वरूण राजास पत्र!
प्रिय वरूणराजास,
पत्र लिहायला घेतले तर खरे पण प्रिय लिहिताना हात क्षणभर अडखले. नंतर अभिवादन म्हणून काय लिहावे हाही प्रश्न पडलाच. तू आमची, शेतबागांची, प्राण्यांची, वृक्ष वेलींची तहान भागवतोस, ही धरती, ही सृष्टी शोभायमान करतोस, मनमोहक करतोस, धरतीमातेच्या सहाय्याने आम्हा प्राणिमात्रांची भूक भागवतोस म्हणून प्रिय हा मायना लिहून नमस्कार, साष्टांग नमस्कार या प्रकारचे अभिवादन करावे म्हटले तर दुसऱ्याच क्षणी तू गत् वर्षी घातलेला हैदोस आणि काही दिवसांपूर्वी कोकणात घातलेले तांडव आठवले की तुला देव मानावे तरी कसे असा एक विचार मनाला शिवतो कारण असे थैमान, अशी वृत्ती केवळ राक्षसाजवळ, हैवानाजवळ असते. असो. तू अधूनमधून नकारात्मक वागतोस म्हणून मी का माझी सकारात्मकता सोडावी? तुला वाट्टेल तेव्हा येतोस तेही तुझी वाट पाहून पाहून आम्हा मानवाच्या डोळ्यात पाणी नव्हे तर प्राण आल्यावर बरसतोस. कधी कधी केवळ उपस्थिती नोंदवून लगेच निघून जातोस ते पुन्हा लवकर परतत नाहीस. अनेकदा तर आल्यावर नको असलेल्या पाहुण्यांप्रमाणे असा ठाण मांडून बसतोस नि की, घरातील म्हातारी माणसं म्हणतात याला चटका द्या. मग कसा पाय लावून पळतो ते बघा. जुनी माणसेच ती. त्यांच्या काळात केलेल्या प्रयोगाची आठवण येते त्यांना. बरे, तुला पळवून लावण्यासाठी चटका देणारास म्हणे नग्न होऊन मध्यरात्री पोळवावे लागते. आजकालची तरुणाई जणू रात्रभर जागीच असते, ऑनलाईन असते. कुणी तशा अवस्थेत चटका देतानाची छायाचित्रे काढली किंवा चित्रफित काढली तर? त्यापेक्षा तुझा संताप परडवला. जेव्हा तू ठाण मांडून बसतोस तेव्हा कसा कहर माजवतोस ते जरा कोकणात डोकावून बघ. राहायला छप्पर नाही, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही अशी अनेक कुटुंबांची अवस्था झाली आहे. एक तर असा ओल्या सुक्काळातून दुष्काळात ढकलतोस नाही तर मग कोरडीफट्ट धरती करून टाकतोस. काहीही केले तरी बरसतच नाही. तुझे ना कसे आहे, उगाळला तर परमेश्वर नाही तर संन्येश्वर! आपल्या धो धो प्रेमामुळे किंवा रुसून बसण्यामुळे सृष्टीवर काय परिणाम होतात, आम्हाला कशा कशाला तोंड द्यावे लागते. याची तुला जाणीव नसते असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल कारण शेवटी तू आमचा देव! तुला काही ठाऊक नसेल असे कदापिही शक्य नाही. मग का असा वागतोस?
वरुणराजा, तू का आमचा असा छळ मांडला आहेस? आम्हाला लागेल-पुरेल एवढा पाऊस आणि तोही योग्य वेळी का नाही पाठवत? कधी पावसाचा सुकाळच सुकाळ, तर कधी पाऊस न पडल्याने त्राही..त्राही.... कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, तर कधी अवर्षण...यामुळे कायम नापिकी... देवाने दिलेल्या बुद्धिचा आणि विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही कृत्रिम पाऊस हा पर्याय शोधून काढला तर तोही तुला रुचला नाही. अशा पावसासाठीही आकाशात पावसाचे ढग असावे लागतात. परंतु तेही तू पळवून लावतोस. मान्य आहे की, आम्ही माणसांनी प्रचंड प्रमाणात झाडे तोडली आणि त्याप्रमाणात वृक्ष लावलीच नाहीत. परंतु वरुणदेवा, पाऊस पाडणे हे तुझ्या हातात आहे, ते तुझे कर्तव्य आहे ना? त्यासाठीच तुझी नेमणूक करण्यात आली आहे ना? मग कर्तव्यात कशाला कसूर करतोस? कशाला हवीत झाडे? झाडे असोत वा नसो तुझा त्याच्याशी संबंध नसावा. सृष्टीची गरज जाणून हवा तेवढा नियमित पाऊस पाडून तू आणि ढगांनी नंतर आठ महिने विश्रांती घ्यावी ना पण नाही. ज्या गोष्टी तुझ्या हातात आहेत त्या न देऊन, कधीकधी प्रचंड प्रमाणात देऊन का मानवास मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेस ? जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे ना तर मग त्याला सुखासुखी मरण का देत नाहीस? मरणांतिक वेदना देऊन त्यास छळून का त्यास मृत्यू देत आहेस ? त्यामुळे म्हणजे वरूणदेवा, तुझ्या लहरीपणामुळे झाले काय माहिती आहे ? या देशाचा पोशिंदा, अन्नदाता, माय-बाप शेतकरी त्यातही छोटा शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहात फसत आहे. घेतलेले कर्ज न फेडता आल्यामुळे, आर्थिक स्थितीमुळं शक्य न झाल्यामुळे हजारो शेतकरी स्वतःचे जीवन स्वतःच संपवत आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाला संकटाच्या खाईमध्ये ढकलत आहेत. वरुणराजा, पाऊस नियमित, वेळेवर, गरजेपुरता झाला ना, तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. तशी वेळच येणार नाही. विद्युत! अन्न, वस्त्र, निवारा या नैसर्गिक गरजांच्या पुढे जाऊन आम्ही मानवांनी निर्माण केलेली एक अत्यावश्यक बाब! पण या विद्युतेला आम्ही पूर्ण स्वातंत्र्य नाही बहाल केले. खटक्यांच्या निगराणीत ठेवले आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा खटका दाबला न दाबला की एका क्षणात सर्वत्र लख्ख प्रकाश किंवा विद्युतेच्या मदतीने पाहिजे त्या उपकरणाची सेवा घ्यायची. काम संपले की, पुन्हा कळ दाबताच विद्युतदेवी आराम करायला जाते. तसा तूही बरसायला पाहिजेस. ज्या भागात जेवढे पाणी हवे तितकाच तू कोसळायला हवे! कशाला तू तरी जास्त श्रम करतोस? गडगडत येताना, धो धो बरसायला तुला का कमी शक्ती लागते? त्याचबरोबरीने जेव्हा तू खूप दिवस बरसायचे नाही असे ठरवून लपून बसतोस त्यावेळी तो आवेग दाबून ठेवण्यासाठी तुला किती मेहनत घ्यावी लागत असेल ह्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाहीत कारण नैसर्गिक क्रिया काही काळ रोखून धरताना आमच्या नाकीनऊ येतात. तो त्रास आम्ही जाणतो म्हणून हे वरूणदेवा, तुला हात जोडून कळकळीची विनंती करतो ना आम्हाला त्रास दे, ना तू स्वतःला त्रास करुन घे. सोड तुझा लहरीपणा, सोड तुझा आक्रस्ताळेपणा. देवत्व तुझ्या शरीरात आहेच तर देवाप्रमाणे वाग...
०००
नागेश सू. शेवाळकर