agnidivya - 3 in Marathi Fiction Stories by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | अग्निदिव्य - भाग 3

Featured Books
  • सर्द हवाएं

    लेख-सर्द हवाएं*******""       यूं तो सर्दियों के मौसम में जब...

  • इश्क दा मारा - 45

    यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत...

  • लल्लन जी की अद्भुत नौकरी

    गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ...

  • चुप्पी - भाग - 2

    क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद...

  • छिनार

    बसंत बाबू, ये ही बोलते थे लोग, 23 साल का खूबसूरत युवक, 6 फिट...

Categories
Share

अग्निदिव्य - भाग 3

सायंकाळचा समय, चुकार पांढऱ्या ढगांवर सूर्याची किरणं तांबूस रंग चढवल्या सारखी वाटत होती. अंधार दाटू लागला होता. सदरेवरील समया प्रज्वलित करण्यासाठी कामगारांची लगबग चालू होती. राजे सदरेवर बसले होते. मूठ कपाळावर टेकवून नजर जमिनीवर खिळली होती. सर्व सरदार मानकरी खाली माना घालून बसले होते. सदर शांत होती.

हेरांकडून नेतोजीरावांना पन्हाळ गडाकडे राजांच्या सैन्याची उडालेली दाणादाण आधीच कळली होती. विशाळगडावर येतानाच त्यांना मावळ्यांच्या मुजऱ्यात झालेला बदल लक्षात आला होता. आता आपल्यावर काय गुजरणार आहे, याची त्यांना चांगलीच कल्पना होती. पण आल्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय आता काही मार्गच उरला नव्हता. गडावर पोहोचता पोहोचता सायंकाळ झाली होती. आज राजांना भेटायलाच नको म्हणून नेतोजीराव सदरेवर न जाता सरळ आपल्या वाड्यात जाऊन आराम करत बसले होते. गावक्षातून मावळतीकडे झुकणाऱ्या सुर्यनारायनाच्या तांबूस बिंबाकडे एकटक पाहत होते. तोच एक हुजऱ्या येऊन म्हणाला,

"सरकार, राजांनी याद केलंय."

"हम्म, राजे कुठे आहेत?"

"सदरेव, सगळी जमल्याती सरकार..."

"बरं, तू हो पुढे. आलोच आम्ही."

नेतोजीरावांनी डोक्यावर सेनापतीची पगडी चढवली. तलवार घेतली आणि जड पावलांनी सदरच्या दिशेने चालू लागले.

घाईने एक हुजऱ्या दरबारात येऊन सरनोबत आल्याची वर्दी देऊन गेला. राजांचा पारा आधीच चढला होता. नेतोजींना सदरेवर येताना पाहून राजांनी आपली भेदक नजर त्यांच्यावर रोखली.

राजांच्या उग्र चेहऱ्याकडे बघताच नेतोजी थोडे गडबडले, "म.. मुजरा राजं... माफी असावी..."

ताडकन राजे बैठकीवरून उठले. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. नेतोजींवर जळजळीत कटाक्ष टाकत राजे कडाडले.

"माफी ?? माफी कसली मागता सरनौबत. तुम्हाला तर पंचारती घेऊन ओवाळायला पाहिजे. तोफांच्या बत्ती द्यायला हव्यात ना !"

भट्टीतून लालबुंद झालेल्या तलवारीच्या पात्यावर हतोडीने ठोकल्यावर जश्या ठिणग्या उडतात तसे शब्द राजांच्या मुखातुन बाहेर पडू लागले.

"प्रतिशिवाजी म्हणून बिरुदावली मिरवता. शिवाजीच्या जागेवर येऊन एकदा तरी विचार केलाय का?"

राजांचा तो उग्र चेहरा, तो आवाज, तो आवेश पाहून आजूबाजूचे सरदार, शिलेदार क्षणभर चरकले.

नेतोजी कातर स्वरात, " माफी असावी राजं... पर एक डाव ऐकून घ्यावं..."

"काय ऐकून घ्यावं.. सरनौबत म्हणे. तुम्ही तर नुसते नावाचेच सरनौबत. समयास पावत नाही, ही कसली सरनौबती. ही तर सिपाईगिरी.", राजांचा राग अनावर झाला होता.

नेतोजींनी मान खाली घातली. काय बोलावं? कळत नव्हतं. डोळ्यांत पाणी साठलं होतं. बोलणं तर भाग होतं. धीर एकवटून नेतोजी त्यांच्या करारी आवाजात बोलले,

"कोण सरनौबत? हिथं सवराज्य कुटं ऱ्हायलंय आम्हास्नी सरनौबत म्हणाय."

अवाक होऊन सदरेवर असलेले कारभारी आणि सरदार नेतोजींकडे पाहू लागले.

"सरनौबत...! काय बोलतायसा..!", तानाजी धावले. तोच नेतोजी तानाजीला थांबवत म्हणाले,

"थांबा तानाजीराव... बोलू द्या आम्हास्नी...", नेतोजींच्या तोंडून शब्द बाण सुटू लागले.

"आता तुम्ही मुघलांचं सरदार. आन सरदाराला कुटं सेनापती अस्तु व्हय? तुमच्यासाठी आम्ही रक्त सांडायचं आणि मुघलांचं नौकर म्हणून राहायचं, नुसतं नावाला सेनापती म्हणाय काय जातंय..", उसनं हसं आणत नेतोजीराव बोलून गेले.

"नेतोजीराव ssss ", राजांचा संताप अनावर झाला. अशी उद्दाम भाषा..! तीही राजांसमोर..! नेहमी नेतोजी काका म्हणणारे राजे आज एकेरीवर आले होते.

नेतोजींनी कमरेची समशेर काढून समोर फेकत म्हणाले, "हि घ्या तुमची सरनौबती...! बस झालं राजं... आता न्हाई. आता तुम्ही आन आमी मुघलांच नौकर..."

भर सदरेवर नेतोजींचे हे कृत्य राजांना सहन होणारे नव्हते. राजांच्या संयम सुटला.

"खामोssssश....."

धगधगत्या आगीतून अंगार बरसावे तसे राजांच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले.

"एक अवाक्षरही बोलाल तर गर्दन कलम केली जाईल. आत्ता.... या क्षणापासून... तुम्हाला सरनौबत पदावरून बडतर्फ करण्यात येत आहे. चालते व्हा आमच्या नजरे समोरून..."

"निघा ssssssss ."

नेतोजीही म्हणाले, "जातु... पर एक ध्यानात ठिवा राजं. नेतोजी म्हणत्यात मला. कळल समद्यास्नी येक दिस, ह्यो नेतोजी काय चीज हाय त्ये."

राजांना मुजरा न करताच नेतोजीराव गर्र्कन मागे वळले अन ताडताड चालू लागले. सदरेवरच्या पायऱ्या उतरले अन मागे वळून राजांकडे पाहिलं. राजे अजूनही नेतोजींकडे पाहत होते. डोळ्यांत राग आणि आगतिकता एकत्रच दिसत होती. नेत्र कडा पाण्यानं ओलावल्या होत्या. पण नजर अजूनही तशीच होती. भेदक. यांनतर पुन्हा राजांची भेट होईल न होईल. नेतोजींनी राजांची मूर्ती हृदयात साठवून घेतली. नेतोजींच्या डोळ्यांत किंचित पाणी तरळले.

गहिवरल्या स्वरात नेतोजी म्हणाले,
"राजं... ह्यो शेवटचा मुजरा राजं... "

"आता नेतोजीच्या नावानं पुन्हा मुजरा न्हाई..."

"आता या सवराज्यात नेतोजी पालकर म्हणून पुन्हा पाऊल न्हाई ..."

सदरेवरची सारी मंडळी शांत होती. हे काही घडेल याची कुणी कल्पना वा विचारही केला नव्हता. सुभेदार तानाजी मालुसरे, हे काय विपरीत घडलं म्हणून नेतोजीरावांकडे एक दोन पावलं गेले. तोच त्यांनी हाताने इशारा करत त्यांना थांबवलं.

आपल्या एका शब्दखातर, आपल्यावर असलेल्या विश्वासावर, स्वराज्याप्रति असलेल्या निस्सीम प्रेमाखातर आपले बलिदान द्यायला निघालेल्या नेतोजींकडे राजे अभिमानाने पाहत होते.

नेतोजी काका!

स्वराज्य स्थापने पासून बरोबर असलेले!

अफजल खान प्रसंगी गनिमांची पळताभुई थोडे करणारे!

सिद्दी जौहरचा वेढा फोडण्यासाठी रात्र रात्र जागून जीवाची बाजी लावणारे!

हरेक मोहिमेमध्ये प्रतिशिवाजी म्हणून वावरणारे!

काय काय म्हणून राजे आठवत होते. नेतोजींनी राजांना मुजरा केला. नकळत राजांचा हात हृदयापाशी आला. नेतोजीरावांनी राजांची मूर्ती आपल्या हृदयात साठवून घेतली. त्यांच्या डोळ्यांतून खळकन दोन थेम्ब खाली दगडी पायरीवर पडले.

एक राजांसाठी... अन एक स्वराज्यासाठी...

सदर रिकामी झाली. बराच वेळ राजे एकटेच आसनावर बसले होते. थाळ्यासाठी हुजऱ्या किती वेळा येऊन गेला, त्याकडेही राजांचं लक्ष नव्हतं. स्वराज्यासाठी अजून किती जणांना आहुती द्यावी लागणार आहे. याच विचारात राजे आसनावर बसले. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. राजांनी मोठ्या कष्टाने अश्रू आवरले. तानाजी, येसाजी यांनी नेतोजीरावांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. झाल्या चुकीची राजांकडे आम्ही मनधरणी करू पर असा तडकाफडकी काही चुकीचा निर्णय घेऊ नका. म्हणून नेतोजीरावांना खूप विनवण्या केल्या. पण त्यांनी आपला हेका सोडला नाही.

आपणाकडून आगळीक झाली होती. आणि त्याची भरपाई मावळ्यांच्या जीवाशी आणि खुद्द राजांच्या पराभवात झाली होती. आजपर्यंतच्या मोहिमांमध्ये असा मार, अशी माघार राजांनी कधीही घेतली नव्हती, कधीही पाहिली नव्हती. आपल्याला यायला उशीर झाला खरा पण कोकणातील आदिशाही ठाणं मारून बक्कळ पैसा हाती लागला होता. त्याच्या नादात राजांना कुमक करण्यासाठी उशीर झाला, हे कारण देणं कधीही रास्त नाही. सबब, नेतोजी शांतच राहिले.

मुक्कामाच्या ठिकाणी येताच नेतोजीरावांनी बिछान्यावर अंग टाकून दिलं. खोलीचे दरवाजे बंद करून घेतले ते थळ्यालाही उघडले नाहीत. मध्यरात्री कधीतरी नाईक त्यांना भेटून गेले. राजांचा निरोप मिळताच नेतोजीराव सुन्न झाले. ठरलेली मसलत आता कोणत्याही परिस्थितीत तडीस न्यायला पाहिजे, त्याशिवाय गत्यंतरच नाही. नाहीतरी आता कुडतोजीरावांना सारनोबती दिली होती. स्वराज्यात आपलं स्थानही आता उरलं नव्हतं.

पलंगावर पहुडलेले नेतोजीराव एक एक प्रसंग आठवू पाहत होते.

'राजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये मी सॊबत असायचो. प्रतापगडाच्या रणसंग्रामात अफजखानाच्या सैन्याची उडवलेली दाणादाण! त्यानंतर सात आठ महिने आदिशहाचे प्रदेश, किल्ले जिंकण्याची अविरत मोहीम. जौहरचा वेढा मोडून काढण्याचा प्रयत्न. शाहिस्तेखानावर टाकलेला छापा. बुर्हाणपूरची लूट! आणि पुरंदरचा तह! काय काय म्हणून आठवू!'

'ज्या ज्या किल्ल्यावर, प्रदेशावर मोहीम निघायची. तो तो किल्ला, प्रदेश स्वराज्यात सामील झालाच म्हणून समजा.! हार कधी नाहीच. पराजय कधी नाहीच. प्रत्येक मोहिमेमध्ये राजांची सावली बनून त्यांच्या बरोबर राहायचो. त्यांची प्रतिकृतीच जणू! माझा पराक्रम, लढाईतलं कसब, रणनीती पाहून स्वराजातील लोकंच काय तर मोगल, आदिलशाही सुद्धा आम्हाला प्रतिशिवाजी म्हणून ओळखू लागली होती! स्वराज्याचे दुसरे सेनापती! सरनौबत नेतोजी पालकर!'

पहाटे पहाटेच कोंबडा आरवायच्या आधीच नेतोजीरावांनी दोन तीनशे मावळ्यांसह गड सोडला. स्वराज्यासाठी खेळला जाणारा हा डाव नेतोजीरावांसाठी मात्र एक अग्निदिव्यच होते!

*****

|| जय शिवराय ||

क्रमशः

(पुढील भाग लवकरच...)