श्री दत्त अवतार भाग ७
२) परशुराम
ऋषिश्रेष्ठ जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम.
त्यांना एकूण चार पुत्र होते.
परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे.
जमदग्नी ऋषि हे अत्यंत कोपिष्ट होते.
एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागवले, त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले.
पुत्रांनी मातृवधाला नकार दिला.
थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली.
त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले.
ते पाहिल्यावर जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला.
त्यांनी परशुरामाला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने आपल्या आईला पुन्हा जिवंत करा आणि आपला कोपिष्ट स्वभाव संपवा असे दोन वर मागितले.
जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला जिवंत केले, परशुराम हे बाह्यवृत्तीने ऋषी असले तरी त्यांचा स्वभाव क्षत्रियाला साजेसा असा होता.
त्यांनी सर्व विद्या, कला आणि सिद्धी आत्मसात केल्या होत्या.
ते शस्त्र आणि युद्ध विद्येतही निपुण होते.
ते ही आपल्या पित्याप्रमाणे थोडे रागीट स्वभावाचे होते.
प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे ते गुरू होते.
तसेच त्यांचे महाभारत काळात भीष्मांबरोबर युद्ध झाले होते.
कर्णाला ब्रह्मास्त्र विद्या त्यांनी शिकवली होती.
एके काळी संपूर्ण भारतवर्षामध्ये क्षत्रियांनी सर्वत्र अराजक माजवले होते. सर्व क्षत्रिय भोग विलासामध्ये रममाण झाले होते. कोणीही प्रजेची काळजी घेत नव्हते. सर्वत्र अनाचार आणि अनीती यांना उत आला होता.
अशावेळी परशुरामाने प्रतिज्ञा केली आणि एकदा-दोनदा नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी पूर्णपणे निःक्षत्रिय करुन टाकली.
त्यांच्या या अलौकिक कार्याने सर्वजण भयभीत झाले आणि त्यांना शरण गेले.
त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर यज्ञ केले आणि सर्वत्र यज्ञसंस्कृती रुजविली.
त्यांनी अपार दानधर्म केला. शेवटी सर्व पृथ्वी त्यांनी कश्यप ऋषींना दान केली.
त्यानंतर त्यांना राहण्यासाठी त्यांनी समुद्राकडे जागेची विनंती केली आणि त्यातून कोकण भूमी निर्माण झाली असे कथानक आहे.
याच कोकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असताना त्यांनी श्रीदत्तात्रेय यांची उपासना केली.
श्रीदत्तात्रेय यांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यांना ब्रह्मविद्या आणि श्रीविद्येची उपासना सांगितली. श्रीदत्तात्रेय आणि परशुराम यांचेमधील संवाद "श्री दत्तभार्गव संवाद" म्हणून प्रसिद्ध आहे.
'त्रिपुरारहस्य' नावाच्या ग्रंथामध्ये हा संवाद असुन श्रीदत्तात्रय यांनी परशुराम यांना चिरंजीवित्व बहाल केले. आजही परशुरामांचे वास्तव्य श्री दत्तप्रभूबरोबर बद्रिनाथाजवळ बद्रिकाश्रमामध्ये आहे अशी श्रद्धा आहे.
३) आयुराजा
सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा म्हणजे नहुष हा होता.
त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी तो इंद्रपदी आरुढ झाला.
नहुषाचे वडील हे आयुराजा होते.
आयुराजाची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती.
विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती.
यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्रीदत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना केली.
तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले.
एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्रीदत्तात्रेय बसलेले दिसले.
त्यांच्या मांडीवर एक तरुण स्त्री बसली होती.
तिच्याबरोबर त्यांचे मद्यपान सुरू होते आणि ते दोघेही धुंद झाले होते.
त्यांच्या बाजूला मांसही शिजवलेले होते.
अशा स्थितीत पाहूनही आयुराजाने दत्तप्रभूंची विनम्रपणे प्रार्थना केली.
तेव्हा हसून दत्तप्रभू म्हणाले, 'अरे, मी तर असा दुराचारी आहे, तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही.
तरीही आयुराजा तेथून हालला नाही.
तेव्हा श्रीदत्तात्रेय यांनी त्याचा अपमान केला, त्याची अपशब्दांमध्ये संभावना केली आणि त्याला हाकलून दिले. तरीही विचलित न होता, त्याने अंतःकरणपूर्वक श्री दत्तत्रेयांची उपासना सुरू ठेवली.
अशी अनेक वर्षे गेली.
शेवटी दत्तप्रभू त्याचेवर प्रसन्न झाले व त्याला वर माग अशी आज्ञा केली.
तेव्हा आयुराजाने श्रद्धापूर्वक वर मागितला की, कर्तव्यदक्ष, पराक्रमी, आध्यात्मिक, उदार, ज्ञानी, अजिंक्य आणि दीर्घायुषी असा पुत्र मला द्या. श्रीदत्तात्रेयांनी त्याला 'तथास्तु' असा आशिर्वाद दिला आणि मग चक्रवर्ती नहुषाचा जन्म झाला.
४) पुरुरवा
पुरुरवा राजाचेही गोत्र अत्रि हेच होते.
कोणत्या तरी शापाने तो जन्मल्यापासून अतिशय कुरुप होता.
तो राजपुत्र होता परंतु त्याचे रूप अतिशय लाजिरवाणे होते.
सर्वजण त्याची निर्भत्सना आणि चेष्टा करीत असत.
तो युवराज झाला.
त्याचे लग्नाचे वय झाले पण त्याला कोणीही मुलगी देईना.
एखादा वधुपिता त्याला मुलगी देण्याची तयारी दाखवी, पण प्रत्यक्षात मुलगी त्याचा स्वीकार करीत नसे.
आपल्या रूपामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरुरवा अतिशय निराश झाला.
शेवटी त्याने ठरविले की आपण तपश्चर्या करायची.
ज्या ठिकाणी अत्रि ऋषिनी तपश्चर्या केली तेथेच आपण जायचे या निश्चयाने तो बाहेर पडला.
त्याने तेथे जाऊन तपश्चर्या सुरू केली.
त्याला भगवान श्रीदत्तात्रेय यांनी दर्शन दिले.
ते म्हणाले की, जीवन म्हणजे मायेचा खेळ आहे.
ही योगमायाच आपल्याला जन्माला घालते आणि संसार क्षेत्रामध्ये खेळवते.
संसार म्हणजे तिच्याच लिला आहेत.
श्रीदत्तात्रेय यांनी पुरुरवाला ज्ञान आणि मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह दिला.
त्याला त्यांनी देवीची उपासना करायला सांगितली.
पुरुरव्याने श्रीदत्तात्रेयांची आज्ञा मान्य करून देवी उपासना सुरू केली.
त्याच्या प्रखर उपासनेमुळे त्याला अतिशय सुंदर रूप प्राप्त झाले, आणि त्याने दीर्घकाळ राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतला.
शेवटी तो दत्तचरणी मोक्षधामी गेला.
क्रमशः