Her beauty is curse or blessing in Marathi Short Stories by शमिका books and stories PDF | तिची सुंदरता शाप की वरदान???

Featured Books
Categories
Share

तिची सुंदरता शाप की वरदान???

अंजली एका श्रीमंत, प्रतिष्ठित, खात्या-पित्या पाटलाच्या घरात जन्मलेली मुलगी होती तिला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नव्हती ती मागेल ते, मागेल तेव्हा तिला मिळत होते, तिचे वडील बँकेत नोकरीला होते, अमाप पैसे होते, गावाकडे शेतजमीन, मोठी प्रॉपर्टी होती, मोठ्या व्यवसाय होता त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडू दिली नाही. अंजली लहान असतानाच ते पुण्यात येऊन स्थित झाले, पुण्यात येताच त्यांनी मोठ्ठे तीन बीएचकेचे घर विकत घेतले, मुलं लहान होती पण जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांना घर लहान वाटले नाही पाहिजे. सुरूवातीला तिच्या वडिलांना जास्त पगार नव्हता पण त्यांना गावाकडून प्रत्येक गोष्टी आयत्या मिळत होत्या, गावाकडे तीन भाऊ, शेती, व्यवसाय सांभाळत होते, त्यामुळे अंजलीचे वडिल शहरात निश्चिंत होते, त्यांच्या शिक्षणाचाही त्यांना फायदा होत होता आणि घरून मोप प्रमाणात धान्य, पैसे मिळत होते म्हणून पाटील घराणं एकदम गुण्यागोविंदाने राहत होते.

अंजलीचे लहानपणीपासूनच फार लाड झाले, ती घरात मोठी होती तिच्या पाठीमागे तिला दोन भाऊ आणि एक बहिण होती, तरी त्या सर्वांचेच फार लाड होते, ते खाऊन पिऊन मस्त होते. मोठे घर, हवे ते मिळत असल्याने त्यांच्या मनात त्यांच्या आई- वडिलांविषयी एक सकारात्मक प्रतिमा तयार झाली होती. चौघेही चांगले शिकत होते ज्याप्रमाणे वडिल लाड करायचे तसेच ते रागिष्टही भरपूर होते म्हणजे जास्त बाहेर खेळायला जायचे नाही, सात नंतर तर अंजली आणि तिच्या लहान बहिणीने दारातही उभे रहायचे नाही. घरात म्हणजे घरातच, तेवढा त्यांचा दरारा होता, मग बाबा आले की अंजली आणि तिची लहान बहिण काव्या दोघी घरात येऊन बसायच्या, पण त्यांच्या लहान भावांना कसलेच बंधन नव्हते ते त्यांना वाटेल तोपर्यंत खेळू शकत होते. हा भेदभाव का याचा अंजली नेहमी विचार करायची पण बाबा घरी आले की नेहमी काही ना काही तरी खायला आणत त्यामुळे ती त्यांच्यावर कधीच रागवत नसे उलट तिला वडिलांबाबत खूपच आपुलकी आणि प्रेम वाटे.

पाहता पाहता अंजली मोठी होऊ लागली तशी अंजली फारच सुंदर दिसू लागली होती हळूहळू तिच्या वडिलांनी तिचे पूर्णपणेच बाहेर जाणे बंद केले होते, फक्त घर आणि शाळा एवढाच तिचा दिनक्रम असायचा त्यामध्येही बाबाच तिला शाळेत सोडवायला आणि घ्यायला जायचे, त्यामुळे ती घरातच राहून तिची सौंदर्यपट्टी मस्त झाली होती, तिची तब्येत मस्त गुटगुटीत झाली होती, गोरा चेहरा त्यावर रेखीव, मोठे डोळे, सरळ लांब नाक, मोठे आणि दाट केस ह्या अद्भुत सौंदर्यामुळे ती फारच उठून दिसत होती. अंजली दहावीला असल्यापासूनच तिला स्थळ यायला सुरूवात झाली, गावाकडून, बाबांच्या कामातून, आईच्या मैत्रिणींकडून अंजलीसाठी बोलणी व्हायला लागली. आई नेहमी मध्येच बोलत की अंजलीला शिकायचे आहे आम्ही लवकर तिचे लग्न करणार नाही, पण बाबा नेहमी आईला रागवत आणि लवकर तिचे लग्न उरकून टाकायचा विचार करत, आणि त्यांच्या मनात एक वेगळाच विचार येत, त्यांनी अंजलीची दहावी झाली की तिचे शिक्षण थांबवायचा विचार केला, अंजली फार सुंदर आहे आणि जर ती कोणत्या मुलाच्या जाळ्यात अडकली तर आपल्या एवढ्या लाडाचा, तिला दिलेल्या ऐशारामाचा आणि कोणत्याच गोष्टीला अर्थ उरणार नाही, याहीपेक्षा त्यांना याचे टेन्शन होते की, जर आपली मुलगी आपल्या हाताबाहेर गेली तर आपल्याला गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही, आपल्या आख्ख्या पाटील घराण्यात आपली इज्जत जाईल. त्यापेक्षा तिचे लवकर लग्न उरकून टाकलेले बरे असा विचार त्यांनी अंजलीच्या आईला सांगितला, पण तिच्या आईला हा विचार फार पटला नाही, लोकांच्या भितीमुळे आपण आपल्या मुलीवर अविश्वास दाखवणे चूक आहे आणि तिच्या आईला खात्री होती की अंजली तिच्या आई वडिलांची इजत्त कधीच धूळीस मिळवणार नाही. बाबांनी आईच्या म्हणण्यावरून आणि अंजलीने फार रडारड केल्याने अंजलीला पुढचे शिक्षण घ्यायची परवानगी दिली. अंजली ऐंशी टक्के मिळवून दहावीत उत्तीर्ण झाली, तिच्या आई- वडिलांना दोघांना फार आनंद झाला, एवढी हुशार मुलगी खरेच आयुष्यामध्ये काहीतरी करू शकते असे तिच्या आईचे मत होते पण बाबांचे मात्र राहून राहून एकच खूळ मनात होते, कॉलेजमध्ये अंजली कोणत्या मुलांना भेटली त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि अंजली जर त्यांच्यामध्ये वाहवत गेली तर तिच्या वडिलांची इज्जत जाणार ह्या विचाराने त्यांना रात्र रात्र झोप येत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांच्या गावाकडच्या भावांना विचारून घेतले की मला समजत नाही काय करू ते, त्यांनी स्पष्ट सांगितले की तिला इकडे पाठवून दे ती शाळा वगैरे सगळं विसरून जाईल, चांगलं शेतात काम करीन, घरची दोन – तीन काम शिकीन आणि गावातलंच स्थळ बघून तिचं थाटामाटात लग्न लावून देऊ, काय तिथे तिच्या कॉलेजचं टेन्शन घेतो. या बोलण्यावर तिच्या वडिलांना धीर वाटला आणि त्यांनी लगेच अंजलीला गावाला सोडण्याची तयारी सुरू केली. अंजली आणि तिची आई त्यांना फार विनवणी करत होत्या. पण त्यांनी काही ऐकले नाही, अंजलीने मोठमोठ्याने रडायला आरडा ओरडा करायला सुरूवात केली, आजपर्यंत सगळ्या गोष्टी दिल्या, ज्या नको होत्या त्या पण दिल्या, पण मला नकोय त्या गोष्टी, मला शिक्षण हवंय असं बोलत अंजली रडत होती. अंजलीचा उध्दटपणा बाबांना पचला नाही म्हणून ते तिच्यावर धावून गेले आणि आई मध्ये गेली. त्या दोघांमध्ये मोठे वाद झाले, बाबा सुध्दा आवाज चढवत आईशी बोलत होते आणि आईसुध्दा अंजलीच्या बाजूने ओरडत होती. पंधरा मिनिटे भांडल्यानंतर आईला अचानक भोवळ आली आणि आई निपचित खाली पडली. हे पाहून अंजली, बाबा फार घाबरले त्यांनी ताबडतोब तिला जवळच्या दवाखान्यात नेले. बाबा आईशी खूप आक्रमकतेने भांडलेले पण त्यांना आता तिची काळजी वाटू लागली होती, थोड्यावेळापूर्वी अंजलीला गावी पाठविण्यासाठी हट्ट धरणाऱ्या बाबांना आता तिची खूप गरज वाटली ती करत असलेली धावपळ पाहून त्यांना धीर आला. आईला दोन तीन दिवस अ‍ॅड्मिट केले आणि नंतर डॉक्टरांना औषध देऊन त्यांनी तिला डिस्चार्ज दिला. नेमकी चक्कर कशामुळे आली हे मात्र आईला समजले नाही, डॉक्टरांनी फक्त बाबांना सांगितले की त्यांना ह्र्दयरोग झालेला आहे लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल. बाबांना फार मोठा धक्का बसला, पण अंजलीने त्यांना खूप मोठा धीर दिला, मी आहे सगळं करायला आपण आता आईची काळजी घेतली पाहिजे, तुम्ही नाही म्हणत शाळा शिकायची तर मी नाही शिकत पण मला आईची सेवा करायला तरी इथे थांबूद्या, अंजलीच्या एवढ्या कळवळीच्या विनवणीवर बाबांच्या डोळ्यात अश्रू आले, त्यांना त्यांची चूक गवसली होती. बाबा आईला घेऊन घरी आले, आईला काहीच काम करायचे नव्हते सगळं अंजली करत होती. तिला गावी पाठवण्याचा विचार बाबांच्या डोक्यातून कधीच गेला आणि त्यांनी तिला कॉलेजातही घालण्याचे ठरविले. अंजली फार खूश होती, तिला पुन्हा बाबांविषयी प्रेम वाटू लागले, ती खूप समजूतदारपणे सगळ्या गोष्टी समजून घेत होती, तिच्या आईची सगळी कामे ती करत होती. ते करून ती तिच्या लहान भावंडांची काळजी घेत होती, आणि सगळं करून ती कॉलेजला जात. बाबांचे प्रमोशन झाले होते म्हणून त्यांना फार कामाचा लोड येत होता. त्यामुळे लहान भावंडांचा अभ्यास, घरात काय लागतं ते पहायला त्यांना वेळ मिळत नसे. बाबांचा लोड पाहून तिने बाहेरची काम करायलाही सुरूवात केली, बाहेरून किराणा भरणं, लहान भावांना शाळेत सोडणं, घरातलं काम करून ती कॉलेज करत होती. बाबांचा तिच्यावरचा जाचही कमी झालेला होता. आईही खूश होती. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्यासमोर वाद घालायचे, तिला टेन्शन येईल अशा गोष्टी तिला सांगायच्या नाही, या सगळ्या गोष्टींचे ते पालन करत होते. काही दिवसांनी आईचे ह्र्दयाचे ऑपरेशन झाले, अंजलीने तिची मनोमन सेवा केली, तिला हवे नको ते पाहिले आणि आई ठणठणीत बरी झाली.

आता अंजलीची बारावीत होती, अंजलीला अभ्यासासाठी वेळ हवा होता. बाबांनी हे समजून घेतले आणि त्यांनी तिच्यावरील काम कमी केले त्यांनी घरकामासाठी बाई ठेवली. आता घरात सर्वांना आराम होता, आईलाही फार काम नव्हते कारण ती कामवाली सगळं पाहायची, भावांना शाळेत सोडवणे किराणा आणणे वगैरे सगळी कामं ती चोख करत होती. त्यामुळे आई बाबा निश्चिंत होते. सगळं काही नीट चालू होतं आणि सर्वजण पुन्हा पहिल्यासारखे आनंदात राहत होते. एवढं सगळं असले तरी आता अंजलीला बाहेर बसण्यापासून, फिरण्यापासून बाबांना काही प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे अंजली बिनधास्त होती. तिचे बाहेर जाणे, मैत्रिणींसोबत वेळ घालवणे सुरू होते. बाबांनी अगदी दक्षतेने तिला मुलींच्या कॉलेजमध्ये घातले होते पण तिला याची काही खंत नव्हती, तिला शिक्षण घेणे हा खरा हेतु होता, त्यामुळे ती आहे त्या कॉलेजमध्ये भरपूर एन्जॉय करत होती, एवढे काम करून, घरचं टेन्शन असूनही तिचा चेहरा नेहमी प्रसन्न असायचा. तिच्या मैत्रिणीपण नेहमी तिचे कौतूक करत. अंजली ज्या भागात राहत होती, त्या भागात बिल्कुल टवाळकी मुलं वगैरे नव्हती त्यामुळे तिला त्यांच्या परिसरात वावरताना कधी असुरक्षित वाटले नाही.

एकदा ती कॉलेजमधून घरी येत असताना त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या कौस्तुभची तिच्यावर नजर पडली, एवढी वर्षे समोरासमोर राहूनही त्याने तिचे एवढे भारावून टाकणारे सौदर्य पाहिले नव्हते याचे त्यालाच नवल वाटले. तिने पंजाबी ड्रेस घातला होता, दोन्ही खाद्यावर ओढणी अडकवलेली, मागे बॅग होती, लांबसडक वेणी, आणि उन्हामध्ये तिचा चेहरा आणखीनच चमकत होता. कौस्तुभ तिचे हे डोळे दिपवून पाहणारे सौदर्य वरूनच पाहत होता, पण ती भरभर चालत घरात गेली. कौस्तुभ मात्र नकळत तिच्या प्रेमातच पडला होता. तो तसाच त्यांच्या घराच्या खिडकीकडे, टेरेसकडे पाहत बसला. आणि हळूहळू तिला पाहणे हा त्याचा रोजचा नित्यक्रम ठरला. कौस्तुभ तिला नुसते पाहायचा आणि स्वतःचे मन भरून घ्यायचा. त्याने कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तो तिच्या वडिलांना चांगलाच ओळखत होता, त्यांचा स्वभाव त्याला कधीच पटला नाही, त्यामुळे त्याने त्यांच्या मुलीशी बोलण्याचा कधी प्रयत्न केला नाही.

अंजलीची बारावी झाली, अंजली बारावीतपण चांगल्या मार्क्सनी पास झाली, तिच्या आईच्या आता तिच्याकडून अपेक्षा वाढल्या. तिचे बाबाही अंजलीवर फार खूश होते. गावाकडून त्यांना सारखे फोन यायचे की तू तुझ्या मुलीला शिकवू नको, ती शिकून तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल, आपल्यामध्ये मुलींना जास्त शिकवण्याची पध्दत नाही. पण बाबा त्यांच्या अशा बोलण्याकडे लक्ष देत नसत आणि अंजलीला पूर्ण पाठिंबा देत होते.

आता अंजली एफवायबीएचे शिक्षण घेऊ लागली, ती रोज कॉलेजला जात होती आणि आपल्याला कुणीतरी सारखे पाहत आहे, हे तिलाही जाणवू लागले होती. तिला समजले समोरच राहणारा कौस्तुभ तिच्याकडे सारखा पाहत आहे, तो तिच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा होता, त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो एका आयटी कंपनीत कामाला होता. त्याची ही सर्व माहिती तिला कामवाल्या मावशींकडून मिळालेली होती. लगातार वर्षभर तो नुसताच अंजलीकडे पाहत होता, पण अचानक एकेदिवशी अंजलीनेही त्याच्याकडे पाहिली आणि तिला त्याचे हसू आले. कौस्तुभसाठी ही फार मोठी गोष्ट होती, एक सुंदर मुलगी आपल्याला लाईन देत आहे या गोष्टीने तो सुखावला होता. झाले आता अंजली आणि कौस्तूभ रोजच एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्यामध्ये एकप्रकारचे प्रेम उमलू लागले होते, अंजली सारखी कामवाल्या मावशींकडे त्याची माहिती विचारायची आणि तिला दरवेळेस त्याची चांगलीच माहिती मिळत होती. मग त्यावर तिच्या मनात एक मत तयार झाले होते, जर मुलगा चांगला असेल तर त्याकडे पाहण्यात काहीच अडचण नाही. अंजलीचे आणि कौस्तुभचे एकप्रकारे आखो ही आखोमे टाईपचे प्रेम प्रकरण सुरू झाले.

पाहता पाहता अंजलीचे पहिले वर्ष पूर्ण झाले. आता अंजली दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. कौस्तुभ आणि ती रोज टेरेसवर, खिडकीतून फक्त एकमेकांसोबत इशाऱ्यांनीच गप्पा मारत होते, त्यांच्या प्रेमात कोणते शब्द, कोणते वचन यांचा संबंध नव्हता. हळूहळू दुसरे वर्षपण संपत आले. अंजलीच्या बाबांना आता गावाकडून सारखेच फोन येऊ लागले होते, मुलगी हाताबाहेर गेल्यावर तिला गावी आणणार का, तिला लवकर गावी आण नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल. असे बोलून ते रोज तिच्या बाबांवर दबाव आणत होते, पण त्यांचा अंजलीवर विश्वास आलेला होता, एवढे शिक्षण केले पण तिने कधी तसली काही भानगड केली नाही, कधी तिच्या वडिलांना त्रास होईल अशी वागली नाही, मग एका वर्षाने काय फरक पडणार म्हणून त्यांनी गावाकडे सांगितले की एवढं तिचे पदवीपर्यंत शिक्षण झाले की आणतो मी गावाला मग करू तिचं लग्न..... हे ऐकून अंजलीच्या जीवाची घालमेल सुरू झाली, तिला नक्की कळेना की कौस्तुभ तिच्याकडे नुसता पाहतोय की त्याचं तिच्यावर खरं प्रेम आहे. त्यांच्यामध्ये प्रेम आहे की नाही याचीची तिला शाश्वती नव्हती तर तिने स्वप्न पाहणंही चुकीचे आहे असं बोलून तिने त्याचा विषय सोडून दिला.

एके दिवशी त्यांच्या कामवालीकडून त्याला समजले की शिक्षण पूर्ण झाल्यावर अंजलीला गावी घेऊन जाणार आहे आणि तिचं लग्न लावून देणार आहे, तसे कौस्तुभलाही चैन पडेना, आता त्याला तिच्याशिवाय राहणे शक्य नव्हते. ती गावी जाणार हा विचारच तो पचवू शकला नाही आपण त्याआधी तिच्याशी बोल्ले पाहिजे असे त्याला वाटू लागले. त्याने कामवालीकडे एका कागदावर त्याचा मोबाईल नंबर लिहून दिला. पण अंजलीकडे मोबाईल नसल्याने ती त्याच्याशी बोलू शकली नाही, दुसऱ्याच दिवशी त्याने कामवालीकडे तिच्यासाठी मोबाईलही पाठवून दिला. ह्या सगळ्या गोष्टीचा अंजलीवर फार परिणाम पडला आणि कौस्तुभ तिच्यावर खूप प्रेम करत आहे असे तिने गृहीत धरले. पण त्याच्याशी बोलण्याआधी तिच्या डोळ्यासमोर आई-बाबांचा चेहरा आला, तिला त्यांना फसवून कोणतीही गोष्ट करायची नव्हती. पण तिला शिक्षण सोडून गावी जायचे नव्हते, कारण गावी गेले की पुढे शिकता येणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती. म्हणून तिने सहज एकदा बाबांना विचारले की, मी गावी जाऊन करणार काय... तिथे काका तर मला शिकू पण देणार नाही. त्याच्यावर बाबांनी लगेच उत्तर दिले आता तुझे ग्रॅज्युएशन झाले की बास झाले ना शिक्षण अजून किती शिकायचे, आणि गावाला तुझा नवरा ठरवेल आता तुला शिकवायचं की नाही, आईलाही हे मत पटले होते कारण मुलीने हवे ते शिक्षण घ्यावे आणि लग्न करावे अशा विचाराची ती होती पण बाबांचा प्लॅन तिला ठाऊक नव्हता, बाबांनी बोलता बोलता सांगितले की अंजलीला तिच्या चुलत आत्याने मागणी घातली आहे, मोक्कार पैसा, प्रॉपर्टी आहे या विचाराने तिच्या बाबांनी त्यांना अंजलीचा होकारही कळवून टाकला होता, पण नेहमीप्रमाणे आईला आणि अंजलीला ही गोष्ट खटकली, आईने मुलाविषयी विचारले तर बाबा म्हणाले, चांगला हुषार आहे, शेती करतो, चांगलं त्याला व्यवहारातील ज्ञान आहे, आणि त्याचे वय 30 आहे. तशी अंजली कोसळली, एकोणिस वर्षाच्या अंजलीचे 30 वर्षाच्या मुलाशी लग्न करण्याचा तिच्या बाबांनी विचार कसा केला हेच तिला समजले नाही. पण तिचे बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम होते, आत्तापर्यंत गावाकडच्या कुणाचं ऐकलं नाही फक्त तुमचं दोघींचं ऐकलं पण एकदिवस लोक मला गावात घेणार नाही, मला त्यांचं ऐकूनच रहावं लागल, आणि आता शिक्षण पुरेसं झालं आता पुढच्यावर्षी लग्नाचं पाहू, बाबा त्यांचा निर्णय सांगून मोकळे झाले, आईने त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला पण त्यांनी ह्यावेळेस काही ऐकले नाही. अंजलीच्या तर डोळ्यासमोर पूर्ण अंधार होता, बाबा म्हणेल ते ती करायला तयार होती पण लग्न झाल्यावर तिचे शिक्षण, तिचे स्वातंत्र्य तिला मिळणार की नाही हा एक मोठा न सुटणारा प्रश्न होता, त्यात त्या मुलामध्ये आणि अंजलीमध्ये दहा- अकरा वर्षांचे अंतर होते. आता मात्र अंजली सुन्न झाली होती तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न पडलेला होता, तिने खूपदा बाबांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तिलाच गप केले आणि ती लोकं किती चांगले आहेत, तो मुलगा तिला कसा सुखात ठेवेल याची खात्री देऊ लागले.

खूप प्रयत्न करूनही बाबांनी ऐकले नाही, शेवटी तिच्याकडे कौस्तुभ हाच एक पर्याय होता, तो तिच्यावर प्रेम करतो आहे त्याने तिच्यासाठी तिला फोन घेऊन दिला म्हणजे तो तिच्यासाठी काहीही करू शकतो असा विचार करून तिने त्याने दिलेल्या फोनवरून त्याला फोन केला, कौस्तुभने पहिल्यांदा तिचा आवाज ऐकलेला, दोन वर्षे तिला पाहून तिच्याविषयी जी प्रतिमा तयार झाली होती त्या प्रतिमेची आज तिचा आवाज ऐकून त्याला खात्री झाली. अंजलीने सर्वात पहिल्यांदा त्याला विचारले, जर उद्या आपले लग्न झाले तर तू मला शिक्षण घेऊ देशील का... तिच्या ह्या प्रश्नावर त्याला तिची खरी परिस्थिती काय आहे हे समजले आणि तिने सगळी हकीकत त्याला सांगितली. त्याला काय करावे काही समजले नाही. त्याने लगेच तिला उत्तर दिले, तु म्हणशील ते तुला करायला माझी मुभा असेल आणि तु जो बंदिस्तपणा त्या घरात सोसला आहे तो मी गेली कित्येक वर्ष पाहत आलो आहे, खरेच तुला एक नवीन जीवन देईल, तू म्हणशील ते तू करू शकशील माझ्या घरी. कौस्तुभच्या या बोलण्यावर अंजलीला फार हुरूप आला, कौस्तुभ हा अगदी तिच्याचसाठी बनला आहे याची तिला खात्री पटू लागली.

अंजलीने त्याला तिच्या घरी येऊन तिचा हात मागायला सांगितले, पण त्याला माहित होते तिचे बाबा काही करून तयार होणार नाही. पण अंजलीला वाटत होते की आपण दोघे एकाच जातीचे आहोत तुझ्या घरीही सगळं चांगले आहे, तू चांगला जॉबला आहे तर ते ऐकतील पण कौस्तुभला वेगळीच भिती होती आणि ती त्याची भिती खरी ठरली, अंजली आणि कौस्तुभला फोनवर बोलत असल्याचे तिच्या बाबांनी पाहिले आणि त्यांनी सगळे ऐकले त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली होती, त्यांना खूप पश्चाताप होऊ लागला. त्यांनी अंजलीच्या हातातला फोन हिसकावून घेतला आणि तिच्या आईला तिचे पराक्रम सांगितले. अंजलीच्या वडिलांना आता एक क्षणही तिला इथे ठेवणे शक्य नव्हते, त्यांनी कसेही करून तिला गावी घेऊन जायचे ठरविले, त्यांनी नाही अंजलीचे काही ऐकले नाही तिच्याशी काही बोल्ले. अंजली काही करून यायला तयार नव्हती, त्यांच्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखे वाद होऊ लागले, अंजलीचे बाहेर जाणे पूर्ण बंद झाले आणि तिने रागाने खाणे- पिणे बंद केले, आईला तिची चूक झाली हे पटत होते पण तिची ही परिस्थिती बघवत नव्हती, आईने समजावले पण तिने आईला कौस्तुभ कसा आहे हे सांगितले, आणि कौस्तुभ आपल्या घरासमोर राहणाराच मुलगा आहे हे समजल्यावर आईला फार भिती वाटू लागली. कसेही करून बाबांना हे समजता कामा नये नाहीतर ते त्याचे काहीही करेल अशी तिला भिती होती. अंजली सारखं आईला सांगत होती, अगं पण तोही आपल्याच जातीतला आहे, आणि तो मला एकदम परिपूर्ण आहे. पण बाबांनी त्यांच्या बहिणीला शब्द दिला आहे, त्यांनी शब्द मोडला आणि त्यांनी त्यांच्या मुलीचे दुसऱ्या कोणत्या मुलाबरोबर लग्न करून दिले, हे त्यांच्या बहिणीला कधीच पटणार नाही, त्यांना गावात मान मिळणार नाही.. तुला समजतंय का, आजपर्यंत त्यांनी जे काही कमावले ते फक्त इज्जतीसाठी.... आई कळवळून अंजलीला सांगत होती. पण आई, तुला वाटतं का तिथे मला स्वातंत्र्य मिळेल, मला शिकता येईल, अगं आई तो मुलगा कोण आहे त्याला मी पाहिले पण नाही. त्याच्याबद्दल मला काहीच माहित नाही. पण बाबांना माहित आहे ना, त्यांनी काहीतरी चांगले पाहूनच निर्णय घेतला असेल ना, आई तिला समजावत बोलत होती. आई प्रॉपर्टी आणि शेती पाहून दिलेला निर्णय माझ्यासाठी कसा उपयुक्त असेल... जाऊदे तू त्याला विसरून जा आणि तो कोण आहे हे बाबांना कधी सांगू नको... आईने फक्त एवढांच सल्ला दिला आणि तिला जेवून घ्यायला सांगितले.

अंजली फारच चिंतेत होती, तिचे कॉलेजला जाणे बंद होते, ती खिडकीतूनही बाहेर बघू शकत नव्हती. कौस्तुभला या सगळ्या गोष्टी समजल्या पण तो तिच्याशी बोलू शकत नव्हता कारण तिच्या बाबांनी कामवालीला काढून टाकले होते. शेवटी कौस्तुभने त्याच्या घरी सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनीपण एका पायावर अंजलीला होकार दिला पण प्रश्न अंजलीच्या वडिलांचा होता, आणि त्यांच्याशी बोलायची कुणाची हिम्मत होत नव्हती.

काही दिवसांनी अंजलीचे काका, काकू आणि गावाकडचे काही माणसे आली. त्यांनी अंजलीला सगळे समजून सांगितले आणि तिला गावाकडे चल असे सांगितले, त्यावर तिने पुन्हा तेच सांगितले. आता मात्र त्यांच्या जबरदस्तीमुळे अंजली मोठमोठ्याने रडू लागली होती. तिला खिडकीतून कौस्तुभला आवाज देऊ वाटत होते पण आईच्या म्हणण्यानुसार ती काहीच करू शकत नव्हती. शेवटी बाबांच्या आणि काकांच्या निर्णयासमोर तिला मुकावे लागले कारण ती कौस्तुभबद्दल कोणतीच गोष्ट त्यांना सांगू शकत नव्हती. झाले दोन दिवसांचा पाऊणचार घेऊन सगळी गावाकडची मंडळी अंजलीला गावाला घेऊन जाणार होती, तिथे ती काकांकडे राहणार होती आणि काही दिवसांनी तिचे लग्न होणार होते. असा साधा-सोप्पा प्लॅन तिच्या वडिलांनी केला होता, पण तो पूर्णपणे फिसकवटत अंजली सकाळी सातलाच घरातून बाहेर पडली ते दुपारी तीन चारपर्यंत तिचा काही पत्ता नव्हता. तिचे बाबा आणि काका डोक्याला हात लावून बसलेले होते, त्यांनी कुठेही पोलिसांत वगैरे जाण्याची तयारी केली नाही कारण पुन्हा पुन्हा त्यांना त्यांची इज्जत प्यारी होती. अंजलीच्या आईला संशय आला म्हणून ती लपतछपत कौस्तुभच्या घरी गेली तर त्याच्या आईने सांगितले, त्यांनी काही वेळापूर्वीच लग्न केले आणि आता मी त्यांना गावी पाठवलं आहे, तुम्ही तिच्या वडिलांना थोडं समजवायचा प्रयत्न करा, जर ते मान्य झाले तर आपण परत मोठ्या थाटामाटात लग्न लावू. त्यांच्या या बोलण्यावर काय बोलावे हे अंजलीच्या आईला काही समजत नव्हते, उलट तिच्या वडिलांना जर ही गोष्ट समजली तर ते तुम्हाला इथे राहणं अवघड करतील. असं आई त्यांना सांगू लागली, पण त्यांना त्याचे काही वाटले नाही, त्याच्या घरच्यांनी तिच्या वडिलांना समजवायला येतो अशीही तयारी दर्शवली पण तिच्या आईने त्यांना रोखले.

असे पाहता पाहता, एक दोन आठवडे निघून गेले, अंजलीच्या वडिलांचे कशामध्येच लक्ष लागत नव्हते, त्यांना मोठा धक्का तर बसलेला पण त्यांना आता गावात परत जाऊन काय सांगायचे याची भिती होती, आता लहान मुलीचं तरी कसं लग्न होईल याची त्यांना चिंता लागली होती. त्यांना राहून राहून कौस्तुभवर राग येत होता., पण हा नेमका कुठला मुलगा आहे हे त्यांना समजत नव्हते, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या अंजलीच्या फोनवरून त्या नंबरवर खूप फोन केले पण तो बंद होता. त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईला त्यांनी परत घरी बोलवले आणि तिला ते खडसावून विचारू लागले ती काही सांगायला तयार नव्हती. शेवटी त्यांनी तिला पैशाचे आमिष दाखवले तेव्हा तिने समोर खिडकीतून कौस्तुभचे घर दाखवले. तिच्या वडिलांना एक दुसरा धक्का बसला होता की आता गल्लीतही कुणाला तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. बाबा आणि अंजलीचे काका ताबडतोब कौस्तुभच्या घरी गेले, त्यांच्या घरात गेल्यावर त्यांचे सर्व सुरळित चालू होते, कुणाला कशाची चिंता नव्हती असे दिसल्यावर बाबांनी तिथेच आरडाओरडा सुरू केला आणि अंजलीला आत्ताच्या आत्ता घरी आणा, तुमच्या मुलाने तिला पळवून नेले आहे असा ते त्यांच्यावर आरोप करू लागले. पण कौस्तुभच्या घरच्यांनी त्यांना पूर्ण शांत केले. आणि त्यांना वाटाघाटी करायला सांगितले. पण कौस्तुभची परिस्थिती पाहून त्यांना बिल्कुल वाटाघाटी करायची नव्हती, त्यांना कसेही करून त्यांची अंजली परत हवी होती. म्हणून बाबांनी त्यांच्यासमोर काही लाख रूपये ठेवले आणि मला माझी मुलगी परत द्या अशी विनवणी करू लागले. तिच्या घरचे पैसे पाहून पागाळले पण कौस्तुभ ह्या गोष्टीला तयार होणार नाही म्हणून त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला, आणि ते दोघं कुठे, कोणत्या गावाला आहे हे देखील सांगितले नाही.

शेवटी अंजलीच्या घरच्यांनी ती परत येईल अशी आशा सोडून दिली, आणि तिथला आपला बोरी बिस्तारा बांधला आणि दुसरीकडे राहायला गेले कारण तिच्या वडिलांना तिथं होणारा अपमान कधीच सहन होणार नव्हता. त्यांनी दहावीत असलेल्या तिच्या बहिणीचे शिक्षण पूर्णपणे बंद केले आणि अंजलीच्या ऐवजी तिला त्यांच्या बहिणीच्या मुलाला दिले. लहान बहिणीला विनाकारण तिच्या शिक्षणाला मुकावे लागले आणि एवढ्या मोठ्या पुरूषासोबत तिला संसार करावा लागला. अंजलीची आई पूर्णपणे थकून गेली होती, दोन्ही मुली तिच्या समोर नव्हत्या त्यांच्या काळजीने ती फार उदास होती.

दोन तीन महिने उलटून गेले होते, अंजली आणि कौस्तुभ त्यांच्या घरी येऊन राहू लागले पण त्यांनाही त्या वस्तीत जास्त दिवस राहता आले नाही, कारण राहून राहून त्यांना तिच्या वडिलांची भिती होती. कौस्तुभ आणि त्याच्या कुटुंबानेही दुसरीकडे राहण्याचे ठरविले. कौस्तुभची परिस्थिती ही अंजलीपेक्षा हालाखीची होती, त्यात त्याला तीन भाऊ होते, त्यातल्या दोघांचे लग्न झाले होते, आणि आता कौस्तुभही लग्न करून आलेला होता. टूबीएचकेच्या घरामध्ये त्यांना सर्वांना राहणे अवघड झाले होते, तरी अंजली सर्वकाही गोष्टींमध्ये तडजोड करत होती, सर्वांसोबत मिसळून राहायचा प्रयत्न करत होती पण तिच्या दोन्ही जाऊ बाई तिच्याकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहत होत्या, पळून आलेली मुलगी कशी असेल अशाप्रकारचे त्यांचे मत होते पण अंजली त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने वागत होती. तिला अशी आशा होती की हे दिवस जास्त काळ टिकणार नाही, काहीच दिवसांनी ती परत कॉलेजमध्ये एडमिशन घेणार होती, तिचे अर्धवट राहिलेले शिक्षण परत सुरू होणार होते, बाबांच्या घरी न मिळालेले स्वातंत्र्य तिला इथे मिळणार होते. तिला तिच्या घरची खूप आठवण यायची पण कौस्तुभ तिला देत असलेल्या प्रेमामुळे ती सगळं विसरत होती.

दोघांच्या लग्नाला दोन महिने उलटून गेले होते, आता अंजलीला तिच्या आई- बाबांची फार आठवण येत होती, कारण तिच्या सासरी तिच्या माहेरचा सारखा उध्दार होत होता. लग्नासाठी एका पायावर तयार झालेली तिची सासू आता तिला रोज टोमणे मारत होती, सारख्या तिच्या कामामध्ये, तिच्या बोलण्या- वागण्यामध्ये त्यांना चुका दिसत होत्या. तिच्या जावा तिच्याशी सारख्या भांडत होत्या, ही काय पळून आलेली हिला काय संसार समजणार. तिची सासू सारखा हुंड्याचा विषय काढत आणि म्हणत की एखादा गरीब बाप असता तर नसता मागितला पण या कौस्तुभने मात्र कहरच केला, एवढ्या श्रीमंत बापाची पोर आणली पण एक रूपयाचा हुंडा घेतला नाही. तिची सासू सारखा तिचा संताप करत होती. अंजली हे सगळं शांतपणे सहन करत होती कारण तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. आता कौस्तुभही रात्री लवकर घरी येत नव्हता, कधीकधी तो घरीच येत नसत. अंजलीला त्या घरात अगदी कोंडल्यासारखे झाले होते. ती नेहमी तिचे रडगाणे कौस्तुभला सांगत पण तो तिला तु मुलगी आहेस, आता तुझं लग्न झालं आहे, तुला तुझा संसार सांभाळण्यासाठी हे सारं सहन करावंच लागणार, असं सागत असे. पण ह्या संसारात ती एकटी पडली होती हे त्याला कळत नव्हते. तो त्याचे मन होईल तेव्हा तिच्यासोबत चांगला बोलत होता, सगळे झोपले की मिळेल त्या एकांतात, मग ते किचन असो, बाथरूम असो... तिच्या शरीरावर एखाद्या रानटी जनावरागत तुटून पडायचा. त्यांना अजून त्यांची स्वतःची खोली नव्हती, कोणताच भाऊ त्याची खोली सोडायला तयार नव्हता. मग अंजली आईंसोबत झोपत होती आणि कौस्तुभ टेरेसवर झोपत असे. लग्नाआधीदेखील त्यांचे प्रेम अबोल होते पण लग्नानंतर त्यांच्या प्रेमात कधी तो अबोला संपलाच नाही, शरीराचे मिलन कित्येकदा झाले पण मनाचे मिलन अपूर्णच होते.... तरी अंजली ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती. ती रोज उद्याच्या चांगल्या दिवसाची आशा करत होती. पण तो दिवस तिच्या आयुष्यात कधी आलाच नाही... कौस्तुभ तिच्याकडे आता सरार्स दुर्लक्ष करू लागला होता, तिचे त्या घरात केवळ रांधा वाढा, उष्टी काढा एवढेच काम होते, दिवसभर राबराब राबायचे, आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचा, त्यांच्यासमोर रोज झुकायचे आणि रात्री मोठ्या आशेने कौस्तुभची वाट पाहत बसायची. तो रात्री अपरात्री घरी येणार त्यापुढे त्याला जेवायला द्यायचे, थोडे दोन प्रेमाचे शब्दपण बोलायला कौस्तुभ वेळ देत नसत आणि त्याचे रात्रीचे पुरूषी कर्तव्याचे काम उरकून झोपी जात..

अंजली आता ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळली होती, ती आत्ता कौस्तुभकडे हट्ट करू लागली, मला बाहेर जायचं आहे, कॉलेज करायचं आहे पण कौस्तुभने तिच्या या विचाराला पूर्णपणे नकार दिला. मुलगी ही घरीच चांगली असते आणि आता तुझं लग्न झालंय आता तू घर आणि माझी सेवाच करण्यामध्ये रमावं असं तो तिला सांगे आणि त्याच्या आईचे आणि वहिनींचे उदाहरण देत. ती मात्र रोज त्याच्यासोबत भांडू लागली, लग्नाआधी मला म्हटला तुला सगळं स्वतंत्र देतो, आणि आता घरातच डांबून ठेवलं आहे, मग त्यावर कौस्तुभ शांत बसत नसे आणि तिला तिच्या वडिलांची आठवण करून देत, जे तुझ्या बाबांनी केलं तेच मी पण करणार ना, तुझ्यासारख्या सुंदर मुलीला बाहेर पाठवलं तर माझी तरी कुठं इज्जत राहील. अंजली ह्या वाक्याने पूर्ण हादरली होती, कारण हा ही इज्जत, घर या विचारसरणीचा होता याची तिला कल्पना आली होती. आता तिला आयुष्यात पूर्णपणे हरल्यासारखे वाटत होते, तिची घरात सारखी भांडणं होत होती आणि कौस्तुभ कधीच तिच्या पाठीशी नव्हता नेहमी तिला दोष देत आणि तिने आवाज चढवला की तिच्यावर हात उगारत. अंजलीला खूप एकटे वाटत होते, शहरातला मुलगा, आयटी कंपनीत चांगला नोकरीला असलेल्या मुलाचे पण असेच विचार असतील या विचाराने तिला स्वतःचीच किव वाटे. तिला आईची खूप आठवण येत, बाबांची आठवण येत, कदाचित त्यांचे ऐकले असते तर आज किमान असा त्रास झाला असता तर धावत पळत त्यांच्याकडे गेले असते. पण इथं मात्र सगळंच बंद आहे, तिला सगळेच मार्ग संपल्यासारखे वाटत होते. ती त्या क्षणी नाही माहेरची होती नाही सासरची. सासरकडे तिचे अमानुष छळ चालू होते आणि ते ती निमूटपणे सहन करत होती. काहीच दिवसात ती गरोदर असल्याचे समजले, तिला फार आनंद झालेला होता. तिचे मत होते की आई- बाबा माझ्या बाळाला पाहून शांत होतील त्यांचा राग जाईल, सासरकडचेही फार खूश होतील, कदाचित त्या बाळ्याच्या येण्याने तिचा भोग संपेल. पण झाले उलटेच, कौस्तुभला ही गोष्ट फारशी आवडली नाही त्याने अंजलीला फार झापले आणि कुणाला काही सांगू नको असे सांगितले. कौस्तुभला फार अस्वस्थ होता, पण अंजलीला समजत नव्हते तो का रागावत आहे. पण त्याच्या जबरदस्तीखातर तिने गर्भपात केला, तिचे स्वप्न, आशा, आकांक्षा तिथेच संपल्या, आणि या मागे कारण होते, कौस्तुभची इज्जत. झोपायला खोली नसताना अंजली गरोदर कशी अशा लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्याच्याकडे उत्तर नव्हते आणि त्याला इतक्यात जबाबदारी घ्यायची नव्हती, पण तो अंजलीलाही समजून घ्यायला तयार नव्हता.

झालं याही वेळेस अंजलीच्या स्वप्नांमध्ये तिच्या नवऱ्याची इज्जत, मान, प्रतिष्ठा आली आणि तिने चांगलं आयुष्य जगायचे स्वप्न बघणंच सोडून दिले. अगदी नाजूक आणि रेखीव असलेली अंजली आता फार सुकून गेली होती, तिच्या आयुष्यात फक्त भोग होते, दिवसभर सासरचे करायचे आणि रात्रीची ती तिच्या नवऱ्याची धन होती. तिचे अस्तित्व हे फक्त कौस्तुभच्या प्रतिष्ठेपुरते होते, ती तिथे राहत होती, तिथून कधी निघून कुठे गेली नाही कारण तिला भिती होती की कौस्तुभची इज्जत कुठेतरी कमी होईल, त्याला लोकं नावं ठेवतील. तिला राहून राहून वाटायचे, जर आपण अशाच प्रकारे बाबांच्या प्रतिष्ठेचा विचार केला असता तर आज आपल्या आयुष्यात हे भोग नसते. ती खूपदा जीव द्यायचा प्रयत्न करत पण तिच्यासमोर आता फक्त आणि फक्त कुणाच्या मान प्रतिष्ठेला धक्का लागू द्यायचा नाही, एवढेच होते. ती खूप त्रास सहन करत आहे हे तिला तिच्या वडिलांना दाखवून द्यायचे नव्हते कारण पुन्हा तिथे त्यांच्याच प्रतिष्ठेचा प्रश्न येत होता. तिला खूप पश्चाताप होत होता, तिने खूपच तडकाफडकी कौस्तुभशी लग्न करायचा निर्णय घेतला, बाबांचा विश्वासघात करून ती कौस्तुभसोबत पळून गेली, पण आता तिच्याकडे पश्चाताप करण्यापलीकडे काहीच नव्हते.

आणि शेवटी अंजलीने आलेल्या दिवसाला सामोरे जायचे आणि स्त्री म्हणून आपल्या वाट्याला आलेले भोग भोगायचे, एवढेच ठरवले. पण तिच्यासमोर देवाला एक विनवणी आणि प्रश्न होता, मी सुंदर आहे त्यात माझी काही चूक आहे का, आणि तिची देवाला विनवणी होती की या जन्मी मला सुंदर बनवले आहे पण पुढच्या जन्मी मात्र माझ्या पदरी कुरूपताच बरी.

ही कथा काल्पनिक आहे, असं मी बोलूच शकत नाही कारण ह्या भारतामध्ये घडणारी ही वास्तविकता आहे, आज निम्म्याहून अधिक मुली ह्या अशा चुकीच्या निर्णयाची सजा भोगत आहेत. म्हणून मुलींनी कधीही कोणतेही पाऊल उचलण्याआधी आई- वडिलांचा विचार करावा, प्रत्येक आईवडिल हे वाईट नसतात, त्यांना त्यांच्या मुलीचे चांगलेच झालेले पाहायचे असते, काही अपवाद वगळता. आई- वडिल देखील कधी - कधी प्रतिष्ठा आणि इज्जतीच्या नावावर मुलींचा नाहक बळी देतात, त्यांनी आपल्या प्रतिष्ठेसोबत फक्त एकदा मुलीच्या मनाचा विचार करणे गरजेचे आहे.

कथेतल्या अंजलीला सुधारण्याची संधी मिळाली नाही पण ही कथा वाचणाऱ्या प्रत्येक मुलीला अजून खूप वेळ आहे आपल्या भविष्याचा चौकस विचार करण्याची.

©Bhartie "शमिका❣️"