Taarif in Marathi Comedy stories by Milind Joshi books and stories PDF | तारीफ

Featured Books
Categories
Share

तारीफ

काही लोकांना इतरांची प्रशंसा ( म्हणजे तारीफ हो... ) करण्याची खूप चांगली सवय असते. अगदी हृदयाच्या तळापासून ते समोरच्या माणसाची प्रशंसा करतात. मलाही खूप आवडते, लोकांनी माझी प्रशंसा केलेली. अगदी स्पेशल वाटतं दिवसभर. पण काही वेळेस अशा व्यक्ती आपली प्रशंसा करताना आपल्याला असली एकेक बिरुदे चिकटवतात की त्यावर हसावे की रडावे अशा प्रश्न पडतो.

गोष्ट तशी बरीच जुनी आहे... माझ्या कॉलेज जीवनातली. पण अजूनही अगदी जशीच्या तशी आठवते आहे. त्या काळी मी क्रिकेट खेळायचो... म्हणजे अजूनही खेळतो म्हणा. पण आताच्या खेळण्यात आणि त्या वेळेसच्या खेळण्यात खूप फरक पडला आहे.

त्या दिवशी आमच्या संघाने अकरा रुपयांवर सामना लावला होता. प्रत्येकाने १ रुपया भरला होता. सामना जिंकलो तर एकाचे दोन रुपये मिळणार आणि हारलो तर पैसे गेले. आमच्या कप्तानाने नेहमी प्रमाणे नाणेफेक ( म्हणजे टॉस हो ) हारली आणि आम्ही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलो. सामना सुरु झाला. समोरचा संघ आमच्या तोडीचा होता. त्या दिवशी आमचे गोलंदाज म्हणावे तसे चालले नाहीत, त्यामुळे आम्हाला १२ षटकात ७६ धावांचे आव्हान मिळाले.

परत सामना सुरु झाला. आमची पहिली जोडी चांगली खेळत होती पण अचानक त्यांचा कोण तो बावळट गोलंदाज, बेण्यानं आमच्या संघाच्या सलग चार विकेट काढल्या. त्यावेळेस आमच्या संघाच्या पटावर फक्त ३०/३२ धावा लागल्या होत्या. सलग चार फलंदाज हात हलवत परतल्यामुळे आमच्या संघावर प्रचंड दडपण आले. आणि त्याच दडपणात अजून फक्त १५ धावांची भर घालत पुढचे तीन फलंदाज माघारी वळले.

झाले... सामना हातातून गेला असेच आम्ही सगळयांनी मनोमन मानले. एरवी त्याचे एवढे वाईट वाटले नसते, पण प्रश्न १ रुपयाचा होता. तशी ५ षटके बाकी होती म्हणा, पण बॅट माझ्या हातात होती. आणि मी जिंकणारी मॅच व्यवस्थित हरवून देऊ शकतो यावर सगळ्यांचाच गाढ विश्वास होता. तसा तो मी माझ्या फलंदाजीने आतापर्यंत तरी सार्थ ठरवला होता. खरे तर क्रिकेट मधील मला न जमणारी गोष्ट म्हणजे फलंदाजी. पण माझ्या संघातील लोकं ती उजागर होणार नाही याचा नेहमीच प्रयत्न करत आणि माझ्यावर फलंदाजीला येण्याची वेळच येऊ देत नव्हते. रोज क्रिकेट खेळूनही कित्येक वेळेस १० / १२ दिवस माझ्या हातात बॅट यायची नाही. आणि आता माझ्याच हातात बॅट असल्यावर सामन्याचे काय होणार हे सगळ्यांना चांगलेच माहिती होते. मी फलंदाजीला उतरल्यावर चेंडू आणि स्टंप यांचं मिलन होणं हे ठरलेलंच असायचं. समजा काही कारणाने तसं नाही झालं तर तो स्टंपमागे उभा असलेला यष्टीरक्षक नावाचा प्राणी ते स्वतः घडवून आणायचा, आणि मला त्यानंतर होणाऱ्या श्रमापासून वाचवायचा. पण त्या दिवशी बहुतेक त्या गोलंदाजाचं दुर्भाग्य आड आलं असावं. प्रत्येक चेंडू माझ्या बॅटवर येत होता आणि आमच्या धावा वाढत होत्या. सगळ्या संघासाठी हे एक आश्चर्यचं होतं. खरं तर माझ्यासाठीही. तो सामना आम्ही २ चेंडू राखून जिंकला आणि सगळ्यांनी माझा उदोउदो चालू केला. तसे मी केलेले रन अगदी २० एकच असतील. पण माझ्याकडून कुणी तशी अपेक्षाचं केली नव्हती त्यामुळे ते सगळ्यांना खूप जास्त वाटत होते.

प्रत्येकाचा एक दिवस येत असतो, तो दिवस माझा होता. संध्याकाळी कॉलिनीतील इतर मित्र जमल्यावर परत एकदा दुपारच्या सामन्याचा विषय निघाला आणि मी मनातून सुखावलो. पण काही झालं तरी आपण स्वतःची प्रशंसा करायची नाही हे मी आधीच ठरवलं होतं. काय आहे ना... आमचे सर नेहमी सांगतात... इतरांनी आपली प्रशंसा करणं जास्त महत्वाचं. म्हणूनच मी शांतीला धरलं आणि निल्या पेटला.

“गण्या..., आज म्याच लैच भारी झाली. या मिल्यामुळं जिकलो आज. यानं हारलेली म्याच जिकून दिली.” निल्यानं स्तुती करायला सुरुवात केली आणि अभिमानानं माझा उर भरून आला. गण्या माझ्याकडं अगदी विस्मयाने पहात होता. आईशप्पथ सांगतो, मनातल्या मनात मला खूपच गुदगुल्या झाल्या.

“काय सांगतोस? मिल्या कधी पासून बॅट हातात धरायला लागला?” गण्यानं अविश्वासानं विचारलं...

“च्यायला... हा गण्या ना, एक नंबरचा खौटाड प्राणी आहे साला... पहा कसा जळतोय...” मनात विचार आला पण मी चेहऱ्यावर काही दिसू दिलं नाही.

“मी काय खोटं बोलू ऱ्हायलो का? हवं तर विचार विक्याला...” गण्या आपल्यावर विश्वास ठेवत नाही हे पाहून निल्या भडकलाच.

“तसं नाही रे... पण मिल्याच्या हातात बॅट यावर विश्वास बसत नाही लवकर...” गण्यानं काहीसं नरमाईच्या स्वरात म्हटलं आणि निल्या परत सुरु झाला.

“तुला सांगतो गण्या.., हा मिल्या ना, त्या समोरच्या टीमवर, पिसाळलेल्या कुत्र्याच्या आईगत तुटून पडला.” निल्यानं मला पहिलं बिरूद चिकटवलं.

असा संताप आला यार.., उपमाच द्यायची तर ‘चवताळलेला वाघ’, ‘चिडलेला सिंह’ अशी काहीतरी द्यायची ना? ते सोडून हा काय म्हणतोय तर... ‘पिसाळलेल्या कुत्र्याची आई...???’ तुम्हीच सांगा, तुम्हाला तरी रुचेल का अशी उपमा?

“अबे निल्या, एखादी चांगली उपमा तरी दे यार..!” कसेतरी मनात आलेल्या रागावर नियंत्रण मिळवत होईल तितक्या सौम्य शब्दात मी निल्याला सांगितलं.

“सॉरी यार...! ते आपल्याला काय कळत नाय... गण्या, पिसाळलेल्या कुत्र्याची आई नाई रे... ते काय आपलं... हा आठवलं... जसा डखाळलेला माणूस अन्नावर तुटून पडतो ना, तसा हा मिल्या रनांवर तुटून पडला...” निल्यानं पहिलं बिरूद परत घेत दुसरं बिरूद चिकटवलं आणि माझ्याकडे वळून म्हणाला... “बसं का भो? आता ठीके का?”

“साला... तुला चांगल्या उपमा नाही देता येत का रे?” मी वैतागलोच.

“विक्या... तूच सांग रे... आपल्याला नाही नीट सांगता येत...” मी वैतागलेलो पाहून निल्याने पुढची गोष्ट सांगण्याची जबाबदारी विक्याकडे सोपवली. गण्या मात्र या उपमा ऐकून हसत होता. तो जसजसा हसत होता मी भडकत होतो. आणि विक्याने सुरुवात केली.

“हा यार... आपल्या धडाधड विकेट पडत होत्या पण मिल्या मात्र क्रीजला गोचिडासारखा चिपकून बसला होता.” विक्याने उपमा दिली आणि गाण्याच्या हसण्याचा बांध फुटला. माझं तर टाळकंचं सरकलं. पण त्रागा करूनही उपयोग नव्हता. कारण मी चिडलो असे दाखवले असते तर ती बिरुदे मला कायमस्वरूपी चिकटली असती. शेवटी अगदी थातूरमातूर कारण सांगून मी तिथून काढता पाय घेतला.

तो दिवस होता नी आजचा दिवस आहे. या काळात मी अनेक वेळेस क्रिकेट खेळलो पण त्यानंतर एकदा ही मी दोन अंकी धावा फटकावल्या नाहीत. अगदी शक्य असूनही. आपण खूप घाबरतो. काय घ्या, परत कोणा मित्राला माझी प्रशंसा करावीशी वाटली तर? त्या दिवसापासूनच मला एक नवीन म्हणही मिळाली आहे...

‘मान नको पण तारीफ आवर...!’

मिलिंद जोशी, नाशिक...
९६५७४६२६१३