gotya - 1 in Marathi Fiction Stories by Na Sa Yeotikar books and stories PDF | गोट्या - भाग 1

Featured Books
Categories
Share

गोट्या - भाग 1

आज दूरदर्शनवरील पुनः प्रक्षेपित होत असलेले रामायण मालिका पाहतांना गोट्याला म्हणजे सोहमला त्याचे 20-25 वर्षापूर्वीचे बालपण आठवून गेले. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले होते. कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे म्हणून सरकारने सक्तीचे आदेश काढले. घरात बसून बसून लोकांना कंटाळा येऊ नये म्हणून सरकारने पुनश्च एकदा जुनी मालिका रामायण दाखविण्यास प्रारंभ केले होते. आज ती रामायण मालिका पाहतांना गोट्याला ती मजा येत नव्हती, जी मजा त्याने लहानपणी अनुभवली. तो आपल्या भूतकाळात रमला.
खरं तर त्याचे नाव सोहम होते पण घरात, दारात, गल्लीत सर्वत्र तो गोट्या या नावानेच प्रसिद्ध होता. त्याला कारण ही तसेच होते. सोहम अगदी लहान म्हणजे शाळेत जाण्याचे वय नसल्यापासून गोट्या खेळायचा. गोट्या असा खेळायचा की त्यात त्याचा विजय ठरलेला असायचा. त्याच्या खिशात नेहमी खिसा भरून गोट्या असायच्या म्हणूनच त्याचं नाव गोट्या पडलं होतं. खूप वेळा त्यासाठी त्याला आई-बाबांच्या शिव्या देखील खाव्या लागल्या. त्याचे वडील एका सरकारी शाळेत शिक्षक होते, त्यांची आणि गोट्याची भेट रविवार ते रविवारीच व्हायची. आई घर काम आणि शेती काम करायची. गोट्यापेक्षा एक मोठी बहीण होती. असे इनमिन हम दो हमारे दो असा त्यांचा परिवार होता. गोट्या घरात लहान असल्यामुळे सर्वजण त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे आणि तो देखील रडून रडून आपला हट्ट पूर्ण करून घ्यायचा. गोट्याचे शाळेत जाण्याचे वय झाले होते मात्र तो काही शाळेत जाण्यास तयार होत नव्हता. त्याची मोठी बहीण चौथ्या वर्गात शिकत होती. शेवटी एके दिवशी तिने गोट्याला घेऊन शाळेत गेली आणि त्याचा शाळेचा प्रवास सुरु झाला. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे गल्लीमधले पाच सहा मुलं त्याच्या वर्गात त्याला दिसली त्यामुळे अजून आनंद वाटला. ते सर्वच मित्र मिळून शाळेत अनेक खेळ खेळू लागले, सोबत गोट्याचा खेळ देखील होताच. शाळेतून घरी आलं की दप्तर फेकून द्यायचं आणि खेळायला बाहेर जायचं हा त्याचा रोजचा दिनक्रम असे. दिवे लावणीच्या वेळी घरी यायचे, हात पाय धुयायचे, शुभम करोती म्हणायचं आणि जेवण करून झोपी जायचं. सकाळी उठलं की परत थोडा वेळ खेळायचं आणि स्नान करून शाळेला जायचं, या रीतीने तो हळूहळू मोठा होऊ लागला. शाळेच्या अभ्यासापेक्षा त्याचा खेळण्यावर जास्त लक्ष होता. घरी येऊन त्याने कधी ही पुस्तक उघडून अभ्यास केला नाही त्यामुळे आईला त्याची काळजी वाटायची. चौथी बोर्ड परीक्षेच्या काळात त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावे म्हणून आईने विशेष करून वडिलांनी कडक सूचना केली. थोडा खेळ कमी करून त्याने बोर्डाचा अभ्यास केला आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण देखील झाला. त्यापुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागत असे. तो देखील त्या गावी जाण्यासाठी तयार झाला. तीन किमीवरच्या शाळेत काही मित्रासोबत चालत जायचा. त्या गावात एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी एक टीव्ही होती. नुकतेच रामानंद सागर यांचं रामायण ही मालिका चालू झाली होती. ती मालिका दर रविवारी सकाळी नऊ वाजता दाखविल्या जायचे. गावात तर कोणाच्या घरी टीव्ही नव्हती. सुट्टी असून देखील गोट्या रामायण मालिका बघायला त्या गावात जायचा. ते छोटंसं घर होते, मात्र सर्वजण दाटीवाटीने बसून रामायण बघायचे बघायचे. मालिका संपल्यावर घराचा रस्ता धरायचा. रस्त्याने मग त्याच मालिकेविषयी चर्चा व्हायची. घरात कोणाला कळू नये म्हणून बॅटबॉल सोबत घेऊन जायचं आणि कोणी विचारलं कुठं गेला होता ? तर उत्तर ठरलेलं असायचा क्रिकेट खेळायला. रामायणची प्रसिद्धी पाहून त्या गावातील एकाने कलर टीव्ही आणली आणि रामायण मालिका बघायला पैसे घेऊ लागला. कलर टीव्ही बघण्याची हौस पूर्ण करण्यासाठी सर्व मित्र एकत्र येऊन पैसे जमवायचं आणि कलर टीव्हीवर रामायण बघण्याचा आनंद घ्यायचा.
क्रमशः

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769