Lockdown - 6 in Marathi Short Stories by Shubham Patil books and stories PDF | लॉकडाउन - क्वारंटाइन सॉफ्टवेअर इंजिनीअर - भाग ६

Featured Books
Categories
Share

लॉकडाउन - क्वारंटाइन सॉफ्टवेअर इंजिनीअर - भाग ६

“रामराव, आहात का घरात?” पाटलांनी दारावर थाप मारत जोरात आरोळी मारली.

“या... या पाटील. काय म्हणतात, आज सकाळीच चरणकमल आमच्या घराला लावलेत. काय विशेष?” रमराव दार उघडत म्हणाले.

“तुमचे कुलदीपक आले म्हणे पहाटे, त्यांनाच घ्यायला आलोय.” पाटील मिशीला ताव देत म्हणाले.

पाटलांचे हे बोलणे ऐकून रामरावांचा चेहरा चिंताग्रस्त झाला. रामराव पाटील, गावातील एक उमदा शेतकरी माणूस. स्वभावाने चांगला. सुयोग, रामरावांचा एकुलता एक मुलगा. सॉफ्टवेअर इंजिनीअर. नोकरीला अर्थातच पुण्याला. उच्चशिक्षण देखील पुण्यालाच. त्यामुळे गावाशी फारसा संबंध नाहीच. काल रात्री दुचाकीवर मित्रासोबत घरी येण्यासाठी निघाला. तसं गाव त्याला आवडायचं नाही. पण आता गावी जाणं म्हणजे काळाची गरज होती. सर्वत्र कडक लॉकडाउन सुरू होते. पुण्यात कोरोना दिवसागणिक हातपाय पसरत होता. त्यामुळे प्रॉपर पुण्यातली सोडली तर, पोट भरण्यसाठी आणि गावाकडे कंपनी वा उद्योगधंदे नाहीत म्हणून पुणायला स्थलांतरित झालेली असंख्य मंडळी गावी परतत होती. आकाशमंडळात भास्कर असे पर्यन्त पोलिसांची करडी नजर चुकवून जाणे मुंगीलासुद्धा अशक्य होते. कुणी दिसताच त्याला चौदावे रत्न दाखवण्यात यायचे. दिवसाढवळ्या डोळ्यासमोर काजवे चमके पर्यन्त. पण रात्री काहीही कारण सांगून सटकता येणे शक्य असल्याने सुयोग रात्रीच निघाला. लॉकडाउन असल्याने रस्त्यावर एक हॉटेल उघडे असेल तर शपथ. त्यामुळे प्रवासात कुठेही चहा वगैरे घेताच आला नाही. पहाटे पाचच्या सुमारास सुयोग घरी आला. इतक्या सकाळी देखील तो नदीवर तुळस लावून येत असलेल्या रम्याच्या नजरेला पडला आणि रम्या तिकडेच पाटलाकडे गेला.

गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी पाटील, सरपंच वगैरे मंडळींनी एकत्र येऊन गावात गावाबाहेरील व्यक्तींना प्रवेश निषिद्ध केला होता. त्यासाठी ते स्वतः पहारा देत होते. गावाच्या दोन्ही प्रवेश्द्वारांवर आळीपाळीने ते ठाण मांडून होते. म्हणजे ते त्यांच्या मार्जिने तसं करत होते असे नाही, त्यांना सरकार कडून तशी सक्त ताकीद आली होती. नाहीतर पद जाणार होते. त्यामुळे हे सर्व करणे आगत्याचे होते.

“कुठे हरवलात रामराव?”

“काही नाही, अगं उठव त्याला.”

सुनिताबाईंनी दोनच तासांपूर्वी झोपलेल्या सुयोगला उठवले आणि पाटलांसमोर हजर केले.

“काय बाळ, कसा झाला प्रवास?” पाटलांनी आवाजात शक्य तितका मृदुपणा आणत म्हटले.

“ठीक झाला.” सुयोग जांभई आवरत म्हणाला.

“मग, आता आराम का?” पाटील.

“हो. रात्रभर गाडी चालवली हो. एक मिनिट सुद्धा झोपलो नाही.”

“बापरे, ते सर्व ठीक आहे, पण तुला क्वारांटाईन व्हावे लागेल.” पाटील थेट मुद्द्यावर आले.

“कुठे?” वक्राकार भुवया अजून ताणत सुयोग जवळपास किंचाळला.

“आपल्या शाळेत.” पाटील स्मितहास्य करत उद्गारले.

“त्या जिल्हा परिषदेच्या?”

“हो, त्याच. तिथे तुमची सर्व व्यवस्था केली आहे. खाणं – पिण – झोपण वगैरे एकदम मस्त.”

“मी घरी होतो ना त्यापेक्षा. मी रजा नाही टाकलीये मी घरूनच काम करणार आहे.”

“शाळेतून कर ना, कुणाला समजते?” पाटील डोळा मिचकवत म्हणाले.

“अहो पण....”

“बघा रामराव, तुम्ही सुशिक्षित आहात. आज तुम्हीच जर असे वागलात तर गावातील लोकांना कुणाचे उदाहरण देणार? ही काही सविनय कायदेभांगाची वेळ नव्हे. समजावा तुमच्या मुलाला. पुण्याहून आलाय म्हणून. जवळपासहून आला असता तर मी आलोदेखील नसतो. पण गावात कोरोनाची लागण झाली तर काय होईल आणि त्याला काही सीमेवर नाही पाठवत आहोत. चौदा दिवसांचा तर प्रश्न आहे. त्याला काहीही झाले नाही हे सर्वांना माहिती आहे पण सरकारी नियम पाळणे बंधनकारक आहे.” सुयोगला पुढचं काहीएक न बोलू देता पाटील रामरावांना जवळपास धमकावण्याच्या आवेशात म्हणाले.

“बरोबर आहे पाटील तुमचं. मी समजवतो त्याला. तुम्ही या. तो स्वतःच येईल शाळेत.”

“सुयोग बाळ, मी परत सांगण्याची गरज आहे का?”

“नाही बाबा, जातो मी.” सुयोग नाइलाजाने म्हणाला.

“छान, तू नको काळजी करूस, तो काही युद्धावर नाही चालला. गावातच आहे.” रामराव सुनीताबाईंना समजावत म्हणाले.

लॅपटॉप, मोबाइल या प्राथमिक जीवनावश्यक वस्तूंसोबतच इतर दुय्यम जीवनावश्यक वस्तू बॅगेत भरून सुयोगने प्रस्थान केले. शाळेच्या गेटवरच त्याच्या हातावर रीतसर क्वारांटाईन झाल्याचा शिक्का आशा सेविकांकडून मारून घेतला. त्याच्यावर काय लिहिले आहे हे बघत असतानाच त्याला आवाज आला. “मेरा बाप चोर है, असं लिहिल्यासारखा काय बघतोयस लेका.”

सुयोगने चमकून वर पहिले. तो विकास होता. सुयोगाचा बालपणीचा मित्र. “अरे विकास, इकडे कसा?”

“कसा म्हणजे काय? तू आलास तसा. चल मला सोबत झाली.” असे म्हणून तो खळखळून हसू लागला.

सर्व सोपस्कार यथास्थित पार पाडून सुयोग क्वारांटाईन झाला. दुसरीच्या वर्गात त्याची व्यवस्था होती. पहिलीच्या वर्गात पाच जण, दुसरीच्या वर्गात पाच असे सातवीच्या वर्गापर्यंत एकूण पस्तीस जण क्वारांटाईन झाले होते. आणि तिथेच रहात होते. गुण्यागोविंदाने. ही सर्व मंडळी मागील एक दोन दिवसांतच मंडळी इथे भर्ती झाली होती. सर्व मंडळी सुयोगच्या गावातील तथा शाळेत देखील एकदोन वर्ष मागेपुढे असल्याने सुयोग सर्वांना नावाने नाही पण चेहर्‍याने बर्‍यापैकी ओळखत होता. शाळेत असताना विकास त्याच्या वर्गात होता आणि आतदेखील तो त्याच वर्गात क्वारांटाईन झाला होता. निव्वळ विचित्र योगायोग.

सुयोग रात्रीच्या अविश्रांत प्रवासामुळे फार थकून गेला होता. त्यात अपूर्ण झोप. त्यामुळे त्याला झोपेची नितांत आवश्यकता होती. तो त्याचा दुसरीचा वर्ग न्याहाळू लागला. आठवणी पुसट होत्या, पण काहीतरी कुठेतरी घडल्यासारखं आठवत होतं. खाली सतरंज्या टाकल्या होत्या. हा शेवटी आला असल्याने जागा निवडण्याचा प्रश्नच नव्हता. जी सतरंजी रिकामी होती, तिच्यावर त्याने सामान टाकले. थोडी किळस येत होती, पण त्याला पर्याय नव्हता. कारण तो कधी खाली जमिनीवर झोपलाच नव्हता. वर कोळ्यांची जाळे, भिंतींचे पोपडे निघालेले, नावापुरता प्रकाश, स्वतःचेच घर असल्यासारख्या फिरणार्‍या पाली, त्यांची सावज पकडण्यासाठीची धडपड हे सर्व पाहून त्याला किळस वाटणे साहजिकच होते. कशीतरी त्याने टेकवली आणि बॅगेतून पाण्याची बाटली काढत असतानाच विकास आला. सुयोगचा चेहरा पाहून तो समजायचे ते समजला. मग त्याच्या जागेवर बसत म्हणाला, “सवय करा पाटील याची. आता सुटका नाही. तू झोप आता. थकला असशील.”

“हो, जेवायला उठव.” असे म्हणत सुयोग त्या सतरंजीवर आडवा झाला. त्या खोलीत त्याला कसेतरीच वाटत होते. पण काय करणार. त्याने फोन काढून बॉसला आज सुट्टीवर असल्याचा मेसेज केला आणि फोन स्विच ऑफ करून डोळे बंद केले. पडताच त्याला निद्रादेविने आपल्या ताब्यात घेतले. यथावकाश दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास त्याला विकासने माह्त्प्रयासाने उठवले. तो बाहेर शाळेच्या मैदानात आला तेव्हा मंडळी मोठे रिंगण करून बसली होती. ही दोघेपण त्यांच्यात सामील झाले. मग हातोहात केळीची पानं, पोळी, भजी स्वहस्ते वाढून घेण्यात आली आणि जेवण सुरू झालं. सुयोग अजूनही गुंगीतच होता आणि भूक देखील प्रचंड प्रमाणात लागलेली. त्यामुळे ते नावडते जेवण तो भुकेच्या सापट्यात फस्त करू लागला. जेवण वगैरे झाल्यावर तो परत झोपला तो सायंकाळच्या सुमारास उठला. त्याने फोन हातात घेतला आणि बॉसचे आलेले मिस्डकॉल आणि मेसेज पहात बसला. काहीतरी नवीन प्रोजेक्ट आला होता, त्या बाबतीत बॉसने त्याला अर्जंट फोन लावायला लावला होता. सुयोग त्या आपत्तीचे चिंतन करत होता, तोच विकास आला, “झाली का झोप?”

“झाली बाबा. फार थकलो होतो रे.”

“बरं ते जाऊ दे, चला खिचडी बनवायला.”

“आता? आणि मला काहीच नाही बनवता येत.”

"चल रे, आता पुण्यात नाहीस तू." असे म्हणत विकास सुयोगला जवळपास ढकलतच बाहेर मैदानात घेऊन आला. सर्व क्वारांटाईन मंडळींनी मिळून खिचडी केली आणि अगदी थोड्याच वेळात फस्त केली तेव्हा फक्त साडेसात वाजले होते. सुयोगने बॉसला फोन लावला. आधी बॉसचे बोलणे ऐकले आणि मग प्रोजेक्ट विषयी बोलला लागला. आज रात्री त्याला काम करण्यासाठी म्हणून बसावे लागणार होते. मंडळींची जेवणं झाल्यामुळे जवळपास सर्वजण आपापला मोबाइल चेक करण्यात व्यस्त होते. सुयोगने देखील लॅपटॉप काढले आणि चार्जिंग पॉइंट शोधू लागला. जिल्हा परिषदेची शाळा ती, तिथे कशाचा चार्जिंग पॉइंट आणि काय. ऑफिस मध्ये एक ईलेक्ट्रिक बोर्ड होते. तिथे सुयोगची सोय झाली. तो मोठ्या उत्साहात काम करायला बसला पण थोडेदेखील नेटवर्क असेल तर शपथ. मोबाइल बाहेर ठेवायचा हा एक पर्याय होता, पण मैदनवर मोबाइल ठेवला आणि चोरीला गेला तर. असे वाटून त्याने काहीतरी दूसरा मार्ग मिळतो का असा विचार करायला सुरुवात केली. त्याने बाहेर बघितले, मंडळी मैदानात झोपण्याची सोय करत होती. त्याने विचारल्यावर समजले की, सर्वजण रात्री बाहेरच झोपतात कारण उन्हाळा प्रचंड होता. त्याने विकासकडे मोबाइल दिला आणि काम सुरू करावे म्हणून ऑफिसमध्ये गेला. हे तेच ऑफिस होते जिथे जायला तो आधी खूप घाबरायचा. कारण तिथे हेडमास्तर असायचे. त्याला ते दिवस आठवले. तो स्वतःशीच हसला. लॅपटॉप सुरू केले आणि बघतो तर काय नेटवर्क नव्हतेच. सुयोग वैतागला. क्वारांटाईन मंडळीपैकी जवळपास सर्वांचे रोजचे नेट संपले होते.

मग शांतपणे लॅपटॉप बंद करून बागेत ठेवले आणि सतरंजी घेऊन मैदानात आला. विकासच्या बाजूला सतरंजी अंथरुन आडवा झाला. त्यांच्या बालपणीच्या गप्पा सुरू झाल्या मग. याच मैदानावर त्यांची सकाळी प्रार्थना व्हायची. डबे देखील ते इथेच खायचे. कितीतरी लहान वाटत होते ते मैदान आता. मैदान होते तसेच होते, मंडळी मोठी झाली होती. यांच्या गप्पा सुरू झाल्यावर बाकीचे दोन-चार जण यांना सामील झाले. मग काही वेळाने अजून पाच-सहा. असे करत करत सर्व जण बालपणींच्या आठवणींमध्ये रमून गेले. हास्याविनोद सुरू झाले. एकमेकांची टिंगल करणे सुरू झाले. अगदी लहानपणी करायचे तसे. मोठे झाले म्हणून काय त्यांच्यातले लहान, खट्याळ मूल अजून जीवंत होते. किंबहुना ते निद्रिस्त झाले होते, त्याला जागवले होते ते या शाळेने, गावाने आणि सर्वांच्या सहवासाने. एकमेकांच्या विचारपूस सुरू झाल्या, विषय नागमोडी वळणे घेऊ लागले. तो आता काय करतो, ती कुठे आहे, याच्या लग्नाला काय मजा आली होती, त्या दिवशी अचानक ती भेटली होती. वगैरे, वगैरे. खेदाची गोष्ट म्हणजे सुयोगकुमार यांच्यात कुठेच नव्हता. तो फक्त ते क्षण मुकेपणाने ऐकत होता. बळेच हसत होता. त्यांच्यात सामील व्हायचा प्रयत्न करत होता. पण चोवीस तास कम्प्युटरची स्क्रीन बघणायची सवय असलेले त्याचे मन हा खर्‍याखुर्‍या माणसांमध्ये रामण्यास कुठेतरी आडकाठी लावत होते. बराच वेळ झाल्यावर गप्पा संपल्या. सर्व जण झोपले तरी हा जागाच. घुबडासारखा. मग तो मैदानात ऊगाचच फेर्‍या मारू लागला. हात मागे बांधून. दुरूनच कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते. हा मात्र फिरत होता. अस्वस्थपणे. या अस्वस्थतेचे कारण त्यालाच समजत नव्हते. कितीतरी दिवसांत नव्हे तर वर्षांत तो त्याच्या मित्रांमध्ये असा गप्पा मारायला बसला होता. नवीन प्रोजेक्ट डोक्यावर होता, नेटवर्कमूळे काम करता येणे केवळ अशक्य होते. यावर उपाय काय असा विचार करण्यातच मध्यरात्र झाली. काहीतरी सुचल्यासारखे झाल्यावर त्याने मोबाइल काढला आणि बॉसला एक लांबलचक मेल लिहून निश्चिंतपणे आडवा झाला. त्याने दोन आठवडे रजा टाकली होती. त्याच्या भरपूर सुट्ट्या बाकी होत्या आणि कामात तरबेज असल्यामुळे बॉस काही जास्त विरोध करू शकणार नव्हता, ही गोष्ट त्याने हेरली होती. या गोष्टीवर त्याने स्वतःलाच शाबासकी दिली.

सकाळी जाग आली तेव्हा त्याच्यासमोर बरेच जण व्यायाम वगैरे करताना दिसले. मजा म्हणून तो त्यांची गंमत पाहू लागला. तेव्हा इतरांनी त्याला त्यांच्यात सामील करून घेतले. मग चांगला घाम निथळेपर्यंत योगासने, प्राणायाम झाल्यावर अंघोळीसाठी म्हणून कपडे घेऊन सर्वजण नदीकडे निघाले. सुयोगला हा प्रकार आवडला. स्विमिंग पूल मधील बंदिस्त पाण्यात पोहलेला सुयोग आता नदीतील निर्धास्त आणि बिनधास्त पाण्यात पोहणार होता. त्याला परत लहानपणीचे दिवस आठवले. त्याला आता पावलोपावली या आठवणी येत होत्या. तो हे सर्व लहानपणी अनुभवला होता. पण मध्येच पारखा झाला होता. इतका की आता हे सर्व त्याला नवीनच वाटत होते. गावातील लोकं त्या जथ्थ्याकडे कुतूहलपूर्वक पाहू लागले. नदीचे थंडगार पाणी अंगाला लागताच सुयोग शहारला. मनसोक्त डुंबून झाल्यावर स्वारी परत शाळेकडे निघाली. तो पर्यन्त दूध आलेले होतेच. सकाळच्या कसरतीने आणि पोहण्याने सर्वांना भुका लागल्या होत्या. मग वेळ न दडवता सर्वांनी दूध प्राशन केले आणि शांत बसून राहिले. आता सर्वांपुढे गहन प्रश्न होता की करायचे काय? कारण अजून दिवसाला फक्त सुरुवात झाली होती. वैशाख महिन्यातील उष्ण दिवस होते ते. नुसत्याच वर्गात बसून काय करणार, त्यापेक्षा मैदानातल्या झाडाच्या सावलीत किंवा व्हरांड्यात बसणे हा एक चांगला पर्याय होता. शेवटी सर्वजण झाडाखाली बसले आणि आता काय करायचे या विषयावर एक परिसंवाद सुरू झाला. त्यांच्यात एक प्राध्यापक महाशय होते, त्यांनी न सांगताच परिसंवादाचे अध्यक्षपद घेतले. हे महाशय पंचक्रोशीत बर्‍यापैकी प्रसिद्ध होते. यामुळे त्यांच्या ओळखीचा आणि प्रसिद्धीचा वापर करून शेजारच्या गावातील वाचनालयातून पुस्तके आणण्याचे ठरले. सर्वांनी एकमताने होकार दर्शवला. लगेचच मागणी पत्र वागैरे तयार झाले आणि संध्याकाळपर्यन्त पुस्तके येतील अशी ग्वाही देऊन प्राध्यापक महोदय भाव खाऊन गेले.

यथावकाश दुपारच्या जेवणाची तयारी झाली. मग जेवणं झाल्यावर वामकुक्षी वगैरे. ठरल्याप्रमाणे सायंकाळी प्राध्यापकांचा विद्यार्थी गोणीभर पुस्तकं घेऊन आला. मग हौशी वाचकांनी लगेचच चांगली पुस्तकं निवडून घेतली. ते मराठी साहित्य बघून सुयोग थोडा ओशाळला. त्याला इंग्रजी साहित्य वाचण्याची आवड. मग त्याने एक कादंबरी हतात घेतली आणि चाळत बसला. काळोख पडण्याच्या सुमारास परत खिचडीची तयारी सुरू झाली. या स्वैपाकात मात्र मजा होती. कारण थोड्या-थोड्या गोष्टींवरून देखील भांडण होण्याचा संभव असे. म्हणजे तेल इतकेच का टाकले, बटाट्यांची साल का काढली नाही ह्या बाबीदेखील बिनसण्यासाठी पुरेश्या होत्या. पण या भांडणातून होणारी खिचडी मात्र अप्रतिम असे. मग वेगवेगळ्या पाककृती तयार करण्यास सुरुवात झाली. हौशी मंडळी ती. मंडळाच्या साहित्यातून हवे ते समान मिळू लागले. मग बुंदी पडून झाली, जिलेबी झाली, अगदी बलुशाही सुद्धा. रोज मेजवान्या झडू लागल्या. नियतीपण किती विचित्र असते. इकडे जग कोरोनामुळे गर्भगळीत झाले होते आणि मंडळी मात्र मजा करत होती. मनसोक्त आणि आकंठ.

मग असेच दिवस जाऊ लागले. आनंदात, थट्टामस्करी करण्यात. या सोन्याच्या दिवसांची सुयोग मनापासून मजा घेऊ लागला. तो देखील आता त्यांच्यातलाच एक झाला. कामासाठी रात्रभर जागणार्‍या सुयोगला कोरोनाने जगणं शिकवलं हे मात्र खरं. माणसांतून यंत्रात गेलेला सुयोग परत माणसांत आला. त्याने वाचलेले साहित्य त्याने शतशः अनुभवले. त्याने गावाकडच्या गोष्टी वाचल्या, मिरासदार वाचले, बनगरवाडी वाचली, आनंद यादव झोंबी सकट सगळे वाचले. इथे त्याने खरे साहित्य अनुभवले. ग्रामीण साहित्य. शुद्ध आणि स्वच्छ. खर्‍या अनुभवांचे एक शब्दचित्र. त्याला त्या इंग्रजी साहित्यापेक्षा हे मराठी साहित्यच जास्त आवडले.

मग यथावकाश चौदा दिवस संपले. संपले कसले, भुर्रकन उडाले. एखाद्या पक्ष्यासारखे. या दोन आठवड्यांत सर्वजण अगदी गुटगूटीत झाले होते. सर्वजण मनसोक्त जगले होते. आयुष्यात पहिल्यांदा. नाहीतर नोकरदार मंडळींना कुठे उसंत. तिकडे लोकं जीव जाण्याची भीती उराशी घेऊन जगत होते, तर या मंडळींनी या दोन आठवड्यांत मनसोक्त जगून परत नवीन संकटांचा सामना करण्यासाठी तयारी करून ठेवली होती. शेवटच्या दिवशी सर्वजण थोडे हळवे झाले. रोज सकाळी नदीवरील आंघोळ आणि सायंकाळी मारुतीच्या पारावर गप्पा या गोष्टींसाठी एकमेकांशी वचनबद्ध होत आपआपल्या गल्लीची वाट धरली.