A relationship - beyond friendship and the recent love affair in Marathi Anything by Priyanka Kumbhar-Wagh books and stories PDF | एक नातं - मैत्रीच्या पलीकडे अन् प्रेमाच्या अलीकडे

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

एक नातं - मैत्रीच्या पलीकडे अन् प्रेमाच्या अलीकडे

'गर्लफ्रेन्ड' म्हटलं कि, प्रत्येकाला आपली प्रेयसी डोळ्यांसमोर दिसते आणि ज्याला गर्लफ्रेन्डच नसेल, त्याला आपल्या मित्राची प्रेयसी डोळ्यांसमोर दिसते. काय मग... अगदी मनातलं ओळखलं ना ? असो !!! गर्लफ्रेन्डबद्दल तर आपल्या सर्वांना माहित आहे. पण 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' ही संकल्पना ऐकली कि, बरेच लोक बुचकळ्यात पडतात. खरंतर या संकल्पनेबद्दल आपल्या देशात फारच कमी लोकांना माहित होते. २०१४ मध्ये, सुप्रसिद्ध भारतीय लेखक चेतन भगत यांनी 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' ही कादंबरी प्रकाशित केली त्यानंतर ही संकल्पना काही लोकांपर्यंत पोहचली होती. नंतर २०१७ मध्ये अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा "हाल्फ गर्लफ्रेन्ड" हा चित्रपट प्रकाशित झाला तेव्हा अनेक लोकांना प्रश्न पडला होता कि, 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' म्हणजे नक्की काय ?

जसजशा पिढ्या बदलतात तसतशा काळानुसार संकल्पना देखील बदलतात. मला अत्यंत आनंद होत आहे कि, कोणीतरी या संकल्पना शोधत आहे. त्यावर ते त्यांचे विचार व्यक्त करत आहेत. आधुनिक दुनियेमुळे जग जसजसे उंचीचे शिखर गाठत आहे तसतसे माणसांचे विचारही विकसित अर्थात मॉडर्न झाले आहेत. आधुनिक जगातील उत्क्रांती पाहता, या संज्ञांना अनेक लोकांनी आपापल्या पद्धतीने परिभाषित करण्याचा प्रयत्न केला आहे. 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' म्हणजे एक अशी मुलगी जी एखाद्या बद्दल आपल्या मनातील प्रेम, काळजी, आपुलकी बाळगणारी भावना व्यक्त करते, पण तिला शारीरिक संबंधात किंवा अन्य काही कारणामुळे नात्यात गुंतता येत नाही. थोडक्यात 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' म्हणजे एक असं नातं जे मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असते.

आजकाल डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपल्या भारतात डेटिंगची संकल्पना थोड्याफार प्रमाणात विकसित झालेली पाहायला मिळते. आपण नेहमी बघतो कि, आज लोकं डेटवर (तरुण व तरुणी यांची ठरवून झालेली भेट) जातात. शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थीसुद्धा एकमेकांना डेट करताना आपण अगदी सहज बघतो. पूर्वी लोकांना आपल्या मनातील भावना किंवा प्रेम व्यक्त करायची इच्छा असेल, तर ते थेट लग्नासाठी मागणी घालत असे. आता लोकांचे विचार बदलले आहेत. प्रेम व्यक्त करण्याची नवीन पद्धत आली आहे. आजकालची पिढी "Will you be my Girlfriend or Boyfriend ?" असे विचारून भावना व्यक्त करताना आपल्याला नेहमी दिसते.

आपल्या सर्वांनाच माहित आहे आजकालच्या पिढीमध्ये आधुनिक काळातील नातेसंबंध ( मॉडर्न रोमँटिक रिलेशनशिप ) असल्यामुळे एखादा तरुण किंवा एखादी तरुण मुलगी त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी किंवा एकमेकांना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी काही वेळ घेतात. ते एकमेकांसोबत काही क्षण व्यथित करतात. त्यांच्यासाठी काय चांगले आहे हे पाहण्यासाठी इतर लोकांना देखील भेटतात. थोडक्यात प्रत्येकजण एखाद्याच्या आवडीनिवडीपासून शेवटी त्याच्याशी किंवा तिच्याशी लग्न करण्यापर्यंतचा जो काही प्रवास करत असतो त्या नात्याला मैत्रीच्या पलीकडे अन् प्रेमाच्या अलीकडे असलेले खुले नातेसंबंध (ओपन रिलेशनशिप) असे म्हणता येईल.

मित्रांनो, 'हाल्फ गर्लफ्रेन्ड', 'ओपन रिलेशनशिप', 'लिविंग रिलेशनशिप' या संकल्पना काहीवर्षांपूर्वीच जन्माला आल्या. मग प्रश्न असा पडतो कि, या आधी असे नातेसंबंध नव्हते का ? अर्थातच होते !!! फक्त त्यावेळेस अशा नात्यांना कोणाला परिभाषित करणे शक्य झाले नसेल म्हणून त्या नात्यांना नाव देता आले नसेल. अजूनही आपण आपल्या अवतीभोवती बघतो, आपल्यापैकी कोणीतरी मुलगा अथवा मुलगी, त्यांना एखाद्या व्यक्तीच्या प्रेमाबद्दल पूर्णपणे खात्री नसते. त्या मुलाला किंवा त्या मुलीला ती व्यक्ती आवडत असते पण बंधनात अडकून राहायचे नसते. अशा नात्याला आजकालच्या भाषेत एखाद्यावर केवळ क्रश असणे असेही म्हणतात. माझ्या अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्या अशा परिस्थितीतून गेलेल्या आहेत.

मग हाल्फ गर्लफ्रेन्ड किंवा हाल्फ बॉयफ्रेन्ड यांचा अर्थ असा होतो का, एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला जाऊन सरळ बोलू शकते कि, तू माझी हाल्फ गर्लफ्रेन्ड किंवा हाल्फ बॉयफ्रेन्ड हो ? अर्थातच नाही !!! खरंतर आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात जी परिस्थितीमुळे बंधनात अडकलेली असतात किंवा अन्य काही गोष्टींमध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे ती नाती जीवनाच्या वाटेवर कुठेतरी अपुरी राहून जातात. आपली इच्छा नसतानाही त्या नात्यांना मागे सोडून आपल्याला पुढे जायला लागते. त्यामुळे साहजिक गोष्ट आहे कि, त्या सुखद - दुःखद नात्याला आपण शेवटपर्यंत निभावू शकत नाही कदाचित त्या नात्याला काय नाव द्यायचे हे आपल्याला त्यावेळेस उमजलेले नसते म्हणून आपण त्याची साथ सोडतो.

माझ्या मते, 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' ही अतिशय सुंदर संकल्पना आहे. एक स्त्री एखाद्या व्यक्तीसोबत शरीराने नाही तर केवळ मनाने जोडली जाते तेव्हा त्या दोघांमधील नातं अधिकच सुंदर होतं. ते असं एक गोड नातं असतं, ज्यात एकमेकांच्या प्रति असलेल्या भावना व्यक्त करण्यास आपण मुक्त असतो. अर्थात शरीराने एकत्र जोडले ( शारीरिक संबंध किंवा फिजिकल रिलेशनशिप ) जायचे कि नाही हा त्या दोघांचा वैयक्तिक निर्णय असतो. अशा नात्यात काही मर्यादा असल्या, तरी ते विश्वास आणि प्रेम यांच्या आधारावर आजीवन टिकू शकते कारण त्यात निःस्वार्थी भावना आणि निरपेक्ष प्रेम असते.

ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. तिचा जास्तीत जास्त वेळ ती आपल्यासोबत व्यथित करते. वेळप्रसंगी आपल्यावर रागावते तर कधी भावुक होऊन आपल्यासाठी रडते. जिचा आपल्यावर विश्वास असतो, जी संकटसमयी आपला एकमेव आधार असते. तीच तर खरी 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' असते. कधी रोज न बोलताही तिच्या प्रेमाचा ओलावा आपल्याला असा जाणवतो जणू तिच्या मैत्रीचा जिव्हाळा उन्हात असलेल्या शीतल सावलीसारखा भासतो. ती आपले सामर्थ्य असते, आपले धैर्य असते. मला तर कधी कधी वाटते, कदाचित तिच्या रूपाने आपल्याला आपल्या कर्माचे पुण्य मिळाले असते.

हल्ली असे काही गैरसमज पसरले आहेत कि, 'हाल्फ गर्लफ्रेन्ड' म्हणजे एक अशी मुलगी किंवा स्त्री जी एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळते पण त्या व्यक्तीला मात्र स्वतःच्या भावनांशी खेळू देत नाही. खरंतर ती एक मुलगी, बहीण आणि मुख्य म्हणजे एक स्त्री असते त्यामुळे ती अनेक बंधनात अडकलेली असते. तिची आपल्या कुटुंबाप्रति अनेक कर्तव्ये असतात. म्हणूनच जेव्हा जेव्हा तो तिच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतो आणि फक्त एक चांगला मित्र किंवा जवळचा मित्र नसून तिच्याबद्दल त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. कारण कधी तिच्या घरच्यांचा नकार असतो तर कधी तीच लग्न ठरलेलं असतं. पण याचा अर्थ खरंच असा होतो कि, ती आपल्या भावनांशी खेळते ?

आजकाल काही जोडपे प्रेमबंधनात अडकलेले असतानाही नात्यात जरा देखील दुरावा आला कि, क्षणांत नातं मोडून एकमेकांपासून वेगळे होतात. पण नात्यात बंधने असूनही बिनशर्त प्रेम करणारी ती, मैत्रिणीपेक्षा जास्त तर प्रेयसीपेक्षा कमी नसून प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवी असलेली एक निखळ मैत्रीच तर असते. ती जिवलग सखी असते. ती प्रत्येक वेळेस नव्याने भासणारी आणि कधीही न उलघडणारे अजब गजब कोडं असते. तिची कल्पना केली कि, शब्द आपोआप रचले जातात,

"ती दुःखात मिळालेला आधाराचा हाथ
तर सुखात लाभलेली आनंदाची साथ असते
तिची निःस्वार्थी अन् निरपेक्ष मैत्री जणू
चांदण्यांची सोबत काळोखी रात्र असते"

प्रत्येकाच्या आयुष्यात असे सुंदर क्षण नक्कीच येतात. जीवनाच्या वळणावर प्रत्येकाला अशी जिवलग सखी मिळतेच जी अधिकृतरित्या जरी आपली नसली तरी मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असणारी "हाल्फ गर्लफ्रेन्ड" असते. फक्त काही लोकांना ते नातं ओळखता येतं तर काही लोकांना त्याची परिभाषा कळतंच नाही. आपण कळत नकळत का होईना, पण असे अविस्मरणीय विलक्षण क्षण अनुभवत असतो. मीसुद्धा हे सुंदर क्षण अनुभवले आहेत. तुम्ही सुद्धा अनुभवले आहेत ना ???

(साहित्य क्षेत्रातील हे माझे पहिले पदार्पण. हा मी लिहिलेला पहिला लेख. खरंतर असं म्हणायला हरकत नाही कि, पाहिलंच असल्यामुळे मी अगदी घाबरतच हा लेख लिहिला आहे. मी माझे सकारात्मक विचार मांडण्याचा अटोकात प्रयत्न केला आहे. हा लेख मी माझ्या दृष्टीने विचार करून लिहिला असल्यामुळे सगळ्यांचेच विचार माझ्या विचारांशी जुळतील असे नाही. प्रत्येकाचे स्वतंत्र विचार असतात. तुमच्या प्रतिक्रियांद्वारे तुमचे विचार आणि मत ऐकायला मला नक्कीच आवडेल. धन्यवाद !!!)

(टिप : या लेखाची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या लेखाचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय हा लेख ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )