ranubaaiche mrutyupatra in Marathi Short Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | राणूबाईचे मृत्युपत्र

Featured Books
Categories
Share

राणूबाईचे मृत्युपत्र

* राणुबाईचे मृत्यू पत्र *
--------------------------------
० मच्छिंद्र माळी औरंगाबाद



रात्री बराच वेळ झाला होता. संगमनेर
जाणारी शेवटची बस वैजापुर स्थानकावरुन वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही.
तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी संगमनेर जाणारे होते. एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकिट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर फाटा असलेल्या व तेथुन तीन चार किलोमिटर दूर असलेल्या माळवाडीचे तिकिट मागु लागली.
बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल?
वाहक सूर्यभान चौधरी थोडासा म्हातारीवर रागावलाच की, 'तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला? लवकर उजेडात निघुन जायायचे ना?'
म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तीला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला.
इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक सूर्यभान मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तीला उतरुन देवु पण धड चालता न येणारी, व्यवस्थीत रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पाऊसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल? रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर?
तेवढयात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली. वाहक सूर्यभानने आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तीचे बखोटे धरून तीला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.
बाहेर डोळयांना काहीही दिसत नव्हते. क्षणाचाही विचार न करता त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहचविणे.
म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकु लागली.
इकडे बस चालक नाना कोळेकर व प्रवाशींची 'दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे?' अशी काव काव सुरु झाली. चालक कोळेर बसखाली उतरुन त्याने खिश्यातुन बिडी काढून अलगद तोंडात धरली व फरssकन काडी ओढून पेटविली.थकवा घालविण्यासाठी दमदार झुरके मारीतच बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येवुन पडला की काय? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल.
संताप झाला त्याचा. प्रवाशीही संताप करु लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडुन हा निघुन गेला. काही म्हणाले 'चला हो, त्याला राहु द्या' वगैरे वगैरे.
इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, 'बा तुझे नांव काय रे?'
'तुला काय करायचे आजी माझ्या नांवाशी... मी सूर्यभान चौधरी.'
'कोणत्या डेपोमध्ये आहे?'
सूर्यभान- 'वैजापूर.'
आजी - 'मुलेबाळे?'
सूर्यभान- 'आहेत दोन.'
तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहक सूर्यभानचे हाती म्हातारीने कुलुपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.
ती म्हातारी राणुबाई शिसोदे त्या घरात व गांवात एकटी राहत होती. तीला जवळचे म्हणुन कोणीच नातेवाईक नव्हते. तीच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तीच्या आजुबाजुला फिरकत नसे.
तीही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तीला वाटणे स्वाभाविक व सहजही होते.
गांवा लगतच राणुबाईची 'पांढरी' नावाचे चार बिघा शेत तीच्या मालकीचे होते. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवुन आपला उदरनिर्वाह करायची.
असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तीने गांवचे सरपंच दौलतराव पालकर,ग्रामसेवक देवधर लाटकर व पो.पा.दादासाहेब नागरे यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारी राणुबाईने असे अचानक का बोलाविले म्हणुन नवल वाटले.
ते घरी आले. म्हातारी उठुन बसली व त्यांना म्हणाली, "दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर सूर्यभान चौधरी, कंडक्टर, डेपो वैजापुर याच्या नावावर लिहुन द्या" व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातुन मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही आता.
सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे, कोण हा सूर्यभान चौधरी कंडक्टर? त्याला सर्व म्हातारी का देतेय? असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.
दोन तीन दिवसात म्हातारी वारली. सरपंच व ग्रामसेवकाने तीच्या सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यावर मग त्यांनी सूर्यभान चौधरी कंडक्टरचा वैजापुर बसस्थानकावर शोध घेतला. त्याला भेटुन सर्व वृत्तांत सांगितला. साधारण वर्षभरापूर्वीचाच बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकुन तर त्याला रडुच कोसळले.
त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी सूयर्भान चौधरीला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.
वाहक सूर्यभान चौधरी गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला.
वाहक सूर्यभान म्हणाला, 'का? गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?'
सरपंच म्हणाले, 'गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.'
वाहक सूर्यभान चौधरी ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, 'हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत. हे घर पण
विक्री करा आणि हे सोने हे विकुन त्यातुन येणारे पैसे बांधकामाला वापरा अन शाळेला छान दरवाजा बांधा अन त्यावर "राणुबाई शिसोदे विद्यालय माळवाडी" नांव असे सुंदर नांव टाका.'
टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावुन गेले. 'दरवाज्यालाच काय हायस्कुलला राणुबाईचे नांव देवु.'
वाहक सूर्यभान आनंदाने भारावून गेला. त्याच्या डोळ्यातून आनंदाने धारा वाहु लागल्या. कधीकाळी केलेली लहानशी मदतही व्यर्थ नसते हे त्याला मनोमन पटले.त्याने "फाटकी झोळी" असुनही गावाला अनमोल दान दिले.गावकरीही त्याचे दानशुर वृत्तीने हर्षित होऊन भारावून गेले.सूर्यभानने सर्वांचे आभार मानले, प्रेमाने निरोप घेतला.अन सर्वजन भारावलेले अंतःकरणाने त्याच्या पाठमो-या आकृतीकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पहात कितीतरी वेळ पहात ऊभे होते......!
*******************