Adhikashy adhikan falam in Marathi Spiritual Stories by Aaryaa Joshi books and stories PDF | अधिकस्य अधिकं फलं- अधिक मासाचे महत्व

Featured Books
Categories
Share

अधिकस्य अधिकं फलं- अधिक मासाचे महत्व

अधिकस्य अधिकं फलं- अधिक मासाचे महत्व

डॉ. आर्या जोशी

दर तीन वर्षांनी येणारा अधिक महिना. या महिन्यात जावयाला अनारशाचे वाण देणे, भागवत पुराणाचे वाचन करणे, जप करणे, विष्णूस्वरूप सूर्यदेवतेची पूजा करणे या गोष्टी अधिक महिन्यात केल्या जातात. परंतु नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा एखादे शुभ कार्य करणे हे मात्र आपण अधिक महिन्यात करण्याचे टाळतो... काय आहे हा अधिक महिना ? आणि याचे स्वरूप काय? चला जाणून घेऊया या महिन्याबद्दल “ अधिक” माहिती.

संपूर्ण भारतातच अधिक महिना श्रद्धेने पाळला जातो. या महिन्यामध्ये केलेली पुण्यकर्मे आपल्याला “अधिक” फल मिळवून देतात अशी आपली धारणा आहे.

आपण भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे पालन करतो. आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचा आधार आहेत “ वेद”. आपल्या सर्व धर्माचे मूळ वेदात आहे असे शास्त्र वचन प्रसिद्ध आहेच. त्यामुळे “अधिक मास” या धार्मिक संकल्पनेबद्दल समजून घ्यायचे असेल तर आपल्याला वैदिक साहित्यही शोधले पाहिजे. वैदिक साहित्य संस्कृत भाषेत रचले गेलेले असल्याने सर्वसामान्यपणे आपण ते वाचायला जात नाही कारण ते आपल्याला अवघड वाटते. पण भारतीय संस्कृती, धर्म आणि परंपरेतील विविध संकल्पना वेदातच उगम पावलेल्या आहेत. अधिक महिना हा सुद्धा त्याला अपवाद नाही.

यज्ञसंस्था ही सुद्धा भारतीय धर्म- संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे. आपणही विविध विधीच्या निमित्ताने लहान- मोठे यज्ञ करीत असतोच. वास्तुशांती, साठीशांती, विवाह, मुंज अशा निमित्ताने आपण अग्नीत आहुती देतोच. मोठे यागही समाजात ठिकठिकाणी होताना दिसतात. दत्त याग, गणेश याग, गायत्री याग असे मोठे यज्ञ जगाच्या कल्याणासाठी करण्याची भारतीय परंपरा आहेच. या परंपरेचे मूळ प्राचीन वैदिक यज्ञसंस्थेत आपल्याला सापडते.

वैदिक काळातील ऋषी मोठे यज्ञ करीत असत. त्यांना “याग” किंवा “सत्र” असे म्हटले जाई. हे याग कसे करावे याविषयी आपल्याला प्राचीन संस्कृत ग्रंथात वर्णने सापडतात.

चांद्र म्हणजे चंद्रावर आधारित आणि सौर म्हणजे सूर्यावर आधारित कालगणना ही वैदिक कालपासून अस्तित्वात आहे. आता आपण सर्व ठिकाणी ग्रेगोरियन पद्धतीची कालगणना वापरतो. बारा महिन्याचे एक वर्ष ही कल्पना देखील वैदिक काळातीलच आहे. चांद्र कालगणना आपल्याला तिथी, व्रतवैकल्ये, सणवार यांच्या माहितीसाठी मर्यादित स्वरूपातच माहिती असते. पण या दोन्ही कालगणना पद्धती प्राचीन आहेत हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.

यामध्ये एक गंमत अशी दिसून येते की सौर कालगणनेनुसार एका वर्षात ३६५ दिवस असतात आणि चांद्र कालगणनेनुसार एका वर्षात ३५४ दिवसच असतात. त्यामुळे असे होते की १२ चांद्र महिने म्हणजे एक वर्ष असे मानले तर हळूहळू एक एक महिनामागे पडत जाईल. असे होता कामा नये यासाठी ३२ किंवा ३३ चांद्र महिन्यांच्यानंतर एक चांद्र महिना “ अधिक" धरावा लागेल ज्यामुळे सौर वर्ष आणि चांद्र वर्ष हे एकमेकांशी जुळलेले राहतील. वैदिक काळातच याचा विचार केला गेला आणि अधिक महिना किंवा अधिक मास ही कल्पना अस्तित्वात आली.

याग किंवा सत्रे ही केवळ एक दिवसाची किंवा काही विशिष्ट दिवस चालणारी अशी नसत. अनेक मोठे याग हे एक-एक वर्ष सुरु असत.(यज्ञ आणि संवत्सर( वर्ष) हे समानवाचक शब्द म्हणजे समान अर्थाचे शब्द असल्याचे उल्लेख आपल्याला वैदिक साहित्यात वाचायला मिळतात.) या यागाचे संपूर्ण वर्षभराचे नियोजन वैदिक ऋषी करीत असत. त्याचे वेळापत्रक हे सूर्याच्या गतीवर किंवा परिभ्रमणावर आधारित असे.लोकमान्य टिळकांनी आपल्या प्रसिद्ध “ ओरायन” नावाच्या ग्रंथात सुद्धा या अधिक महिन्याच्या शास्त्रीय मांडणीचा उल्लेख केलेला आहे.

आपल्याला सामान्यपणे सूर्याचा मकर राशीत संक्रमण आणि उत्तरायणाची सुरुवात माहिती असते कारण त्याकाळात आपण मकरसंक्राती संपूर्ण भारतभरात साजरी करतो. पण प्रत्येक सौर महिन्याला सूर्य बारा राशीपैकी एकेका राशीत संक्रमण करत असतो म्हणजे प्रवेश करीत असतो. अधिक महिन्यात मात्र सूर्याचे असे राशी संक्रमण होत नाही ही बाबही येथे समजून घेण्यासारखी आहे.

वैदिक ग्रंथात अधिक महिना हा पापी किंवा निंद्य मानला गेला त्यामुळे तोच विचार आजही आधुनिक युगात आपण स्वीकारताना दिसतो.

कोणते महिने किती वर्षांनी अधिक येतात याबद्दलही अभ्यासक नोंदवतात ते असे- चैत्र, ज्येष्ठ आणि श्रावण हे महिने दर १२ वर्षांनी अधिक येतात. आषाढ महिना १८ वर्षांनी तर भाद्रपद महिना २४ वर्षे काळानंतर अधिक येतो. आश्विन १४१ वर्षांनी तर कार्तिक महिना हा ७०० वर्षांनी अधिक येतो. ( ग्रेगोरीयन वर्ष २०२० साली आश्विन हा महिना अधिक आलेला आहे. )

अधिक महिन्याला मराठीत आपण मलमास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतो. “पुरुषोत्तम मास" असे आदराचे नावही या महिन्याला मिळाले आहे. पण वैदिक काळात या महिन्याला अंहसस्पती, संसर्प अशी नावे मिळाली आहेत. ऋग्वेद या ग्रंथात सांगितले आहे की संपूर्ण वर्षभर आपली काम पूर्ण करून ऋतू थकून जातात त्यामुळे ते काही दिवस आपली गती मंद करतात आणि सूर्याचा पाहुणचार घेतात. अशी वैदिक विधाने ही “अधिक मासाचा” उल्लेख करताना दिसतात.

नंतरच्या काळात तयार झालेल्या पुराण ग्रंथानी वैदिक साहित्यातील विविध संकल्पना सोप्या भाषेत मांडून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या. अधिक महिन्याच्या बाबतीतही असे झालेले दिसते. बृहत् नारदीय पुराण आणि पदम पुराण या दोन पुराणांनी पुरुषोत्तममास महात्म्य,किंवा मलमास महात्म्य या प्रकरणात अधिक महिन्याचे महत्व सांगितले आहे.

या विशिष्ट महिन्याची देवता म्हणजे विष्णू. विष्णूची कृपा आपल्यावर राहून त्याचे आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळावेत यासाठी अधिक मासात त्याची उपासना करावी असे सांगितले आहे. अधिक मासात महिनाभर जे व्रत करायचे त्याचे कारण म्हणजे व्रताने माणसाच्या आयुष्याला नियमितता येते, शिस्त लागते. ईश्वराच्या जवळ राहण्याची संधी व्रतामुळे आपल्याला मिळते.

अधिक मास व्रत का करावे याची आख्यायिका अशी आहे की नहूष या राजाला इंद्रपद म्हणजे सर्वोच्च पद मिळाले. त्यामुळे तो गर्विष्ठ आणि उन्मत्त झाला. त्याने इंद्राची पत्नी शची हिची अभिलाषा मनात बाळगली. तिच्या महालात जाण्यासाठी त्याने ऋषीचा वापर केला आणि अगस्ती आदी थोर ऋषीना आपली पालखी उचलून नेण्याची आज्ञा केली. पालखीत बसल्यानंतर तो अगस्त्य ऋषीना म्हणाला

“सर्प “ म्हणजे लवकर चल. त्यावेळी रागावलेल्या अगस्ती ऋषीनी उन्मत्त नहुषाला शाप दिला की “ तूच सर्प होशील". त्याप्रमाणे मनुष्याच्या योनीतून तो राजा सापांच्या योनीत जाऊन पडला. आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाल्याने तो व्यासांना भेटला. महर्षी व्यास यांनी राजाला अधिक मासाचे व्रत करायला सांगितले. हे व्रत केल्याने राजा सर्प योनीतून मुक्त झाला अशी याची कथा सांगितली जाते. अशा कथा केवळ ऐकायच्या नसून त्यातून प्रत्येकाने बोधही घ्यायचा असतो. सर्वोच्च पद मिळाल्याने गर्विष्ठ झालेल्या राजाने विद्वान ऋषीचा अपमान केला आणि त्यांना आपल्या सेवकाप्रमाणे वागणूक दिली. माणसाने कधीच आपलया पदाचा अभिमान बाळगू नये आणि आपल्यापेक्षा थोरांचा अनादर कधीच करू नये, कायम विनम्र असावे हा या कथेचा बोध आहे हे येथे लक्षात घ्यावे.

अधिक मास व्रतामध्ये विष्णुस्वरूप सूर्य देवाची उपासना करावी. पूर्ण उपवास करावा किंवा एक वेळ भोजन करावे. गूळ घालून केलेले ३३ अनारसे ब्राह्मणाला दान करावेत. आणि या दणाणले माझी सर्व पापे नाहीशी होवोत अशी प्रार्थना करावी. या जोडीने पादत्राणे, छत्री, सुवर्णदक्षिणा यांचेही दान करावे.

अधिक महिन्यात जावयाला ३३ अनारसे देण्याची पद्धती दिसते. मुलगी आणि जावई हे लक्ष्मी नारायण यांचे रूप मानण्याची परंपरा आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव या व्रतावर पडला असण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात याचे प्रमाण जास्त दिसते. एकूणच भारतातील पितृसत्ताक कुटुंब पद्धती हे सुद्धा याचे एक कारण असले पाहिजे.

पुरुषोत्तम मास असल्याने या महिन्यात भागवत पुरणाचे वाचन केले जाते, भागवत कथा सप्ताह आयोजित केले जातात. विविध धर्मग्रंथ आवर्जून वाचले जातात. विष्णूच्या मंदिरामध्ये अधिक महिन्यात विशेष पूजांचे आयोजन केले जाते. वृंदावन येथील प्रसिद्ध कृष्ण मंदिरात भारतातील विविध प्रांतातून भक्त दर्शनासाठी येतात. यात्रांची आयोजन केले जाते. भजन, कीर्तनात भक्तगण दंग होतात. या सर्व कृत्यांमुळे मनाला शांतता मिळते आणि सदाचरण करण्याकडे मनुष्याची प्रवृत्ती वाढते.

महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात पुरुषोत्तमाचे विशेष मंदिर आहे. अधिक मासात येथे जत्रा भरते, धार्मिक उत्सव केला जातो.

अशाप्रकारे ईश्वर चरणाशी लीन होण्याची संधी देणारा, सदाचरणाला प्रवृत्त करणारा अधिक महिना. आधुनिक युगात त्यामागील खगोलीय कारण समजावून घ्यावे, गरजूला दान द्यावे, आधुनिक काळात रक्तदान, त्वचादान अशी काळाला उपयुक्त दाने करावीत. छिद्र असलेल्या बत्तासे, अनारसे अशा वस्तू दान करताना हे समजून घ्यावे की आपणही कुणाच्यातील उणीवा काढून नयेत आणि स्वतःमधील छिद्र बुजविणे म्हणजे स्वतः:च्या स्वभावातील न्यूनता कमी करणे, चांगले गुण जोपासणे यासाठीही प्रयत्न करावा.