हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी...
भाग-5
दुपारची वामकुक्षी घेऊन ते काकांकडे निघणारच होते, पण जशी कणक चालायला लागली..... तिच्या पायाला कळा येत होत्या आणि तिला नीट चालता देखील येत नव्हतं.कसं जाणार ,मग आता काकांकडे? सगळ्यांना प्रश्न पडला. 'चार-पाच दिवसांनंतर कणक ला थोडा नीट चालता यायला लागलं... का मग जाऊ.' असं सगळ्यांचे ठरलं... असं पण तिच्या काकांचे मित्र त्यांना खूप दिवसातून भेटायला आले होते. त्याच्यामुळे आज तिच्या चुलत काकांकडे जाण्याची युक्ती पूर्णपणे रद्द झाली होती. गावातले लोक म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार तर कसा असतो, हे काही सांगायला नको. आणि आज तर काकांचे मित्र आले होते ,तेही एवढ्या दिवसानंतर मग काय त्यांचा चांगलाच थाटमाट..!
पाहुण्यांच्या गणगणीत आजचा दिवस कसा गेला कळालेच नाही.चंचल मनाच्या कणकला अशा एका जागेवर बसायचं म्हणजे मोठ संकट पडलं... पण काय करणार ? झाडावर चढून दाखवून तिने अशी करामत दाखविली होती की, तिला बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते..
यातच एक-दोन दिवस उलटले आणि कणकच्या मावशीच्या घराला एक दुःखद बातमी कळाली. 'त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या सविता मावशी अचानक आलेल्या हृदय विकाराच्या झटक्या मुळे देवाघरी गेल्या.' कणकच्या मावशीला खूप दुःख झालं.. सविता मावशी त्यांच्या लहानपणाच्या मैत्रीण.. त्यांच्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठ्या असतील.. मागच्या दहा- पंधरा वर्षांपूर्वी पासून त्यांचा चांगला घरोबा होता. नेहमीच बोलणं चालणं चालू असायचं. कणक देखील त्यांना ओळखायची. जेव्हा कणक लहान होती तेव्हा, ती त्यांच्या घरीच खेळायला जायची. पण मरण थोडीच कोणाला चुकतं...! कधी काय होईल आणि कधी अगदी हसत-खेळत माणूस मृत्यूच्या दारात पोहोचेल सांगता येत नाही...'
कणकच्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे सुतकीचं वातावरण होतं. कणक, कणकचे मावशी-काका, आजी, भाऊ-बहिणी सगळे त्यांच्या दुःखात सामील होते.सविता मावशींचे सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, गावकरी त्यांच्या श्राद्धाला उपस्थित होते. सविता मावशींची बहीण कविता मावशी लोकांना तर माहितीच होत्या पण कणक तर त्यांना चांगलीच ओळखायची. लहानपणापासून त्याच तर कणकला भुताखेतांच्या गोष्टी सांगायच्या. कविता मावशी म्हणजे अंधश्रद्धेची मशालच होत्या..
" तिच्या खूप अपेक्षा बाकी होत्या. खूप इच्छा होत्या तिच्या..काशी पंढरपूर करत लांब-लांब फिरण्याच्या. यवतमाळच्या त्या प्रसिद्ध चमत्कारी बाबांना भेटण्याच्या. पण साऱ्या राहून गेल्या... देवा!! तू असं का केलंस रे? का केलं तिला आमच्यापासून एवढ्या दूर?? तुझे दर्शन घ्यायला येणारच होती ना!!! पण त्या आधी तु तिला तुझ्याकडे बोलून घेतलं.. तूच सांग देवा तिच्या आत्म्याला शांती तरी मिळेल का रे? तिचा आत्मा देखील मुक्त नाही होणार..तिथेच भटकत राहील देवा.! देवा! का केल रे तू? असं का केलं??"कविता मावशी अख्ख आवार डोक्यावर घेऊन सगळ्यांना रडून-रडून सांगत होत्या..!! सर्व वातावरण निराश आणि दुःखाने वेढलेलं होत.कणक तर आणखीनच चिंतेत होती.कारण असं की, काल रात्री तिला नेहमीप्रमाणे भूताचं भयानक स्वप्न पडलं होतं. त्यामुळे तिच मन अगोदरच अस्थिर होत.पण आता मात्र तिला कविता मावशींच्या बोलण्याची भीती वाटत होती. कविता मावशींनी बोललेल्या सर्व गोष्टी कणकच्या डोक्यात खुप वेळापासून घोळत होत्या.काही केल्या त्या गोष्टी तिच्या डोक्यातून जाण्याच नावचं नव्हत्या घेत.
इकडे कणकच्या मावशी कविता मावशींना आधार देत होत्या. मात्र कविता मावशींच रडगाणं काही थांबत नव्हतं..घरातल्या वातावरणावरून कणक अनुमान काढत होती की, आता काही 4-5 दिवस आपल्याला काकांकडे जाता येणार नाही, म्हणून ती शांत बसून होती.
सुर्य अस्ताला जात होता तस-तशी आवारातील गर्दी कमी होत होती.सई, ईशा, कनिष्का, नयन, आणि तेथील काही मुले त्यांच्या-त्यांच्या खेळात मग्न होती.नयन आणि ईशा कणकला खेळायला बोलवायला आले. कनक थोडं मन हलकं व्हावं म्हणून त्यांच्यासोबत खेळायला निघाली.
"नीट खेळा रे..! आता नका कोणी पडू.. अंधार होत चाललायं.. सांभाळून जरा.नाहीतर बस्स!!" आजी दटावत म्हणाली.
"हो आजी.. आता नाही पडणार मी. कशाला घडीघडी पडू? इथेच गोठ्याच्या आसपास मळ्यात खेळतो आहे आम्ही." कणक हातवारे करत म्हणाली.
झाली परत यांची लपाछपी सुरू... लपाछपी मध्ये सई वर राज्य येतो. सर्वजण वेगवेगळ्या जागांवर जाऊन लपतात.इथे मी लवकर सापडणारचं नाही या विचाराने कणक गोठ्यात जाऊन गाईजवळ लपते.कणक एकदम शांतपणे तेथे लपलेेेली असते.सईचा आवाज तिच्या कानावर पडतो.ती सापडू नये म्हणून आणखी मध्ये लपूूून बसते. पण परत तिला त्या रात्रीच्या घटनेसारखी अंतर्मनाला जाणीव होते.कोणी तरी तिच्या मागे असल्याचा आभास तिला होतो.एक हात तिला तिच्या खांद्यावर आला आहे असं समजतं...
"कोण आहे?" कणक घाबरलेेल्या आवाजात विचारते.
"कणक...! अगं मी ..!!"
"मी कोण?"
"मी सविता मावशी.."
- ज्ञानेश्वरी ह्याळीज
क्रमशः