ek patra putlyache in Marathi Letter by Nagesh S Shewalkar books and stories PDF | एक पत्र पुतळ्याचे

Featured Books
Categories
Share

एक पत्र पुतळ्याचे

एक पत्र पुतळ्यांचे !
प्रति,
अतिप्रिय भक्तांनो,
नाही. अभिवादन स्वरूप काहीही लिहणार नाही. कारण त्यावरून तुम्ही सरळ आमच्या जातीवर जाल. आम्हाला धर्माच्या वेष्टनात बांधून मोकळे व्हाल. नाही तरी आमच्यासारख्या महात्म्यांना, समाजसुधारकांना तुम्ही जाती-धर्मात वाटून घेतले आहेच. एक स्पष्टपणे सांगतो की, आम्ही सारे पुतळे एकत्रितपणे हा संवाद साधत आहोत. पाण्याला रंग नसतो परंतु धर्माला असतो. वेगवेगळे रंग देऊन तुम्ही जाती-धर्माची विभागणी केली आहे. नशीब पाण्याचे बलवत्तर की, तुम्ही अजून त्याला कोणता रंग दिला नाही. परंतु शिवाशिवीच्या जोखडात तुम्ही पाण्यालाही बांधून ठेवले आहेच की.
अरे, काय अवस्था केली आहे या तुमच्या व्यवस्थेने आम्हा महापुरुषांची! दगडांचे पुतळेच करून टाकलेत आमचे. जिवंत असताना कधी सुखाचे चार घास खाऊ दिले नाहीत की, कधी शांतपणे झोपू दिले नाही. मरणोत्तर तरी सुखाचे काही क्षण जगता येतील असे वाटले होते परंतु तेही आमच्या नशिबी नाही. स्वर्गात असूनही कधीच स्वर्गीय सुखाचा आनंद लुटता येत नाही. अधूनमधून स्वर्गासारख्या सुंदर असणाऱ्या आपल्या भूमीला तुम्ही नरक केलेले असूनही आम्हाला यावेच लागते. आमची होणारी हेळसांड, विटंबना, दुरावस्था उघड्या डोळ्यांनी पाहावीच लागते. अरे, काय एक एक प्रकार तुम्ही शोधलेत रे बाबांनो. कुणी आमची तोडफोड करते, कुणी उपटसुंभ जोड्याचा हार घालतो, कुणी डांबर टाकते तर कुणी माथेफिरू शाई टाकतो. मग अशा कारणांमुळे तुम्ही वेगवेगळ्या जातीचे-धर्माचे लोक एकमेकांच्या जीवावर उठता. एकमेकांची डोकी फोडता, हातपाय तोडून अधूअपंग करता. एकमेकांचे संसार उद्ध्वस्त करताना सधवांना विधवा करता. चिमुकल्यांचे छत्र हिरावून घेता. हेच शिकवले होते आम्ही तुम्हाला?ज्या धर्माची तुम्हाला एवढी चाड आहे, अभिमान आणि गर्व आहे तो धर्म अशी शिकवण देतो? निरपराध लोकांना जखमी करण्याची, संसारातून उठविण्याचे सांगतो? एरव्ही धर्माची शिकवण आठवत नाही तुम्हाला, पण कुणी तुमच्या धर्माबद्दल बोलले, पुतळ्यांची विटंबना केली की, तुमची अस्मिता जागी होते, तुमचा अहंकार दुखावतो आणि सुरू होतो मग नंगानाच! हिच आहे का तुमच्या प्रिय धर्माची शिकवण? आमच्या सारखे निर्जीव पुतळे तुमच्या एकमेकांवरील रागाचे, रोषाचे, संतापाचे बदल्याचे बळी ठरतात. का एकमेकांच्या जीवावर उठता? का आम्हाला वेठीस धरता?
फार मोठा पुळका येतोय ना आमचा. वाजतगाजत, नाचत-गात आम्हाला मोठ्या आनंदाने बसवता. पण कुठे? चौकात, गावाबाहेर, उघड्यावर? हिच का रे आमची जागा? तुमच्या मनात आमच्या बाबतीत एवढा पुळका, कळवळा असेल, भक्ती असेल तर मग आमची जागा उघड्यावर? फार तर एखादे छोटे छत्र डोक्यावर? या छत्राखाली आम्ही सुरक्षित असतो? उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून करते ते छत्र आमचे संरक्षण? आम्ही अशा नैसर्गिक परिस्थितीचा सामना करत असताना तुम्ही स्वतः मात्र संरक्षित ठिकाणी दडून बसलेले असता. ही आमची विटंबना नाही का? हा आमचा अपमान नाही का? थंडी, उन, पाऊस, वारा आम्ही का सोसावा? एक क्षण लाइट गेले तर काय अवस्था होते तुमची? पंखा,कुलर,ए. सी. या वाचून जीव जातो तुमचा. मग आमचीच का दुरावस्था? अनेक मंदिरं, प्रार्थना स्थळं वातानुकुलीत आहेत. भव्य इमारती आहेत. मग आमच्या नशिबी उघड्यावरचा संसार का? कधी हा विचार केलाय? एक्का-दुक्का पुतळ्यांना भव्य इमारत, वातानुकुलीत व्यवस्था आहे. तर मग भक्तांनो, सर्व पुतळ्यांना किमान संरक्षक भिंत आणि डोक्यावर भव्य छताची व्यवस्था तर करा. देव मानता ना आम्हाला? भक्तिभावाने पूजा करता ना आमची? मग भेदभाव का करता? रात्रीच्या अंधारात कोण आमच्या दिशेने काय फेकतो हे आहे तुम्हाला माहित? अनेक ठिकाणी आम्हाला जयंतीला घातलेले हार पुण्यतिथीला आणि पुण्यतिथीनिमित्त अर्पण केलेले हार जयंतीला काढले जातात. वाळलेले हार घालून आम्ही महिनो न महिने का बसायचे? इथे बरे तुमची अस्मिता दुखावल्या जात नाही. साफसफाईच्या नावाने बोंबाबोंबच की. विशिष्ट दिवस आणि अधूनमधून होणारी सफाई सोडली तर रोजच्या कचऱ्याचे काय? स्वतः च्या घरात असा कचरा, अस्वच्छता चालते तुम्हाला? मग घरातील स्वच्छतेप्रमाणे पुतळा परिसराची स्वच्छता नित्यनेमाने कधी होणार? दुसऱ्या जाती-धर्माच्या माणसाने आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले की, संतापाने चेहरा फुलतो तुमचा. अपमान जिव्हारी लागतो तुमच्या. मग तुम्ही स्वजातीय आमची जी अव्यवस्था करता त्याचे काय? तो अपमान नाही? ती विटंबना नाही? कधी कधी संकटकाळी आमच्याशी संवाद साधता, तुमची सुख-दु:ख, गाऱ्हाणी आमच्या समोर मांडता म्हणून हा संवाद प्रपंच करतोय. तुमच्यातील जातीद्वेष, धर्मभेद बाहेर पडावा म्हणून.
इतर जातीच्या लोकांचे रक्त सांडतांना तुम्हाला काही कसे वाटत नाही? समोरच्या माणसाचे डोके फुटले, हातपाय तुटले, त्याच्या शरीरातून रक्ताचे पाट वाहायला लागले की, असुरी आनंद होतो तुम्हाला. झेंड्याचे रंग तर वाटून घेतले तसे रक्ताला रंग द्या.आणि ते आपापसात वाटून घ्या. दंगलीत सांडलेल्या रक्तावरुन तरी लक्षात येईल की, कोणत्या रंगाचे अर्थात कोणत्या जातीचे रक्त जास्त सांडलेय ते. त्यावरून अजून एक लक्षात येईल की विजय कुणाचा झालाय? करू शकता का अशी व्यवस्था? हे मानवांनो, तुम्हाला आमचा पुळका कधी येतोय तर आमची जयंती, पुण्यतिथी, आणि निवडणुकीत विजय झाला की. नाही तर एरव्ही भयाण शांतता! आमच्यावर एवढी भक्ती आहे ना, मग आमची जयंती, पुण्यतिथी असताना निधी का गोळा करता? स्वखर्चाने का आनंद व्यक्त करत नाहीत? वर्गणी जमा करताना जोरजबरदस्ती का करता? तुमच्या गुंडगिरीला, दहशतीला घाबरून अनेक लोक नाखुशीने निधी देतात. परंतु तुमच्या पश्चात ते लोक काय बोलतात हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला? वर्गणी घेऊन तुम्ही निघून गेल्यावर तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहताना आमचाही उद्धार करतात. मग का करावा असा उत्सव? अरे, उत्सव म्हणजे मांगल्याचा क्षण! आनंदी क्षण! मग अशा आनंदी वातावरणात वर्गणीचे विरजन का घालावे? अशाच गुंडगिरीमुळे संधी मिळताच परधर्मीय हमला करतात. त्यावेळी अपमान करण्यासाठी, बदला घेण्यासाठी आम्ही चौका-चौकात असतो की. त्यावेळी होते आमची विटंबना, अपमान! एकाने आमच्यावर सूड उगवला की, दुसऱ्या जातीचे बदला घेण्यासाठी दुसऱ्या पुतळ्याची निवड करतात.
आम्ही सर्वधर्मीय पुतळे सर्व जाती-धर्माच्या भक्तांना विनंती करतो की, सोडा हे जातीपातीचे, धर्माचे भांडण, राजकारण्यांचे राजकारण. विसरा सारे. एक व्हा. तुम्हाला वेळोवेळी का भडकावले जाते याचा बारकाईने विचार करा. तुमच्या चितेच्या ज्वालावर जर कुणी स्वतःच्या पोळ्या भाजून घेत असेल तर जागे व्हा. एकत्र येऊन मुकाबला करा अन्यायाचा. सामना करा भ्रष्टाचाराचा. मूठमाती द्या स्वार्थाला. तिरस्कार करा घाणेरड्या राजकारणाचा. स्वच्छ, प्रामाणिक, स्वातंत्र्याचा श्वास घ्या. मुक्त करा आम्हाला जात-धर्म यातून. बनवू नका, बसवू नका आमचे पुतळे उघड्यावर... कराल एवढे?....
तुमचे सर्वांचे लाडके,
सर्व धर्माचे पुतळे...
०००
नागेश सू. शेवाळकर