एक पत्र सायकल या सखीला!
प्रिय सखी... सायकल!
ट्रिंग... ट्रिंग... हे घंटीच्या आवाजाने केलेले अभिवादन !
मी १५ आॅक्टोबर १९८१ या दिवशी केंद्रीय प्राथमिक शाळा खरवड ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे सहशिक्षक या पदावर हजर झालो. कळमनुरी ते खरवड हे अंतर तब्बल पंधरा किलोमीटर! त्या काळात ना ऑटो, ना जीप, ना अन्य कोणते खाजगी वाहन, सारा कारभार महामंडळावर अवलंबून! माझ्यासोबत माझी आजारी आई आणि तरूण बहीण त्यामुळे खेड्यात घर करणे शक्य नव्हते. सोबतचे दोन शिक्षक सायकलवर म्हणजे तुझ्या संगतीने जाणे येणे करीत असल्याने मी त्यांच्यामध्ये सामील झालो. मात्र तुझ्यासोबत नित्यनेमाने शाळेला जाणे-येणे सुरू होताच त्याचे परिणाम जाणवू लागले. कळमनुरीहून जाणारा अकोला - हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताच सुरू होणाऱ्या तेरा किलोमीटरच्या जोडरस्त्यावर जीव हातात घेऊन जावे लागे. रस्ता खडकाळ आणि खड्डे असलेला. एक खड्डा किंवा एखादा दगड चुकवावा म्हटलं तर दहा खड्डे 'आ' वासून तयार तर दहा दगड अंगावर चाल करुन यायच्या अवस्थेत! हवा हमखास जाता येता समोरून आक्रमण करीत असे. अशा स्थितीत सायकल तुला चालवताना श्वास वर होतो की, काय अशी अवस्था! चौदा - पंधरा किलोमीटरचे अंतर पार करणे म्हणजे डोंगर चढून जाण्याप्रमाणे! पण इलाज नव्हता आईच्या औषधोपचारासाठी हे करावेच लागते होते. महामंडळाच्या बसने जावे तर ती बस अकरा नंतर पोहोचायची. शाळा दहा वाजता सुरु होई. त्यामुळे बसचा उपयोग नसे. एक गोष्ट मात्र, आनंददायी असे. ती म्हणजे, तुझ्यासवे दगडफोड आणि उरफुटा प्रवास करून गेल्यावर संभामामाच्या एकावेळी फारतर पाच माणसं पोत्यावर बसतील अशा कळकट, मळकट हॉटेलमध्ये गरमागरम भज्यांची चव काही वेगळीच स्फूर्ती शरीरामध्ये भरत असे. तुझ्यावर स्वार होऊन केलेल्या प्रवासाचा सारा ताण काही क्षणातच निघून जात असे. इतर दिवसांपेक्षा पावसाळ्यात भरपूर त्रास होत असे. पाऊस पडला की, तू रूसून बसायची. तुझे तरी का खोटे होते? चिखलाचे गोळे दोन्ही मडगारमध्ये शिरून तुझी चाके जाम करीत असत. त्यामुळे तुझे दोन्ही मडगार काढून टाकण्याचा विचार केला आणि रविवारी दोन्ही मडगार काढून टाकले. एका अर्थाने हे सखी, तुझे दोन्ही हातच काढले की ग! सोमवारी सकाळी फार मोठा तीर मारल्याप्रमाणे तुझ्यावर स्वार होऊन ऐटीत शाळेत पोहोचलो. दुपारी तीनच्या सुमारास धुवाँधार पाऊस सुरु झाला. चार वाजता शाळा सुटेपर्यंत सर्वत्र पाणी आणि चिखल! सोबतच्या शिक्षकांनी त्यांच्या सख्यांची विशेष काळजी असल्याप्रमाणे त्यांच्या सायकली शाळेत ठेवल्या आणि नऊ किलोमीटर कच्च्या रस्ताने निघाले. मलाही चला म्हणाले. मी म्हणालो, मडगार काढले आहेत आणि पाऊसही थांबलाय. चिखलाचा त्रास होणार नाही. मी सायकलवर (तुझ्यावर) टांग मारली नि निघालो. केलेल्या प्रयोगाची फलश्रुती लगेच समोर आली. सखे, कदाचित तुझे मडगाररुपी हात काढून ठेवल्यामुळे तू प्रचंड रागावली होती की काय कारण जो चिखल मडगार अडवून ठेवायचे तोच चिखल आता जोराने दोन्ही बाजूने शरीरावर मारा करीत होता आणि कपड्यांचे रंग बदलत होता. कपडे सारे चिखलाने भरून गेले. आश्चर्य म्हणजे जसा राष्ट्रीय महामार्गावर आलो तसे पावसाचे नामोनिशान नव्हते. सारा परिसर कोरडाफट होता. आजूबाजूने जाणारे माझ्या अवताराकडे बघून हसत होते. कळमनुरी शहरालगत एक ओढा होता. तिथे सखे तुला मनसोक्त आंघोळ घातली, धुतली. कपड्यांवरील चिखलही धुतला. चिखलाची माती बरीच निघाली परंतु डाग आणि रंग तसाच राहिला. लोकांच्या डोळ्यातील विविध भाव अनुभवत घरी पोहोचलो. स्नान करून, स्वच्छ कपडे घालून तुला घेऊन दुकानात गेलो आणि पुन्हा तुझे हात... दोन्ही मडगार बसवून घेऊन आलो.
अशा परिस्थितीत खरवड येथे चार वर्षे काढली. नंतर लग्न झाले. पत्नी नांदेड जिल्ह्यात शिक्षिका होती. आमचे दोन्ही शाळांचे अंतर शंभर किलोमीटर होते. एका वर्षाने सौ. ची बदली माझ्या शाळेपासून म्हणजे दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर झाली तरीही अंतर तीस किलोमीटर! पत्नीच्या नोकरीच्या गावी राहून मी जाणे येणे करू लागलो. बारा किलोमीटर अंतर कापण्यासाठी सायकलरुपी जीवाभावाची सखी होती. त्या फाट्यावर तुला ठेऊन पुढचा प्रवास मिळेल ते वाहन पकडून मी माझ्या शाळेस जात असे. अशी कसरत करत असताना आम्हा दोघांच्या शाळेचे अंतर पाच किलोमीटरवर आले...
जवळपास पंधरा वर्षे हे सायकले तू माझी सखी, माझी सावली बनून माझ्या सोबत होती. हवा कमी असणे, पंक्चर होणे, ब्रेक फेल होणे असे प्रकार होत असत परंतु, तू मला कधी पाडले नाही. एका पाठोपाठ एक माझ्या दोन्ही मुलांचा माझ्या शाळेत प्रवेश झाला. तीन किलोमीटर अंतरावरील माझ्या शाळेत त्यांची ने-आण करावी लागे. शाळेची माहिती देण्यासाठी, बैठकीला, पगार घेण्यासाठी सहा किलोमीटर अंतरावरील केंद्रीय शाळेत जायला लागे. त्यावेळी सहकारी शिक्षकाला डबलसीट न्यावे लागे. खरेतर हा तुझ्यावर अन्याय होता. तू माझी सखी होती पण मी तुझ्या पाठीवर अजून एका शिक्षकाचे ओझे लादून तुझा छळ करीत होतो. एक प्रसंग तर फार मजेशीर घडला. आता मजेशीर वाटतोय पण तो प्रसंग किती अवघड होता, किती यातनामय होता हे माझ्यासवे तुलाही आठवत असेल. एकदा सौभाग्यवतीला तिच्या शाळेत झेंडावंदनासाठी सोडण्यासाठी सकाळी सकाळी सहा वाजता सायकलवर आम्हा पती-पत्नीची डबलसीट 'प्रभातफेरी 'निघाली होती. यातनामय असला तरीही किती मजेशीर प्रसंग होता. एका सखीला मी घेऊन जात होतो तर माझी दुसरी सखी म्हणजे तू आम्हा दोघांना घेऊन जात होती. बायकोला सोडून मी माझ्या शाळेवर झेंडावंदनासाठी हजर झालो. आठवडी बाजार आणि महिन्याचे किराणा सामान सहा किलोमीटर अंतरावरील गावाहून आणताना होणारी कसरत आठवली की आजही अंगावर शहारे येतात. नंतर गॅस सिलिंडरसह सखे, तुझ्यासंगे केलेली यात्रा हा प्रवासही लक्षात राहिलाय बरे. हे सारे आठवले म्हणजे, बाप रे! एवढे सारे आपण केले ह्याचे आश्चर्य वाटते. पण, तू या प्रवासात माझ्यासंगे होती, मला भरभरून साथ दिली हे नाही विसरू शकत मी.
त्यानंतरचा काही वर्षांचा प्रवास हा मोटार सायकलवर करावा लागला. नंतर खाजगी वाहनांची साथ मिळाली. आता सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन्ही मुलांकडे चार चाकी वाहनं आहेत परंतु, अजूनही कुठे तरी ऱ्हदयाच्या कोपऱ्यात तू...माझी 'सखी' दडून बसली आहे.. ते म्हणतात ना, मनुष्य आयुष्यातील पहिले प्रेम, पहिली सखी आयुष्यभर विसरू शकत नाही अशीच काहीशी माझी अवस्था झाली आहे...
०००
नागेश सू शेवाळकर