श्री दत्त अवतार भाग ४
श्री दत्तात्रेय यांच्या अवतारांचे जन्म.त्यांचे वास्तव्य,त्यांची विश्रांती स्थाने त्यांची कार्ये आणि त्यासंबंधात असलेल्या विविध कथा यासाठी काही गावे ओळखली जातात .
दत्तसंप्रदायात या गावांना अतिशय महत्व आहे .
दत्तभक्त यातील प्रत्येक गावाला भेट द्यायची मनीषा बाळगून असतात .
१)माहूर (नांदेड) महाराष्ट्र
हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे.
महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा, विष्णू, आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला.
हे क्षेत्र फार प्राचीन आहे.
ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांती स्थान सुध्दा म्हणतात.
ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ शक्ती पीठ आहे.
२) गिरनार जुनागड,सौराष्ट्र, गुजरात
हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.
याच ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला.
हे स्थान उंच पर्वतावर असून या ठिकाणी जाण्यासाठी जवळ जवळ १०००० पाय-या चढून जाव्या लागतात.
ह्या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत.
इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो असा प्रत्यय भक्तांना नेहमी येतो.
३) पिठापूर - (पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश
हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे.
या क्षेत्रास पादगया असे सुध्दा म्हणतात.
आपस्तंब शाखेतील आपलराज, आणि सुमती माता या ब्राह्मण दांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला होता .सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने दत्तात्रेयांना भिक्षा वाढली.
त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी मी तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशिर्वाद सुमती मातेस दिला होता .आंध्र प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाडा या गावाजवळ हे क्षेत्र आहे.
४) कुरवपूर (जि.रायचूर) कर्नाटक
हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे.
या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.
या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी जवळपास १४ वर्षे वास्तव्य केले.
श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा “या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.
याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.
रायचुर - हैद्राबाद या बस मार्गावर मतकल नावाचे गाव लागते तेथुन १६ कि.मी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या गावास जावे लागते.
पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.
५) कारंजा दत्त (वाशिम) महाराष्ट्र
हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे.
आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता.
हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे.
इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत.
श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.
६) नृसिंहवाडी-(कोल्हापूर, महाराष्ट्र)
हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे ७०० वर्षां पूर्वी वसले असून सद्गुरु दत्तत्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळखले जाते.
श्री नृसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री १२ वर्षे राहीले.
आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या आहेत.
त्यापैकी गुरु चरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे.
हे गाव नृसिंह वाडी पैलतीरी आहे .
बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशिर्वाद देऊन परत आणली त्याची उतराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे.
कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे परमप्रिय शिष्य श्री नृसिंह सरस्वती (दिक्षीत स्वामी) यांनी स्थापन केलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर, वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणी मंदिर आहे.
त्याचा जिर्णोध्दार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला आहे.
नृसिंह वाडीला काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी "वेदभवन" या वास्तुचे निर्माण केले आहे.
७) औदुंबर सांगली, महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्त क्षेत्र आहे.
श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे.
या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते.
कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरु चरित्राच्या अध्यायात आलेली आहे.
याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले.
याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरु चरित्र पारायण करणा-या भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल आणि त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील, असे वचन दिले.
८) गाणगापूर (गुलबर्गा, कर्नाटक)
गाणगापूर हे क्षेत्र मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्तव्यासाठी निवडले होते .
भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे.
या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून, यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र केला आहे.
या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे.
दत्त भक्तांची अशी भावना आहे की रोज दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात.
येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे.
हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे फार महत्त्वपूर्ण आहे.
क्रमशः