मायाजाल - १०
त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये एक मोठं इमर्जन्सी ऑपरेशन होतं. त्यामुळे इंद्रजीतला रात्रीपर्यंत थांबावं लागलं. त्याला निघायला बराच उशीर झाला. निघाल्यापासून सतत त्याला वाटत होतं की; एक गाडी त्याच्या गाडीच्या मागे राहून त्याचा पाठलाग करीत होती. इंद्रजीतने गाडीचा स्पीड कधी वाढवला--कधी कमी केला, पण ती गाडी त्याची पाठ सोडत नव्हती..पण "हायवेवर--एवढ्या गर्दीच्या रस्त्यात हे शक्य नाही, मला भास होत असेल!" अशी त्याने मनाची समजूत घातली. अंधेरीपर्यंत त्याची गाडी हाय - वे वर होती. पाठलाग करणारी गाडी त्याच्या गाडीच्या मागे- त्याला दिसत होती. अंधेरीला इंद्रजीतने गाडी पण हाय - वे सोडून आत वळवली; आणि ती दुसरी गाडी दिसेनाशी झाली.
" ते माझ्या मनाचे खेळ होते! ती गाडी तिच्या मार्गाने पुढे गेली बहुतेक! मागच्या त्या प्रसंगापासून जरा काही झालं की संशय यायला लागतो-- भीती वाटायला लागते! माझा आत्मविश्वास डळमळायला लागलाय; हे काही बरं नाही! " इंद्रजीतने निश्वास सोडला.
पण थोड्या वेळातच त्याचा भ्रमनिरास झाला. एका निर्मनुष्य रस्त्यावर ती गाडी अचानक् पुढे येऊन उभी राहिली. इंद्रजीतचा रस्ता त्या गाडीने अडवला होता त्यामुळे गाडी थांबवून त्याला खाली उतरावं लागलं. त्या दुस-या गाडीतून चार आडदांड माणसे खाली उतरली. आणि इंद्रजीतच्या गाडीजवळ येऊ लागली. इंद्रजीत संतापून म्हणाला,
" मी मघापासून बघतोय! हे काय चालवलंय तुम्ही? मी हाॅस्पिटलमधून निघाल्यापासून तुम्ही माझ्या मागे आहात! तुम्ही माझा पाठलाग का करताय? आणि अाता माझा रस्ता का अडवलाय? आपण एकमेकांना ओळखतसुद्धा नाही! का त्रास देताय? चला! तुमची गाडी बाजूला घ्या! मला उशीर होतोय!" इंद्रजीत संतापून बोलत होता.
" तू आम्हाला ओळखत नाहीस; पण आम्ही तुला चांगलंच ओळखतो! आम्हाला एवढ्या लवकर विसरलास? एकदा आमच्या हातचा मार खाऊन तुझं समाधान झालं नाही! तुला ' त्या 'मुलीपासून दूर रहायला सांगितलं होतं; पण तू ऐकला नाहीस!" असे म्हणत त्यांनी गाडीतून हाॅकी स्टिक काढल्या; आणि इंद्रजीतला मारायला सुरुवात केली. इंद्रजीत प्रतिकार करत होता, पण चौघा धटिंगणांपुढे त्याची शक्ती तोकडी पडू लागली. शुद्ध हरपत असताना त्याने त्यांच्यापैकी एकाला बोलताना ऐकलं,
" गेल्या वेळी याला जपूनच फटकावलं होतं; कारण त्याने तशी ताकीद दिली होती! पण आता हा पायावर उभा राहता कामा नये ; त्याचा आदेशच आहे तसा!" शुद्ध हरपून खाली पडता- पडता इंद्रजीतने सायरनचा आवाज जवळ येताना ऐकला .
"पोलीस आले! पळा!" त्यांच्यापैकी एक जण ओरडला.
यानंतर इंद्रजीतला काही कळलं नाही. त्याच्या डोळ्यासमोर काळोख पसरला.
************
इंद्रजीत शुद्धीवर आला; तेव्हा तो हॉस्पिटल मध्ये होता. त्याचं अंग ठणकत होतं. अतीव वेदना होत होत्या. कालचा प्रसंग आठवला त्या माणसांमधलं संभाषण आठवलं, " हा पायावर उभे राहता कामा नये----" त्याच्या अंगावर शहारा आला आणि त्याने हातपाय हलवून पाहिले. हातपाय शाबूत आहेत याची खात्री पटली; तेव्हा त्याच्या जीवात जीव आला.
शुद्ध हरपत असता ऐकलेला पोलीस व्हॅनचा सायरन त्याला आठवला. पोलीस अगदी वेळेवर पोहोचले होते; नाहीतर काय झालं असतं, या विचारानेच इंद्रजीतच्या अंगावर शहारा आला! पोलीस तो शुद्धीवर कधी येतोय; याची वाटच पहात होते. काही वेळातच इन्स्पेक्टर त्याचं स्टेटमेंट घेण्यासाठी वाॅर्डमध्ये आले. पण त्यांना सांगण्यासारखं इंद्रजीतकडे काहीच नव्हतं. आपल्यावरचा हा दुसरा हल्ला आहे हे मात्र त्याने सांगितलं. हे कोण करत आहे याविषयी तो स्वतःच संभ्रमात होता, तर पोलिसांना काय सांगणार होता?
" माझं कोणाशी शत्रुत्व नाही. हे कोण करतंय याविषयी मला काहीही कल्पना नाही! गेल्या वेळी त्यांनी हल्ला केला तेव्हाही मी पोलिस - कम्प्लेंट केली होती." एवढंच तो सांगू शकला.
त्याला बघून प्रज्ञाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला रडताना बघून इंद्रजीत म्हणाला,
"घाबरू नकोस प्रज्ञा! मी ठीक आहे! पण आता मात्र हा जो कोणी आहे; त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही." त्याने तिला त्या गुंडांचं संभाषण सांगितलं. ते ऐकून ती अधिकच घाबरली,
"म्हणजे-- हे माझ्यामुळे होतंय? मी काय करू म्हणजे तुझा हा त्रास थांबेल?"
"तो माणूस कोण आहे हे आधी कळलं पाहिजे. तो किती दिवस लपून रहाणार? पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत.तो नक्कीच मिळेल! काळजी करू नकोस!" इंद्रजीतने तिला धीर दिला.
इंद्रजीतला माहित नव्हतं--- त्यादिवशी तिथे आलेल्या पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व गुंडांना पकडलं होतं. पोलीस - व्हॅन अनपेक्षितपणे आली; त्यामुळे ते पळून जाऊ शकले नव्हते. त्यांची चौकशी लाॅक-अपमध्ये पोलिसांच्या पद्धतीने चालू होती.
सुदैवानं इंद्रजीतला गंभीर दुखापत झाली नव्हती त्यामुळे त्याला लवकरच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.
प्रज्ञा त्याला भेटायला घरी गेली; तेव्हा त्याची आई तिला मिठी मारून रडू लागली.
" प्रज्ञा! तुला यात काही कळतंय का गं? कोण माझ्या इंद्रजीतच्या मागे लागलंय, त्याला काय हवंय; काही कळत नाही! त्याला घरातून बाहेर पडणं मुश्कील झालंय! माझ्या मुलाने कुणाचं काय बिघडवलंय?"
प्रज्ञाला मनातून अपराधी वाटत होतं! इंद्रजीतच्या या त्रासाला आपणच कारणीभूत आहोत अशी टोचणी तिच्या मनाला आता लागली होती.
-------***********---------
पोलीसांनी आपला खाक्या दाखवून गुंडांकडून सर्व काही वदवून घेतलं. या सर्व प्रकरणातला करविता धनी वेगळाच आहे; याची त्यांनी दिलेल्या माहितीवरून खात्री पटली होती. त्यांनी खरं सांगितलं आहे याची त्यांनी खात्री करून घेतली. त्या माणसाची माहिती काढायला सुरूवात केली.
एक दिवस इंद्रजीतला पोलीस चौकीतून फोन आला,
"तुम्ही पोलीस चौकीवर येऊ शकाल का? तुमच्या केसमधला मुख्य आरोपी मिळाला आहे! बघा तुमच्या ओळखीचा आहे का?" ते म्हणाले.
इंद्रजीत लगेच निघण्यासाठी तयार होऊ लागला.
"बाबा! मी जरा पोलिस स्टेशनवर जाऊन येतो. मला त्यांनी बोलावलंय!" तो अविनाशना म्हणाला.
" मी पण येतो तुझ्याबरोबर! इन्सपेक्टरशी बोलायचंय मला! " ते म्हणाले आणि त्याच्याबरोबर निघाले.
"बाबा! तुमची महत्वाची कामं असतील! तुम्ही कशाला वेळ फुकट घालवताय? मी ड्रायव्हरला घेऊन जाईन!" त्यांना या प्रकरणापासून दूर ठेवण्याच्या इराद्यानं मानव म्हणाला.
" गेल्या वेळी तुझ्यावर असाच हल्ला झाला होता! त्यावेळी तू मला लक्ष घालू दिलं नाहीस! आता मात्र मी ठरवलंय, हे प्रकरण काय आहे याचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. एखादा घाव वर्मी बसला असता तर? या सगळ्यामागे जो कोणी असेल, त्याला मी पाताळातूनही शोधून काढायला लावेन! चल मीही येतो तुझ्याबरोबर!" ते निग्रहाने म्हणाले.
पोलीस इन्सपेक्टर त्यांना ओळखत होते. एवढा मोठा उद्योगपती पोलीस -स्टेशनला आलाय हे पाहून ते म्हणाले, " साहेब! हा तुमचा मुलगा आहे हे मला हाॅस्पिटलमध्ये कळलं, आणि मी प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं. आमचा तपास चालू आहे. तुम्ही इथे यायची तसदी कशाला घेतली?
" माझ्या मुलावर हा दुसरा प्राणघातक हल्ला झालेला आहे. तो कधीच कोणाच्या आल्या- गेल्यात नसतो. तो डाॅक्टर आहे, आणि तो नेहमीच सगळ्यांच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा कोण माणूस त्याच्या मागे लागलाय? त्याला काय हवं हे त्याने समोर येऊन सांगावं. माझ्या मुलाच्या जीवावर का उठलाय हा? आज-काल इंद्रजीत घरातून बाहेर पडला तरी आम्हाला भीती वाटते. आणि कामं सोडून तो घरी किती दिवस बसणार? काहीतरी करा आणि या प्रकरणाचा लवकर शोध घ्या!" ते काकुळतीला येऊन इन्स्पेक्टरना विनंती करत होते.
” काळजी करू नका! आम्ही या प्रकरणाचा मुळापासून शोध घेण्याचा प्रयत्न करतोय! प्रथम आम्हाला वाटलं होतं, तुम्ही यशस्वी उद्योगपती आहात; त्यामुळे तुमच्या व्यवसायातला कोणी शत्रू तुम्हाला त्रास व्हावा; म्हणून हे करत असेल. पण तसं काही दिसत नाही. ते चारही हल्लेखोर आमच्या ताब्यात आहेत. त्यांचं तुमच्या मुलांशी काही वैर नाही. त्या चौघांचाही काही पोलीस रेकाॅर्ड नाही, त्यांच्याकडून कोणीतरी हे करून घेतोय! आम्ही आमच्या मित्रासाठी हे सगळं केलं; असं ते म्हणाले! तो माणूस कोण आहे; हे आम्ही त्यांच्याकडून काढून घेतलंय! पण इंद्रजीत त्याला ओळखतो का; हे आम्हाला पहायचं आहे. हे सगळं करण्यामागचा त्याचा हेतू कळला, की त्याच्याविरुद्ध स्ट्राँग केस आम्हाला तयार करता येईल! आम्ही त्याला इथे घेऊन येण्यासाठी आमची माणसं पाठवलेली आहेत. काही वेळातच त्याला घेऊन येतील! मोठ्या हुद्दयावरील काम करणारा- सुशिक्षित माणूस आहे! त्याला ह्या गुंडांच्या सांगण्यावरून आम्ही नाही पकडू शकत! जर इंद्रजीतने त्याला ओळखलं आणि तोच या प्रकरणाचा कर्ता-धर्ता आहे हे सिद्ध झालं तर त्याला आम्ही आमच्या कस्टडीत घेणार आहोत. काही वेळातच सगळं काही स्पष्ट होईल" .....
**********
पोलीस व्हॅनच्या सायरनचा आवाज जवळ येऊ लागला. व्हॅन पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबली. सगळ्यांचे डोळे गाडीतून उतरणा-या माणसांकडे रोखलेले होते. पण पोलीसांच्या गराड्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता. पोलिस आत आले; त्यांच्या बरोबर आलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हर्षद आहे हे पाहिलं; आणि इंद्रजीतचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना! तो ताडकन् उठून उभा राहिला.--- त्याच्या तोंडून शब्द निघाले,
"हर्षद तू?"----
------*******---- contd--- part XI