुकीची।।
--------------------------------------------------------------------