लेडीज ओन्ली
|| एक ||
'प्रो महाराष्ट्र' वृत्तवाहिनीच्या न्युज रूममध्ये प्राईम टाईमची लगबग सुरू होती. दोन तीन कॅमेरामन अन् त्यांचे चार पाच सहकारी कॅमेरा सेट करण्यात व्यस्त होते. दोघेजण खुर्च्या अन् त्यासमोरचा भला मोठा टेबल व्यवस्थित लावण्यात गुंतलेले तर पलीकडच्या कोपर्यात मेकअपवाल्या मुली पाहुण्यांच्या तोंडावर ब्रश वगैरे फिरवत होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असताना प्राईमटाईमची अँकर मात्र अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. निकिता साबळे नाव तिचं. खरं तर लाईव्ह शो सुरू व्हायला अजून काही मिनिटांचाच अवधी उरला होता. पण निकिताचं मन स्थिरावत नव्हतं. अजून तिचं मेकअपही बाकी होतं. मेकपमनने तीन चार वेळा आवाजही दिला. पण छे...
शेवटी ती न राहावून समोरच्या मोठ्या कॅमेऱ्याचं सेटप लावत असलेल्या मुलीजवळ गेली. "शन्नो ... सुन ना.."
"हं बोल ना निकू... "
" काय वाटतं तुला..? "
" अगं कशाबद्दल? "
" आजच्या.. माझ्या शोबद्दल.. कसा जाईल? "
" म्हणजे काय? अगं तू काय आजच शो करतेयस का? यु आर द बेस्ट अँकर डियर.. " शन्नोने तिला प्रोत्साहन दिले.
" तसं नाही गं... पण.. " निकिताच्या मनात काय चाललं होतं ते तिलाच ठाऊक.
" पण काय? " शन्नोने कॅमेऱ्याची पोझिशन फायनल केली. अन् निकिताच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं," भीती वाटतेय का तुला? "
" भीती? अन् मला? " निकीताने खांदे उडवले,"आजिबात नाही.. पण का कुणास ठाऊक... मला असं वाटतंय की हा माझ्यासाठी लास्ट चान्स आहे. आज जर मी चमत्कार घडवून दाखवू शकले नाही तर... "
" तर..?? "
" मला जे ध्येय गाठायचे आहे ते मी कधीच गाठू शकणार नाही... "
" ध्येय? "
" हं... ध्येय..!! निकिता साबळे... एडिटर इन चीफ..प्रो महाराष्ट्र न्युज चॅनेल... " निकिता प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होती.." मला प्रो महाराष्ट्र वर राज्य करायचंय... मराठी न्युज चॅनेल इंडस्ट्रीची सम्राज्ञी व्हायचंय.. मला.. "
" अगं हो.. पण तुझ्या त्या महत्वाकांक्षेचा आजच्या शोशी काय संबंध? " शन्नोला कळत नव्हते,"आणि राहिला प्रश्न एडिटर इन चीफचा.. तर त्यासाठी काय करावं लागतं... यू नो व्हेरी वेल..."
" हं आय नो.. अँड.. मी ते केलंय सुद्धा... "
" व्हॉट? " शन्नोला धक्काच बसला," तू बॉससोबत... "
" येस.. पण हरामीनं धोका दिला.. म्हणाला, 'तुझ्या शोला टीआरपी नाही.. दुसरी कोणतीही पोस्ट माग.. देतो.' भें... " सगळी चिडचिड दडपून शांतपणे बोलणं फार अवघड असतं. पण निकिता ते साधत होती.
" निकू आय कान्ट बिलीव दीस... महत्वाकांक्षेपायी तू या थराला जाऊ शकशील असं कधी वाटलंही नाही.. " शन्नोचा जणू स्वतःवरच विश्वास बसत नव्हता.
" महत्वाकांक्षी माणसं थराचा विचार करत नसतात. आणि लोक यशस्वी माणसाचे यश ध्यानात ठेवतात, त्यानं ते कोणत्या थराला जाऊन मिळवलंय याचा विचार नाहीत करत. " निकिता तिच्या मतांवर ठाम होती," ते सोड.. तुला नाही पटायचं... तू कॅमेऱ्यामागेच आयुष्य घालव. तुला कॅमेऱ्यामागे येण्यासाठी काय काय कॉम्प्रमाईज करावं लागलंय.. एव्हरीवन नोज... "
" हो.. अन् मी माझ्या कॅमेऱ्यामागेच सुखी समाधानी आहे...करायचं तेव्हा सगळं काळं पांढरं गेलं... अब नौ सौ चुहे खाने के बाद... " शन्नो बोलली.
" सदा सुखी राहा.. " निकिताने शन्नोच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला," पण माझं एक काम करावं लागतंय डार्लिंग तुला.. करशील? "
" नाही म्हटले तरी पिच्छा सोडणार नाहीसच ना.. "
" यू नो मी व्हेरी वेल.. " निकिता खळाळून हसली.
" काय करायचंय? " शन्नोचा प्रश्न.
" बॉसची अपॉइंटमेंट घ्यायचीय.. "
" अपॉइंटमेंट? प्रेमाबिमात पडलीस की काय त्याच्या? "
" प्रेमात आणि मी? शटअप यार... यु नो... प्रेम म्हणजे बद्धकोष्ठतेसारखं असतं ज्याला होतं, त्याला कण्हावंच लागतं..! अन् हे कण्हणं कुंथणं आपल्याला मान्य नाही... मला माझी स्वप्नं पूर्ण करायचीत... महत्वाकांक्षेचं शिखर गाठायचंय... "
" अगं पण तो वासनांध वाघ आहे... "
" मग काय झालं? "
" तुला भीती नाही वाटत त्याच्या वखवखलेल्या नजरेची? "
" शिकारीच जर ज्याची शिकार करायचीय त्यालाच घाबरू लागला तर कसं व्हायचं डिअर... तू फक्त मिटींग फिक्स कर... "
" कधीची? "
" आजचीच.. "
" आज..? " शन्नो पुन्हा कोड्यात पडली..
" हं.. शो नंतर.. नाईट मिटींग...!! "
" काय करणार आहेस निकू तू? " शन्नोने अतिशय गंभीरपणे विचारले.
" या न्युज चॅनेलची प्रमुख होणार आहे.. "
" अगं पण.. "
" मराठी न्युज चॅनेल्सच्या इतिहासात सर्वांत जास्त टीआरपी आजच्या माझ्या शोला मिळणार आहे.. " कसलासा विचार करून निकिता बोलली.
" काहीतरीच बडबडू नकोस... जादूची कांडी आहे का तुझ्याकडे? " शन्नोला अजूनही काहीच उलगडत नव्हते.
" येस.. जादूची कांडी... बॉसला टीआरपी पाहिजे ना.. आज मी दाखवून देईन टीआरपी काय असते.. चॅनेलवर अन् बेडवरही... पुढच्या पंधरा दिवसांत मला चीफ एडिटर व्हायचंय.. आणि मी होणारच.. बघच तू.. " निकिताच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जणू ओसंडून वाहत होता.
" बेस्ट लक... "
" थँक्यू... आणखी एक काम कर... तुझे कॅमेरे व्यवस्थित लाव. आज एकही मोमेंट मिस व्हायला नकोय.. " निकिताने शन्नोचे खांदे थोपटले,"गेट रेडी." आणि ती तिच्या होस्ट चेअर कडे निघाली .
शन्नोला निकिताच्या महत्वाकांक्षेचं कौतुक तर वाटत होतंच.. सोबत भीतीही..!!
© शिरीष पद्माकर देशमुख ®