Gharguti hinsachar in Marathi Women Focused by Nilesh Desai books and stories PDF | घरगुती हिंसाचार

Featured Books
Categories
Share

घरगुती हिंसाचार

लग्नानंतरचा तिसरा दिवस होता तो. देवदर्शन करून सगळी मंडळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी आली होती. दोन दिवस जेवणाची व्यवस्था बाहेरच झाली असल्याने आज रात्रीचे जेवण घरी बनवावे लागणार होते. आल्याआल्या सासूच्या आज्ञेप्रमाणे रेखाने भरभरून कपडे बदलले आणि हातपाय धुवून स्वयंपाकघरात आली.

रेखा तशी बऱ्यापैकी सुगरण होती. त्यामुळे पहिल्यांदा सासरी जेवण बनवण्याचा उत्साह तिच्या हालचालीत दिसून येत होता. सासूबाई मागून येऊन जेवणाचा बेत सांगू लागल्या. कोणते सामान कुठे आहे वगैरे समजून घेतल्यावर रेखा जेवण बनवण्याच्या तयारीला लागली.

जेवण बनवताना सासूबाई मागे उभ्या राहून संपूर्णपणे मार्गदर्शन करत होत्या. जेवण जरी रेखा बनवत असली तरी कोणती गोष्ट कश्याप्रकारे बनवायची, किती तिखट टाकायचे, तेल किती वापरायचे धडे सासूबाई देत होत्या. जेवणातल्या तिखटाच्या प्रमाणावर रेखाने सौम्य आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा सासूबाईंची जीभ त्याहून तिखट वाटली. चपाती अशीच बनली पाहिजे, यावरही त्यांचा विशेष जोर होता. एकंदरीत रेखा नावाला फक्त जेवण बनवत होती, खरे कसब सासूबाईंचेच होते.

तुझ्या नवऱ्याला असेच आवडते, माझ्या नवऱ्याला तसेच आवडते करत करत सासूबाईंनी प्रत्येक पदार्थ स्वतःच्या मर्जीप्रमाणे करायला सांगितलं होता. त्यातही पुन्हा जेवढे सांगितलेय तेवढेच पदार्थ बनवायचे, स्वतःचे निर्णय घ्यायचे नाहीत, असेही वर बजावले.

जेवण तयार होऊन ते वाढण्याच्या वेळेपर्येंत रेखाचा उत्साह उतरलेला दिसत होता. सर्वांना वाढल्यावर स्वतःच्या ताटात तिने अगदीच थोडेसे घेतले. पहिला घास घाबरत घाबरतच तिने घेतला.

रेखाला फारसं तिखट जमायचं नाही. लहानपणापासून मिळमिळीत जेवणाची तिला सवय होती, म्हणूनच पहिल्याच घासात तिला ठसका लागला. डोळ्यांतून पाणी येऊ लागलं, तिखटाने घाम फुटू लागला.

घरात नवी व्यक्ती आलेली म्हणून प्रत्येकाची तिरपी नजर मधूनमधून तिच्याकडे पडतच होती. त्या रात्री रेखाने कसेबसे अर्ध्यापोटी जेवण संपवले. लग्नानंतर कित्येक दिवस झाले, तरी परिस्थिती बदलली नाही. खूप भूक लागली असली तरी रेखाला इतकं तिखट जेवण जमायचं नाही. परिणामी ती उपाशीच राहू लागली.

नवऱ्याजवळ सांगून पहिले, पण काहीच उलयकग झाला नाही. स्वतःसाठी वेगळं असं काही बनवण्याची तिला परवानगी नव्हती. 'आम्ही असेच खात आलोय आणि तुलाही असेच खावे लागेल' असं सासूबाईंचा दंडक होता. काही दिवसांत तिखटाची अजिबात सवय नसलेल्या रेखाला शरीरात जळजळ वाटू लागली. जेवण नीट पचायचं नाही. जेवणावरची इच्छा उडाली आणि पुढे ती आजारी पडली.


*******


मीनलचं लग्न झालं तेव्हा ती शेवटच्या वर्षाला होती. परीक्षा अजून चार महिने लांब होती. हाती आलेलं स्थळ जाऊन न देण्याच्या उद्देशाने वडीलांनी मध्येच तिचं लग्न ठरवले होते. पुढे शिकण्याची आपली इच्छा मीनलने लग्नाआधीच सर्वांना सांगितली होती.

पण लग्न झाले अन मीनलच्या अंगावर जबाबदारीचं गाठोडं पडलं. दिवसेंदिवस घरातली काम वाढू लागली. घरातल्या प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी जपणं, त्यांना काय हवं नको ते पाहण या सर्वातच दिवस निघून जायचा. सायंकाळी नवऱ्याच्या वेगळ्या फर्माईशी असायच्या. नवरा फक्त शय्यासोबत्त करण्यापुरता जवळ असायचा.

या सगळ्या उपक्रमांमुळे मीनलला अभ्यासावर लक्षचं देता येईना. घरातले वातावरण तिच्यादृष्टीने योग्य असे नव्हतेच.शिक्षण थांबवण्यासंबंधी वारंवार सांगितले जात होते. धाडस करून तिने घरात एकदा परीक्षेचा विषय काढला तर सगळ्यांनी तिच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

त्यातही चोरून अभ्यास करताना तिला पाहिल्यावर सासू तिला मुद्दामच नवी कामे सांगत असे. जाणूनबुजून तिला कामाच्या ओझ्याखाली अडकवण्याचे खेळ खेळले जात. नवराही तिच्या शिक्षणाविरुद्ध होता, त्यामुळे त्याच्याकडूनही तिची पाठराखण होणे शक्य नव्हते.

परीक्षेची तारीख जवळ येईपर्येंत मीनल या भाबड्या आशेवर होती की, काहीतरी चमत्कार होईल आणि घरातले तिच्या शिक्षणाला पाठिंबा देतील. पण तसे नाही झाले. वर्ष वाया गेल्याने मीनल आतल्याआत खूप दुखावली.


*******


एका दुपारी दारात रांगत आलेल्या बाजूच्या लहान मुलाला उचलून घेत रुपाली त्याला कुरवाळू लागली. त्याच्याशी बोबड्या आवाजात बोलू लागली.

ते ऐकून त्या बाळाची आई पटकन घरातून बाहेर आली आणि रुपालीच्या हातात असलेल्या मुलाला घेऊन निघून गेली.

"एवढी लहान मुलांची आवड आहे, तर स्वतः का नाही होऊ देत.." रुपालीच्या कानावर त्या बाईचं पुटपुटणं सौम्यपणे आलं पण मनातल्या जखमांवर मीठ चोळून गेलं.

लग्नाला चार वर्षें झाली तरी घरात अजून पाळणा हालत नव्हता. नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्या टोमण्यांमुळे रुपाली हल्ली फारच दडपणात राहायची. फारशी कोणामध्ये उठबैस करण्याची सोय नव्हती.

घरात सासूसासरे नेहमी त्या गोष्टीची आठवण करून द्यायचे. सासू तर रुपालीला घालूनपाडून बोलायची, वेगवेगळी दूषणे लावायची. नवरा सरळ दुसऱ्या लग्नाची धमकी द्यायचा. अडाणीपणात कधीकधी शिव्या घालायचा. असं नेहमीच घरात तिच्या अपमानाचे सत्र चालूच असायचे.

रुपाली खरंतर या मानसिक त्रासाला कंटाळली होती. पण तरीही काही वेळ रडून पुढे पुन्हा आशावादी होत ती निमूटपणे सगळं ऐकून घ्यायची.


*******


अठरा वर्षांची असतानाच प्रियाचे लग्न लावून देण्यात आले होते. तारुण्यात पाऊल टाकल्या टाकल्याच एक जबाबदारी अंगावर पडली होती. सासरची माणसे तशी चांगली होती तरीही अपत्य लौकर व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती. प्रियाला अर्थातच इतक्यात ते नको होते. सासरच्या वातावरणाशी किंवा लग्न झाल्यानंतरच्या जीवनाशी जुळवून घेण्यात तिची धांदल उडत होती.

तिने उघडपणे विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला पण तो विचार तिथेच दाबून टाकण्यात आला. प्रियाला स्वतःच्या इच्छेविरुद्व बाळ जन्माला घालावेच लागले.

लग्न, सासर आणि अपत्य यांतच वयाची विशी पार करण्याअगोदर प्रियाचं आयुष्य गुरफुटून गेलं. वरवर पाहायला गेलं तर बाळ तिचं होतं, सासर तिचं होतं, नवरा तिचा होता पण यावेळी ती स्वतःची नव्हती.


*****


वीणा असावी पंचविशीतील बहुधा. आधुनिक युगातली नोकरी करणारी महिला तिच्या उच्च शिक्षणामुळे मोठ्या हुद्द्यावर होती. तिच्या हाताखाली वीसेक लोकं काम करायची. दिवसातले नऊ तास लोकांना आपलं मार्गदर्शन करून कामासाठी प्रवृत्त करणारी वीणा जेव्हा घरी यायची तेव्हा तोंडातून ब्र निघायचा नाही. सासूसासरे, नवरा, दीर यांच्यासमोर बोलताना तिच्यावर दडपण असायचे. महिन्याच्या अखेरीस संपूर्ण पगार सासूकडे जमा करावा लागायचा. त्यातून मग गरजेपुरते पैसे तिला मिळायचे.

बाहेरच्या युगात वावरताना तसे कपडे, सौन्दर्यप्रसाधने यांचे वीणाला आकर्षण होते. पण तिला मिळणाऱ्या पैश्यातून या गरजा भागणे अशक्य होते.

"लग्न झालेय.. आता कश्याला बाहेरच्या गोष्टींवर लक्ष द्यायचं.." नवऱ्याचे विचार स्पष्ट होते.
वीणा आतल्या आत कुढत दिवस ढकलायची.

एखाद्या स्त्रीला सजण्या-नटण्यापासून रोखणे, किंवा तिने कमावलेल्या स्वकमाईच्या पैश्यावर तिला अधिकार नाकारणे हा हिंसाचार असू शकतो यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. तो खरेच गुन्हा आहे का याचे उत्तर बहुतेकांकडे नाही.


*******


टीव्ही, वर्तमानपत्रांतून स्त्री-अत्याचार, बलात्कार, अतिप्रसंग, विनयभंग यासारख्या विषयांच्या बातम्या रोज येत असतात. ठिकठिकाणी चर्चा होऊ लागतात. घरी, कामाच्या ठिकाणी, मित्रमैत्रिणींसोबत आपली मतं मांडली जातात. न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढले जातात. यासारख्या गुन्ह्यांसाठी काय शिक्षा असावी याचेही विवेचन केले जाते. समाज कसा लयाला जात आहे, याचे विश्लेषण केले जाते. जनजागृतीचे कार्यक्रम आखले जातात. पण हे सर्व त्याच गुन्ह्यांबाबत मर्यादित असते जे आपण प्रत्यक्ष पाहतो किंवा आपल्याला दाखवले जातात.

वर सादर करण्यात आलेल्या कौटुंबिक घटनांचा आढावा घेता, त्यातील कोणत्याही घटनेमधील हिंसेचं स्वरूप सामान्य माणसाच्या नजरेत येणार नाही. याला कारण म्हणजे स्त्री जीवनाविषयी समाजाने पुर्वीपासून काही ठोकताळे बांधून ठेवले आहेत. समाजात स्त्रीच्या अस्तित्वाची व्याख्या मुळात तिच्या शरीराचा संदर्भ घेऊन केली जाते. त्यामुळे ती ठराविक अवयवांभोवती घुटमळत असताना पाहायला मिळते.

स्त्री जीवनाचे आकलन सामान्य डोळ्यांनी होऊ शकत नाही, कारण समाजाने पुर्वीपासून रुजवलेल्या विचारांची अदृश्य पट्टी आपल्या डोळ्यांवर असते. त्यामुळे त्या शरीराच्या आतले मन पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नसते.

या पातळीवरचा विचार समाजात अभावानेच केला जातो. बाहेर एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर त्यातली हिंसा आपल्याला दिसून येते. परंतु कुटुंबात परिवाराकडून होणारे तिचे मानसिक खच्चीकरण दिसण्यात येत नाही.
साधारण वाटत असणाऱ्या या घटना म्हणजे घरगुती हिंसाचाराचे असे प्रकार आहेत, जे समाजमान्य आहेत.

म्हणजे एखाद्या कुटुंबात असे काही घडत असले तरी बाहेरील व्यक्ती किंवा समाज त्याकडे कानाडोळा करतो. 'ही बाब म्हणजे त्यांचा घरगुती प्रश्न आहे' असे समजून त्याविरुद्ध आवाज उठवणे टाळले जाते. मुख्य बाब म्हणजे अश्या घटनांमधील पीडित स्त्री स्वतः त्याबाबतीत जागरूक नसते, किंबहुना हा एकप्रकारचा अत्याचार आहे हे देखील फारश्या स्त्रियांच्या ध्यानी नसते.

मनावर केलेले वार खोलवर जखमा देऊन जातात. ती जखम दिसून तर येत नाहीच पण कधी भरूनही येत नाही.
स्त्री-अत्याचार, बलात्कार, अतिप्रसंग, विनयभंग हे सर्व गंभीर गुन्हे आहेतच आणि त्यासाठी कठोर शिक्षा झालीच पाहिजे यात दुमत नाही.

परंतु जेवण न देणे, अपत्य होत नाही म्हणून हिणवणे, शिक्षणापासून परावृत्त करणे, नोकरी करण्यापासून रोखणे, तिच्या पगारावर अधिकार गाजवणे, चारचौघात चेहरा-शरीर यांवर टिप्पणी करणे, अपमानित करणे यासारख्या शारीरिक हिंसेच्या चौकटीत न बसणाऱ्या परंतु स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या हिंसाचाराला वचक बसायला हवा. आपली आवड, आपल्या इच्छा एखाद्यावर लादण्याचा अधिकार कुणालाही नसतो.

शारीरिक हिंसाचाराच्या गुन्ह्यासाठी उशिरा का होईना न्यायव्यवस्थेकडून न्यायदानाचे कार्य संविधानाने आखून दिलेल्या नियमानुसार होत असते. न्यायप्रक्रियेत उशीर झाला की न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी वेगळ्या अर्थाने आपल्याला दिसून येते. खरेतर निःपक्षपाती निकाल त्यातून सूचित होत असतो.

वर नमूद केलेले प्रत्येक प्रसंग रोज हजारो कुटुंबात घडत असतात. अशाप्रकारच्या विकृती 'घरगुती हिंसाचार' या प्रकारात मोडतात. कायद्याप्रमाणे हे सर्व गुन्हेच आहेत, आणि ते थांबवण्यासाठी समाजात या न दिसणाऱ्या हिंसाचाराविषयी जागृती होणे गरजेचे आहे.

मात्र अश्या घरगुती हिंसाचाराविरुद्ध लढण्यासाठी बुरसटलेल्या सामाजिक विचारांची पट्टी डोळ्यांवरून निघायलाच हवी.


समाप्त

निलेश देसाई