mahanti shaktipinthachi - 18 in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | महती शक्तीपिठांची भाग १८

Featured Books
Categories
Share

महती शक्तीपिठांची भाग १८

महती शक्तीपिठांची भाग १८

३) श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी) शक्तीपीठ

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे.
ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची ही आराध्यदेवता.
अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.
हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे.
मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे.
ऐतिहासिक व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.
तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.

भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.
संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे.
कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात - श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे.
अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.
महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत.
त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना भवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते.

पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.
तुळजा भवानी मंदिर ...
सरदार निंबाळकर या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते.
येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते.
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत.
एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत.
या पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात .
समोरच कल्लोळ तीर्थ आहे.
देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सागितले जाते.
मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे.
येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात
मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे.
येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते.
तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे.
मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे.
अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे.
देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे.
वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते.
असे इतरत्र कोठेही आढळत नाही.
गाभाऱ्याच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत.
सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.

ही अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत.
आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे.
पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत.
तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो.
दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे.
देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषीची पत्नी “अनुभूती” दिसून येते.

येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते.
वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते.
नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते.
देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.
प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंथी असून त्यात कोरीव काम करण्यात आले आहे.
मंदिराच्या गाभार्‍यातच एका खांबावर चांदीचा कडा आहे.
सात दिवस त्यास स्पर्श केल्याने जुनाट आजार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मार्कंडेय पुराणात तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो.
दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आणि सात हजार श्लोकांद्वारे देवीचे महात्म्य वर्णन करण्यात आले आहे.
दुर्गा सप्तशती हा ऋषी मार्केंडेय यांनी रचलेल्या मार्कंडेय पुराणाचाच एक भाग आहे.
याशिवाय देवी भगवतीमध्येही तुळजाभवानीचे महत्व सांगण्यात आले आहे.
तुळजाभवानीबद्दल पुढील आख्यायिका प्रसिद्ध आहे.
स्कंध पुराणात देवीची अवतारकथा वर्णन करण्यात आली आहे.
कृतयुगात कर्दम नावाचे वेदशास्त्रपारंगत ऋषी होते,ते आणि त्यांची पत्नी अनुभूती एका मुलासह रहात असत.
अनुभूती ही रतीप्रमाणेच सुंदर आणि बहुगुणी भार्या होती.
कर्दम ऋषीचा एकाएकी अंत झाल्याने तरुणपणी ती विधवा झाली.
कर्दम ऋषीच्या निधनानंतर तिने सती जाण्याचे ठरविले मात्र तेव्हा आकाशवाणी झाली.
लहान मुल असल्यामुळे सती जाण्याची गरज नाही असे आकाशवाणीत सांगण्यात आले.
मुलासाठी ऋषीमुनींनी सुध्धा तिला सहगमनापासून परावृत्त केले.
यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय रद्द करीत मंदाकिनी नदीच्या काठी आपल्या लहान मुलाला घेऊन तपश्चर्येला सुरुवात केली.
पर्णकुटीत ती तपाचरणात काळ घालवू लागली.
एकदा दोन प्रहरी ती समाधी लावून बसली होती.
त्यावेळी कुकुर नावाचा दैत्य मृगया करीत तेथे आला.
तो तिला लावण्यमयी, अप्सरा संबोधू लागला, सर्व सुखांची प्रलोभने देऊन विलास याचना करू लागला. तिची समाधी भंग करण्यासाठी टाळ्या वाजवू लागला, ओरडू लागला.
तरीही प्रतिसाद न मिळाल्याने कुकुराने त्या तापसीच्या शरीरास स्पर्श केला व त्याने तिचे पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न केला. केला.
अनुभूतीने भवानीचा धावा केला.
भवानी योगिनीवृंदासह प्रगट झाली.
भवानी व कुकुराचे युद्ध सुरू झाले.
कुकुराने महिषासुराचा अवतार घेतला.
भवानीने महिषासुराचा वध केल्यानंतर त्याच्या सैन्याचा फडशा, योगिनी भैरव, वेताळ, कंकाळ यांनी पाडला.
अनुभूतीच्या मदतीला प्रकट झालेल्या देवीने राक्षसाला ठार मारल्यानंतर ‘सदोदित तुझी पदसेवा घडावी’अशी विनवणी करीत अनुभूतीने भवानीच्या चरणी लोळण घेतली.
साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले.
अनुभूतीची याचना ऐकून देवी त्वरीत प्रकट झाली म्हणून या देवीला त्वरीता असे नाव देण्यात आले.
याचाच अपभ्रंश होऊन तुळजाई असे देवीचे नाव झाले.
तुळजाईलाच भक्तगण तुळजाभवानी असेही म्हणू लागले.
अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी देवी मातेने कुकूर राक्षसाचा वध केला.
हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला.
यानंतर अनुभूतीने देवीस कायमस्वरुपी तिथेच वास्तव्य करण्याची विनंती केली.
त्याच ठिकाणाला तुळजापूर असे नाव पडले.

येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात.
जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गाभारा असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे.
या ऐतिहासिक शक्तीपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.
घारशीळ, भारती बुवांचा मठ, पापनाश तीर्थ, धाकटे तुळजापूर, तीर्थकुंड, रामवरदायिनी मंदिर इत्यादी पवित्र धार्मिक स्थळे तुळजापुरात आहेत.

आदीमाया शक्तीचे मानवी रूप असलेल्या देवीची आराधना पूर्वापार होत आली आहे.
नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात..

महात्म्य...
तुळजाभवानीचे देवस्थान मनुष्यमात्राला ऊर्जा प्राप्त करून देणारे आहे.
तुळजाभवानीचे वास्तव्य स्थान म्हणून त्यास तुळजापूर नाव मिळाले.


आणखी एक कथा मेरू पर्वतावर मंदाकिनी तीराजवळ घडली.
सीतेच्या शोधार्थ राम दंडकारण्यात हिंडत असता त्यांची भेट घेण्याची भवानीची इच्छा झाली.
आपल्यासाठी यमुनांचल (बालाघाट) पर्वतावर स्थान पाहून येण्यासाठी तिने भैरवास आज्ञा केली.
भैरवाने भवानीसाठी जे निवासस्थान शोधले होते , ते हेच श्रीक्षेत्र तुळजापूर.

स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात तुरजामहात्म्य प्रकरणात हे वर्णन आहे.
तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो.
तत्पूर्वी देवी भाद्रपद वद्य अष्टमीपासून आश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत मंचकी निद्रा घेते.
त्यानंतर मातेची मूर्ती पुन्हा मूळस्थानी सिंहासनावर विराजमान केली जाते.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला दुपारी १२ वाजता मंदिरात घटस्थापना होते.
गायमुख या ठिकाणावरून तीन कुंभांमध्ये सवाद्य जल आणून प्रमुख घट देवीच्या सभामंडपात अर्पण करतात .
दुसरा घट होमकुंडाच्या त्रिशूल ओवरीत अर्पण केला जातो, तिसरा मातंगी देवी सभामंडपात अर्पिला जातो.
नवरात्रोत्सवात विविध नयनरम्य पूजा बांधल्या जातात.
रोज रात्री प्रतीकात्मक नंदी, गरुड, हत्ती, सिंह, मोर इत्यादी वाहनांवरून छबिना (पालखी मीरवणूक )काढला जातो.
आश्विन शुद्ध अष्टमीला वैदिक होम केला जातो.
नवमीला सकाळच्या अभिषेकानंतर अजबळी दिला जातो.
घटातील माळ तोडून घटविसर्जन होते.
त्यानंतर जोगवा मागणे, परडी मिठा-पिठाने भरणे, पोत उजळणे आदी होते.
विजयादशमीला सकाळी देवीची नित्योपचारे पूजा होते.
नगरवरून आलेल्या पालखीतून देवीची मूर्ती फिरवली जाते.
या विधीनंतर पाच दिवस श्रमनिद्रा घेण्यासाठी पहाटे शयनगृहात देवी नेली जाते.
पौर्णिमेला पहाटे पुन्हा सिंहासनावर येते.
या दिवशी सोलापूरहून शिवलाड समाजाच्या काठय़ा छबिन्यासह दाखल होतात.
सायंकाळी देवीचा छबिना काढला जातो.
या छबिना मिरवणुकीनंतर उत्सवाची सांगता केली जाते.

क्रमशः