Ladies Only - 6 in Marathi Fiction Stories by Shirish books and stories PDF | लेडीज ओन्ली - 6

The Author
Featured Books
Categories
Share

लेडीज ओन्ली - 6

|| लेडीज ओन्ली ||

[ भाग - 6 ]

शहराच्या मोठ्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका दहा बाय दहाच्या छोट्याश्या टीनपत्र्यांच्या खोलीत विजयाताईंनी आपलं दुकान थाटलं होतं. दुकान छोटंच पण पुस्तकांची संख्या खूप जास्त. अगदी जुन्या पुराण्या दुर्मिळ पुस्तकांपासून धार्मिक, राजकीय, सामाजिक, चरित्रात्मक, ललित, काव्य, कथा, कादंबरी, बालसाहित्य, विद्रोही साहित्य अशा सर्व प्रकारांच्या पुस्तकांसोबतच शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाची पुस्तकंही त्यांच्याकडे उपलब्ध होती. जवळच एक दहावीपर्यंतची शाळा होती. त्यामुळे वही पेन पेन्सिल असं विद्यार्थ्यांना लागणारं साहित्यही त्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलं होतं. इतकंच नाही तर वह्या पुस्तकांच्या खरेदीसाठी पालकांसोबत येणारी मुलं चॉकलेट्स मागतात म्हणून ती ही त्यांनी विक्रीसाठी ठेवलेली होती. छोट्याश्या जागेत अतिशय कल्पकतेने कप्पे तयार करून सगळ्या पुस्तकांची विषयवार विभागणी करून मांडणी केलेली होती. शैक्षणिक पुस्तके आणि लेखन साहित्याचा तर वेगळा विभागच केलेला होता. काऊंटरवर चॉकलेट्स च्या बरण्या ओळीने मांडल्या होत्या. त्याला लागूनच मांडलेल्या टेबलावर वर्तमानपत्रे आणि नियतकालिके व्यवस्थित ठेवलेली. त्याच्या मागे त्यांची खुर्ची अन् त्यांच्या खुर्चीच्या मागे पुस्तकांचे रॅक्स. आजूबाजूला वह्या पुस्तकांची अनेक मोठमोठी दुकानं होती. पण विजयाताईंकडे गिऱ्हाईक मोठ्या विश्वासाने यायचं कारण हवं असलेलं जे साहित्य किंवा पुस्तक इतर कुठेच मिळणार नाही ते विजयाताईंकडे अगदी हमखास मिळणारच याची खात्री असायची. शिवाय अगदी रास्त किंमतीत. म्हणूनच तर अवघ्या दहाच वर्षांच्या काळात त्यांच्या दुकानाचा चांगला नावलौकिक झाला होता. त्या शहरातील गिऱ्हाईक तर यायचंय पण आजूबाजूच्या शहरातील लोकही विजयाताईंच्या दुकानावर विश्वासाने यायचे. या दुकानाच्या बळावरच मुलीला शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचं धाडस त्या करू शकल्या.
तसं पाहिलं तर त्यांनी या शहरात पाऊल ठेवून तब्बल बावीस वर्षे उलटली होती. त्यातली पहिली बारा वर्षे खडतर वनवासाचीच. जीवनाने जहरी डंख मारणाऱ्या विखारी अनुभवांची पेरणी आयुष्यात करून ठेवली होती. अशाच एका जीवघेण्या काळोख्या मध्यरात्रीनं त्यांना या शहरातल्या बसस्टँडवर आणून सोडलं. आजूबाजूला अंधार होताच पण त्याहून कितीतरी जास्त गहिरा काळोख काळजात पसरलेला होता. डोळे स्वच्छ उघडे होते.. पण पावलापुढची वाट दिसत नव्हती. दिसत होती धगधगती आग.. ती बहुधा भुकेची होती किंवा सरणाचीही असू शकेल. सरण - जे गिळंकृत करण्यासाठी विजयाताईंच्या दिशेनं धाव घेत होतं.
तब्बल एक आठवडा त्यांनी याच शहराच्या बसस्टॅंडवर काढला. दिवसभर कुठेतरी कोपऱ्यात हात पसरून बसायचं. लोकांनी हातावर घातलेल्या भीकेतून पोटाची खळगी भराची. कुणा दानशूर महामानवाने उभारलेल्या पाणपोईचं पाणी प्यायचं. अन् रात्र झाली की हातपाय दुमडून त्याच कोपर्‍यात डोळे घट्ट बंद करून पडून राहायचं. आयुष्याला काही अर्थच उरला नव्हता. श्वास येतात जातात म्हणून स्वतःला जिवंत समजायचं. नसता देहाचं जणू मढं झालेलंच होतं. दुर्दैव असं की त्या मढ्यात चेतना जिवंत होत्या. कदाचित त्या स्वतःपुरत्या मर्यादित असत्या तर विजयाताईंनी कधीचंच संपवलं असतं स्वतःला... पण..!
त्यादिवशी त्यांच्या कोपऱ्यात त्यांच्या बाजूला आणखी एक मढं येऊन पडलं. तेही त्यांच्यासारखंच. श्वासोच्छवास चालतोय म्हणून जिवंत आहे असं म्हणायचं. अदरवाईज ते मढंच..! अंगावर फाटकी साडी, सुजलेले डोळे, गालांवर ओरबाडल्याच्या खुणा, फाटक्या ब्लाऊजमधून डोकावणाऱ्या पाठीवर काळेनिळे व्रण... अत्याचार पचवलेल्या बायका जशा असतात. तशीच तीही होती. विजयाताईंनी तिची चौकशी केली. काय झालं ते विचारलं. अन् तिनं सांगितलं... " हूंड्यासाठी मारहाण केली... बापाजवळ जेवढं होतं तेवढं दिलं त्यांनी... यांची पोटंच भरत नाहीत... " ती रडत नव्हती. कदाचित तिच्या डोळ्यांतले अश्रू आटले असावेत सगळे.
आतापर्यंत बधीर झालेल्या विजयाताईंच्या मेंदूला जणू तिच्या वेदनेच्या इंगळ्यांनी कडाडून दंश केला. सुशिक्षित सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या घरातून हूंड्यासाठी गृहलक्ष्मीला हाकलून लावलं जातं. जीव जाईपर्यंत तिला मारहाण केली जाते . का? पैशांसाठी?आणि तिनंही सगळं सहन करायचं का तर ती केवळ स्त्री आहे म्हणून? म्हणजे या दुनियेत स्त्रीच्या जीवनापेक्षाही पैसा अधिक मौल्यवान... अधिक महत्वाचा? स्त्रीची गरजच नाही का कुणाला? आणि त्यांना गरज नाही म्हणून तिने जन्मही घ्यायचा नाही. जगायचंही नाही? का? आमच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारे तुम्ही कोण? नाही नाही.. तो अधिकार तुम्हाला नाही.. आम्ही लढणार.. आम्ही जगणार.. तुमच्या नाकावर टिच्चून उभं राहणार. तुम्ही कितीही नाकारत राहा आमचं अस्तित्व.. पण आम्ही मिटणार नाहीत.. स्वतःला मिटवणार नाहीत.. मिटू देणार नाहीत.
विजयाताई त्या कोपऱ्यातून उठल्या. अगदी आत्मविश्वासाने उठून उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतःशीच काहीतरी ठरवलं होतं.
"कुठं चाललीस? " तिनं विचारलं.
" लढायला...! " विजयाताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला," तू ही उठ... चालायला लाग.. लढायला शीक ... जगायला लाग....!!"
" कोणासाठी? कोणाच्या आधारानं? " तिचा प्रश्न.
" स्वतःसाठी... स्वतःच्याच आधारानं... लक्षात ठेव... कोणाचाही आधार घ्यावा वाटणं म्हणजे मनाच्या दुर्बळतेला बळ देण्यासारखं आहे. जो कोणाच्याही आधाराशिवाय उभं राहण्याचा प्रयत्न करेल.. तो पडेल... धडपडेल.. पण जेव्हा उभा राहिल तेव्हा त्याला पाडण्याची ताकद कुणातच नसेल. कुणाच्या तरी आधारानं उभं राहणाऱ्यांचा आधार डळमळला.. की तो कोसळलाच म्हणून समजा..! उभं राहण्यासाठी वेळ लागला तर हरकत नाही.. पण त्यासाठी बळ स्वतःचंच असलं पाहिजे...मी उभी राहतेय.. तू ही उभी राहा...आयुष्याने पुन्हा कधी मनात आणलं तर भेट होईलच आपली कुठल्यातरी वळणावर... " विजयाताईंजवळच्या चिंधूकात भीक मागून जमा झालेले पोळ्या भाकरीचे वाळलेले तुकडे त्यांनी तिच्या पदरात टाकले. त्या बसस्टॅंडच्या बाहेर पडल्या. त्यानंतर ती स्त्री विजयाताईंना कधीही भेटली नाही.!
बसस्टँड सोडल्यानंतर विजयाताई या शहराच्या गल्लीबोळात भटकत राहिल्या. इथून तिथे. वाट फुटेल आणि पाय नेतील तिकडे. आणि एके ठिकाणी त्या थांबल्या. त्या गल्लीतल्या रस्त्यावर कचऱ्याचा भला मोठा ढिगारा साचलेला होता. कुबट वास येत होता. गल्लीतला प्रत्येक जण आपल्या घरातला कचरा त्या ठिकाणी आणून टाकायचा. पण इतका घाणेरडा वास सुटलेला असतानाही कुणाला तो कचरा तिथून उचलावासा वाटत नव्हता. कारण प्रत्येकाचं मत एकच, कचरा उचलणं - शहराची साफसफाई करणं हे शासनाचं काम आहे. गल्लीतले सगळे जण, 'सरकार येईल आणि कचरा उचलून घेऊन जाईल' याच अपेक्षेने वाट बघत होते. घराघरात घुसलेली ती दुर्गंधी सहन करत होते.
विजयाताई त्या रस्त्यावरून जात होत्या. कुठे जात होत्या त्यांनाच ठाऊक नव्हतं. त्यांच्या दिशाहीन प्रवासात पावलांखाली आलेल्या अनेक रस्त्यांपैकी हा एक रस्ता.. यापलीकडे त्यांची त्या रस्त्याशी ओळख नव्हती. पण त्या घाणेरड्या वासाच्या आगराजवळ येताच त्या थबकल्या. थांबल्या. इकडे तिकडे बघितलं आणि काय लक्षात आलं कुणास ठाऊक... खांद्यावरची ओढणी नाकाला बांधली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कुणीतरी फेकून दिलेलं प्लॅस्टिकचं फुटकं टोपलं उचललं. कचरा त्यात भरला. टोपलं उचलून डोक्यावर घेतलं. टोपलं फुटलेलं असल्याने अर्धी अधिक घाण त्यांच्याच अंगावर पडली. पण त्यांना त्याचा वास येत नव्हता. टोपल्यात भरलेला कचरा गल्लीच्या टोकाला असलेल्या भल्या मोठ्या कचराकुंडीत नेऊन टाकला. खरंतर लोकांनी इथे कचरा आणून टाकणं अपेक्षित होतं. इथून नगरपालिकेची घंटागाडी कचरा उचलून न्यायची. पण लोक कचराकुंडीपर्यंत येत नव्हते अन् घंटागाडी लोकांच्या दारापर्यंत जात नव्हती.
बसस्टँडवरच्या त्या कोपऱ्यातून निर्धाराने विजयाताई उठून उभ्या राहिल्या तेव्हाच त्यांनी मनाशी ठरवलं होतं, सफाई करायची..! स्वमनाची अन् समाजमनाचीही.. कदाचित हे त्या प्रवासाच्या दिशेने पहिलं पाऊल होतं. बघता बघता कचऱ्याचा अख्खा ढिगारा संपला. लोक दारात उभे राहून - खिडकीतून डोकावून, कुणी नाकाला रूमाल लावून, कुणी पदर लावून ते दृश्य बघत होते. किडकिडीत शरीराची एक सतरा अठरा वर्षांची मुलगी गल्ली स्वच्छ करतेय. लोकांनी केलेली घाण स्वतः उचलतेय. काहीही कारण नसताना. कसे कुणास ठाऊक पण कचऱ्याचा संपूर्ण ढिगारा उचलून झाल्यानंतर लोकांनी आपापल्या दारात उभे राहून टाळ्या वाजवल्या. ही विजयाताईंच्या कामाला समाजाकडून मिळालेली पहिली सलामी होती. त्यानंतर लोकांनी त्यांना पोळ्या- भाजी - भात- भाकरी जे काही असेल ते दिलं. काहींना दहा पाच रुपयेही दिले. चिखलात माखलेल्या ओढणीत विजयाताईंनी ते सगळं बांधून घेतलं अन् पुढे निघाल्या. पुढच्या गल्लीच्या स्वच्छतेसाठी...
कधी या मोहल्ल्यात कधी त्या गल्लीत विजयाताई स्वच्छता करत राहायच्या. लोकही जे शक्य होईल ते त्यांच्या पदरात टाकायचे. उदरनिर्वाहाचं साधन त्यांना मिळालं होतं. संध्याकाळच्या वेळी कोणत्याही एखाद्या धार्मिक प्रार्थना स्थळापुढच्या पटांगणाची झाडलोट करायची अन् तिथेच एका कोपर्‍यात पडून रात्र घालवायची. एकट्या तरूण बाईच्या बाईपणाला असणारा धोका टाळण्यासाठी प्रार्थना स्थळं ही त्यातल्या त्यात सुरक्षित आश्रयस्थानं. तिथं पाप करण्याची नाही म्हटलं तरी भिती वाटतेच माणसाला.!
वनवासातले सुरूवातीचे चार पाच महिने असेच ठेचाळत अडखळत काढले विजयाताईंनी. ही भटकंती एकटीच्या उदरनिर्वाहाचा विषय होता तोपर्यंत ठीक होती. त्यानंतर मात्र त्यांना कुठेतरी स्थिरावण्याची गरज वाटू लागली. गल्लीतले रस्ते स्वच्छ करणाऱ्या या मुलीकडे लोक स्वतःहून घराची स्वच्छता ठेवण्याची कामं देऊ लागले. अंगणाची झाडलोट करणे,नंतर घराची साफसफाई करणे ,धुणी भांडी करणे अशी कामं पुढे पुढे मिळत गेली. पोट भरण्याचा प्रश्न मिटला होता. कामाचे बऱ्यापैकी पैसेही मिळू लागले. अशातच एका सामाजिक कार्यकर्तीच्या शिफारशीनं गावाबाहेरच्या झोपडपट्टीत एका छोट्याश्या जागेत टीनपत्र्याची एक खोली मिळाली. विजयाताईंनी त्या पडक्या मोडक्या झोपडीत स्वतःचं विश्व उभं केलं. सध्याचं पुस्तकाचं दुकान हे त्या विश्वाचं दुसरं टोक होतं.
दुपार उलटून गेली होती. एकाण्या- दुकाण्या गिऱ्हाईकाचं येणं जाणं चालूच होतं. अवांतर वाचनाच्या पुस्तकापेक्षा शालेय पाठ्यक्रमाची पुस्तकं,वह्या, पेन पेन्सिलचं गिऱ्हाईक जास्त असायचं. अधेमधे थोडा वेळ मिळाला की विजयाताई एखादं नियतकालिक, एखाद्या आवडत्या लेखकाचं पुस्तक घेऊन बसायच्या. वाचनाची आवड होती म्हणूनच त्या या पुस्तकांच्या व्यवसायाकडे वळल्या असाव्यात.
"ट्रिंग ट्रिंग.." मोबाईल खणाणला. कुणाचातरी अननोन नंबर होता. विजयाताईंनी हिरवं बटन दाबलं.
"नमस्कार... मी लोकविकास पक्षाची प्रदेशाध्यक्षा बोलतेय... " तिकडून आवाज आला आणि विजयाताई गोंधळल्याच. राजकारणातल्या एवढ्या मातब्बर हस्तीचा फोन येणं ही खरोखरच त्यांच्यासाठी धक्कादायक बाब होती.
" अं.. नमस्कार.. हं.. हो बोला... " विजयाताई अडखळत बोलल्या.
" मग काय ठरलंय तुमचं? "
" क.. कशाचं..? "
" आमच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायच्या बाबतीत... हे बघा विजयाताई.. आम्ही तुमचं सामाजिक कार्य जाणतो. तुमचे स्वच्छ चारित्र्य.. जनमानसातील प्रतिमा.. या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून सगळ्या बाबींची व्यवस्थित माहिती घेऊनच आम्ही तुम्हाला उमेदवारी द्यायचं ठरवलंय... "
" अहो पण..."
" हे बघा विजयाताई... कित्येक माणसं संधीची वाट बघत सगळं आयुष्य वाया घालवतात. तुमच्या बाबतीत संधी स्वतः तुमचा दरवाजा ठोठावते आहे. आता दार उघडायचं की बंद ठेवायचं हा तुमचा प्रश्न आहे... " प्रदेशाध्यक्ष बाईंनी निर्णयाचा चेंडू विकिपीडिया विजयाताईंच्या दिशेने टोलवला.
" खरं तर तुम्ही अशी संधी मला देताय त्यासाठी मी आपले आभार मानायला हवेत.. पण मला तुमच्या राजकारणात आजिबात इंटरेस्ट नाही. त्यामुळे तुमच्या एखाद्या पदाची लालसा असण्याचा प्रश्नच नाही. मला असं वाटतं की मी तुमच्या राजकीय व्यवस्थेत अॅडजस्ट होऊ शकणार नाही..तरीही जर तुम्ही मला माझ्या पद्धतीने काम करू देणार असाल तर... मी विचार करीन.... " विजयाताई खूप विचारपूर्वक बोलत होत्या.
" अगदी मान्य.. तुमच्या सगळ्या अटी शर्ती मान्य... आम्हाला राजकारण बदलून टाकायचंय... देशाच्या व्यवस्थेत बदल घडवून दाखवयाचाय.. त्यासाठी तुमच्या सारख्या सुस्पष्ट विचारांच्या परिवर्तनवादी व्यक्तींची आम्हाला गरज आहे... " प्रदेशाध्यक्षा.
" असं असेल तर मी तयार आहे...! "
विजयाताईंनी राजकारणात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. कचऱ्याचा ढिगारा उचलण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आज सफाईच्या दिशेनं पुढचं पाऊल टाकत होतं. रस्त्यावरची घाण साफ करत सुरू झालेला स्वच्छतेचा प्रवास राजकारणाच्या साफसफाईच्या दिशेने चालला होता. पुढे काय होणार हे त्यांना कालही माहित नव्हतं. आजही माहीत नाही..! उद्याचा दिवस कसा असेल याचा विचार त्यांनी कालही केला नव्हता. तो त्या आजही करत नव्हत्या. त्यांना चालणं माहीत होतं अन् त्या पुढे पुढे चालत होत्या.. काळाला मागे टाकीत..!!

© सर्वाधिकार सुरक्षित -
© शिरीष पद्माकर देशमुख ®

{ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.
लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®