Ladies Only - 9 in Marathi Fiction Stories by Shirish books and stories PDF | लेडीज ओन्ली - 9

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

लेडीज ओन्ली - 9

|| लेडीज ओन्ली ||

( भाग - ९ )

त्या घटनेनंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. दवाखान्यातून घरी आणलं खरं मला, पण ते घर आता माझं राहिलं नव्हतं. घरातलं कुणीही माझ्याशी नीट बोलत नव्हतं. माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे माझे बाबाही माझ्यापासून दूर दूर राहायला लागले होते. आजवर माझ्या अवतीभवती खेळणारी माझी भावंडं माझ्या जवळही यायला तयार नव्हती. माझ्या हुशारीचं कौतुक करताना न थकणारी माणसं माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं बघायला लागली होती. माझा बळी देऊन स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरलेल्या मैत्रीणींकडे मला भेटायला, माझ्याशी बोलायलाही वेळ नव्हता. सगळंच बदलून गेलं होतं. नाही म्हणायला आई तेवढी अजूनही जशीच्या तशीच होती. लोकांनी उगाच चौकशी करू नये म्हणून मला घरामागच्या अडगळीच्या खोलीत बाज टाकून दिली होती. माझा अशक्तपणा अजूनही कमी झालेला नव्हता. म्हणून मी तिथेच पडून असायची एखाद्या रोगी माणसासारखी. आई जेवणाचं ताट, चहापाणी सगळं आणून द्यायची. रात्री माझ्या बाजूला झोपायची. मी अर्ध्या रात्रीतून दचकून उठायचे.बडबडायचे. ओरडायचे. कण्हायचे. विव्हळायचे. मग आई जवळ यायची. घट्ट मिठी मारायची. मग माझी भीती कमी व्हायची. आई मला पाणी पाजायची. मी थरथरत्या अंगाने तिच्या मांडीवर झोपायचे. आई सोबत असली की मला सुरक्षित वाटायचं.
आणखी एक महिना उलटला. डॉक्टरांनी चेकअपसाठी बोलावले होते. बाबांना सुट्टी नव्हती. मी आणि आई.. दोघीच गेलो. डॉक्टरांनी तपासले. ब्लड प्रेशर, ईसीजी काय काय नि काय काय... ब्लड आणि युरीनचे सॅम्पलही घेतले टेस्टसाठी. खरं तर मला काहीच झालं नव्हतं. महिन्याभरापूर्वी जाणवणारा विकनेसही तेवढासा राहिला नव्हता. आज दवाखान्यात यायची तर गरजही वाटत नव्हती. पण डॉक्टरांनी फाईलवर नेक्स्ट व्हिजीटची तारीख लिहिलेली. ती टाळता कामा नये असा आईचा हट्ट. त्यातून ही चक्कर. डॉक्टर मॅडम म्हणाल्या , " मुलगी मनाने खरोखरच खूप स्ट्राँग आहे. अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या मानसिक धक्क्यातून सावरण्यात आयुष्य उद्ध्वस्त होतं कित्येकांचं. पण या मुलीला सलाम करावासा वाटतो. ती मनाने खूप मजबूत आहे. काळनागाच्या फण्यावर पाय देऊन ठामपणानं उभं राहण्याची जिद्द असणारं कणखर मन आहे तिच्याकडं. "
डॉक्टर मॅडम बराचवेळ आईजवळ माझं कौतुक करत होत्या. पण ते ऐकण्यात मला काहीच कौतुक वाटत नव्हतं. दोन अडीच तासांनी माझे सगळे रिपोर्ट्स आले. मी आणि आई पुन्हा एकदा डॉक्टर मॅडमच्या केबीनमध्ये गेलो. त्यांनी सगळे रिपोर्ट्स नीट बघितले. पुन्हा पुन्हा बघितले. आणि म्हणाल्या... " शी इज प्रेग्नंट..!!"
स्वतःला सावरू पाहणाऱ्या मला कुणीतरी उकळत्या तेलाच्या कढईत ढकलून दिलंय असंच वाटलं ते ऐकून. जणू सगळं आभाळ कट करून माझ्या एकटीच्याच माथ्यावर कोसळत होतं पुन्हा पुन्हा. मी दगड होवून बसले. श्वास बंद झाले होते. पापण्यांचं थरथरणं थांबलं होतं. धमन्यांतून वाहणारे रक्ताचे प्रवाहही अचानकच कोरडे ठाक पडले होते जणू. हृदयाचं धडधडणं थांबलं होतं. मी थिजून गेली होते जागच्या जागीच. अन् माझ्या बाजूच्या खुर्चीत बसलेली माझी आई? ती केव्हाच बेशुद्ध पडली होती. हा धक्का तिला पचवता येणं शक्यच नव्हते. डॉक्टरांनी तिला खुर्चीतून उचलून बेडवर टाकले. सलाईन लावले. मी अजूनही माझ्याच जागी बसलेली होते दगड होवून. डोळ्यांच्या आत कुठेतरी आसवांचा प्रवाह अडला होता. तो धड आतही राहत नव्हता. बाहेरही पडत नव्हता. डोळ्यांचे श्वास गुदमरायला लागले होते.
एक सलाईन संपल्यानंतर आई भानावर आली. मी अजूनही माझ्याच जागी. आई उठली. माझ्याजवळ आली. माझ्या खांद्यांना धरून मला उठवले. माझे हात धरून मला चालवत नेऊ लागली. माझे पाय चालत होते. मी नाहीच.. तिनं मला कसं घरापर्यंत आणलं ते तिचं तिलाच ठाऊक..!!
संध्याकाळी बाबा माझ्या खोलीत आले. मला कोंडून ठेवलेल्या खोलीत.
"आणखी कोणते भोग मांडून ठेवणार आहेस आमच्यापुढे.... " बाबा चिडले होते. त्यांची चिडचिड होणे साहजिकच होते. माझ्यामुळे त्यांना समाजात उजळ माथ्याने फिरायची देखील मुभा राहिली नव्हती. त्यांची होणारी घुसमट मी समजू शकत होते. पण करू काहीच शकत नव्हते. बाबा बोलत होते. मी गप्प. तोंड शिवून घेतल्यासारखी.
" नरकयातना ज्याला म्हणतात ना त्या ह्याच... याहून वेगळा नरक नसतोच कुठे... जितेपणी आमच्या वाट्याला नरक आलाय.. " बाबांच्या जीवाची होणारी चडफड थांबत नव्हती. मी ठरवलं होतं आपण काहीच बोलायचं नाही. बाबा जे बोलतील ते ऐकून घ्यायचं. बोलायचं काहीच नाही. अगदी तोंड शिवून घ्यायचं. आणि ते म्हणतील ते करायचं. अगदी डोळे झाकून..
" ते काही नाही... हिचं शिक्षण बिक्षण बंद सगळं.. उद्याच हिला हिच्या मामाकडे पाठवायचं... "
" अहो बारावीची परीक्षा तर.. " आईनं बोलण्याचा प्रयत्न केला.
" गरज नाही... निघाले ते धिंडवडे खूप झाले आब्रुचे... आता सगळं बंद... "
" आणि थेट मामाकडे म्हणजे... इतक्या दूर.. इंदोरला... "
" म्हणूनच..! तिथे कुणीही काहीही विचारणार नाही. वर्ष सहा महिने राहिल. लगेच एखाद्या आंधळ्या पांगळ्याच्या गळ्यात बांधून टाकू... ही ब्याद आता मला माझ्या डोळ्यासमोर नकोच... " बाबांना माझ्याबद्दल घृणा वाटायला लागली होती.
" अहो काहीतरीच काय बोलताय... पोटची पोर आहे ती...! " आईचा जीव माझ्यातून निघत नव्हता.
" पोटातच नरडीला नख लावलं असतं हिच्या तर बरं झालं असतं.. " बाबा पुटपुटले. आईला हुंदका आवरता आला नाही." ते काही नाही.. उद्याच्या उद्या हिला इंदोरला नेऊन टाकायचं म्हणजे टाकायचंच.. " बाबांचा निर्णय झाला होता. आई गप्प झाली. मी तर कधीचीच..! मला बाबांचे सगळे निर्णय मान्य होते.
" जाण्याआधी ही घाण साफ करावी लागेल... "
" म्हणजे? " बाबांच्या या वाक्याचा अर्थ ना आईला कळला ना मला..
" हे... पोटातलं पाप... याची विल्हेवाट लावावी लागेल ना... कुणालाही कळायच्या आधी... " बाबांनी माझ्या पोटाकडे बोट दाखवले,"आजच रात्री जाऊया डॉक्टरांकडे.. दहा बारा हजार ठेवू त्याच्या हातावर. पण या प्रकाराची कुठेही वाच्यता व्हायच्या आत अ‍ॅबॉर्शन..."
" मी अ‍ॅबॉर्शन करणार नाही... " मी आतापर्यंत तोंडाला कुलूप लावून बसले होते. पण अचानकच माझ्या जीभेत कुठून बळ आलं माझं मलाच कळलं नाही," मी तुम्हाला माझ्या पोटातल्या निरागस बाळाचा जीव घेऊ देणार नाही... "
" मी तुझा जीव घेईन आता.. " बाबा माझ्या अंगावर धावून आले," आता एकही शब्द बोलशील तर नरडीचा घोट घेईन तुझ्या...! "
" तुम्ही जर या निष्पाप जीवाचा बळी घेणार असाल तर तुम्हाला आधी माझा जीव घ्यावा लागेल... " मी का आणि कशी काय बोलत होते माझं मलाच कळत नव्हतं. पण जे काही बोलत होते ते कुठूनतरी आतून येत होतं एवढं मात्र नक्की.
" अगं काय बोलतेस विजू तू हे.. " आई समजावू लागली," त्या राक्षसांनी तुझ्यावर केलेल्या बलात्काराची निशाणी आहे ही. आणि तिलाच जन्म द्यायचा म्हणतेस तू? "
" हो आई... मला माहित नाही हे कोणत्या नराधमाचं बीज माझ्या उदरात पडलंय ते.. पण ते आता अंकूरलंय. त्याच्यात जीव आलाय. त्याचा अंकूर असा खुडायला मी.. मी राक्षस नाही आई... मी माणूस आहे.. एक स्त्री आहे..! " माझ्या मनात विचारांची जी उलथापालथ चालली होती ती शब्दात मांडण्याचा प्रयत्न मी करत होते.
" वेड लागलंय या कार्टीला ... " बाबा ओरडले," कसले कसले सिनेमे बघून अन् भंपक आदर्शवादाची पुस्तकं वाचून डोकं फिरलंय हिचं. वेडाचा झटका आलाय हिला... बिना नवऱ्याचं पोट आलेल्या बायकांवर थुंकतो हा समाज... पापीणी, दुराचारीणी म्हणून शेण फेकतात तिच्या अंगावर...पण तुला काय फरक पडतोय त्यानं.. विकृत विचारांचा विंचू चावलाय तुझ्या मेंदूला.. चांगल्या वाईटाची जाणीव बधीर झालीय तुझी... " बाबांच्या मनात जणू जाळ पेटला होता. ते भडाभडा आग ओकत होते.
" बाबा, माझ्या पोटात एक जीव अंकुरलाय... तो श्वास घेतोय! तुम्ही त्याचा खून करायला सांगताय.. हे चांगलं आहे? मानवीय आहे? " मी बाबांच्या बोलण्याला अतिशय शांतपणे प्रत्युत्तर देत होते.
" तू मला मानवतेच्या गोष्टी शिकवू नकोस... अगं खरंतर तुला तिरस्कार वाटायला पाहिजे या तुझ्या पोटातल्या पापांशाचा.. जितका तिरस्कार त्या नराधमांबद्दल वाटतो.. तितकाच.. "
" होय बाबा... त्या घटनेचा विचार डोक्यात आला तरी मला किळस वाटते... अंगावर काटा येतो.. त्यांनी मला लुटलं, ओरबाडलं, आयुष्यातून उठवलं.. पण हे जे माझ्या आत रूजलंय ना... ते त्यांचं नाहीच... माझं आहे.. माझ्या शरीराचा तो भाग आहे. रस्त्याने चालताना पायाला कुत्रा चावला तर तो पाय तोडून फेकला जात नाही... हे जे माझ्या पोटात वाढतंय ते माझ्या रक्तामांसाचं आहे... लेकराच्या जन्म घेण्यात बापाचं योगदान फक्त एका थेंबाचं असतं बाबा... बाकी सगळं समर्पण आईचंच... मी आई आहे त्या जीवाची.. अन् मी त्याची हत्या करणार नाही. करू देणारही नाही... " मला कुठून शब्द सुचत होते माझे मलाच कळत नव्हते. हे मी बोलतेय की माझ्या आतून दुसरंच कुणीतरी ते ही कळत नव्हतं. मी तर ठरवलं होतं स्वतःशी बाबा जे सांगतील तसंच वागायचं. मग.. मग त्यांना विरोध करणारं हे कोण पेटून उठलंय माझ्यात? मीच? माझं दुसरं मन? की.. की.. नेमकंच अंकुरायला लागलेलं ते भ्रुण??
"काय हवंय तुला? तुझ्या बापाला या समाजाने वाळीत टाकावं अशी इच्छा आहे का तुझी? येता जाता लोकांनी माझ्या अंगावर थुंकावं असं वाटतंय का तुला? तुझ्या मायबापानं चार दिवस सन्मानानं जगावं असं वाटत नाही का तुला? तुझ्या नशीबात अंधार आला म्हणून तुझ्या बहीणभावांचं भवितव्य काळोखात लोटायचंय का तुला? " बाबा एकामागोमाग एक प्रश्न विचारत होते अन् माझ्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी शांतपणे ऐकून घेत राहिले.
" आता बोल ना... आता का दातखीळ बसलीय? या वास्तवातल्या दाहक प्रश्नांवर नाही का एखादं आदर्श उत्तर तुझ्याकडे? "
" मी माझ्या नशीबातला अंधार माझ्यासोबत घेऊन जायला तयार आहे... त्याची सावली तुमच्या कुटुंबावर पडणार नाही... " दीर्घ श्वास घेऊन मी बोलले." पण मी या निष्पाप जीवाला संपवण्याचं पाप करणार नाही..! "
मला असं वाटलं की यावर बाबा माझ्या अंगावर धावून येतील. मला मारतील. पण त्यांनी तसं काहीही केलं नाही. ते शांत उभे राहिले अन् बोलले," ठीक आहे तर मग... तुला त्या पापाला नष्ट करण्याचं पाप करायचं नाही.. तर मग... तुला बापाला ठार केल्याचं पाप तुझ्या पदरी घ्यावं लागेल... "
" अहो... " आई घाबरली होती.
" होय... एका बलात्कारित मुलीचा बाप म्हणून मिरवायचं बळ आणलं असतं मी कसं बसं... पण एका कुमारी मातेचा बाप म्हणून वाट्याला येणारं लाचार जिणं मी जगू शकत नाही. तुझ्या पोटातल्या पापाचा शाप माथ्यावर मिरवीत मी जगू शकत नाही.... दहा मिनिटांचा वेळ देतोय.. बघ... तुला कुणाचा जीव वाचवायचाय ते ठरव.. " आणि बाबा त्या खोलीतून बाहेर पडले.
आई धाय मोकलून रडत होती. मी जीर्ण पानागत खाली कोसळले. माझ्या हातपायांत त्राणच उरला नव्हता. बाबांच्या या शस्त्राच्या वारानंतर मी, माझं मन, माझे विचार रक्तबंबाळ होऊन धारातीर्थी पडले..!!
रात्री उशिरा आम्ही पुन्हा दवाखान्यात गेलो. आता बाबाही सोबत होते. डॉक्टरांनी पुन्हा काही तपासण्या केल्या. तासाभरात त्यांचे रिपोर्ट आले. डॉक्टरांनी आम्हाला बोलावून घेतले.
"या मुलीची कंडिशन खूपच क्रिटीकल आहे... अ‍ॅबॉर्शन करताना हिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.. " डॉक्टर समजावू लागले,"आणि ही जनरली धोक्याची सूचना दिली जाते त्यापैकी एक आहे असं समजू नका.. अशा केसेसमध्ये नव्वद टक्के पेशंट्सना जीव गमवावा लागला आहे. मला विचाराल तर तुम्ही हे अ‍ॅबॉर्शन करू नये असाच सल्ला मी देईन..." डॉक्टरांनी सांगितलं. का कुणास ठाऊक पण मला ते ऐकून बरं वाटलं. आता तरी बाबा माझं ऐकतील असं वाटलं," तुम्ही नीट विचार करा आणि काय करायचं ते मला सांगा.. " डॉक्टरांनी विचार करायला वेळ दिला. आम्ही डॉक्टरांच्या केबिनबाहेर आलो. मला एक वेगळा बेड दिला होता. तिथे येऊन बसलो. बाबा परत एकदा डॉक्टरांकडे गेले. जरावेळाने बाहेर आले. बाबांनी आईला एका कोपर्‍यात बाजूला बोलावून घेतले. दोघांमध्ये हळू आवाजात काहीतरी चर्चा झाली. बाबांनी आईच्या हातात काहीतरी दिले. आईने ते पदरात बांधले. बाबा दवाखान्याबाहेर पडले. आई माझ्या जवळ येऊन बसली.
" काय म्हणताहेत गं बाबा..?" मी विचारले. " काही नाही..."
" करायचंय का अ‍ॅबॉर्शन? "
" हं... डॉक्टर जास्त पैसे मागायलेत... ते आणायला गेलेत.. "
" आणि खरंच जर मला काही..." आईनं माझ्या तोंडावर हात ठेवला. मला पुढे बोलूच दिलं नाही. माझ्या डोक्यावरून हात फिरवला. माझ्या कपाळावर ओठ टेकवले. मला कुशीत घेतलं अन् म्हणाली, " दीड दोन महिन्यापासूनच तुझ्या कुशीत फुललाय ना तो जीव... तरीही किती ओढ तुला त्याची. किती जिव्हाळा... पोरी, कुठून आणलंस गं इतकं नाजूक मन... मी तुला नवमास पोटात ठेवलं. सतरा वर्षांपासून तळहाताच्या फोडावानी तुला जपलं.. तरी आज एक संकटाचा प्रसंग आला तर... आम्ही खूप करंटे आहोत गं पोरी... खूप निष्ठूर... अगदी अमानुष.. " आई रडत होती.
" काय झालं आई... बाबा काही म्हणाले का? " मी विचारलं.
" हं... " आईचे शब्द आसवांनी ओलावले होते,"ते डॉक्टरांशी बोलले..... मागाल तितके पैसे देतो म्हणाले.. पण हे अ‍ॅबॉर्शन कराच..!! आणि.. आणि.. हे ही.. म्हणाले की..." मी कानात प्राण आणून ऐकत होते, " पोरीचा जीव गेला तर जाऊ द्या... पण अ‍ॅबॉर्शन कराच..!!"
म्हणजे... बाबांना... ? अ‍ॅबॉर्शन मध्ये माझा जीव जाईल का राहील ते मला माहीत नव्हते. पण बाबांसाठी मात्र आता मी मेले होते. माझं असणं त्यांच्या प्रतिष्ठेला, सन्मानाला धक्का देत होतं. मी नसणंच त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर होतं. हा माझ्यावर होत असलेला तिसरा मोठा आघात होता. कदाचित यानंतर माझ्या जिवंत असण्या नसण्याला काहीच अर्थ उरणार नव्हता. माझ्या डोळ्यांतलं पाणी आटलं होतं. ते कोरडेठाक झाले होते.
" विजू... माझं एक ऐकशील..." माझे विस्कटलेले केस नीट बांधील आई बोलली. मी नुसतंच 'हं' म्हणाले, " तू इथून निघून जा... दूर कुठेतरी.. जिथे आम्ही कधीच पोहोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी... तू जा.. आमच्याशी असलेली सगळी नाती तोडून.. मुक्त हो.. निघून जा.. आणि.. आम्हाला परत भेटू नकोस.. कधीच.. कधीच..." आईने तिच्या पदराला बांधलेली गाठ सोडली. मघाशी बाबांनी तिच्याजवळ ठेवायला दिलेले सगळे पैसे माझ्या हातावर ठेवले..., " तू जा पोरी...वाट नेईल तिकडे.. कुठेही जा.. परतीच्या सगळ्या वाटा बंद करून जा... कुठेही राहा.. कशीही राहा.. पण जिवंत राहा.. जिवंत राहा..!" आईचे डोळे घळाघळा वाहू लागले. माझेही. मी उठून बसले. तिनं दिलेले पैसे ओढणीच्या कोपऱ्यात बांधले. आईला कडकडून मीठी मारली. तिच्या पायांवर डोकं ठेवलं. अन् तिचा निरोप घेतला. तिच्याकडे बघत बघतच दवाखान्याच्या बाहेर पडले. आईला अन् बाबालाही माहीत होतं, अ‍ॅबॉर्शन मध्ये माझा जीव जाणार. बाबांना तो जाऊ द्यायचा होता. आईला तो वाचवायचा होता. आई जिंकली. तिनं तिच्या काळजाचा तुकडा एका अनोळखी आभाळात भिरकावून दिला होता. नजरेसमोर राहिला नाही तरी फक्त जिवंत तरी राहील या एकाच आशेने. कशाचं बनलेलं असतं हो आईचं काळीज? कशी असते ही काळीजमाया? काळजाचा तुकडा जगावा म्हणून स्वतःचं काळीजच पेटवून द्यायचं. ही कोणती माया? नाही कळायची... आई झाल्याशिवाय नाहीच कळणार..!!
मी धावत पळत बसस्टॉपवर आले. तिथे एक बस उभी होती. कुठे जाणारी होती ते ही बघितलं नाही. आत जाऊन बसले. कंडक्टर आला. शेवटच्या स्टॉपचं तिकीट घेतलं. बस निघाली..
डोळ्यांपुढचा अंधार आता दुप्पट झाला होता. दगडगोट्यांच्या पायवाटेवर काटेही अंथरले गेले होते. अन् तरीही मी माझं पुढचं पाऊल टाकलं होतं..!!

© सर्वाधिकार सुरक्षित -
© शिरीष पद्माकर देशमुख ®

{ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध आढळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.
लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®