Chanchal in Marathi Women Focused by Nilesh Desai books and stories PDF | चंचल

Featured Books
Categories
Share

चंचल


मध्यमवर्गीय कुटुंबातली असली तरी आईवडिलांनी तिला लाडात वाढवलेले होते. बालपणापासूनचे तिचे सगळे हट्ट विनातक्रार पुरवले गेले होते. कदाचित एकुलती एक असल्यामुळे तसे होणे स्वाभाविक वाटत होते. अर्थात त्यामुळेच तिच्या आईवडिलांसाठी ती लाडकी होती. पाठवणी करताना आईला हुंदका आवरत नव्हता. पाहुण्यांशी बोलता बोलता वडिलांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. तरीही स्थळ छान मिळाल्यामुळे आईवडील समाधानी होते.


नाही म्हणायला तिच्या आईवडिलांना काळजी एकाच गोष्टीची वाटायची. ती म्हणजे तिच्या हातात सतत असलेला मोबाईल. आईवडिलांच्या मते तिने मोबाईलवरची खाटखूट थोडी कमी करावी, शिवाय सोशल मीडियावरचा वापर प्रमाणात करावा. पण आपलं मत त्यांनी कधीही तिच्यावर थोपण्याचा प्रयत्न केला नाही.

नव्या काळातील नव्या विचारांची चंचल नावाप्रमाणेच चंचल होती. स्वतंत्र, मोकळं आयुष्य जगण्याची ईर्ष्या तिच्या मनात सुरुवातीपासूनच होती. नव्या जमान्याचा स्मार्टफोन तिचा जीव की प्राण होता.

दिसायला सुंदर असलेल्या चंचलला आपल्या रूपावर थोडासा का होईना पण गर्व होता. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी बऱ्याचश्या सामाजिक कट्ट्यांवर ती स्वतःचे विचार मांडायची. सेल्फी काढणे, रोजचा प्रोफाइल फोटो बदलणे, व्हाट्सअप वर स्टेटस ठेवणे, दुनियाभरच्या साईट्स वर टाकत जाणे असे तिचे आवडते छंद होते. फेसबुकवरचे तिचे फोटो शेकडो लोकांना आवडायचे. टिकटॉकवरचा तिचा अभिनय आणि नृत्य चांगलेच चर्चेत असायचे. रोज मैत्रिणींशी मनसोक्त गप्पा मारायची. या सर्व गोष्टींमुळे चंचल खुश असायची.

लग्नानंतर तिने अजून बऱ्याच जागी आपले सोशल अकाऊंट उघडले होते. नवरा समंजस होता, तिच्या सवयीत त्याला वावगे असे काही वाटले नाही. चंचलला सुरुवातीला नवीन नवीन म्हणून सर्व काही छान वाटायचे. लोकांच्या लाईक्स, कंमेंट्स यामुळे स्वारी खुश असायची.

हल्लीच्या काही दिवसांत मात्र चंचलचा सोशल मीडियावरचा वावर वाढत चालला होता. आपल्या मागील पोस्टपेक्षा आता येणारे लाईक्स कमी झाल्याचे तिला सारखे वाटत राहायचे. तिचं मन त्यामुळेच उदास होऊ लागलेलं. त्यामुळे जास्तीत जास्त चर्चेत राहण्यासाठी ती सोशल मीडियावर अजून जास्त वेळ देऊ लागली होती.

"काय गं.. काय होतेय..? " त्या रात्री नवऱ्याने तिला विचारलं.

"काय नाही.. कुठे काय... !" थोडंसं चाचपडतच ती म्हणाली.

"अगं मग लक्ष कुठे आहे..? जेवण थंड होत चाललेय.. !" तो म्हणाला.

"तू माझ्या पोस्टना लाईक का करत नाहीस कधी..? " तिने त्रासिकपणे विचारले.

"कुठल्या पोस्ट..? " विषय कुठच्या कुठे भरकटल्याने त्याने भुवया उंचावल्या.

"फेसबुकवरच्या... ! आणि काय माझं व्हाट्सअँप चे स्टेटस पण नाही बघत तू.. ! माझ्या कोणत्याच कामात तुला आवड नसते.. तू म्हणजे ना अगदीच अरसिक आहेस... " तिने घडणाऱ्या गोष्टींचे खापर त्याच्यावर पाडायला सुरुवात केली होती.

त्याने शांतपणे जेवण उरकले आणि चंचलच्या सुरु असलेल्या तक्रारींचे पाढे तो अजूनही ऐकत होता. काहीवेळात चंचलची कुरकुर थांबली, तेव्हा त्याने बोलायला सुरुवात केली.

"हे बघ चंचल.. घरात तू करत असलेल्या प्रत्येक कामाचा मी आदर करतो. जमेल तशी मदतदेखील करतो. तू नवनवे पदार्थ बनवतेस, त्यांचंही मी नेहमी कौतुक करतो. तुझ्या हाताला छान चव आहे. तू मला किती आवडतेस हे देखील मी वारंवार तुला सांगत आलोय."

"राहिली गोष्ट तुझ्या सोशल मीडियावरच्या कामाची तर मी स्वतःचं फेसबुक कित्येक महिन्यांत पाहिले नाही. व्हाट्सअँप वर कोण काय स्टेटस ठेवते ते सुद्धा पाहणे मला जमत नाही. माझं खरं मत सांगायचं तर मला उगाच सोशल मीडियात वेळ खर्च करायला आवडत नाही, आपली नोकरी आणि कुटुंबाला देता येणारा वेळ यात मी समाधानी आहे.."

त्याच्या उत्तरावर ती अजूनच खट्टू व्हायची.

खरंतर चंचलच्या आईवडीलांप्रमाणेच तिच्या नवऱ्यालाही कधीकधी तिची सवय खटकायची. कधी जेवताना, कधी एकमेकांशी संवाद साधताना चंचल मध्येच मोबाईल हातात घ्यायची आणि मग नवऱ्याचाही हिरमोड व्हायचा. घरातल्या आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्षित होऊन जायच्या. त्याने चंचलला एकदोनदा समजावून पाहिले, पण त्यानेही कधी तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला नाही.

जेव्हा त्या दोघांना जेव्हा पहिलं मुल झालं, त्याआधी म्हणजे चंचलच्या गरोदरपणातल्या काळात चंचलची मनस्थिती बिघडू लागली होती. टिकटॉकवर विडिओ बनवता येत नव्हते. फेसबुकवर फोटो टाकता येत नव्हते. तिथे इतरांची प्रगती पाहून मात्र जळफळाट होतं होता. सोशल मीडिया वर स्वतःच्या पोस्ट टाकता येऊ शकत नसल्याने तिची लहान लहान बाबींवरून चिडचिड होऊ लागली होती.

नवऱ्याने त्या काळातही समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा विरोध चंचलच्या मोबाईल वापरण्याला नव्हता तर तिच्यावर होणाऱ्या परिणामांची त्याला चिंता वाटायची. पण चंचल चंचलच होती, तिची सोशल मीडियावरची भुरळ काही केल्या कमी ह्यायचं नाव घेत नव्हती.

कसेबसे मुल झाल्यावर आपण सुटलो या आविर्भावात चंचलने हॉस्पिटलमध्ये असतानाच पुन्हा मोबाईल हाती घेतला. मधल्या काळातली कसर लौकरात लौकर भरून काढायची होती. खूप सारे विडिओ बनवायचे होते, फोटो काढायचे होते. पण हाय रे... गरोदरपणाचा तिच्या रूपावर काही प्रमाणात का होईना परिणाम झाला होता. शरीर काहीसे बेढब दिसत होते. सोशल मीडियावरचा तिचा प्रभाव अगोदरच कमी झाला होता. त्यात नेहमीची चढाओढही कायम असणार, या विचाराने तिच्यावर आणखी दडपण आले.

मोबाईल हातातच होता, सहज म्हणून फेसबुक उघडले. कुठलातरी 'आई' वरचा लेख समोरच दिसला. लेख थोडा मोठा होता पण वाचायला सुरुवात झाली होती, मुद्दे पटत होते म्हणून अर्ध्यावरती तो सोडता येईना. साधारण वीस मिनिटांत लेख वाचून झाला. पाठवणी करतानाचा आईने दिलेला हुंदका आठवला. चंचलच्या डोळ्यांतून आसवं बाहेर येऊ लागली.

आईची महती सांगणारी कुठलीही कथा, लेख, कविता वाचकाला कंटाळवाणी वाटू शकत नाही. आईची ममता तिच्या नुसत्या नामोच्चाराने सामान्य लेखकाची लेखणीही असामान्य करते. त्या लेखातील मुद्द्यांनी चंचलच्या डोळ्यांवरची झापड उडाली.

आई झाल्याचा खरा आनंद तिला तो लेख वाचल्यावर झाला. शिवाय त्या आनंदाची अनुभूती घेतल्यावर तिला कळून चुकले की आजवरच्या सोशल मीडियाकडून मिळालेल्या हजारो क्षणैक सुखांपेक्षा हा आनंद किती मोठा आहे.

एकएक करत तिने सगळ्या साईट्सवरून आपले अकाउंट बंद केले. आता तिला खूप मोकळे वाटत होते. कसलेही बंधन नव्हते, कोणतीही वेळ पाळायची नव्हती. पण थोडासा तरी विरंगुळा माणसाला हवाच की..! लहानपणी खूप वाचन व्हायचे, म्हणूनच तर स्वतःचे विचार सोशल मीडियावर मांडण्याइतपत ती समृद्ध होती. कित्येक वर्षांनी मन एकाग्र करून आज हा लेख वाचला आणि त्याचाही ऐनवेळी फायदा झाला.

या विचारांनी तिला नवी दिशा उमगली. तितक्यात तिथे नवरा आला. चंचलच्या चेहऱ्यावर स्मित पाहून त्यालाही बरे वाटले.

"का गं.. एकटीच हसतेस..!"

"ऐका ना.. मला काही पुस्तकं आणून द्या ना वाचायला..?" ती लाडात म्हणाली.

"पुस्तकं..?" तो आश्चर्यचकित झाला, "आणि मग तुझं सोशल मीडिया..?"

"त्याला खूप पोसलं आणि सोसलं.." ती लटक्या रागात म्हणाली.

"पण त्यासाठी तुला नवीन ठिकाणी अकाउंट उघडावं लागेल..." तो मिश्किल हसत म्हणाला.

"ते कश्याला.. मला आता पुन्हा सोशल मीडियाचं तोंड पाहायचं नाही.." ती म्हणाली.

"अगं मोबाईलमध्ये प्रतिलिपीचं अकाउंट उघड, पाहिजे तसल्या विषयांवर पाहिजे तेवढं वाचायला भेटेल.." तो भाव खात म्हणाला.

"खरं की काय, मला कसं माहित नाही.." ती.

"तुला तुझ्या सोशल मीडियातून फुरसत कुठे होती.. हा पण फक्त तिथल्या चर्चासत्रापासून दूर राहा, हल्ली तिकडेही सोशल मीडिया सुरु झालेय" तो म्हणाला आणि दोघेही हसू लागले.


चंचलने बाजूला असलेल्या बाळाकडे पाहिले. बाळसुद्धा हसत होते.


समाप्त

निलेश देसाई