सीमा खूपच घाईत घरातून बाहेर पडली. ऑफिसला आज उशीर होतो की काय असच वाटत होतं तिला सारखं..अविही आज लवकरच निघून गेला त्यामूळे हीला एकटीलाच मोपेड घेउन निघाव लागलं. आज कॉर्पोरेट ऑफिसची लोकं येणार होती त्यांच्या ब्रांचमधे भेट देण्यासाठी. तिने बरीच तयारी करून ठेवली होती कालच. प्रोजेक्ट मॉडेलही तयार केलं होतं दाखवायला. ती ऑफिसला आली आणि काही क्षणातच कॉर्पोरेट ऑफिसची लोकं आली. इतर विभागाची पाहणी करून ती सीमाच्या केबिन मधे आली. सीमाने त्यांना तिच्या प्रोजेक्टच मॉडेल दाखवलं आणि संपूर्ण तपशीलवार माहिती दिली. सर्वांनाच प्रोजेक्ट आवडला. सहमतीही मिळाली तिच्या प्रोजेक्टला. सीमा हुशार होती कामात त्यामुळे तीला दोनच वर्षांत बढती मिळाली होती ऑफिसमधे.
सीमाला का कोण जाणे आज सारखीच आईची आठवण येत होती. तिचं आजच काम तसंही संपलच होतं. ती ऑफिसमधून बाहेर पडली आणि सरळ आईच घर गाठलं तिने. दारातली जाई सूकल्या सारखी वाटत होती तिला आज. तूळसही वाळू लागल्यासारखी वाटली. तिने घराकडे पाहिलं तर घराला कुलूप. सीमा दचकलीच एकदम. बाजूच्या भामामावशींकडे विचारायला गेली तर तिला पाहताच त्या रडू लागल्या म्हणाल्या अगं किती फोन केले तूला माझ्या मुलाने सूधीरने तू फोनच नाही उचललास. तो सुमनबाईंना घेऊन दवाखान्यात गेलाय तासभर झाला असेल. त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं अग आणि अचानक दरदरून घाम फुटला गं त्यांना मी नेमकीच चहा घेऊन गेले होते त्यांच्यासाठी आणि पाहते तो त्यांची अशी अवस्था. लगेच सुधीरला आवाज दिला आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेला तो लगेच. जा लवकर पोरी बघ बर त्यांना काय झालय काही फोन नाही गं सूधीरचा काळजी वाटतेय मला.
सीमा धावतच दवाखान्यात आली. सूधीर तीला पाहताच धावला. अश्रू पुसत म्हणाला, ताई तूला उशीर झाला यायला. सूमनमावशी गेली. तिला हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरांनी काही करायच्या आतच असं झाल. सीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. तीने एकच टाहो फोडला. एक गोष्ट तिला आतून खात राहीली की आईला ती शेवटची भेटूही नाही शकली. ती तिच्याच विश्वात आणि त्या कॉर्पोरेटच्या विळख्यात अडकली.
आईचे सर्व शेवटचे विधी अविने पुर्ण केले कारण सीमा एकुलती एक लेक आणि सीमाचे बाबा दोन वर्षांपूर्वीच वारले होते. सीमा आणि अविने असंख्यवेळा सूमनबाईंना त्यांच्या घरी रहायला येण्याचे सूचवले पण त्यांनी कायम नकार दिला कारण त्यांना सीमाच्या बाबांच्या आठवणीचा ठेवा असलेलं ते घर सोडून कुठेही जायचं नव्हत.
सर्व नातेवाईक जाताच सीमाने अविलाही घरी पाठवून दिलं आणि ती आईच्या घरीच थांबली. तिला वाटलं जरा आईच्या जाईला पुन्हा फुलवावं. दारातली तुळस तिलाही जरा टवटवीत करून जाव कारण आईचा फार जीव होता या सर्वांत. आई घरही नेहमी नीटनेटकं स्वच्छ ठेवायची. दूपारचा वाफाळता चहा घ्यावा म्हणून सीमा उठली. साखरेच्या छोट्या डब्यातील साखर संपली म्हणून तीने मोठ कपाट उघडलं. साखर पाहण्यासाठी म्हणून डबा उघडला तर त्यात आईने सीमासाठी बनवलेल्या नारळाच्या वड्या दिसल्या. आणि त्या वड्या पाहून सीमाच्या अश्रूंचा बांध फुटला. तीला एकदम आठवलं आईचा जाण्यापूर्वी दोन दिवस आधीच फोन आला होता सीमाला ती प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त होती. आई तीला म्हणाली बबडे ये न गं आज आॅफिसमधून इकडेच गंमत केलीए तूझ्या आवडीची तुझ्यासाठी. तूला खूप पहावस वाटतय गं. पण सीमा काम आहे नंतर येईल असं म्हणाली आणि हे च संभाषण त्यांच्यातलं शेवटचं ठरलं.
हीच ती गंमत जी आईने केली होती सीमासाठी. आई तू शेवटपर्यंत देतच राहीलीस ग कायम माझ्या आवडीचा विचार करत राहीलीस पण शेवटची न भेटताच जाता जाताही ही नारळाच्या वड्यांची आशिर्वादरूपी भेट मला देऊन गेलीस. पण ती भेट राहून गेली गं आई आपली शेवटची. एक वडी तोंडात घालून सीमा कितीतरी वेळ चघळत राहीली. कदाचित त्या नारळाच्या वडीच्या माध्यमातून ती आईला भेटत होती... शेवटचंच.....
विद्या कुलकर्णी-उन्हाळे