Saubhagyavati - 11 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | सौभाग्य व ती! - 11

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

सौभाग्य व ती! - 11

११) सौभाग्य व ती !
"नयन, सांभाळून राहा. स्वतःला, संजीवनीला जप. सदाशिवरावांना बोलू नको.काही झालं तरी तुला त्यांच्यासोबत आयुष्य काढायचे आहे..." बसस्थानकावर सोडायला आलेला बाळू नयनला म्हणाला. ज्या गोष्टी घरातल्या मोठ्या माणसांनी सांगाव्यात त्या गोष्टी लग्नाची हळद ओली असणारा बाळू सांगत होता. त्याच्या सहानुभूतीने नयनचे डोळे भरून आले. तिचा हात हातामध्ये घेत बाळूची बायको मीना म्हणाली,
"नाही.असे नाही." ते ऐकून नयनला जास्तच भडभडून आलं. कुणी काही बोलण्यापूर्वीच बस आली.डोळे भरलेल्या अवस्थेत हातामध्ये सुटकेस आणि कडेवर संजूला सांभाळत ती मोटारीमध्ये शिरली. आसनावर बसताच तिचे विचारचक्र सुरू झाले....
विठाबाई म्हणाली तेच खरे होते. नयनच्या माहेरचा आधार तुटल्यात जमा होता.त्यांची जाऊ पाहणारी वतनदारी, प्रतिष्ठा जपण्यासाठीच त्यांची धडपड चालू होती. आधार तर सोडा पण साध्या शब्दांची सहानुभूतीही कुणी दाखवली नाही. बाळूचे लग्न होताच भाऊंनी अमरावतीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना तिथे एका सिनेमागृहामध्ये व्यवस्थापक म्हणून काम मिळाले होते. तालुक्यामध्ये कुणीही हात न धरू शकणारे भाऊ, गडगंज संपत्ती असणारे भाऊ, ज्या सिनेमागृहाच्या मालकास विकत घ्यायची ताकद असणारे भाऊ, महिन्याकाठी त्याच मालकासमोर पगारासाठी हात पसरायची वेळ भाऊंवर आली होती. गाव सोडायच्या भाऊच्या निर्णयामुळे भाऊ-अण्णामध्ये प्रचंड वाद झाला . दोघांचेही विचार बरोबर असले तरीही तांत्रिक दृष्टीने भाऊंचे बरोबर होते. कर्जाखाली दबलेली जमीन विकून टाकावी. सावकारांचे आणि कामानिमित्त सोयऱ्याकडून घेतलेले पैसे देऊन।टाकावेत. उरलेले पैसे बँकेत टाकावेत किंवा एखादा धंदा सुरू करावा ही भाऊंची व्यावहारिक दृष्टी तर कर्जाची असली तरी जमीन-जायदाद पूर्वजांची आहे, त्यामुळे वतनदारी प्रतिष्ठा आहे. इस्टेट नसली तर... ही कल्पनाच अण्णांना सहन होत नव्हती...
बस थांबली. त्याचबरोबर नयनचे विचारचक्रही थांबलं. ती खाली उतरली. ती रिक्षा करून घरी निघाली तसे तिच्या विचाराचे आवर्तनही बदलले. तिच्या पश्चात घरी काय घडल असेल? ती नसताना प्रभा - सदासाठी रान मोकळे होते. कदाचित प्रभाचे बिऱ्हाड नयनच्याच वाड्यात असेल, तिच्याच खोलीत, नयनच्याच पलंगावर आणि नयनच्या नवऱ्यासोबत प्रभाने धांगडधिंगा घातला असेल? त्यांच्या लीलांना ऊत आला असेल? ज्या शय्येने फक्त आणि फक्त बलात्कारच पाहिला होता, त्या गादीला त्या प्रेमक्रीडा पाहवल्या असतील? प्रभा-सदाला नयनच्या पलंगावर गोंधळ घालताना लाज वाटली नसेल? नियतीने तसं का छळावं? तिच्या संसाराचे तसे वाट्टोळे का व्हावं? का-का-तसं छळायचेच असते तर मग तिला सौभाग्य... तसं शापित सौभाग्य का दिलं? सौभाग्य म्हणजे चार मनी, एक पोत आणि कुंकापुरतेच मर्यादित आहे का? ज्याच्या नावाने कुंकू लावलं, ज्याचं सौभाग्य पत्करलं त्याचे काहीच कर्तव्य नसावे? त्याला फक्त हक्कापोटी मिळणारा भोग
आणि विकृत वासनाच माहिती असावी? ते वसूल करताना दुसऱ्याच्या सुख दुःखाचा, मनाचा, शारीरिक स्थितीचा विचार नसावा? शरीरसुख म्हणजे पुरुषाने दिलेल्या मरणप्राय वेदनाच का?...
"बाईसाहेब, इथेच उतरायचे का?" रिक्षावाल्याच्या आवाजाने भानावर येत नयन "होय..." म्हणाली. सायंकाळ होत आली होती. सूर्यदेव हळूहळू मावळतीच्या मिठीत गडप होत होते. गल्लीत घरोघरी लावलेल्या झाडांच्या फुलांचा मंद मंद सुवास सर्वत्र दरवळत होता. गुरे-वासरे घराकडे परतत होती. दिवसभराच्या कामाने थकलेले जीव विश्रांती मिळेल या आशेने घरी जात होते. खरेच रात्र म्हणजे सर्वांसाठी विसावा, एक आरामदायी, उत्साही अशी नैसर्गिक व्यवस्था! तरूणांसह सारे आबालवृद्ध रात्रीची वाट पाहतात, प्रत्येकालाच विश्रांतीची आणि सुखाची गरज असते. परंतु रात्र म्हटलं, की नयनच्या अंगावर काटा येत असे. का... का... का..? तिला शरीरसुखाची आवश्यकता नव्हती? तिच्यासाठी त्या सुखाची व्याख्या, संदर्भच वेगळे होते...
संजीवनीने भोंगा पसरला आणि ती भानावर आली. प्रभाच्या वाड्याला कुलूप होते तर तिचा वाडा सताड उघडा होता. नयन क्षणभर दारात उभी राहिली. आत जावे का नाही? आत काय पहायला मिळेल? बाळूच्या लग्नाला जाताना सदाला विचारण्यासाठी जाताच प्रभाच्या वाड्यात जे दृश्य दिसले तसे काही दिसले तर? ती दाघे नयनच्याच पलंगावर धुडगूस घालीत असतील तर? तिला ते उघड्या डोळ्यांनी बघवेल? संयम सुटून वेगळेच काही घडले तर? काहीही झाले तरी नयनला मनावर ताबा ठेवणे गरजेचे होते. तिला आततायीपणा करून चालणार नव्हते. मनावर, रागावर अंकुश ठेवून, काळजावर दगड ठेवून दिसेल ते पाहण्याचा निश्चय करून तिने वाड्यात प्रवेश केला. ओसरीवरील नवीन सोफ्यावर प्रभा आणि सदाशिव एकमेकांना खेटून बसले होते. नयनला अचानक आलेले पाहून दोघेही दचकले. जन्मोजन्मीच्या दुश्मनाला डिवऱ्या म्हशीच्या नजरेने पाहत प्रभा निघून गेली. नयन निःशब्द तिच्या खोलीत गेली. तिची खोली जाताना जशी सोडून गेली तशीच होती. त्याचा अर्थ नयनच्या पश्चात तिच्या पलंगावर तो प्रकार झालाच नव्हता तर! तिला एक वेगळेच समाधान लाभले. त्याच समाधानात तिने पसारा आवरला. पाळणा व्यवस्थित करून त्यामध्ये संजूला झोपवले.संध्याकाळ झालीच होती. देवाजवळ दिवा लावावा म्हणून ती देवघराकडे निघाली. ओसरीवर सदा नव्हता. तो प्रभाकडेच गेला हे नयनने ओळखले. नयनची, संजीवनीची साधी चौकशी न करता गेला हे तिला खटकले. परंतु तो विचार मनात दाबत तिने देवाजवळ दिवा लावला. डोके टेकवून ती पुन्हा खोलीत आली. संजीवनी शांत झोपली होती. स्वयंपाकाचा प्रश्नच नव्हता. निघताना आईने काही तरी बांधून दिले होते. त्यानेच पोट भरणार असले तरी शरीराच्या भुकेचे काय? ती तर केंव्हाच मेली होती. त्या भुकेची आठवणही किळस, शिसारी आणणारी ठरत होती. काही तरी मार्ग काढलाच पाहिजे. सदाशिवला प्रभाच्या जाळ्यातून काढलेच पाहिजे. पण कसे? ती पडली एकटी. जग तरी सुंदर, तरूण स्त्रीला मदत करण्यासारखे आहे का? कदाचित कुणी मदतीला पुढे आलेही असते परंतु तेच हात तिच्या शरीरावरून फिरण्याची अभिलाषा बाळगून असतील तर? ते तिला सहन झाले असते? त्यापेक्षा पोरगी पोटाशी बांधून वाड्यातला आड जवळ केला तर? नाही आत्महत्या पाप आहे. आत्महत्या म्हणजे पळ काढणे होय. शिवाय त्या दोघांना मनसोक्त वागण्याची परवानगी देण्यासारखे आहे. त्यापेक्षा तोच वनवास सहन केला तर? शेवटी तो नवरा माझा नवरा आहे... एक माणूस आहे. किती दिवस त्रास देईल? वर्ष... दोन वर्षे नंतर आपोआप डोळे उघडल्यावर प्रेम करेल. आहे त्याच स्थितीमध्ये राहणे हिताचे ठरेल. हा संसार, हे घर लाथाडून इतरत्र नोकरी करताना त्या बदल्यामध्ये शरीर द्यावे लागले तर? तसा डाग चारित्र्यावर लागण्यापेक्षा सदाचेच अत्याचार सहन करण्यात हशील आहे. काही वर्षानंतर खरोखर सदाला दया आली तर? तिचेही दिवस येतील. प्रभाचे भूत, तिच्या शरीराची धुंदी सदाच्या मनातून निघून जाईल. 'सब्र का फल मीठा होता है' प्रमाणे पुन्हा नव्या जोमाने संसार सुरू करता येईल. कदाचित संजूच्या वाढत्या बाललीला, तिचे बोबडे बोल सदामध्ये परिवर्तन घडवून आणतील. तिचे हरवलेले प्रेम, दुरावलेले सुख, रूसलेले कुंकू तिला परत मिळेल. तशा विचारातच नयनला झोप लागली...
सकाळी तिला जाग आली तेंव्हा चक्क उजाडलं होत. 'त्या' चार रात्रीशिवाय मनस्ताप न देणारी, नयनवर अत्याचार न होणारी सासरची ती पहिलीच रात्र होती. रात्रभर सदाशिव कोठे होता ते माहिती असूनही त्या रात्री तिला यातना झाल्या नाहीत अशा आगळ्यावेगळ्या समाधानात नयन कामाला लागली.
नंतर पंधरा-सतरा दिवसातून एखादी चक्कर टाकणारा सदा चक्क रात्री येतच नव्हता या दुःखापेक्षा तो जीवघेणा प्रसंग घडलाच नाही याचे तिला अधिक समाधान होते. शेवटी समाधान मानण्यावरच असते ना. घडणाऱ्या घटनेत सुख शोधलं तर ते निश्चितच मिळते, नाही तर मिळतो नुसता मनस्ताप. बाळूच्या लग्नानंतर नयनने प्रत्येक गोष्टीत सुख, समाधान शोधायचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे तिला ते मिळत गेलं. अनेक दिवसांपासून सुखात विहार करणारी नयन त्या दिवशी विठाबाईस म्हणाली,
"पंधरा दिवस झाले बघ. विठा, कसं मोकळं वाटतंय?"
"का वो तायसाब, लईच खुश दिसतात?"
"विठा, अग तुझे मालक पंधरा दिवसांपासून रात्री आलेच नाहीत ग..."
"बाय-बाय काय सांगाव तुमास्नी. अव्हो, तुमच्या सौंसारावर गंडातर येते आणि तुम्ही म्हणता की..."
"अग, रोजच्या मरणापेक्षा हे गंडात्र खूप बरे ग..."
"अवो, बायसाब..."
"विटा, खर सांगू. मी खरंच..."
"ताईसाहेब, जरा माझ्याकडे फा बर..." विठा म्हणत असताना नयनने विठाकडे पाहिलं. तसं तिच्या चेहरा आणि डोळ्याकडे पाहत ती पुढे म्हणाली,
"समजल वो तायसाब, तुमचं सुक. जरा सोत्ताच्याच डोळ्यात बगा..."
विठाबाईचे खरे असले तरी नयन एका वेगळ्याच उत्साहाने त्या दिवशी सायंकाळी दूरदर्शनवरील सिनेमा पाहत असताना तिचा पती, तिचे सर्वस्व घरी आले. सदाचा अवतार वेगळेच काही सांगत होता. काही बोलण्यापेक्षा आल्याबरोबर सदाने तिला खोलीत ओढून नेले.
"हे...हे..काय?..."
"म....म....मी तुझा नवरा आहे."
"आज आठवण झाली? ती...ती..." कितीही संयम ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सदाचा अवतार आणि वागणे यामुळे नयनचा स्फोट झालाच.
"ती घरीच आहे. पण चार रात्रीसाठी कामातून गेलीय..." बोलत -बोलत सदाशिवने तिला पलंगावर ढकलले आणि तुटून पडला. पंधरा दिवस अनोख्या समाधानामध्ये असणाऱ्या नयनला पुढल्या चार रात्री तो अत्याचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहत भोगावा लागला...
त्यादिवशी सकाळी सामान घेवून आलेला गडी नेहमीप्रमाणे वेगळ्याच दृष्टीने पाहू लागला. सुरूवातीला त्याची नजर सहानुभूतीची होती परंतु नयनची 'त्या' बाबतीत त्याच्या दृष्टीने होणारी हेळसांड, उपासमार, नयनचे रूप आणि सर्वात म्हणजे सदाकडून लाथाडली जाणारी नयन या साऱ्या गोष्टींमुळे गड्याची नजर हळूहळू बदलत गेली. सहानुभूतीची जागा वासना आणि वाहत्या गंगेत हात धुण्याच्या लालसेने घेतली. वाड्यात असेपर्यंत त्याची नजर नयनच्या शरीरावरच रेंगाळत असे. नजरानजर होताच तो हसायचा. त्या हसण्याचा अर्थ तिला कळत होता. त्याहसण्यामध्ये 'ते' आर्जव आणि एक प्रकारचे जाळे फेकण्याचा अर्थ असायचा परंतु त्या साऱ्याची तिला चीड निर्माण झाली होती तिच्या दृष्टीने प्रेम, भोग सार सार वेदनामय, मरणासन्न होते. तिचा प्रतिसाद मिळत नाही हे समजताच पुढचे पाऊल टाकण्याची त्याची हिंमत झाली नाही. सकारात्मक प्रतिसाद तर सोडा परंतु नयनच्या डोळ्यामध्ये फुललेला अंगार पाहून तो गर्भगळीत झाला...
प्रत्येक महिन्याला प्रभा 'बाजुला' बसलेली असताना चारही रात्री सदा नयनकडे येवून स्वतःचा हक्क बजावू लागला. जणू प्रभा हीच त्याची लग्नाची ...सात जन्माची बायको होती आणि नयन होती... रखेल! परंतु त्या स्थितीत रोजचे मरण महिन्यावर गेले या समाधानात नयनने तेही खुशीने स्वीकारले...
त्यादिवशी सकाळपासूनच नयनला माहेरच्या माणसांची आठवण येत होती. बाळूच्या लग्नालाही सहा महिने झाले. भाऊ अमरावतीस गेले का नाही तेही नयनास समजले नव्हते. ती विचारात असताना बाहेरच्या दारावर थाप पडली. 'भर दुपारी कोण आलं? रात्रीचे मरण आज यावेळी येणार की काय?...'असे स्वतःलाच विचारत तिने दार उघडले. दारात बाळूला पाहताच नयनने आश्चर्याने विचारले,
"बाळ, तू?"
"हो. अग, येथेच बांधकाम खात्यात नोकरी मिळालेय. आजच हजर झालोय. गावाकडे निघालोय. म्हटलं तुझी भेट घ्यावी. आज गावी जावून दोन-तीन दिवसांनी मीनाला घेवून येतो."
"व्वा! छान झाले. बरे, भाऊ, आई..."
"ते अमरावतीला आहेत. भाऊंनी एका टॉकीजमध्ये व्यवस्थापकाची नोकरी स्वीकारलीय. माधवही तिथेच लायब्ररीमध्ये लागलाय."
"अण्णा काका?"
"ते आहेत गावी..." बोलता बोलता चहा झाला. तो संपवून बाळू निघाला. नयन त्याला सोडायला दारापर्यंत आली. तो जाताच ती वाड्यात शिरणार की तिच्या कानावर हसण्याचा आवाज आला. तिने त्या दिशेने पाहिले. प्रभाच्या दारामध्ये उभे असलेले प्रभा-सदा हसत होते हसताना प्रभा हलकेच म्हणाली,
"हा हिचा आतेभाऊ ना? जमलं मग...?" ते ऐकून नयन संतापाने वाड्यात शिरली...
००००