नवीन आयुष्याला सुरुवात करायची वेळ आली. हो माझं लग्न आहे आणि माझ्यातच मी हरवून गेले आहे. उद्या पासून नवीन माणसं नवीन चाली रिती. स्वानंद ची आई खुप प्रेमळ आहे. मला मुली सारखंच करतात. त्यांच्याकडे जाण्याची ओढ देखील लागली आहे आणि आई बाबांना सोडून जाण्याची इच्छा ही होत नाहीये. डोळ्यांतून सारख पाणी येतंय पण सगळयांना खूष पाहून समाधान पण वाटतंय. काय होतंय हे मला कोणी माझ्याकडे तरी पाहा.
घरात नुसती धमाल धावपळ चालू आहे. आई माझी सारखी विचारतेय,
"हे घेतलं का ते घेतलं का..?"
आजी माझी नजर काढतेय. बाकी सगळे घरचे इथे तिथे कामात गुंतले आहेत. पण बाबा. बाबा कुठे आहेत...? सगळीकडे शोधून आले कुठेच दिसत नाही. कुठे गेले असतील.
मी माझ्या खोलीत आले. पाहिलं तर बाबा एकटेच माझ्या लहानपणी चे फोटोज् पाहत होते. डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या. हळूच मी जाऊन त्यांना पाठीमागून मिठी मारली. काही क्षण तसेच गेले.
"बाबा मी अशीच राहते ना. नाही करायचंय मला लग्न. मला नाही जमणार तुम्हाला सोडून जायला. तिथे गेली की, परक्याची मुलगी आणि इथेही परक्याच धन. बाबा मी नक्की कोणाची..? नक्की कोणतं आहे माझं घर..?
बाबांनी डोक्यावर हात ठेवला. माझ्या डोळ्यांत पाहून म्हणाले,
"तु माझीच बाहुली असणार नेहमी. आणि परक्या घराचं म्हणशील तर माझ्या मनात जी जागा आहे, तिथे तु आहेस. आणि कायम असणार. तिथून तुला कधीच कोणी काढू शकणार नाही."
"बाबा मला खुप भिती वाटतेय ह्या नवीन आयुष्याची. कशी जुळवून घेईल मी इतक्या साऱ्या लोकांशी..?"
"बाळा आज तु मुलगी आहेस. उद्या बायको होशील, आई होशील मग सासू. ह्या वळणावर चालताना प्रत्येकाला आपलंस करत जा. वळण कठीण असतं पण कालांतराने त्या वळणाला आपलस करून घेण्याची कला मुलींना खुप छान जमते. इतकी वर्षे सोबत असणाऱ्या आई वडिलांना, काळजावर दगड ठेवून सोडून जाणं सोपं नसतं. तुला आयुष्यभर सांभाळायला मला का नाही जमणार. जमेल. पण, मला माझ्या मुलीला ह्या वळणावर आनंदाने जगताना पहायचय. वळणावर येणाऱ्या अडथळ्यांशी कश्या प्रकारे सामना करतेय हे पाहायचे आहे. आणि शेवटचं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, नात्यांत प्रेमाची गुंतवणूक केलीस तर दुप्पटी ने तुझ्याकडे येईल. करशील ना माझ्यासाठी इतकं..?" मी हो म्हणत त्यांच्या मिठीत सामावले.
सतत सूचना देत दटावणारी आई माझी, क्षणा क्षणाला मिठी मारत होती. होळी मला आवडत नसूनही मुद्दाम रंग लावून पळून जाणारा भाऊ माझा, हळद गालाला लावताना त्याचे हात थरथरत होते. नेहमी मस्तीच्या स्फूर्तीत असणारे बाबा, आज अश्रू लपवत होते.
निरोप देऊन निघतच होते की, बाबांनी स्वानंद च्या बाबांसमोर हात जोडले,
"चुकलं तर सांभाळून.."
अश्रू इतके अनावर झाले की, पुढचं बोलणं त्यांना जमलंच नाही. स्वानंद च्या बाबांनी त्यांचे हात खाली करत म्हणाले,
"चुकलं तर हक्काने ओरडेन. कारण सुन नाही लेक घेऊन जातोय मी." असं म्हणत घट्ट मिठी मारली.
ते वाक्य ऐकताच, आता एक नाही तर दोन आई बाबा असणार माझे, हे त्या क्षणी माझ्या मनाला पटले. मनातली सगळी भितीची जळमटे स्वच्छ झाली. आणि शरीराने नाही तर अंतर्मनाने माझ्या घरात गृहप्रवेश केला. चेहऱ्यावर आलेलं निखळ हसू पाहून आई सारखी, माझी दुसरी आई देखील दुष्ट काढत होती.
सगळीच नाती खूप अनमोल असतात पण बापलेकीच नात अनोखं असतं.. लेखात असणाऱ्या त्या मुलीची घालमेल प्रत्येक मुलीला होते जेव्हा ती नववधू होते. पण साखर विरघळावी तशी ती विरघळून जाते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा हा क्षण आहे, जो मी शब्दांद्वारे मांडलाय...
- अक्षता कुरडे.