Shree Datt Avtar - 3 in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | श्री दत्त अवतार भाग ३

Featured Books
Categories
Share

श्री दत्त अवतार भाग ३

श्री दत्त अवतार भाग ३

तेव्हा ते तिघेजण (ब्रह्मा-विष्णु-महेश) म्हणाले

"ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो."

अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकात यवयास निघाले.

त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले.

भर दुपारची वेळ !
ऊन मी म्हणत होते.

अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले.

त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले-
"आम्हीलांबून आलो असुन, तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे की, तू नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावे.

“आसनी बैसतां सत्वर । म्हणती क्षुधा लागली फार ।नग्न होऊनि निर्धार । इच्छाभोजन देइंजे ॥

हे त्यांचे बोलणे ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली. 'हे कोणीमहान पुरुष माझे सत्त्व पाहाण्याकरिता आले असावेत, यांना जर विन्मुख पाठवले तर माझ्या स्वत्वाची हानि होईल.

माझें मन निर्मळ आहे.

शिवाय माझ्या पतीचे “तपःसामर्थ्य” माझ्यामागे आहे.' असे मनात आणून सती म्हणाली, -

"थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते.''

एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरात गेली.

त्या वेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते.

त्यांस ही सारी कथा निवेदन केली.

तेव्हा मुनीनी अंतर्ज्ञानाने ओळखले की,प्रत्यक्ष त्रिमूर्ती आपल्याकडे आलेत .

आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, "हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे.

त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ लहान बालक झाले

हें जाणोनियां मानसीं । तीर्थगंडी देई कांतेसी । गंगा प्रोक्षूनि तिघांसी । भोजन देई जाण पां ॥

तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली.

हातातील गंगोदक त्या तिघावर शिंपडले.

त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालके झाले.

अगदी लहान लहान अशी बालके !!

ती तीन गोजिरी गोजिरी बालके पायांजवळ रांगत येऊ लागली.

जेव्हा ती बालके भुकेने रडू लागली.

तेव्हा अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणें-

त्यांना यथेच्छ स्तनपान करविले.

त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजविले.

अशी कित्येक युगे लोटली.

पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली.

असाच बराच मोठा काळ पार पडला .

एकदा नारदमुनींची स्वारी अत्रिमुनीच्या आश्रमात आली.

मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हां त्याच ठिकाणीं ती तीन बालके
( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली.

नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत.

अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली.

तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.

तेव्हा त्या तिघींनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, 'हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमात घेऊन चला.

म्हणजे आम्ही आपापले पती परत शोधून घेऊन येऊ.

तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला.

इकडे या तिघी अनुसूयेकडे गेल्या.

त्यांनी तिची करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली.

ते ऐकुन अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला.

तेव्हा अत्रिमुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले.

तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली.

त्या बालकावर गंगोदक शिंपडले.

ती बालके पूर्ववत् ब्रह्मा- विष्णु- महेश स्वरूपात आली.

इतक्यात अत्रिमुनी बाहेर आले.

त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला.

त्यावेळी विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले व म्हणाले, "हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग !"

तेव्हां अनुसूयेने तुम्ही तिघे बालक (ब्रह्मा - विष्णु- महेश) माझ्या घरी तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाणे रहावे वर मागितला.

तेव्हा 'तथास्तु' असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात जन्माला आले .

अशा प्रकारे मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला.

तीन शिरे, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला.

ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य झाली !

तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या प्रत्येक देवालयात दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो.

हा जन्म सोहळा दुपारी १२ वाजता केला जातो.

काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो.

दत्त जन्माविषयी आणखी काही कथा आहेत .

वैकुंठीच्या राणाने अनेक अवतार धारण केले. काही अवतार दैत्यनाशासाठी केले.

काही भक्तरक्षणासाठी केले.

आणि ते कार्य झाल्यावर भगवंतानी लगेच अवतार समाप्ती केली.

मात्र त्यापूर्वी श्रीदत्तअवतार हा काही वेगळाच, विलक्षण, दिव्य असा अविनाशी अवतार भक्तांच्या प्रबोधनासाठी धारण केला. या अवतारातही भगवंत शत्रूनाश करीत असतात.

पण ते बाह्य शत्रू नसतात .

देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आले.

श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात अशी आहे.

अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली.

ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी.

देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा अशी आहे, की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली.

अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली.

अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले सहस्त्रार्जुन ,कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात. या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘सांस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे. या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली.

क्रमशः