श्री दत्त अवतार भाग १
श्री दत्तावताराचे प्रयोजन
श्री दत्तात्रेय ही देवता कशी आहे, तिचे स्वरुप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरुप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसंन्नतेचा प्रसाद म्हणुन काय प्राप्त होते,याविषयी असे म्हणले जाते की ...
आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांची सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे.
हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो.
श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वयंभु मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते.
या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.
त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल.
यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत.
श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे.
तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे.
निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू.
अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू.
संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे.
गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो.
श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे.
सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो.
परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे.
ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे.
दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे.
दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो,कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते.
दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे.
वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे.
दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदांताच्या पायावरच उभे आहे.
‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच अद्वैत ओळखले जाते .
गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही. त्या टिकविण्यासीठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात.
कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त त्यांच्या नावेत रहावे.
ही नाव वल्हविण्याचा प्रयत्न करायचा नाही .
जसे नावेत बसल्यावर किनारी पोहोचविण्याचे काम नावाड्याचे असते.
तसेच आपण श्रीगुरूंची कास धरून ठेवावी. ते पैलतीरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात.
शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरुंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्धशर्करा योगच समजावा.
वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्
भगवान श्रीदत्तप्रभू हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत.
जगन्नियंत्या श्रीभगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्रीदत्तप्रभू.
म्हणूनच त्यांना ' जगद्गुरु ' म्हणतात.
अज्ञानामुळेच जीव आपले मूळचे ब्रह्मस्वरूप विसरून मायेच्या कचाट्यात सापडून दु:ख भोगत असतो.
दु:खी कष्टी जीवांचा कळवळा येऊन श्रीभगवंतच श्रीदत्तप्रभूंच्या रूपाने प्रकट होतात व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्याना आत्मबोध करतात.
या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन्हा पुन्हा अवतरित होतात. ही परंपरा आजही चालूच आहे.
श्रीभगवंतांचे अवतार ज्या कार्यासाठी होतात, ते कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन होऊन जातात. पण श्रीदत्तप्रभूंच्या अवताराचे तसे नाही. जोवर माया आहे तोवर अज्ञान आहेच व तोपर्यंत श्रीदत्तप्रभूंचे कार्य पूर्ण झालेले नसल्याने ते कार्यरत राहणारच.
म्हणूनच श्रीदत्तप्रभूंना' चिरंजीव अवतार' म्हणतात.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अलौकिक स्वरूपाची काही विलक्षण वैशिष्ट्ये आहेत.
श्रीदत्तप्रभू हे भगवान ब्रह्मा, विष्णू व महेशांचे एकत्रित स्वरूप आहेत.
जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभूंचे सहा हात हे सहा शास्त्रांचे, षड्दर्शनांचे प्रतीक आहेत. कपिलमुनींचे सांख्य, कणादांचे वैशेषिक, पतंजलींचे योग, न्याय, मीमांसा व वेदान्त ही सहा दर्शने अथवा शास्त्रे आहेत.
साक्षात् परब्रह्म भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु असल्याने ही सर्व शास्त्रे जणू त्यांच्या पावन देहाचे अवयवच आहेत.
त्यांच्या सहा हातांमध्ये प्रत्येकी दोन आयुधे मिळून सहा आयुधे आहेत.
भगवान श्रीदत्तात्रेयांचे सहा हात हे सहा शास्त्रांचे निदर्शक आहेत.
श्रीदत्तप्रभूंचे तीन उजवे हात भक्तांसाठी आहेत तर तीन डावे हात अभक्तांसाठी, शत्रूंसाठी आहेत.
उजवी बाजू आपल्याकडे पवित्र मानली जाते, तसेच भक्तांना देवांकडे प्रथम मान आहे, म्हणून त्यांना उजवी बाजू दिलेली आहे.
हातातील माळ – जपासाठी
डमरू - व्याकरण आदी शास्त्रे शिकवण्यासाठी
व शंख - ज्ञान देण्यासाठी.
सर्वात वरच्या हातात भगवान विष्णूंचे 'शंख' हे आयुध आहे. या शंखाच्या स्पर्शाने भगवंत शिष्यांना ज्ञानदान करतात. ध्रुवबाळाच्या गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श करून श्रीभगवंतांनी ज्ञान दिल्याचा उल्लेख भागवतात व श्री ज्ञानेश्वरीत आहे.
मधल्या हातात 'डमरू' हे शिवांचे आयुध आहे. त्याचा वापर व्याकरणादी शास्त्रे शिकवण्यासाठी होतो. व्याकरण शास्त्राची मूळ सूत्रे भगवान शिवांनी डमरूच्या नादातूनच निर्माण केलेली आहेत.
भक्तांसाठी असलेल्या उजवीकडील तीन हातांपैकी, सर्वात खालच्या हातात त्यांनी ब्रह्मदेवांचे आयुध असणारी जपाची 'माळ' धारण केलेली आहे. आपल्या भक्तांना सतत नामस्मरण करण्याचा त्याद्वारे श्रीदत्तप्रभू बोध करतात.
या तिन्ही हातांचा व त्यातील आयुधांचा, जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू आपल्या शरणागत शिष्यांवर कृपाप्रसाद देण्यासाठीच उपयोग करतात.
भगवान श्रीदत्तात्रेयांचे डावीकडील तीन हात अभक्तांसाठी, दुष्टांसाठी आहेत.
कमंडलू - पाणी मारून वैरी नाशासाठी
त्रिशूळ - दूर असलेल्या शत्रूला मारण्यासाठी
चक्र - फारच दूरच्या दुष्ट शक्तींना मारण्यासाठी.
श्रीदत्तप्रभूंनी डावीकडील सर्वात खालच्या हातात ब्रह्मदेवांचे 'कमंडलू' हे आयुध धारण केलेले आहे. यातील पाणी मारून ते धर्माचे व सज्जनांचे तसेच भक्तांचे वैर करणारे, त्यांना अकारण त्रास देणारे शत्रू मारून टाकतात. मधल्या हातात त्यांनी भगवान शिवांचे 'त्रिशूल' हे आयुध धारण केलेले आहे. हे त्रिशूल फेकून दूरचे शत्रू ते नष्ट करतात. सर्वात वरच्या हातात त्यांनी भगवान श्रीविष्णूंचे 'चक्र' हे आयुध धारण केलेले आहे. फारच दूरच्या दुष्ट शक्तींचा नि:पात करण्यासाठी त्या चक्राचा ते उपयोग करतात.
भगवान श्रीदत्तप्रभू हे भक्तवत्सल भक्ताभिमानी व दुष्टनिर्दालन करणारे आहेत.
परशुराम-रेणुका संप्रदायाचा दत्तात्रेय संप्रदायाशी संबंध जोडला जातो. जमदग्नी आणि रेणुकापुत्र परशुराम यांनी गुरू दत्तात्रेयांकडे दीक्षा घेतली होती, असे गोपीनाथ कवीराज त्रिपुरा रहस्याचा हवाला देऊन सांगतात.
या दोन्ही संप्रदायांचे तीर्थक्षेत्र माहूर होते .
क्रमशः