एक पत्र छकुलीस!
माझी लाडकी छकुली,
खूप खूप आशीर्वाद!
छकुली! हा शब्द उच्चारताच शरीरात एक वेगळीच अनुभूती संचारते. लहानपणी पाळण्यातील तुझ्या बाललीला पाहून माझ्या तोंडातून उत्स्फूर्तपणे 'छकुली' हा शब्द बाहेर पडला. तू जसजशी मोठी होत होती तसतसे तू सारे घर व्यापून टाकताना ते प्रेमळ नावही माझ्या तोंडातून येत गेले. तू शैक्षणिक यशाचे एक-एक शिखर सर करीत असताना प्रत्येक वेळी मला आसमान ठेंगणे होत गेले. एक अनमोल ठेवा मला गवसत असल्याची जाणीव समाधान देत गेली. एखाद्याने झोपेतून उठवून मला तुझे नाव विचारले तर मी पटकन छकुली असेच सांगत असे. तू बरोबर महिन्याचीही झाली नव्हतीस, तुझी मानही बसली नव्हती. माझ्याकडे पाहून तू गोड, मधाळ हसलीस आणि मला राहवले नाही. मी तुला पटकन उचलले. तसे करताना तुझे इवलेसे ओठ माझ्या गालाला स्पर्श करून गेले. तुला सांगू छकुले, ती अनुभूती ना, एखादा लेखकच काय पण प्रत्यक्ष शब्दकुबरेही शब्दात नाही मांडू शकणार. तुला एक गंमत सांगू का, तुझे नाव टाकण्यासाठी तुला शाळेत घेऊन गेलो ना तर त्या प्रवेश अर्जावर छकुली हेच नाव लिहिले. ते शिक्षक माझ्याकडे आश्चर्याने पाहात असताना माझी छकुली पुढे होत म्हणाली,
'माझे नाव छकुलीच आहे पण ते घरच्यांसाठी. शाळेत लतिका नाव टाकायचे आहे.'
तुझे ते प्रसंगावधान, ती धिटाई पाहून मला तुझा कोण अभिमान वाटला म्हणून सांगू!
तू शाळेत एकेक पायरी चढत असतानाही माझ्या तोंडात छकुली हेच नाव येत असे. एकदा मी तुला घ्यायला तुझ्या शाळेत आलो आणि सरळ तुझ्या वर्गात येऊन म्हणालो,
'अग, छकुली, चल बरे. आपल्याला गावाला जायचे आहे.' मी तसा म्हणालो आणि तुझ्या वर्गातील सर्व मुली आणि तुझ्या बाईही हसल्या होत्या. परंतु त्या हसणाऱ्या मुलीला खडसावून बाईंची परवानगी घेऊन तू मोठ्या आनंदाने माझ्यासोबत निघालीस. घरी आल्यावर तुझ्या आईला मी सारी हकिकत सांगताच ती माझ्यावर चिडून म्हणाली,
'अहो, आता तरी लक्षात घ्या. तिचा असा अपमान असेल, तिचे हसे होणार असेल तर तुम्ही तुमचा हट्ट सोडा ना! लतिका! किती छान नाव आहे...' ती बोलत असताना तिला थांबवत तू म्हणाली,
'आई, काही अपमान होणार नाही. बाबा, कधी कुणाचा अपमान करतील काय? कुणाच्या हसण्याचे सोड पण मला की नाही, छकुली हेच नाव आवडते ग.'
तुझ्या तशा बोलण्याने मला कोण आनंद झाला म्हणून सांगू? कितीही ठरवले तरीही 'लतिका' हे नाव ओठावर येतच नाही...
बघता बघता तू मोठी झालीस. आपण मोठ्या प्रेमाने एखादे बी अंगणात लावतो. ते कधी वाढते, कधी त्याला फुलं येतात, अचानक एखादं फळ लागते हेही समजत नाही. संततीचेही असेच असते. मुलाचा जन्म, मान बसणे, पालथे पडणे, रांगणे, उभे राहणे, दुडुदुडु चालणे आणि पाहता पाहता जोराने पळत जाऊन दृष्टीआड होणे. नंतर सुरू होतो... शैक्षणिक प्रवास! आजकाल शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी विकृत स्पर्धा सुरू झाली आहे ना त्यामुळे मुलं बालकत्व आणि प्रसंगी घरपणही हरवून बसताहेत. बाळे, शाळेच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली बालके घरापासून, नातेवाईकांपासून दुरावल्या जातात ग. तुझेही तसेच झाले. तुझे नाव शाळेत टाकताच प्रकर्षाने जाणवले की, आता आपली छकुली नेहमीप्रमाणे सतत आपल्याजवळ नसणार. ती अभ्यासात गढून जाईल. झालेही तसेच. तू पाहता-पाहता डॉक्टर झालीस. माझे बोट धरून चालणाऱ्या माझ्या छकुलीने त्यादिवशी माझा हात पकडून मला तिच्या पदवीदान समारंभात मोठ्या आदराने व्यासपीठावर नेले आणि माझे डोळे पाणावले, मन भरून आले. वाटलं, माझी छकुली... कालपर्यंत दुडुदुडु धावणारी माझी छकुली आज मलाच आधार देते आहे, माझा आधार बनली आहे. तुझा तो नयनरम्य सत्कार सोहळा आटोपून घरी आलो. आनंदाने चिंब झालेल्या अवस्थेत असताना तुझ्या आईने एका क्षणात माझा आनंद हिरावून घेतला. नाही...नाही... तिचे काही चुकले नाही. तिच्यातील व्यवहारी आई बोलली पण तिच्या त्या वाक्याने बंदुकीची गोळी शरीरात शिरल्याप्रमाणे माझे काळीज छळणी छळणी झाले ग. ती म्हणाली,
'अहो, आपली मुलगी ... तुमची छकुली मोठी झाली आहे. आता तिच्या लग्नाचे बघावे लागेल...'
तापलेल्या तेलाची धार कानात शिरल्याप्रमाणे माझी अवस्था झाली. निर्जीव झाल्यागत् शब्दांनी माझी बाथ सोडली. तुझ्या लग्नाचा विचार त्या क्षणापर्यंत माझ्या मनाला शिवलाच नव्हता ग. 'माझ्या छकुलीचे लग्न' ही कल्पनाच मी कधी केली नव्हती ग. तुझ्या आईकडे वेगळ्याच नजरेने बघत, सर्वस्व हरवल्याप्रमाणे मी माझ्या खोलीत गेलो आणि डोळ्यांनी कधी पाझरायला सुरुवात केली तेही कळलेच नाही.
छकुले, तुझ्या आईच्या सततच्या मागे लागण्याने, अस्वस्थ मनाने तुझ्या लग्नाला होकार दिला. त्यावेळी तुझी आई म्हणाली होत, 'अहो, एवढे का अस्वस्थ होताय? आपण याच शहरातील सासर तिच्यासाठी निवडू. म्हणजे केव्हाही आपल्याला तिच्या भेटीला जाता येईल. तुम्ही हे का विसरताय की, आपली एक छकुली हे घर सोडून जात असेल परंतु चार वर्षांपूर्वी आपल्या घरात आलेली आपली सून आपल्यासाठी छकुलीच आहे ना? तिची आपल्यासोबत आईवडिलांप्रमाणे आणि आपली तिच्याशी मुलीप्रमाणेच वागणूक आहे ना? छकुले, लख्खकन प्रकाश पडला ग माझ्या डोक्यात. खरेच चार वर्षांपूर्वी आपल्या अर्जनभैय्याचं लग्न झालं नव्याने आलेल्या मुलीने.. छकुलीने सर्वांची मने जिंकताना मुलीप्रमाणेच लळा लावलाय ग. मला राहून राहून या गोष्टीचे आश्चर्य वाटले की, तुझ्या लग्नाचा विषय निघताच मी आशाला कसा विसरलो? तुमच्या दोघींमध्ये कधीच भेदभाव केला नाही आणि तरीही तुझे लग्न होणार या विचाराने मी माझ्या दुसऱ्या लेकीलाच विसरलो. महत्त्वाचे म्हणजे तुम्हा दोघींमध्ये मैत्रीचे जे घट्ट नाते विणल्या गेले आहे त्याला तोडच नाही. महिनाभरापूर्वी तुझ्या होणाऱ्या सासरच्या मंडळीने तुला होकार दिला ना त्यावेळी कोण सैरभर झाले असेल, कोणाचे डोळे पाणावले असतील आणि कुणाचा चेहरा उतरला असेल तर बेटा, तुझ्या वहिनीचा! एका डोळ्यात हसू, दुसऱ्या डोळ्यात आसू घेऊन ती वावरत होती. जीवाभावाची आपली मैत्रीण दुरावणार ही कल्पनाच तिला सहन होत नसावी. पण तिने सावरले, स्वतःला सावरले! सारे कसे आनंदाने, उत्साहाने, जिम्मेदारीने करते आहे. सून म्हणून ती कधी वागलीच नाही ग. ती नेहमी मला 'बाबा' म्हणून हाक मारते. अनेक वेळा तिचा आवाज ओळखू न आल्यामुळे किंवा तूच बोलावतेस असे समजून मी म्हणालो, 'बोल ग छकुले...'
छकुले, एक सांगू का, अर्थात तुला सांगायची गरज नाही पण बापाचे ह्रदय आहे. राहवत नाही. बाळे, आशा जशी आपल्या घरात सर्वांशी वागतेय ना, तूही तुझ्या घरी तशीच वागशील ही खात्री आहे मला. सासर! हा शब्दच आजकाल कालबाह्य होतोय. सासर म्हटले की, कुठे तरी थोडा दुरावा येतो, तो ओलावा येत नाही जो घर... माझे घर म्हटले की येतो. तुझ्या घरी गेल्यावर तुझ्या बोलण्यात, वागण्यात तोच ओलावा, तोच प्रेमळपणा असू दे जो आशा आपल्या घरात मुक्त हस्ते उधळतेय. म्हणतात ना, 'जे पेराल, ते उगवेल' तुझेही वागणे असेच असू देत. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो परंतु आपण जुळवून घेतले, समोरच्या माणसाचे समजून घेतले ना, तर छकुले, समोरूनही तसाच प्रतिसाद मिळतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव मुळात रागीट, संतापी असला ना बेटा, तरी आपल्या वागण्यातून तोही स्वतःला बदलून घेतो. निदान तसा प्रयत्न नक्कीच करतो. बाळा, आता पूर्वीप्रमाणे नात्यांमध्ये सासुरवास डोकावत नाही. आत्याबाई, मामंजी, सासुबाई ही शब्दावली अस्ताला जाते आहे. शब्दाशब्दांमध्ये किती फरक असतो ना, सासू, सासरे, दीर, नणंद, जाऊ हे शब्द उच्चारताच नात्यातला एक कडवट, परंपरागत वास दरवळतो. त्याऐवजी आईबाबा, जाऊबाईला वहिनी किंवा ताई, दीराला दादा अशा शब्दांनी बोलवले ना तर नात्यांमधील एक हवाहवासा परिमल दरवळतो. नात्यांमध्ये असलेलं जडत्व, दूरत्व एका क्षणात दूर पळतं. एक जवळीक निर्माण होते. माझी छकुली आजपर्यंत सर्वत्र ज्या सन्मानाने वागली, तिला कुठेही मान खाली घालण्याची वेळ आली नाही. यापुढे विशेषतः तिच्या हक्काच्या घरी असेच कौतुक व्हावे, लाड व्हावेत असे वाटते. तुझ्या चांगल्या गुणांची त्या घरीही चांगली चर्चा व्हावी हीच इच्छा आहे. या घरात प्रत्येकासोबत तुझे जे संबंध आहेत, जो मनमोकळा संवाद आहे तेच संबंध, तसाच संवाद तुझ्या नवीन घरातील प्रत्येक व्यक्तिशी प्रस्थापित व्हावा असे मनोमन वाटत आहे. तसे झाले तर आम्हाला खूप खूप आनंद तर होईलच पण आम्ही केलेल्या संस्काराचा आम्हाला अभिमान वाटेल. आम्ही एक रत्न जन्माला घातले आहे ही भावना दृढ होईल. एक हिरा आमच्यापासून दुरावतोय परंतु त्याच्या तेजाने ते घरही प्रकाशमान होईल. छकुले, करशील ना ग एवढे? अरे, असा कसा प्रश्न मी विचारतोय? तू ते करणार आहेसच. तुझ्या नव्या जीवन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा!
तुझाच,
माझ्या लाडल्या छकुलीचा,
बाबा.
०००
नागेश सू. शेवाळकर.