श्री दत्त अवतार भाग १०
३) श्री दत्तात्रेय
श्री दत्तात्रयांचा हा अवतार याच नावाने ओळखला जातो.
अत्रिवरद अवतारात श्री दत्तात्रेयप्रभूने अत्रिऋषींना, मी तुम्हाला स्वतःला अर्पण करून घेवून तुमच्या येथे पुत्ररुपाने अवतार घेईन असा वर दिला असल्यामुळे ते अत्रिवरद झाले होते .
अत्रिवरद या अवतारात परमेश्वराने अत्रिमुनींना त्रिमूर्तीच्या रुपाने दर्शन देऊन फक्त वरच दिला. पुत्ररुपाने अवतार घेऊन मी तुमच्या वंशाला भूषविन एवढेच सांगून ते अंतर्धान पावले.
त्यानंतर अत्रिमुनि व सती श्री अनसूया यांनी त्रिमूर्ती या रुपाने परमेश्वराचे सतत चिंतन केले.
काही काळाने परमेश्वराने अत्रिऋषींना व अनसूयेला प्रत्यक्ष दर्शन दिले.
“मी तुम्हा उभयतांच्या तपश्चर्येने व अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन तुम्हांला इष्ट वर दिलेला आहे. त्याप्रमाणे आज मी तुमच्यापुढे स्वत:ला अर्पण करुन दत्तारुपाने तुमच्या सानिध्यात अवतरत आहे”
तोच हा अवतार संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेय नावाने प्रसिध्दीस आला.
दत्तात्रेय यांचा हा अवतार कार्तिक वद्य व्दितीयेच्या दिवशी झाला.
त्या दिवशी शुक्रवार असून मृग नक्षत्र होते.
त्यांची प्रभा रंगीत इंद्रनील मण्यासारखी होती. ते नीलवर्ण असून त्यांचा चेहरा चंद्रासारखा आनंददायी होता.
ते चतुर्भूज असून त्यांच्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म होते.
त्यांच्या शरीरावर विभूती विलेपित होती आणि त्यांच्या कपाळावर केसांचा बटा होत्या.
अशा स्वरूपात ते अत्रीऋषींसमोर आले आणि म्हणाले, "दत्तोsहम्" (ज्या परमात्म तत्वाची तुम्ही पुत्र म्हणून ईच्छा केलीत तो मी तुमच्यासमोर पुत्र म्हणून उभा आहे.)
यावर ऋषीदांपत्य अत्री व अनसूया म्हणाले, "जगदीश्वरा जोपर्यंत तू आमच्यापोटी जन्म घेत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकणार नाही."
त्यांच्या या प्रार्थनेला प्रसन्न होऊन, श्री हरींनी ज्योतीरूपाने अत्रीऋषींच्या हृदयांत प्रवेश केला आणि त्यानंतर अत्रि-अनसूयेच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेतला.
इंद्रनीलसमाभासा || भस्माोद्धूलितविग्रहा ||
दत्तात्रेयावताराय || दत्तात्रेयाय नमो नम: ||
इंद्रनील मण्यासारखी आभा असलेल्या, भस्मविलेपित विग्रह (म्हणजे रूप) असलेल्या, दत्तात्रेय अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
४) कालाग्निशमन
श्री दत्तात्रेय यांनी अत्रिमहर्षि व सती अनसूया यांच्या उदरी प्रत्यक्ष औरसरुपाने जो चौथा अवतार घेतला तो कालाग्निशमन या नावाने ओळखला जातो.
दत्तात्रेयांच्या सोळा अवतारातील श्री कालाग्निशमन भगवान दत्तात्रेयांचा हा प्रमुख अवतार मानला जातो.
अत्रि आणि अनसूया यांच्या तपश्चर्येचे हे मुर्तिमंत फळ असल्यामुळे त्याला स्वाभाविक प्राधान्य प्राप्त झालेले आहे.
कालाग्निशमन हा श्री दत्त महाराजांच्या सोळा अवतारांपैकी हा चौथा अवतार सर्वात प्रमुख म्हणून ओळखला जातो. अत्री ऋषींची साधना चालूच होती. (ऋष्यकूल पर्वतावर केलेल्या अतिशय कठोर तपस्येमुळे अत्री ऋषी अतिशय तेजस्वी दिसू लागले आणि त्यांचे शरीर खूप गरम झाले. तेव्हा भगवान श्री हरी अत्री ऋषींचा दाह कमी करण्यासाठी आले हे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अवतारात पाहिले.
यामुळे या अवताराला 'कालाग्निशमन' असे म्हटले जाते. कारण कलियुगाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराने केलेली ही योजना होती.) जेव्हा अत्री ऋषींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांच्यासमोर प्रेममूर्ती अनसूया माता उभ्या होत्या. जे तेज अत्री ऋषींच्या हृदयात प्रविष्ट झाले होते ते आता त्यांच्या नेत्रांद्वारे अनसूया देवींच्या शरीरात प्रवेशले.
हे सर्व मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला झाले.
हीच तेज रूप गर्भधारणा होती. भगवंताची लीला एवढी अगाध आहे की पुढे नऊ महिन्याचा कालावधी नऊ दिवसांत पूर्ण झाला आणि दैवी स्वरुपात मार्गशीर्ष पौर्णिमेला परब्रह्म अनसूया मातेसमोर प्रकट झाले.
पण मातेची वात्सल्याची हौस फिटली नव्हती.
त्यांनी देवाला विनम्रतेने विनवणी केली की, "जोपर्यंत माझ्या गर्भापासून मनुष्य म्हणून आपण जन्म घेत नाही येऊ तोपर्यंत माझे समाधान होणार नाही.
तेव्हा कृपा करून आपल्या बाललीलांनी आम्हा उभयतांना मात्यापित्याचे सुख देऊन संतुष्ट करावे."
त्या विनंतीवरून श्री हरींनी नवजात बालकाचे रूप घेतले आणि अनसूया मातेच्या मांडीवर खेळत राहिले.
यावेळी मृग नक्षत्र होते. परमेश्वरी अवतार हे तेज रूप असतात. मनुष्य जगताचे प्रत्येक नियम त्यांना लागू होतातच असे नाही आणि झाले तरी त्यात योग्य ते बदल ईश्वरी योजनेनुसार होतात.
दत्तात्रेयांनी घेतलेला हा कालाग्नीशमन नावाचा प्रधान अवतार मार्गशीर्ष महिन्यात झाला.
सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष श्रेष्ठ मास मानला जातो. कारण तो प्रत्यक्ष परमेश्वराचाच अंश आहे.
तो परमात्मास्वरुपच आहे.
शिवाय हा महिना अन्नधान्याने समृद्ध असतो.
दत्तात्रेय अवतरले त्या दिवशी पोर्णिमा होती, मार्गशीर्ष शुद्ध १५ शुक्ल पक्ष होता, बुधवार होता. मृग नक्षत्र होते.
अत्रिअनसूयामोदकाय || शशीवर्णा श्रीहरी ||
कालाग्निशमनावताराय || दत्तात्रेयाय नमो नम: ||
ऋषी अत्री आणि माता अनसूया यांना मोद म्हणजे आनंद देणाऱ्या, शशी म्हणजे चंद्रासारखे शीतल पण तेज युक्त वर्ण असणाऱ्या (यामुळेच अत्री ऋषींचा दाह शांत झाला), कालाग्निशमन हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
५) योगीजनवल्लभ
श्री दत्तात्रेय प्रभूंचा पाचवा अवतार योगिजनवल्लभ या नावाने प्रसिध्द आहे.
अत्रिमुनींच्या घरी अवतार घेऊन दत्तात्रेय यांनी कालानलाप्रमाणे अत्रिमुनींच्या देहाचा दाह करणाऱ्या कालाग्नी चे प्रशमन केले.
श्री दत्तात्रेय बालरुपाने अनसूयेच्या सान्निध्यात विराजले असता अत्रिऋषींच्या आश्रमात इंद्रादि देव त्यांना अवलोकन करण्याकरिता आले. त्यांच्या पाठोपाठ ऋषिजनांचा समुदायहि तेथे जमला. गंधर्व आले, सिध्द आले, चारण म्हणजे देवतांचे स्तुतीपाठक तेही आले.
याचप्रमाणे योगविद्येमध्ये निष्णात असलेले योगिजन देखील आले.
अनेक साधुसंत व महात्मेही आले. हे सर्व लोक दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी उत्सुक झालेले होते.
त्यांची उत्कंठा पाहून दत्तात्रेयांनी शैशवावस्था सोडून बालरुपाने सर्वांना दर्शन दिले व योगमार्गाचा उपदेश करुन त्यांनी सर्वांना संतुष्ट केले.
योगतत्वाचा उपदेश सांगून दत्तात्रेय यांनी सर्वांनाच योगी केले. तेव्हापासून लोक त्यांना योगिजनवल्लभ असे म्हणू लागले.
याप्रमाणे मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा, गुरुवार या रोजी योगिजनवल्लभ दत्तात्रेयांचा अवतार झाला. कालाग्नीशमन दत्तात्रेयांचा अवतार निराळा व योगिजनवल्लभ अवतार निराळा.मार्गशीर्ष महिन्यात दत्तात्रेय यांचे दोन अवतार आहेत.
या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार 'योगिजनवल्लभ' या नावाने प्रसिद्ध आहे.
सुरगणादिवंदिताय || बालरूपा निरंजना ||
योगिजन-वल्लभावताराय || दत्तात्रेयाय नमो नम: ||
सुरगण म्हणजे देव - ऋषिंद्वारे वंदिल्या गेलेल्या, बालरूप आणि निरंजन म्हणजे ज्यात कुठलेही अंजन किंवा अशुद्धी नाही (जे निर्मळ, शुद्ध, परम पवित्र आहे). अशा योगिजन-वल्लभ अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
क्रमशः