एका वृक्षाचे मनोगत......!
नमस्कार सर्व मानव जातींना.
मी एक झाड बोलतोय. या पृथ्वीवर सर्व मानवजातीला, सर्व प्रकारच्या वृक्षांच्या प्रजातींना, सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातींना, पक्षांना आणि जैवविविधता राखणाऱ्या घटकांचा समान अधिकार आहे. पण आज माझ्यासारख्या झाडांचे, प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ते पण एका मानव जातीमुळे. मानवांनी या सृष्टीवर अधिराज्य गाजविण्याचा स्पर्धेत आम्हा झाडांना नामशेष करण्याचे धोरण मानव राबवित आहे. पृथ्वीच्या नैसर्गिक सौंदर्याला आज कुठेतरी खीळ बसत आहे.
मी एक झाड म्हणून बोलताना सतत माझ्या मनात प्रश्न येतो की, आम्ही सर्व प्राणी, पक्षी, जीवजंतू या काळ्या आईचे लेकरेच आहोत न ! पण आम्हीच सर्व पृथ्वीला समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. तरी पण आमचं अस्तित्व धोक्यात आहे. आम्हीच नष्ट झालो तर संपूर्ण पृथ्वी समुद्रात सामावून जाईल.
या मानवजातीने पृथ्वीला बंजर बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आज शेतीतून उत्पन्न होत नाही. शेतात असलेल्या बांधावर आज झाडे दिसत नाही. रासायनिक खताचा भडिमार करून जमिनीचे पोत घसरत आहे.
एक झाड म्हणून सांगताना खंत वाटते की, मी परोपकारी वृक्ष असूनही माझी जाणीव कुणालाही कशी नाही बरं ! आज माझ्यामुळे मानवाला घर बांधण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, फर्निचर बनविण्यासाठी, शेतात लागणारे अवजारे बनविण्यासाठी, फळे-फुले यासारख्या अनेक उपयोगी घटकांसाठी माझाच वापर करत होते. आज वापर करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. तरीपण मानव बुद्धीचा वापर करताना दिसत नाही. त्यांच्यात वृक्षसंवर्धनाची भावना केव्हा जागृत होईल.
या पृथ्वीवर वृक्षच नसता, तर सृष्टी कशी दिसली असती. त्यांचे विचार येणे आवश्यक आहे.एकही झाड जमिनीवर उगवले नसते, तर मानवाला शुद्ध ऑक्सिजन कसे मिळाले असते. तापमानात कित्येक पटीने वाढ झाली असती. नदी नाले ओस पडलेल्या दिसल्या असत्या. पाण्याचा एक अंश दिसला नसता. आणि माणूस काय पिऊन जगला असता. प्राण्यांच्या अस्तित्वाला कित्येकपटीने धोका निर्माण झाला असता.
सृष्टीची निर्मिती कशासाठी झाली आहे. ह्या गोष्टीचा विचार करताना झाड म्हणून बोलताना मला असे जाणवते की, भूतलावर असा एकही घटक नसेल त्यांना वृक्षांची गरज भासली नसेल.
सृष्टीच्या नियमाच्या घटकांचा अभ्यास करताना एकमेव घटकांच्या मागे पृथ्वी आज आपल्याला दिसत आहे. ते म्हणजे "मी" वृक्ष होय. कारण असे की, पृथ्वीवर झाडांच्या संख्येमुळे स्थिर होती. समतोल राखून होती. आज तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याला कारणीभूत झाडांची संख्या कमी असल्यामुळे तापमानाची आद्रता कमी होत नाही. उलट वाढत जाते.
आज पावसाळा सुरू झाला, तरीपण पावसाचा एक थेंबही पाणी जमिनीवर पडलेला दिसत नाही. कारण झाडे नसल्यामुळे पोषक असे वातावरण निर्माण होत नाही. आणि पाऊस आपल्या भागात पडत नाही.
झाड म्हणून बोलताना सांगावे असे वाटते की, वीस ते पंचवीस वर्षाच्या अगोदरच्या काळात विचार केला, तर आपापल्या गावात विहिरीद्वारे लोक पाणी आणत होती. पण आज वृक्षांचे अस्तित्वच गावात नसल्यामुळे पाणी झाडांच्या मुळाशी मुरणार कसे. आणि तेच पाणी उन्हाळ्यात भेटणार कसे. म्हणून आज तुम्हा लोकांना टँकरने पाणी आणावे लागते.
आजच्या काळात तुम्ही लोकांनी बोरवेल खोदून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जमिनीत असलेली पाण्याची पातळी नामशेष झालेली आहे, तर पाणी येणार कुठून. शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे. पाऊस नाही आणि बोरवेलमध्येही पाणी नाही. त्यामुळे सतत पाच वर्षापासून मानव सदृश्य दुष्काळ आपल्याला दिसत आहे. आज प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर झाडे लावली, तर कोरडा दुष्काळ पाहण्याची वेळ येणार नाही आणि शेती सारखे दुसरे साधन दिसणार नाही. शेतकऱ्यांची शेती नापीक झाली आहे. त्यात पावसाचे पाणी जिरत नाही, ओलावा टिकून राहत नाही, पाण्याचा निचरा होत नाही, जमीन ताठर बनत चालली आहे. यासाठी झाडे आवश्यक आहे.
आज नदी, नाले, तलाव ओस पडलेली आहे. नदीत वाळूचा उपसा अतोनात होत आहे. तलावाचे खोलीकरण होत नाही. नाल्यातील गाळ साचलेला असल्यामुळे पाणी थांबत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. ते पाणी जमिनीत मुरवू शकतात. त्यासाठी झाडाची गरज आहे. नदीच्या दोन्ही बाजूने झाडे लावले पाहिजे.
मी एक झाड म्हणून बोलताना असे वाटते की, आज तरी या माणसांनी माझी जपवणूक केली, तर उद्याचे भविष्य त्यांच्या मुलाबाळांना शुद्ध हवा, शुद्ध ऑक्सिजन, प्रदूषणमुक्त वातावरण आणि सुदृढ माणूस म्हणून जगताना पहायला दिसेल.
म्हणूनच म्हणतो की,
झाड आहे म्हणून सृष्टी आहे.
पृथ्वी आहे म्हणून मानव आहे.
सृष्टीचा आणि पृथ्वीचा दुवा म्हणजे झाड आहे.
निसर्गाच्या सानिध्यात झाडा तुझी सावली हवी.
मानवाच्या उन्नतीला झाडा तुझी साथ हवी.
मारोती बाबाराव डोंगे
मु. पो. कोरपना त. कोरपना
जि. चंद्रपूर
9765015508