परवड भाग १६
त्या दिवशी अरविंदा सुनंदाच्या जुन्या झोपडीकड़े गेला,त्याचा अंदाज बरोबर ठरला.
सुनंदा तिच्या आधीच्या झोपडीत येऊन राहिली होती.
अरविंदाला बघताच सुनंदाने तोंड फिरवले.
तिच्या त्या वागण्याकडे दुर्लक्ष करून तो तिची समजूत काढू लागला, तिची विनवणी केली,तिला अक्षरश: हात जोडले;पण सुनंदा काहीएक ऐकायला तयार नव्हती! तिचा एकच हेका चालू होता...
“वसंता त्या घरात असेपर्यंत मी त्या घरात पाय ठेवणार नाही!”
अरविंदा हताश होऊन घरी परतला.
लग्न ठरवताना “आंधळ्या वसंताचे पालनपोषण मी स्वत:च्या मुलासारखे करीन.” असे सुनंदाने अरविंदाला वचन दिले होते;पण तो दिलेला शब्द तिने आता मोडला होता!
अरविंदाचे मित्र-देशमाने लग्न ठरवताना बरोबर होते किंबहुना त्या दोघांचा हा नवा डाव सुरू करण्यात देशामानेंनी महत्वाची भूमिका बजावलेली होती.
आताही अरविंदा पुढे काय करावे हे सुचत नसल्याने देशमानेंकडे गेला.
अरविंदाच्या आयुष्यात घडलेल्या या नव्या इपिसोडची कथा ऐकून देशमानेनीही डोक्याला हात लावला!
"माणसाच्या आयुष्यात कधी कधी वाईट काळ येतो;पण तो दुर्दशेचा काळ फार काळ टिकत नाही, रात्रीनंतर दिवस उगवतोच, असे अनेकदा त्यांनी ऐकले व वाचले होते:पण इथे अरविंदाच्या जीवनात मात्र थोडीशी उजेडाची तिरीप दिसते ना दिसते तोच घनघोर अंधार पसरत होता!"
“अरविंदाइतका फुटक्या नशिबाचा दुसरा माणूस त्यांनी अद्याप पाहिला नव्हता!”
देशमाने तिची समजूत काढण्यासाठी स्वत: सुनंदाला भेटायला गेले. सोबत अरविंदाही होता.सुनंदा अजून गुश्शातच होती.
देशमानेनाही सुनंदाने चार खडे बोल सुनावले आणि वसंता घरात असेपर्यंत घरी यायला साफ नकार दिला....
आपल्या मध्यस्तीचा काहीच उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर देशमाने अजून कशी अरविंदाला मदत करता येईल, यावर विचार करायला लागले.....
अरविंदा सुनंदाच्या संपूर्ण कह्यात गेलेला आहे आणि वसंताबद्दल त्याला आता पूर्वीसारखी आपुलकी राहिलेली नाही हे त्यांनी मधल्या काळातल्या त्याच्या वागण्याबोलण्यावरून जाणले होते, त्यामुळे वसंताला वेगळ्या ठिकाणी ठेवले तर त्याचा प्रश्न सुटणार होता.
त्या दृष्टीने विचार केल्यावर त्यांना हायवेवर अंधअपंगासाठी असलेल्या सेवाभावी आश्रमाचा मार्ग वसंतासाठी योग्य वाटला.
देशमानेनी ताबडतोब अरविंदाला त्या आश्रमात वसंताला ठेवण्याबद्दल सुचवले.
वसंता वाईट असला तरी तो अरविंदाचा लाडका होता.आपल्या पोटच्या गोळ्याला आश्रमात ठेवायची कल्पना ऐकून अरविंदा मोठया पेचात पडला होता....
“खूप दिवसांनी सुरळीत झालेले आयुष्य पुन्हा बिघडले होते.या वसंतामुळेच मोठ्या प्रयत्नाने मांडलेला आयुष्यातला हा नवा डाव असा अर्ध्यात मोडायची वेळ आली आहे. किती दिवस आपण वसंतात अडकून पडायचे? वसंताला त्याच्या नशिबावर सोडून द्यावे का? आपले अजून अख्खे आयुष्य समोर आहे! त्याच्याबाबतीत काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागणार आहे! काय करावे? सुनंदा की वसंता? कशाला महत्व द्यावे?”
अरविंदा खूप वेळ स्वत:शी विचार करत राहिला आणि.....
एका क्षणी त्याचा निर्णय पक्का झाला.....
“सुनंदाचे म्हणने मानायचे! वसंताला आश्रमात सोडायचे!”
त्याने स्वत:च्या सुखाला झुकते माप दिले.त्याच्यातला बाप जरी द्विधा मनस्थितीत होता तरी त्याच्यातल्या पुरुषाने मात्र त्याच्या सोयीचा निर्णय घेवून टाकला होता! या उतारवयात सुनंदाशिवाय एकटे रहायचे ही कल्पनाच त्याला आता सहन होत नव्हती!
"बस्स, ठरले,वसंताला आश्रमात ठेवायचे,आश्रमाची किती का फी असेना,ती आपण भरू शकतो!"
ताबडतोब त्या आश्रमात जावून त्याने चौकशी केली. प्रवेशासाठीचे सर्व सोपस्कार समजून घेतले व तो कामाला लागला.
आश्रमाचे संचालक अत्यंत चांगले होते त्यानी अरविंदाची समस्या समजून घेतली व वसंताची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली त्याला धीरही दिला.
“ आजच्या आज वसंताला आश्रमात सोडून यायचे आणि सुनंदाला आजच घरी घेवून यायचे!”
अचानक अरविंदाला वेळेचे भान आले....
विचारांत हरवलेला अरविंदा भानावर आला.
आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून तो पुटपुटला ...
.”बापरे,खूप वेळ झाला,आता निघायला हव.”
त्याने एका हातात त्या दुर्दैवी अंध वसंताचा हात धरला.दुसऱ्या हातात त्याची बैग घेतली आणि त्याला ओढतच घराबाहेर पडला.....आश्रमात सोडण्यासाठी .....
वसंता डोळ्यासमोरच्या अंधारात चाचपडत, आपला बाप नेईल तिकडे पाय ओढत निघाला....
नाही तरी त्याच्यासमोर दुसरा काय पर्याय होता?
नियतीने त्याच्यासाठी मांडलेल्या नव्या खेळात होरपळण्यासाठी वसंता आता सिद्ध झाला होता....
दोन जिवांच्या जगण्याची नवी परवड सुरु झाली होती!
-----समाप्त-----
(या कथेतील सर्व पात्रे, घटना या काल्पनिक आहेत,कुणाच्या वास्तविक जीवनातील घटनांशी या कथेचा कोणताही संबंध नाही, यातील प्रसंगांचे कुणाच्याही जीवनाशी काही साम्य आढळले तर तो केवळ योगायोग समजावा.)
प्रल्हाद दुधाळ ,
५/९ रुणवाल पार्क,मार्केट यार्ड पुणे ४११०३७.
(९४२३०१२०२०)